काश्मिरबद्दल अरूंधती रॉय : अनर्गल?
बुकर पारितोषक विजेत्या लेखिका आणि मानवी हक्क संरक्षण चळवळीच्या आघाडीच्या कार्यकर्त्या श्रीमती अरुंधती रॉय यांनी दिलेल्या एका मुलाखतीत "काश्मिरी लोकांना भारतापासून स्वातंत्र्य हवे असून भारतालाही काश्मिरपासून स्वातंत्र्य हवे आहे" असे विधान केले.
भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत काश्मिरात स्वातंत्र्याचा धोशा लावला जातोय.परशूराम, शारदापीठ, सिंधू नदी, काश्मिरचे मुस्लिमकरण, श्रीनगर, भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणी, टोळीवाल्यांबरोबरचे युद्ध, महाराजा हरीसिंग यांची शरणागती, काश्मिरची फाळणी आणि विलिनीकरण, प्रत्यक्ष ताबा रेषा, युनोतील ठराव, घटनेतील ३७०वे कलम, पाकिस्तानबरोबरची युद्धे, दहशतवादी हल्ले, हजरतबाल प्रकरण, काश्मिरी पंडितांचे शिरकाण आणि पलायन, भारतातील दहशतवादी हल्ले, कारगिल युद्ध, अमरनाथ यात्रा समिती भूभाग प्रकरण, जम्मू आणि काश्मिरमधील परस्परविरोधी उग्र निदर्शने, हुर्रियत नेते गिलानी यांचे पाकिस्तानात विलिन होण्याचे वक्तव्य या भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीवर अरुंधती रॉय यांचे हे वक्तव्य झालेले आहे.
काश्मिरातील परिस्थिती इतकी नाजूक आहे की गेल्या अनेक वर्षांचे प्रयत्न फोल ठरण्याची साधार भीती वाटत आहे. अशा परिस्थितीत स्वतःला बुद्धीवादी म्हणवणार्या लोकांकडून असे वक्तव्य होणे हे समजण्यापलिकडचे आहे.अरुंधती रॉय यांचा मानसिक तोल गेल्याने त्यांनी असे वक्तव्य केलेले असावे असे वाटत नाही. असे वक्तव्य केल्याने आपण भारताचा नोएम चॉम्स्की होऊ असे कदाचित त्यांना वाटत असावे.
मिपाकर हे संवेदनाशील असून ते नव्या आणि जुन्या विचारांचे, तरूण आणि म्हातार्या वयाचे, हसर्या आणि गंभीर चेहर्यांचे, हलक्याफुलक्या आणि सखोल मनाचे प्रतिनिधीच आहेत.या निमित्ताने समस्त मिपाकरांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घ्यावे असे मनात आले.
१. रॉय यांचे हे वक्तव्य अनर्गल आहे असे आपणास वाटते का? या वक्तव्याला कितपत महत्त्व द्यावे?
२. सदर वक्तव्य देशद्रोही आहे असे तुम्हाला वाटते काय? की ते 'भाषण स्वातंत्र्य' या भारतीय घटनेतील मूलभूत हक्काला धरूनच आहे?
३. काश्मिर हा भारताचा भाग स्वतंत्र व्हावा अथवा पाकिस्तानात जावा असे आपणास वाटते का?
४. काश्मिर भारतात राहिले नाही तर तुमच्या आयुष्यात काही फरक पडेल काय?
५. काश्मिर भारतातच रहावे असे आपणास वाटत असेल तर तसे होण्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहे काय?
६. भारतातील काही भाग भारतापासून स्वातंत्र्य देण्यालायक आहे असे तुम्हाला वाटते का? असेल तर कोणकोणता ?
७. भारतातील प्रत्येक भागास स्वतंत्र जनादेश घेऊन भारतात रहायचे की नाही हे ठरवू द्यावे काय?
८. 'काश्मिर घ्या, पण बरोबर यू.पी./ बिहार घ्या असे (१ + २ फ्री)' असे विनोदाने म्हणणेही आपल्याला मान्य आहे का?
या निमित्ताने यापेक्षा अन्य काही विचार समोर आले तर त्यांचे स्वागतच आहे.
वाचन
12944
प्रतिक्रिया
0