१५ ऑगस्ट ची दुपार झाली होती. सगळे सोसायटीच्या आवारातून ऑफीस कडे चालले होते.
"चला रे बसुया " च्या पाच सहा हाका आल्या आणि सगळे निघाले.
"काय रे साला नुसती फालतुगिरी आहे ही दरवर्षीची मीटिंग म्हणजे" , मी.
"अरे यार जाऊन बसुया तर सही" रमेश.
सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला आणि आणखी तो सोसायटीचा असला तर मीटिंग नावाची औपचारिकता झालीच पाहिजे . बरेच जण न जाणे का पण मीटिंग साठी खूपच उत्साही असतात . हि असली मंडळी फक्त मीटिंग साठीच उत्सुक असतात कामासाठी नाही! आणि अश्याच बर्याच जणांच्या एकापेक्षा एक फालतू आयडिया ऐकणे म्हणजे मीटिंग!! माझी आपली नकार घंटा सुरूच होती पण मित्रांबरोबर जाऊन बसावच लागलं. सोसायटीच ऑफिस म्हणजे एक छोटीशी खोली त्यात सात-आठ खुर्च्या टाकलेल्या. मोठी मंडळी खुर्च्यांवर बसली आणि पोरं आपली टेबलावर, डब्यावर आणि थुंकणारे आपल्या सोईनुसार खिडकीच्या जवळ जाऊन बसले. हि मावा , पान-तंबाखू खाणारी लोकं मीटिंग ला येतातच का ते कळत नाही, नुसता आपला "मुमु ऊउ" असले काहीशे आवाज काढून वीट आणतात. नंतर काही लोकं उगाचच येणाऱ्या- जाणाऱ्यांना अरे येरे बस रे जबरदस्ती करतात. मग एवढा वेळ पोरं काय शांत बसणार? मजाक सुरु त्यांचा, ह्याची खेच त्याची खेच. १५-२० मिनटांच्या गलाबल्यानंतर "ए बस आत्ता जरा सिरीयसली घ्या, सगळीकडेच तुमची आपली मस्करी चालेल्ली" असं कोणतरी दम भरतो आणि थोडा आवाज कमी होतो.
"मग काय तो विषय काढा ". पहिला षड्ज असाच लागतो.
सार्वजनिक मीटिंग मध्ये आपण का बसलोय हे सर्वांना माहित असून देखील कुणीतरी औपचारिकरीत्या विषय हा घेतलाच पाहिजे. पण सगळे जण विषय काढा म्हणजे "पाकीट काढा" असंच समजून मी कशाला काढू असा आव आणून गप्पच बसतात.
त्याच्यात थोडा वेळ गेला कि मग कोणीतरी काहीतरी बोलायचं म्हणून आपलं "काय मग या वर्षी गनपती बस्वाय्चाय का नाय?" असला फाल्तू प्रश्न काढतो.
"हा म बस्वाय्चाय ना!" , सगळी पोरं एकदम ओरडली.
"मग आत्ता किती दिवस उरले? काय प्लानिंग केली कि नाय?" सुशील. सुशील आमच्या सोसायटीचा पण कार्यकर्ता असल्याने पुढाकार घेणे (पुढे-पुढे करणे) त्याला आपसूकच येते. बहुतेक सर्वच सोसायट्यांमध्ये असे कार्यकर्ते हमखास मिळतात. विचारलेल्या प्रश्नावर मुलं काही उत्तर द्यायच्या आत स्वतःच्याच उत्तरांची एक मोठ्ठी मालगाडीच तो सुरु करतो आणि हे असं करा ते तसं करा असले फुकटचे सल्ले देतो.
"ते ठीक आहे रे पण पैश्याचं काय?", सुसाट सुटलेल्या गाडीला थोडा ब्रेक लागतो . मग वर्गणी न देणारे कसे हलकट आहेत याचं उदाहरणासहीत सपष्टीकरण सुरु होत.
"मी काय बोलतो सोसायटीने आपल्या गनपतीला एक धा-बारा हजाराचा चेक देऊन टाका काय समजलं?" असा सूर निघतो , ह्याच्या मागचा मूळ हेतू हाच कि "एवढा पैसा येतो सोसायटीकडे तो जातो कुठे? " असं सरळ सरळ विचारावं लागू नये. मग कमिटीचे सदस्य जीवावर आल्यासारखं करून "काय हाय आपण फुल ना फुलाची पाकळी तरी देऊच " असं पक्कं राजकारणी आश्वासन देऊन तिथून सुटतात.
"मग या वर्षी गणपती कोण देतंय?" असा एक चमत्कारिक प्रश्न निघतो. तुम्ही दचकू नका याचा अर्थ मूर्ती कोण sponsor करतंय असा असतो. त्याच्याच नावाची पहिली पावती फाटते. मूर्तीची किंमत बघता ती काय सर्वांनाच शक्य नसतं तरी आपलं कोणी म्हटलं "मी देतो", तर बऱ्याच जणांच्या पोटात दुखतं.
आता पर्यंत तुमच्या लक्ष्यात आलाच असेल कि सोसायटीचा गणपती म्हटला कि फक्त अवाढव्य खर्च कसा करूया याचीच जास्त चर्चा होते. तसंपण मुंबईकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची तितकीशी गरज वाटत नाही. जमलंच तर एखाद दिवशी स्वस्तातलं भजनी मंडळ बोलवायचं कि झाल काम. जस-जसा मीटिंग चा शेवट येतो तशी गाडी भरकटायला सुरुवात होते.
"या वर्षी ना आपण आपली ट्रोली विकत घेऊया"
"आणि ती मग ठेवणार कुठे "
"च्यायला चोरी-बिरी झाली म्हणजे"
"जाउदे ट्रोली नको रे विषय मिटला "
मग कुणाकुणाच्या डोक्यात एकदम भन्नाट कल्पना येतात. "या वर्षी आपण ना पालखीतून मिरवणूक कादुया"
"आणि ती पालखी उचलायला हाय कोण ? सगळे साले मरेपर्यंत नाचतात , गणपतीची पालखी कोण उचलेल? ते जाउदे "
नुसता आयडीयांचा उच्छाद मांडतात.
"आपल्या सोसायटीची भिंत कधी घालणार हा? आपली boundary केवढी? "
"हा हा बरोबर आहे कमिटीला उत्तर द्यावच लागेल "
"अरे तुम्ही काय विचारता आधी स्वतःच्या घराची boundary ठरवा, साला रुमच्या बाहेर समान, वरांड्यात समान आणि वरून जीनापण अडवतात"
"ए तू कोण मला सांगणारा, आम्ही वरांड्यात ठेवू नाय तर दुसऱ्याच्या घरात"
असले एकापेक्षा जोरदार प्रहार सुरु होतात. कुठला आवाज कोणाचा? कोण कोणाच्या बाजूने बोलतंय? काही कळायला मार्ग उरत नाही! ह्याचा गणेशोत्सवाशी काहीच संबंध नसतो पण बरेच खदखदणारे आवाज असेच शेवटाला बाहेर पडतात. मूळ मुद्दा बाजूला राहून, मुद्द्यांवरून गुद्द्यांवर यायची पाळी येते. पण पोरं नेमकी वेळ ओळखतात आणि बरोब्बर फोन आल्याचा नाटक करून एक-एक हळूच कल्टी होतात. कारण प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना अश्या मीटिंगची बिलकुल जरुरी नसते, ते दरवर्षी प्रमाणे जोमाने कामाला लागतात आणि मीटिंग ला तिच्याच अवस्थेत सोडून देतात!!!
प्रतिक्रिया
15 Sep 2012 - 10:48 pm | पैसा
मस्त जमलंय! सगळेच फक्त बोलबच्चन. सोसायटीचं काम करायला पाहिजे यावर एकमत पण प्रत्यक्ष करायच्या वेळेला सगळे गायब होतात! गणपती उत्सव पण याला कसा अपवाद असेल?
16 Sep 2012 - 10:50 am | निवेदिता-ताई
:D
16 Sep 2012 - 1:16 pm | विश्वनाथ मेहेंदळे
छान लिहिले आहे. स्वानुभवातून आलेले लेखन दिसते आहे :-)
अवांतर :- "तसंपण मुंबईकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची तितकीशी गरज वाटत नाही." एक शब्द बदलला असता तर शतक लागले असते राव नावावर ;-)
17 Sep 2012 - 9:51 am | आनंद भातखंडे
+१ .... शब्द कुठला ते नाही सांगितलं. काही काही शब्द द्विशतकपण गाठून देतात म्हणे. ;)
17 Sep 2012 - 10:48 am | भडकमकर मास्तर
मीटिंगचे मस्त वर्णन
17 Sep 2012 - 1:14 pm | ऋषिकेश
मस्त! खुसखुशीत लेखन!
17 Sep 2012 - 1:48 pm | चेतन माने
धन्यवाद !!! :)
17 Sep 2012 - 2:05 pm | रम्या
लेखन आवडले!
23 Sep 2012 - 8:19 am | शुचि
हाहाहा मस्त!!!! विमेंचा प्रतिसादही मस्त :D