गुरूबिन कौन बताये बाट (दत्त संप्रदाय)
दत्त संप्रदाय फक्त महाराष्ट्रातच आढळून येतो. थोडासा अपवाद म्हणजे गाणगापूरच्या आसपासचा कानडी मुलुख. पण महाराष्ट्रात तो एक प्रमुख पंथ आहे व नवीन पायंडा पहाता तो वाढीस लागला तरी आश्चर्य वाटावयाचे कारण नाही. " मी तुझ्या पाठीशी आहे " हा दिलासा बर्याच तरुणांना पुरेसा वाटतो असे दिसते. मुंबईतील स्वामी समर्थ यांच्या मंदिरात चांगली गर्दी असते. हे लोण इतर शहरात पसरणे सहजशक्य आहे. शिर्डीनंतर साईबाबांची मंदिरे इतर शहरात पसरू लागली आहेत, तसेच. आजच्या तरुण पिढीला याचे आकर्षण का वाटत आहे याचे विवेचन शेवटी करणार आहे. या संप्रदायाची माहिती आज करून घेऊं. (१) दैवत, (२) इतिहास, (३) व्यक्तीविषेश, (४) स्थळविषेश, (५) काल, आज, उद्या, असे भाग सोयीकरता पाडले आहेत.
(१) दैवत :
अनसूयेने ब्रह्मा-विष्णु-महेश यांची केलेली तीन बालके म्हणजे दत्त ही कथा सगळ्यांना माहित आहेच.नारदाने केलेली अनूसयेच्या सतीत्वाची स्तुती न आवडून सावित्री, लक्ष्मी व पार्वती यांनी आपल्या पतींना अनूसयेचे सत्त्व हरण करावयास पाठविले.अत्री आश्रमात नसतांना तिघे अतिथीचा वेष घेऊन गेले व भिक्षा मागितली. अनसूयेने भिक्षा आणल्यावर त्यांनी तिने विवस्त्र होऊन भिक्षा वाढावी असा आग्रह धरला. अतिथी न जेवता जाऊ नयेत म्हणून तिने ते मान्य केले व पतीचे नाव घेऊन तिघांवर तीर्थ शिंपडले. तिघांची लहान बालके झाली व मग तिने विवस्त्र होऊन आईच्या ममतेने तिघांना भरविले. इकडे वाट पाहून थकलेल्या तिघीजणी आश्रमात आल्या व आपले नवरे लहान बालके झाले हे पाहून खजील झाल्या. त्यांच्या विनंतीवरून अनसूयेने तिघांना पहिले रूप दिले. जातांना अनसूयेच्या इच्छेप्रमाणे तिच्या पोटी जन्म घेण्याचे तिघांनी कबूल केले. त्याप्रमाणे विष्णूच्या अंशापासून दत्त, शंकराच्या अंशापासून दुर्वास व ब्रह्माच्या अंशापासून सोम अशी तीन मुले अनसूयेला झाली.या कथेप्रमाणे दत्त हा विष्णूचा मुलगा. हा विष्णूच्या चौवीस अवतारांपैकी एक. (दशावताराची कल्पना नंतरची, आधी २४ अवतार कल्पिले आहेत्.) महाभारतात दत्ताचा उल्लेख आहे. पण तो उशीराचा भाग प्रक्षिप्त मानला जातो. तिथे त्याला अत्रीवंशज म्हटले असून तो गृहस्थाश्रमी दाखविला आहे. दत्तात्रेयाचे सर्व शिष्य क्षत्रीय असून फक्त एका ब्राह्मण शिष्याचा अपवाद आहे. अनेक प्रुराणात याचा उल्लेख असला तरी तो महान योगी असाच आहे. मार्कंडेयपुराणात मात्र तो तंत्रयोगी दाखविला आहे. नाथ संप्रदाय व तांत्रिक संप्रदायांत दत्ताला मोठे स्थान असून पुढे महानुभाविकांनी त्याचा महिमा वाढवला आहे. महानुभाव संप्रदाय हा दत्त संप्रदायच आहे. नवनाथांपैकी बर्याच जणांना दत्ताची अमोल मदत झाली आहे.
(२) इतिहास :
दत्तोपासना तशी अर्वाचिनच म्हणावयास हवी. दत्ताची जुनी देवालये सापडत नाहीत. तीनमुखी व सहा हातांचा दत्त पूर्वी नव्हता. (पूर्वीचा दत्त एकमुखी व चतुर्भुज.) अनसूयेच्या कथेनंतर तीनमुखी दत्त ही मूर्ती लोकमान्यता पावली. परमपदाच्या प्राप्तीसाठी योगसाधनेचा स्वीकार व गुरूसंस्थेची महनीयता ही दत्तस्वरूपातील वैशिष्ट्ये नाथसंप्रदायाने स्विकारली आहेत्.दत्त हा अवधूत जोगी आहे व नाथ संप्रदाय हा अवधूत संप्रदाय आहे. उत्तर काळात गोरख-दत्त यांचे संवाद प्रसिद्ध झाले. तंत्रसंप्रदायात, दत्ताशी जोडल्या गेलेल्या तांत्रिक गोष्टींमुळे, दत्ताची जवळीक झाली. महानुभाव पंथाची परंपरा दत्तात्रेय--चांगदेव राऊळ--गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे. म्हणजे महानुभाव संप्रदाय हाही दत्त संप्रदाय म्हणावयास हरकत नाही. आणखी एक गमतीदार गोष्ट म्हणजे दत्त संप्रदाय व सूफी पंथाचा संबंध. एकनाथांना जनादर्नस्वामींनी दत्ताचे दर्शन घडवले ते मलंग रूपातच. माणीकप्रभूंच्या सकलसंतसंग्रहात मुसलमानांचा भरणा आहें. नरसिंहसरस्वतींच्या चरित्रातही तसेच आढळते. याचे कारण हे असावे की दत्त संप्रदायातील श्रेष्ठ पुरुषांच्याभोवती चमत्कारांचे जे वलय निर्माण झाले होते त्याचे आकर्षण सूफींना असावे. इतर समन्वय काही दिसत नाही. बाकी हिंदूनाच ही खाज असावी; नाही तर हिंदू देवतेने फकीर वेष घेण्याचे कारणच काय ? असो. दत्तप्रबोध, दत्तमाहात्म्य, गुरूचरित्र आदी ग्रंथात संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे विवरण केले आहे. थोडक्यात
(१) ब्रह्म हे अखिल, अभंग्,निरुपाधिक, शुद्ध, शांत, निर्गुण, निरामय, नित्यानंद आहे. तेच जगद्रुपाने नटले आहे.
(२) परब्रह्माची त्याहून निराळी नसणारी इच्छाशक्ती म्हणजे प्रकृती. तिच्यापासून त्रिगुणात्मक माया, भूतसृष्टी व तिन्ही लोक उत्पन्न होतात.
(३) जे मूळ परब्रह्मस्वरूप आहेत परंतु भिन्न भिन्न देह धारण केल्यामूळे भिन्न भिन्न दिसतात ते जीव होत.
दत्त हा गुरूदेव आहे. श्रीगुरूदत्त किंवा गुरूदेवदत्त हा संप्रदायाचा जयघोष आहे. त्यामुळे कोणीही उपासक थेट दत्ताला गुरू करू शकतो. त्यामुळे मानवी गुरू-शिष्य परंपरेचे सातत्य राहिले नाही. यामुळे संप्रदायाची संघटीत बांधणी राहिली नाही. सिद्धावस्थेला पोचलेला प्रत्येक जण आपली पृथक पृथक विचारसरणी उपदेश करत गेला. त्यामुळे भारावलेले शिष्य वा सामान्य जन वेगवेगळे आचार व उपासना करू लागले. संप्रदायात रूढ अनुशासन असूनही एकवाक्यता राहिलेली नाही. माणीकप्रभूंचा सकलमतसंप्रदाय, पंतमहाराजांचा अवधूतसंप्रदाय, अक्कलकोतच्या स्वामींचा विधीनिषेधातीत साधनामार्ग , सगळे एकाच संप्रदायाचे ! वासुदेवानंद सरस्वती व केडगावकर महाराज यांच्या चूली परत वेगळ्याच.
समन्वय : दत्त संप्रदाय समन्वयाचे प्रतीक आहे. शैव-वैष्णव समन्वय साधला आहेच पण हिंदू-मुसलमान समन्वय साधण्याचा प्रयत्नही झाला. नरसिंहसरस्वती व जनार्दनस्वामी यांनी हा प्रयत्न केलाही. जे थोडेसे यश मिळाले ते सिद्ध पुरुषांच्या भोवतालच्या चमत्कारांच्या वलयामुळे. उलट असे झाले की काही मुसलमानी प्रथाच या संप्रदायात शिरल्या ! संगीताचे प्राधान्य, धूप या त्यातील काही गोष्टी.
(३) व (४) व्यक्ती-स्थळ विशेष :
वर सांगितल्याप्रमाणे पंथाची घडणच अशी आहे की एखादा सिद्ध पुरुष काही चमत्कार घडवितो, लोकांवर त्याचा प्रभाव पडतो व त्याचे अनुयायी वाढू लागतात. ऐतिहासिक काळापासून हे चालू आहे.महानुभाव पंथापासून सुरवात झाली म्हणावयास हरकत नाही. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयाचे इतिहास काळातील पहिले अवतार समजले जातात. नरसिंह सरस्वती हे दुसरे. नंतर एका शतकातच जनादनस्वामी-एकनाथ-दासोपंत दत्तभक्तीचा आश्रय घेऊन दत्तोपासनेचा प्रभाव वाढविला. नंतर मुक्तेश्वर्,निरंजन रघुनाथ्,नारायणमहाराज जालवणकर, माणिकप्रभू,वासुदेवानंद सरस्वती, पंतमहाराज बाळेकुंद्रीकर, इ. काही सत्पुरुषांची नावे सांगता येतील. यांपैकी काही उन्मुक्त चिंतनाने भारलेले व विधीनिषेधातीत अवधूत वृत्तीचे तर काही कर्मकांडाचा पुरस्कार करणारे, उपासनातंत्राला प्राधान्य देणारे होते. प्रत्येकाला अनुयायी मिळाले.
दत्ताची मंदिरे तुरळक प्रमाणात सर्वत्र आढळतात. माहूर,पांचाळेश्वर,औदुंबर, नरसोबाची वाडी,गाणगापूर, लाडकारंजे, कुरुगुड्डी, गिरनार ही प्रमुख क्षेत्रे आहेत. मंदिरात एकमुखी, तीनमुखी मुर्ती वा पादुका असतात. तांत्रिक उपासनेचा प्रभाव म्हणून म्हणा भूताखेतांनी पछाडलेली माणसे सुटकेसाठी अशा स्थळी गर्दी करतांना दिसतात.
(५) काल, आज उद्या :
असे दिसते खरे की या पंथाचे अनुयायी ब्राह्मण वर्गातलेच. जनसामान्य आले ते चमत्काराच्या आकर्षणाने. बाधा उतरावयाला. मारुतीच्या, विठ्ठलाच्या मंदिरात आढळणारी जनता इथे अभावानेच. पण आता थोडा फरक पडून येत आहे असे वाटते. भुतेखेते, तांत्रिक गोष्ष्टी सोडूनही " मी तुझ्या पाठीशी आहे " हा आश्वासक दिलासा आज सगळ्यांच आकर्षित करत आहे. घरून निघालेला माणुस लोकलमधून सुखरूप परत येईलच अशी खात्री नसली की अशा आश्वासनाची गरज ही माणसाच्या कमकुवत मनाची गरज असते. येथे कोणत्याही तर्कनिष्ठेला वाव नाही. मुंबईच्या स्वामी समर्थांच्या मंदिरात सर्व थरातील माणसे दिसतात. स्त्रीया आहेत, पुरुष आहेत. उच्चशिक्षित आहेत, न शिकलेलेही आहेत. गरीब आहेत, श्रीमंतही आहेत. थोडी मनःशांती लाभत असेल ; दिलासा मिळत असेल, सद्विचारांचा वारा लागत असेल तर छानच की. साईबाबांच्या मंदिरांचे पेव जसे गावोगावी फुटत आहे तसेच याचेही होईल. चांगली गोष्ट. इथे जर आठवले, पै यांसारखी जनसागराला योग्य वाट दाखविणारे आणखी काही सद्गुरू लाभले तर आणखी काय पाहिजे ? शेवटी हे खरेच की " गुरूबिन कौन बतावे बाट ?"
( काही ठिकाणी द्विरुक्क्ती झाली आहे, मान्य. क्षमस्व.)
शरद
प्रतिक्रिया
1 Jul 2012 - 10:44 am | तिमा
बाकी हिंदूनाच ही खाज असावी; नाही तर हिंदू देवतेने फकीर वेष घेण्याचे कारणच काय ?
यातील 'खाज' हा शब्द अवमानकारक वाटला. बाकी चालू द्या.
2 Jul 2012 - 5:44 am | स्पंदना
अगदी तिमा.
लेखकाच्या प्रतिमेला अजिबात न शोभणारा शब्द वाटला मला तर.
2 Jul 2012 - 5:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> हिंदूनाच ही खाज असावी; नाही तर हिंदू देवतेने फकीर वेष घेण्याचे कारणच काय ?
तिरशींगराव आणि अ.अ. लेखकाच्या लेखनीबद्दल आक्षेप घेण्यापूर्वी आपल्याला या काळातल्या धार्मिक स्थितीचा अभ्यास केला पाहिजे. माझं मत तर लेखकाने फार सौम्य शब्द वापरला आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे.
तेराव्या शतकात जेव्हा मुस्लीम आक्रमणे इथे झाली तेव्हा महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक स्थित्यंतरेचा विचार केल्यावर लक्षात येते की इथे निव्वळ अनागोंदी माजलेली होती. दर्गे, मशिदी, पीर, यांना इतके महत्त्व आले होते की विचारु नका. फकीरांनाही खुप महत्त्व आले. हिंदु लोक फकीर बनु लागले आणि हिंदु देवही फकीराच्या वेषात दर्शन देऊ लागले. नाथपंथी योगी आणि सुफी या दोघांनीही चमत्कार व सिद्धीच्या जोरावर जनतेला आकृष्ट करण्याचा सपाटा लावला होता, म्हणुनही खाज शब्द फार सौम्य म्हटला पाहिजे. याच काळात, दत्त संप्रदायात मुसलमान भक्तांचा समावेश व्हायला लागला होता, म्हणुन हिंदु-मुस्लीमांना जोडणारा संप्रदाय म्हणजे दत्त संप्रदाय असेही म्हटल्या जात होते.
अहो, या काळात लोकांनी आपली हिंदु नावं बदलुन घेतली होती, वेषांचे काय घेऊन बसलात. अस्मिता गमावली की लाचारी कोणत्याही थराला जाते. असो.
आम्ही हे सर्व प्राचीन मराठी वाङमयाच्या इतिहासात विविध संप्रदायाचा अभ्यास करतांना शिकलो आहोत. सर, तर कितीतरी सिनियर. असो, एकदा भूमिका समजून घेतली की माझ्यासारख्याला काही प्रश्न पडत नाहीत. बाकी, आपल्या मताचा आदर आहेच.
-दिलीप बिरुटे
2 Jul 2012 - 6:24 pm | नाना चेंगट
आपल्याला काय जास्त समजत नाही आणि प्रा डॉ यांच्याएवढा आपला इतिहासाचा अभ्यास पण नाही. पण आपल्याला असं वाटतं की अस्मिता वगैरे गोष्टी आहेत ना त्या आपले स्वतःचे राज्य, आर्थिक सुबत्ता वगैरे असतांना किंवा आपण प्रखरपणे विरोध करायच्या स्थितीत असतांना बर्या असतात. चोहोकडून हातात कुराण आणि तलवार घेत 'अल्ला हो अकबर' च्या आरोळ्या मारत येणारे लुटारु कम सैनिक असतांना आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवणे म्हणजे आपली मान स्वतःहून कापण्यास निमंत्रण देणे. खरं खोटं माहित नाही पण नालंदावर आक्रमण झाले तेव्हा तुमच्या पुस्तकात जे आहे ते या कुराणात आहे त्यामुळे त्याची गरज नाही, आणि ते कुराणात नसेल तर त्या ज्ञानाला अर्थ नाही असे म्हणत ग्रंथालये जाळली गेली, बौध्द भिक्षु आणि विद्यार्थ्यांची कत्तल करण्यात आली. आम्ही ते पाहिले नाही पण विविध विश्वसनीय स्त्रोतांकडून ऐकले आहे. अशा विपरीत परिस्थितीत सामान्य माणुस जो शहाणपणा दा़खवतो की राजसत्तेशी नमते घेऊन त्यांच्या कलाने रहायचे आणि संधीची वाट पहायची. दुर्देवाने संधी फार उशीरा मिळाली. घडल्या गोष्टीला इलाज नसतो. याच काळात संतांनी संयमाची आणि तितिक्षेची शिकवण दिली, अनेकांनी भले मुस्लिम पेहराव करुन का होईना पण मुस्लिम संतांकडे हिंदू जनता आकृष्ट होत होती किंवा बळाने नेली जात होती, त्याला कुठेतरी लगाम घालण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जे जे केले ते ते त्यांच्या मनोदेवतेने योग्य आहे असा कौल दिला तेच केले. त्याचमुळे मोडका तोडका का होईना हिंदू धर्म, भारत देश शिल्लक राहिला. अन्यथा मध्यपुर्वेतील इतर अनेक संस्कॄतींप्रमाणे आपली सुद्धा वाट लागली असती.
वैदिक कालापासून जर पाहिले तर भारतीय मनोधारणा धार्मिक बाबतीत तरी सदोदीत समन्वयाची दिसते. भगवद्गीता हे त्याचे दृश्य स्वरुप होय असे आम्ही मानतो. आणि त्याचाच परिणाम म्हणून इतर धार्मिक पंथीयांचे आचार विचार उचलूनही हिंदू हा हिंदूच रहातो असे आमचे मत आहे. असो. विषय मोठा आहे आणि आमची समज अल्प तसेच वाड्मयाचा आमचा अभ्यास नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे असेल ही कदाचित किंवा...
2 Jul 2012 - 10:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाना, मोडका तोडका का होईना हिंदु धर्म टीकवण्यासाठी विविध संप्रदायांनी आपापल्या परीने मदतच केली यात काही वाद नाही.
वैदिक कालापासून जर पाहिले तर........
नाना, वैदिक काळ नका आणू राव मधे. वैदिक काळ...समजून घेणे ही सोपी गोष्ट नाही. आपला वैदिक काळावर अभ्यास असल्यामुळे आपणास सर्व ते माहित आहे. मला फार काही माहित नाही.
>>>प्रा डॉ यांच्याएवढा आपला इतिहासाचा अभ्यास पण नाही.
नाना, नम्रतेने सांगतो. माझा कै अभ्यास बिभ्यास नै पण पेशा असा आहे की थोडं फार वाचावं लागतं. बाकी, मध्ययुगीन मराठी साहित्य हा माझा आवडीचा विषय आहे. असो.
-दिलीप बिरुटे
2 Jul 2012 - 6:56 pm | स्पंदना
तो शब्द या अर्थान आला असेल हे जाणवलच नाही.
सांगितल्याबद्दल तुमचे आभार अन सरांची अगदी कान पकडुन माफी.
>>अहो, या काळात लोकांनी आपली हिंदु नावं बदलुन घेतली होती, वेषांचे काय घेऊन बसलात. अस्मिता गमावली की लाचारी कोणत्याही थराला जाते. अस>>>>
हे १००% पटल अन आता मला कळल आमच्या एका पुर्वजाच नाव सुलतान पाटिल का होत ते. हा पण एक मात्र आहे हं , आदिलशहाचे ७ सरदार मारुन एक आठवडा ओढ्या नाल्यात लपुन शेवटी कसेबसे आपल्या मुलुअखात पोहोचले , त्या मुळे हे नाव कदाचित मात्तब्बरी दाखविण्यासाठीही असु शकेल.
6 Jul 2012 - 9:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महंमद गझनीच्या काळापासून सूफी चे पंथ आणि उपपंथ धर्मप्रचारासाठी भारतात यायला लागले होते. राजसत्ता आणि धर्मप्रचारकाच्या साह्याने हजारो हिंदूंना इस्लामची दीक्षा दिली जात होती. त्याचबरोबर, मठ, मंदिरं ताब्यात घेऊन विध्वंस चाललेला होता. अशा सूफी संतांनी अधिकाधिक प्रचाराचं काम आमच्या मराठवाड्यात केलं. धर्मभोळे हिंदू भाविक 'मलिदा' चा प्रसाद अशा दर्ग्यामधून आजही वाटतात. अशाच एका सूफी पंथाच्या एका शिष्याचा माझ्या गावाशी ऐतिहासिक संबंध आहे. त्याबद्दल एक गोष्ट.
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातील पिंपळवाडी नावाच्या गावी या सूफी पथांच्या शिष्यांची एक मोठी दर्गा आहे. पैठणमधील एका महालक्ष्मीच्या मंदिराची वाताहात करुन तिथे दर्गा उभारल्याची गोष्ट अजूनही सांगितली जाते.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या माझ्या तालूक्याच्या गंगापूर या गावी एक मौलानासाहेबचा दर्गा आहे. दर्ग्याच्या बाहेर दोन दगडी खांब आहेत, मला नेहमी वाटतं इथे मंदिरच असावं. [लवकरच इथे तो फोटो डकवीन] अशा या मौलानासाहेबांनी पैठणच्या महालक्ष्मीच्या मंदिराचं दर्गा केला. ( दत्त संप्रदायाचा इतिहास-रा.चि.ढेरे. पृ.क्र.७३) अशा या मौलानासाहेबांचा दर्गा माझ्या तालुक्याच्या गावी आहे. हिंदू भाविकांना सूफी संताचा 'इतिहास' माहिती नसल्यामुळे आजही हिंदूबांधव या दर्ग्यात येऊन सुखी समाधानासाठी इथे येऊन प्रार्थना करतात.
दर्ग्याच्या शेजारी महानुभाव संप्रदायातील चक्रधरस्वामीनीं निवास केल्याचा आजही खाणाखुणा सांगितल्या जातात. माझ्याच तालूक्यात एक शेंदुरवादा नावाचं गाव आहे. इथे एक मोठा प्रसिद्ध गणपती आहे. त्याच गावाजवळ पानरांजणगाव नावाचं एक दोन-पाच घराचं गाव आहे, इथे शहासिकंदरबाबाचा एक दर्गा आहे, इथले पुजारी ब्राह्मण जाई नावाचे हिंदू पुजारी आहेत, मुस्लीम बांधव इथे दर्ग्यात दिसणार नाही. दर्ग्याच्या बाहेर मूस्लीम फकीर दर्ग्याच्या बाहेर मोरपंखी झाडणी डोक्यावर ठेवून हिंदू बांधवांना आशिर्वाद देत असतात.
असो, अशा या वेगवेगळ्या गोष्टी वादग्रस्त असतील पण लिहाव्या वाटल्या म्हणुन हा अवांतरांचा प्रपचं. अशा या संघर्षमय काळात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनरसिंह सरस्वती या दोन महापुरुषांनी क्रमाने अवतार घेतला आणि दत्तात्रेयाचे इतिहासकाळातील पहिल्या अवतारांचा पहिल्या अध्याय इथून सुरु झाला. (इति, दत्त संप्रदायाचा इतिहास. रा.चि. ढेरे)
-दिलीप बिरुटे
6 Jul 2012 - 9:30 pm | अर्धवटराव
झालं गेलं गंगेला मिळालं. आता शांती नांदतेय ना... प्रगती साधायला सर्व धर्म -जाती- प्रांताचे लोकं मिळुन मिसळुन प्रयत्न करताहेत ना... ते महत्वाचं.
अर्धवटराव
6 Jul 2012 - 9:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>झालं गेलं गंगेला मिळालं. आता शांती नांदतेय ना
मान्य.
>>>>प्रगती साधायला सर्व धर्म -जाती- प्रांताचे लोकं मिळुन मिसळुन प्रयत्न करताहेत ना... ते महत्वाचं.
मान्य.
-दिलीप बिरुटे
7 Jul 2012 - 5:16 pm | बॅटमॅन
सेतुमाधवराव पगडी यांच्या आत्मचरित्रात बहुतेक हाच वृत्तांत दिला आहे. एका महानुभाव स्थानपोथीचा हवाला देऊन त्यांनी आपण सांगितलेला किस्साच वर्णिलेला आहे. संदर्भ नीट बघून सांगतो.
1 Jul 2012 - 10:54 am | अर्धवट
तू झोप तुझा दत्त जागा आहे...
1 Jul 2012 - 11:12 am | मराठमोळा
तुमचा अभ्यास चांगला आहे असे दिसते. :)
पण हा माझा प्रांत नाही त्यामुळे पास.. शेवटच्या पॅरातील सहाव्या वाक्यापासुन पुढे सहमत.
1 Jul 2012 - 12:09 pm | राही
श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी गुजरातेत नर्मदातटी गरुडेश्वर येथे एक चातुर्मास करून पुढे समाधीही तेथेच घेतली. त्यांच्या प्रमुख शिष्यांपैकी श्री गांडामहाराज हे गुजरातीच होते तर श्री रंगावधूत स्वामींची समाधी गुजरातेतच नर्मदातटाकी नारेश्वर येथे आहे.या तिघांमुळे आता गुजरातेत दत्तसंप्रदाय थोडाफार वाढीस लागला आहे. शिवाय गिरनारच्या दत्त शिखरावरील पादुकांच्या दर्शनासाठी आता अनेक लोक येतात (जरी या ठिकाणच्या दहा हजार पायर्या चढणे अत्यंत कठिण असले तरी.) त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर संप्रदायाची छाप थोड्या प्रमाणात पडू लागली आहे. या व्यतिरिक्त पूर्वीच्या बडोदे संस्थानांतर्गत प्रदेशात दत्तभक्तीची परंपरा आहे.
महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधरस्वामी यांचा जन्म गुजरातेतील भरुच येथे झाला होता.
कर्णाटकात दत्तसंप्रदायाचा विस्तार मोठा आहेच पण आंध्रातही दत्तभक्ती आहे. कुरुगुड्डी, श्रीशैल्य ही संप्रदायातली महत्त्वाची ठिकाणे आंध्रात आहेत.
दत्त संप्रदायाशी निकटचे साधर्म्य असलेला अवधूतपंथ पूर्वोत्तर भारतात(नेपाळातही) प्रभावशाली आहे. अवघ्या काहींशे वर्षांपूर्वी कश्मीरात कौलमतप्रभाव लक्षणीय होता.
नाथ पंथ, अवधूत पंथ आणि दत्त संप्रदाय यांची कालौघात काही प्रमाणात सरमिसळ झाल्यासारखी वाटते. नाथ पंथावरील श्री. रा. चिं. ढेरे यांच्या पुस्तकात फार चांगले संशोधन आणि विवरण आहे. शाक्त, कौलमत, सूफी या भिन्न संप्रदायांचा परस्परसंबंध मोठा गडद आहे. शैवांची लुडबूड किंवा प्रभावही सर्वत्र आहे. नाथपंथीय निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांनी नाथपंथाच्या मूलस्रोतात विष्णुभक्तीची बळकट धारा ओतून भक्तिपंथाचा एक नवीन प्रवाह निर्माण केला.वैष्णवधर्म वाढीस लागला.
दत्तसंप्रदायही या विभिन्नतेतून एकता साधणारा शैव,वैष्णव,सूफी,नाथ,शाक्त,कौल या सर्वांचा एक समन्वय मानता येईल.
धार्मिक प्रथा, रूढी, संप्रदायांचे ऐतिहासिक दृष्ट्या वेध घेणारे आपले लेखन आवडते.
1 Jul 2012 - 10:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधरस्वामी यांचा जन्म गुजरातेतील भरुच येथे झाला होता.
अर्रर्र, थोडी गडबड आहे. . श्री चक्रधरस्वामी म्हणजेच चक्रपाणी हे सातार्यात जन्माला आले. श्री दत्तात्रय यांनी वाघाच्या रुपात भेट देऊन श्री दत्तात्रेयांनी त्यांना शक्ती प्रदान केली. श्री चक्रपाणींचे जीव उद्धारण्याचे कार्य चालू असतांना एका योगिनीनी रतिदानाचा हट्ट धरला आणि तो हट्ट पाहुन श्री चक्रपाणी यांनी पुरत्याग केला.
त्याच वेळी भडोच येथील एका राजाच्या दरबारी प्रधान असलेल्याच्या मुलगा अकस्मात मृत्यु पावला होता. त्याच्या शरिरात श्री चक्रपाणींनी प्रवेश केला, तेच श्री चक्रधरस्वामी.
(अधिक तपशिलवार माहिती हवी असल्यास महानुभव संप्रदायाचे आमच्या औरंगाबादमधील अभ्यासक डॉ.ब्रह्मानंद देशपांडे यांचे लिळाचरित्र (एकांक) नावाचे पुस्तक उचकुन माहिती टंकेन)
-दिलीप बिरुटे
1 Jul 2012 - 10:56 pm | राही
गडबड काहीच नाही. ही आख्यायिका (किंवा सत्यकथा) प्रचलित आहेच. यावरून फार तर असे म्हणावे लागेल की श्री चक्रधरस्वामी यांनी धारण केलेल्या देहाचा जन्म गुजरातेत झाला.
1 Jul 2012 - 11:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धारण केलेल्या देहाचा जन्म गुजरातेत झाला.
-दिलीप बिरुटे
2 Jul 2012 - 12:14 pm | योगप्रभू
प्रा. बिरुटे यांची माहिती भिन्न दुवे सांधून कथारुपात अशी मांडता येईल.
श्री चांगदेव राऊळ उर्फ चक्रपाणि हे कर्हाडे ब्राह्मण ज्ञातीतील. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील फलटण येथे झाला. हे एक श्रेष्ठ नाथपंथी योगी होते. वाघाच्या रुपात भेट देऊन श्री दत्तात्रेयांनी त्यांना शक्ती व नाथपंथाची दीक्षा प्रदान केली होती. त्यांचा शिष्य म्हणजे गोविंदप्रभु अर्थात गुंडम राऊळ. लोककल्याणार्थ प्रवास करत असताना चक्रपाणि एकदा द्वारकेत असताना तेथे कामाख्या नावाच्या हटयोगिनीच्या दुराग्रहामुळे त्यांनी देहत्याग केला. (तो हट्ट कुठला, हे प्रा. बिरुटेंच्या प्रतिसादात उल्लेखले आहेच) परकायाप्रवेशाच्या वेळी योग्याने देह ठेवताच त्याचवेळी त्याला दुसरे शरीर उपलब्ध व्हावे लागते. चक्रपाणिंनी देह ठेवला त्याचसुमारास द्वारकेपासून जवळ भडोच येथे मल्लदेव राजाचा प्रधान विशालदेव याचा तरुण मुलगा हरिपालदेव याचाही मृत्यू झाला होता.
हा हरिपालदेव सन ११९४ मध्ये जन्माला आला होता. तो अत्यंत शूर होता आणि त्याने सिंघण यादवांचा दोन वेळा पराभव केला होता. राजविलासात मग्न अशा या हरिपालदेवाचा मृत्यू वयाच्या सव्वीसाव्या वर्षी (सन १२२०) झाला. चक्रपाणि राऊळ यांनी त्या मृत देहात प्रवेश करुन त्याला जिवंत केले. शरीर बदलताच चक्रपाणिंची पूर्वस्मृती झाकोळली व ते हरिपालदेवाचेच विलासी जीवन क्रमू लागले. पुढे द्यूतात संपत्ती घालवल्याने व पत्नीशी मतभेदाने हरिपालदेवाला विरक्ती आली. तो रामटेकच्या रामयात्रेला गेला असताना त्याची गाठ वर्हाडातील ऋद्धिपूरचे नाथपंथी सत्पुरुष गोविंदप्रभु उर्फ गुंडम राऊळ यांच्याशी पडली.
आपले गुरु चक्रपाणि हे हरिपालदेवाच्या शरीरात वास करत असून त्यांचे पूर्वजन्मातील कार्य पूर्ण करुन घेण्यासाठी गोविंदप्रभू यांनी हरिपालदेवाला सन १२६३ मध्ये मंत्रोपदेश व ज्ञानशक्ती प्रदान केली व त्याचे नामकरण 'चक्रधर' केले. चक्रधरांनी सातपुडा पर्वतात तपश्चर्या करुन पूर्वीचा चक्रपाणिंचा योगटप्पा पुन्हा गाठला व सन १२६८ मध्ये पैठण येथे संन्यास घेतला. चक्रधरांनी महाराष्ट्रात फिरुन अवलोकन केले असता धर्मात कर्मकांडाचे प्राबल्य वाढले असून जनतेला भोगाची चटक लागल्याचे त्यांना दिसले. जनतेला खरा मोक्षाचा मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली. संन्यासानंतरचा काळ चक्रधरांनी आपल्या महानुभव तत्त्वज्ञानाच्या प्रसारात घालवली. त्यांना सुमारे ५०० अनुयायी लाभले. सन १२७६ मध्ये पट्टशिष्य नागदेवाचार्यांच्या हाती पंथाची सूत्रे सोपवून चक्रधरांनी बदरिकाश्रमाकडे प्रयाण केले.
1 Jul 2012 - 11:55 am | सहज
नुकतेच ऐकलेले, पाहीलेले गाणे. थॅंक्स टू नाईल्या..
1 Jul 2012 - 3:29 pm | मुक्त विहारि
धन्यवाद..
1 Jul 2012 - 3:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर, लेख आवडला. राहीचा प्रतिसादही आवडला, राही म्हणते तसेच म्हणतो ”धार्मिक प्रथा, रूढी, संप्रदायांचे ऐतिहासिक दृष्ट्या वेध घेणारे आपले लेखन आवडते”
एकमुखी दत्तात्रयवर अजून माहिती येऊ द्या सर. बाकी, कलयुगात अर्जंट प्रसन्न होऊन फळ देणारा देव म्हणजे दत्त.
श्री. रा.चि.ढेरे यांचं दत्तसंप्रदायाचा इतिहास असं एक पुस्तक नुकतचं चाळलं त्या पुस्तकाची आपल्या लेखाने त्या पुस्तकाची आठवण करुन दिली.
-दिलीप बिरुटे
1 Jul 2012 - 4:29 pm | शुचि
हे दुवे जरूर पहा -
गुजराथीमधील हा दुवा (मालिका) महराष्ट्रातील दत्तस्थानांची माहीती देतो - http://www.youtube.com/watch?v=c3Hq6iZSQtU&feature=mfu_in_order&list=UL
दत्तबावनी विविध रागांमध्ये - http://www.rangavadhoot.us/dattasastrirg.php
1 Jul 2012 - 6:14 pm | प्रचेतस
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख.
1 Jul 2012 - 6:42 pm | कान्होबा
लेख आवडला नविन माहिती मिळाली.
2 Jul 2012 - 6:31 am | स्पंदना
खुपच माहिती मिळाली. नुसतच देउळ दिसल की डोक टेकणार्या आम्हा सारख्यांना तसा फारसा फरक पडत नाही म्हणा पण चार माणसात बोलताना उगा मिरवायला बरेच मुद्दे मिळाले.
दत्तावतार हा विष्णुचा २४ अवतारांपैकी एक हे नविनच समजल.
जे मी उलिसक वाचलय त्याप्रमाणे देह त्याग करणारा हा दत्त जन्मलेला कधिच दिसत नाही, म्हणजे तो कुठे जन्मला , नाव गाव कुळ काही नाही, एक व्यक्ती जनमानसा समोर उभी ठाकते, काही तरी असामान्य कार्य करते, अन मग देह त्याग.
उदाहरण विचाराल तर शिर्डीचे साईबाबा. अन दुसर उदाहरण माझ्या भागातल, हलसिद्धनाथ!
आता या हलसिद्धनाथाला आम्ही 'आळशिदाप्प्पा' म्हणतो. याची भाकणुक धनगर समाजाच्या मुखावाटे सार्या भागात प्रसारित व्हायची, हल्ली म्हणजे साधारण २५ वर्षापासुन ती छापली जाते.
हा आळशिद आप्पा कुठुन आला माहित नाही, पण निप्पाणकरांच्या(निप्पाणी, कोल्हापुर बेळगावच्या मधल. तेथिल जहागिरदार) वाड्यावर एक दिवस एक दहा बारा वर्षाचा मुलगा येउन ठाकला. तेथे निप्पाणकरांच्या गोठ्यात कामासाठी ठेउन घेतला गेला. निप्पाणकर एक अतिशय कामांध व्यक्ति होती. अजुनही तेथे एक तेलिण त्यांच्या शयनागृहातुन जिवंत बाहेर आली म्हणुन तिला दिलेली इनाम जमिन तिचे वंशज खाताहेत. तर अश्या या सरकारांना ( निप्पाणकर सरकार म्हणायचे त्यांना) एक दिवस उठुन या बालकान हे सार सोड अस खडसावल. पोराकड काय लक्ष द्यायच म्हणुन हसणार्या त्या कामांधाला, तुझ्या बारा पिढ्या निर्वंश होतील असा शाप देउन हा मुलगा तेथुन निघाला. तेथुन चालत तो कुर्लीच्या अलिकडील गाव चिखली येथे पोहोचला. तेथे माळावर बसुन एके ठिकाणी त्याने थोडस बांधकाम केलेल आहे. चिखलीच्या अन कुर्लीच्या मध्ये वेदगंगा (की दुधगंगा?) नदी आहे. तुफान पावसात एकेदिवशी रात्री त्याने आंबेकर्याला मला पलिकडे सोड म्हणुन सांगितल . एव्हढ्या पावसात अन अंधारात आंबेकर्यान नकार दिला म्हणुन त्यालाही बारा पिढ्यांच्या निर्वंशाचा शाप देउन स्वतःच घोंगड पाण्यावर अंथरुन आप्पा नदितरुन पल्याड गेला. तिथुन पुढे आप्प्पाच्या वाडीला जाउन त्यांनी तेथेच समाधी घेतली. या व्यक्तीला देवत्व देणारे, अन त्याच देवस्थान सांभाळणारे सारे धनगर आहेत. घोंगड अन भाकरी एव्हढच वाहिल जायच त्याला. या व्यक्तिला पाहिलेले लोक होते, कारण तो अवतरला ते साईबाबांच्या नंतर, म्हणजे हल्ल्लीचाच.
निप्प्पाणकरांच विचाराल तर अजुन पर्यंत घराण्याला मुलगा नव्हता. सारा दत्तक कारभार. आता निप्पाणकरांना काही व्यक्तिशः ओळखत नाही पण आम्बेकरी (नावाडी) जवळपासचा, अन त्याच्या घरात खरोखर मुलगा नाही गेल्या दहा पिढ्या. सांगतात ते लोक आम्हाला शाप आहे म्हणुन. दत्तक घेउनच चालवलय त्यांनीही. अन त्या दत्तकालाही मुलगा नसतो.
हे माझ्या भागातल उदाहरण म्हणुन मी सांगते आहे. फार छान ढोल घुमायचे रात्री आप्पाच्या वाडीचे.
विश्वास ठेवावा नाही ठेवावा अश्या संभ्रमातली पिढी आमची. शोधायला जाव तर हाती काहीच नाही सापडत.
आता त्या आप्पाचा देव करुन ठेवलाय लोकांनी. या आधी कधिही उल्लेख हा फकत आळशिदआप्पा असाच असायचा आजकाल त्यालाही दर्शन महाग करुन ठेवलय .
फारच अवांतर झाला का माझा प्रतिसाद?
7 Jul 2012 - 10:07 am | झकासराव
आप्पाची वाडीची भाकणुक पुढारीत वाचायचो आधी.
ही कथा माहिती नव्हती. धन्यवाद. :)
फरांडे बाबांची भाकणुकई असायची पट्टणकोडोली यात्रेत.
ती ही यायची पेपरात छापुन.
2 Jul 2012 - 10:27 am | स्वराजित
छान लेख
2 Jul 2012 - 2:58 pm | शिल्पा नाईक
दत्तात्रेयांचा एकेरी उल्लेख खटकला, बाकी खूप माहितीपूर्ण.
2 Jul 2012 - 5:28 pm | योगप्रभू
शिल्पाताई,
लेखकाने केलेला दत्तात्रेयांचा एकेरी उल्लेख तुम्हाला खटकला, पण खरी गोष्ट अशी आहे, की आत्यंतिक जिव्हाळा असेल तिथे एकेरी उच्चारातच आपलेपणा दिसून येतो. आई मुलावर असीम माया करते आणि सांभाळून घेते म्हणून 'ती' आई असते. पण वडील कर्तव्यकठोर आणि प्रसंगी मार देतात म्हणून 'ते' बाबा ठरतात. पण जिथे वडिलांबद्दलही आत्यंतिक उमाळा असेल तिथे तोही एकेरी ठरतो (बाप रखुमादेवीवरु) असो. बहुतेक संतांनी/प्रासादिक लेखक-कवींनी आपल्या आराध्यदैवताला अरे-तुरेच संबोधले आहे. उदाहरणार्थ -
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त
त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा
देवा तुची गणेशु, सकल मती प्रकाशु
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा
धाव रे रामराया, किती अंत पाहासी
विठु माझा लेकुरवाळा
2 Jul 2012 - 6:27 pm | नाना चेंगट
आम्हाला नाही खटकला ब्वा.. आमच्यात देवाला एकेरीच हाक मारतात..
अरे कृष्णा
अरे कान्हा
अरे रामा
अरे विठ्ठला...
2 Jul 2012 - 9:37 pm | गोंधळी
दत्तगुरुंबद्दल अजुन महिती वाचायाला आवडेल.
पण अनसुया माता कि अनुसया माता नक्कि काय नाव आहे.
3 Jul 2012 - 6:59 pm | पैसा
राही, नाना, बिरुटे सर, अपर्णा, योगप्रभू, सगळ्यांचे प्रतिसादही आवडले. बरीच माहिती मिळाली.
7 Jul 2012 - 11:05 am | स्पा
काय सांगतेस खर कि काय?
7 Jul 2012 - 1:54 am | रमेश आठवले
दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा हि धुन
आणि हिन्दि सिनेमातील
कजरारे कजरारे तेरे कारे कारे नयना हि धुन
यान्च्यामधे खूप साम्य असल्याचे संगीतकार कौशल इनामदार यानि म्हटले आहे
7 Jul 2012 - 4:05 pm | ज्ञानोबाचे पैजार
वरती अपर्णा ताईंनी उल्लेख केल्या प्रमाणे दत्तावतार कधी जन्मलेले कधी दिसत नाहीत.
शेगावचे गजानन महाराजही असेच प्रगट झाले होते. ते पण याच सांप्रदयातलेच होते का?