मोजणी

अनिरुद्ध अभ्यंकर's picture
अनिरुद्ध अभ्यंकर in जे न देखे रवी...
3 Apr 2008 - 11:46 pm

हल्ली मनात कोणी वस्तीस येत नाही
मीही चुकून तेथे कोणास नेत नाही

ऐन्यात शोधतो मी सारे जुने पुरावे
निसटून काळ गेला हातात येत नाही

बाजार वेदनेचा आहे भरात आला
जखमा जुन्या तरी मी विक्रीस नेत नाही

मी श्वास घेत आहे की भास होत आहे ?
काळीज धडकल्याचा आवाज येत नाही

आश्वासने जरी ते देऊन काल गेले
परतून भेटण्याला कोणीच येत नाही

माफी मिळून आता कोणास फायदा हा
गळफासमुक्त येथे कुठलेच शेत नाही

आपापले कलेवर सजवून आज ठेवा
सरकार मोजणीला हे रोज येत नाही

कविता

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

3 Apr 2008 - 11:50 pm | चतुरंग

सुंदर गजल, अनिरुध्द!

आपापले कलेवर सजवून आज ठेवा
सरकार मोजणीला हे रोज येत नाही

हे एकदमच टिपेला पोचवलेस!

चतुरंग

सर्किट's picture

3 Apr 2008 - 11:59 pm | सर्किट (not verified)

अनिरुद्ध,

माफी मिळून आता कोणास फायदा हा
गळफासमुक्त येथे कुठलेच शेत नाही

आपापले कलेवर सजवून आज ठेवा
सरकार मोजणीला हे रोज येत नाही

अतिशय सुंदर !!!!

वाहवा !!

दिल दहला देनेवाली गझल !

- सर्किट

मुक्तसुनीत's picture

4 Apr 2008 - 12:08 am | मुक्तसुनीत

मात्र गझलेचा नेमका मूड पकडण्यात मी अयशस्वी झालो. पहिल्या पाच शेरांमधे वैयक्तिक वैफल्याचे , त्यातून येणार्‍या खिन्नतेचे प्रतिबिंब पडते तर शेवटच्या दोन शेरांमधे भेदक सामाजिक वास्तव मांडले आहे. अर्थात गझल या प्रकाराच्या विविधरंगी आणि सर्वसमावेशक स्वरूपाला लक्षात घेतले तर यात काही वावगे वाटू नयेच. ! उत्तम दर्जाची शायरी !

"काळीज धडकल्याचा आवाज येत नाही" मधे यतिभंग झाल्यासारखे वाटले. चू.भू. द्या. घ्या.

(एक बाळबोध शंका : तुम्हीच केसु काय ? )

चतुरंग's picture

4 Apr 2008 - 1:27 am | चतुरंग

म्हणजे जसे 'शांततेचा आवाज'.
पण इथे तसे जाणवले नाही चू.भू.दे.घे.

चतुरंग

अनिरुद्ध अभ्यंकर's picture

4 Apr 2008 - 5:08 pm | अनिरुद्ध अभ्यंकर

(एक बाळबोध शंका : तुम्हीच केसु काय ? )
छा बॉ, भलताच अवघड प्रश्न आहे!!
ह. घ्या.
अनिरुद्ध

प्राजु's picture

4 Apr 2008 - 12:18 am | प्राजु

सुंदर गझल...

बाजार वेदनेचा आहे भरात आला
जखमा जुन्या तरी मी विक्रीस नेत नाही

हे अतिशय सुंदर..

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

नंदन's picture

4 Apr 2008 - 1:14 am | नंदन

गझल. अतिशय आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

व्यंकट's picture

4 Apr 2008 - 1:21 am | व्यंकट

म्हणतो.

व्यंकट

स्वाती दिनेश's picture

4 Apr 2008 - 1:25 am | स्वाती दिनेश

अप्रतिम! अतिशय आवडली गझल.
स्वाती

इनोबा म्हणे's picture

4 Apr 2008 - 1:27 am | इनोबा म्हणे

हल्ली मनात कोणी वस्तीस येत नाही
मीही चुकून तेथे कोणास नेत नाही

ऐन्यात शोधतो मी सारे जुने पुरावे
निसटून काळ गेला हातात येत नाही

बाजार वेदनेचा आहे भरात आला
जखमा जुन्या तरी मी विक्रीस नेत नाही

मी श्वास घेत आहे की भास होत आहे ?
काळीज धडकल्याचा आवाज येत नाही
अहाहा क्या बात है केशवा! तोंडं बंद केलीस रे सगळ्यांची....

आश्वासने जरी ते देऊन काल गेले
परतून भेटण्याला कोणीच येत नाही

माफी मिळून आता कोणास फायदा हा
गळफासमुक्त येथे कुठलेच शेत नाही

आपापले कलेवर सजवून आज ठेवा
सरकार मोजणीला हे रोज येत नाही
साला आजपर्यंत तुझी विडंबने वाचून खो खो हसलो रे! आज मात्र सुन्न करुन टाकलंस तू.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

व्यंकट's picture

4 Apr 2008 - 1:31 am | व्यंकट

हे विडंबन होतं??????

व्यंकट

इनोबा म्हणे's picture

4 Apr 2008 - 1:37 am | इनोबा म्हणे

हे विडंबन होतं??????
साला आजपर्यंत तुझी विडंबने वाचून खो खो हसलो रे! आज मात्र सुन्न करुन टाकलंस तू.
'आज तुझी गझल वाचून सुन्न झालो' असे म्हणायचे होते.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 1:31 am | विसोबा खेचर

माफी मिळून आता कोणास फायदा हा
गळफासमुक्त येथे कुठलेच शेत नाही

आपापले कलेवर सजवून आज ठेवा
सरकार मोजणीला हे रोज येत नाही

वा! लै भारी रे अनिरुद्धा!

तात्या.

अनिरुद्ध,
गझल फारच अप्रतिम आहे. एकेक कल्पना खणखणीत आणि सादरीकरणही सहज. प्रासादिकता किंवा लहजा म्हणतात, ते हेच असावे, असे वाटले. छान.
'अद्यापही सुर्‍याला माझा सराव नाही' चे वृत्त दिसते.
गळफासमुक्तीचा शेर अतिशय प्रासंगिक आणि तो धरून शेवटचे शेर फार मार्मिक आहेत.
इतक्या चांगल्या गझलेस तीट लावावीशी वाटली म्हणून काही तांत्रिक उणिवा दाखवून देण्याचे धाडस करतो आहे, पटल्यास पहा. माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण गझलेत एकच काफिया किती वेळा चालवावा, याला मर्यादा असते. यात 'शेत' व्यतिरिक्त 'येत' आणि 'नेत' सोडून फार काही दिसत नाही. इतक्या छान कल्पना डोक्यात असताना, चपखल शब्दयोजनेची देणगी लाभली असताना काफियांच्या बाबतीत मारवाडीपणा का बरे? समृद्ध काफिया संच असेल, तर कल्पनावैविध्य आणि त्यायोगे पूर्ण गझलही समृद्ध होते, असा स्वानुभव आहे. चूभूद्याघ्या. <कोणीतरी> येत नाही, <कुठेतरी/कोणालातरी> नेत नाही यांची पुनरावृत्ती त्यातून टाळता आली असती. 'बेत', 'प्रेत', 'मजेत', 'घेत', 'कवेत' इ. काफिये योजता आले असते. आठवा दादांची गझल -
मनाप्रमाणे जगावयाचे कितीकिती छान बेत होते
कुठेतरी मी उभाच होतो, कुठेतरी दैव नेत होते
असो. जे काही थोडेफार लिहिलेवाचले आहे, अनुभवले आहे, त्यावरून हे सांगावेसे वाटले. तज्ज्ञ असल्याचा दावा करीत नाही; सबब, पटल्यास पहा अन्यथा सोडून द्या.
'काळीज धडकल्याचा' गुणगुणण्यात अंमळ अडखळायला होते आहे. त्यापेक्षा सोपे काही योजता आले तर पहा. मला 'हृदयात स्पंदनांचा' असे सुचले. हृदयात स्पंदनांचा आवाज होत नाही.
पुढील उत्तम रचनांसाठी अनेक शुभेच्छा.
(आस्वादक)बेसनलाडू

सर्किट's picture

4 Apr 2008 - 4:02 am | सर्किट (not verified)

इतर सूचना छान आहेत ( विशेषतः काफियांविषयी), पण

'काळीज धडकल्याचा' गुणगुणण्यात अंमळ अडखळायला होते आहे. त्यापेक्षा सोपे काही योजता आले तर पहा. मला 'हृदयात स्पंदनांचा' असे सुचले. हृदयात स्पंदनांचा आवाज होत नाही.

हे पटत नाही. मला वाटते, की पुढच्या "आवाज येत नाही" साठी धडकणे हेच योग्य आहे.

स्पंदनांचा तसाही आवाज येत नसतोच.

- सर्किट

हे नवे सुचले. कशाचा म्हणजे धडकण्याचा/ठोक्यांचा वगैरे अध्याहृत म्हणता येईल. सोनिया गांधींचा 'आतला' वगैरे आवाज या गझलेत तरी अपेक्षित नसावा.
नाहीतरी गेयतेतील खडे दूर करून, 'दिल धडकना'ने जन्म दिलेले 'हिंदा'ळलेले काळीज धडकणे पचवायचे असेल तर आम्ही स्पंदनांनाही बोलके करून त्यांचा आवाज ऐकू. पोएटिक लायसन्स यू सी ;)
असो. अंतिम निर्णय मूळ रचनाकाराचा.
(सूचक)बेसनलाडू

सर्किट's picture

4 Apr 2008 - 7:08 am | सर्किट (not verified)

काळीज धडकतेच, ते हिंदी असो की मराठी.

"माझ्या काळजातील धडधड वाढली" हे वाक्य समजण्यासाठी सोनियाचा दाखला द्यावा लागत नाही.

आपल्या आवडत्या "भाईकाकांचे" हे वाक्य आहे.

आता गप !

- सर्किट

बेसनलाडू's picture

4 Apr 2008 - 9:12 am | बेसनलाडू

धडकणे आणि धडधड वाढणे यात सट्ल डिफ्रन्सेस आहेत. शेरात अपेक्षित धडकणे आहे, धडधडणे नाही. धडकणे वेगळे, (कदाचित) स्पंदने वेगळी. असो.
(सपष्ट)बेसनलाडू

धनंजय's picture

4 Apr 2008 - 2:27 am | धनंजय

दिल खुश झाले

सुवर्णमयी's picture

4 Apr 2008 - 3:00 am | सुवर्णमयी

मस्त! गझल अतिशय आवडली.

मीनल's picture

4 Apr 2008 - 4:31 am | मीनल

गझल हा अरेबिक शब्द आहे. ते म्हणजे काही शेर एकत्रीत केलेले काव्य.
त्यात नेहमी ट्रॅजिडी असते.
ही गझलपण वेदनाचा सूर आळवते.

समान बेहेर =मिटर (लांबी ), सारखे रॅडिफ(इथे तो शब्द `नाही` हा आहे) आहे.
काफिया (यमक) मात्र फक्त पहिल्या शेर मधे जुळताना दिसते आहे .

वासतवतेची जाणिव करून देते ही गझल.छान.

मीनल.

सर्किट's picture

4 Apr 2008 - 7:10 am | सर्किट (not verified)

गझल हा अरेबिक शब्द आहे. ते म्हणजे काही शेर एकत्रीत केलेले काव्य.
त्यात नेहमी ट्रॅजिडी असते.

काय सांगता ??

तुमच्या प्रतिसादांतून नेहमी नवनवीन माहिती कळत असते बुवा.

आहे की नाही, चित्तर ?

- सर्किट

विसुनाना's picture

4 Apr 2008 - 3:11 pm | विसुनाना

:)

मदनबाण's picture

4 Apr 2008 - 5:29 am | मदनबाण

आपल्याला आवडले बुवा.....

आश्वासने जरी ते देऊन काल गेले
परतून भेटण्याला कोणीच येत नाही
आपले नेता लोक,,साले सगळेच चोर.....

माफी मिळून आता कोणास फायदा हा
गळफासमुक्त येथे कुठलेच शेत नाही
कुणाला पर्वा आहे का त्याची,, सर्व म्हणतात आपल पोट भरल ना खाऊन. या भ्रष्टाचारी लोकांचीच तिरडीच बांधायला हवी.

(बळीराजाच्या बळींनी व्यथीत)
मदनबाण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2008 - 7:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऐन्यात शोधतो मी सारे जुने पुरावे
निसटून काळ गेला हातात येत नाही

आणि

बाजार वेदनेचा आहे भरात आला
जखमा जुन्या तरी मी विक्रीस नेत नाही

एकदम मस्त !!!

आजानुकर्ण's picture

4 Apr 2008 - 3:56 pm | आजानुकर्ण

अतिशय सुंदर गझल. प्रत्येक शेर(!) दाद देण्यासारखा आहे.

(चाहता) आजानुकर्ण

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 10:12 am | धमाल मुलगा

बाजार वेदनेचा आहे भरात आला
जखमा जुन्या तरी मी विक्रीस नेत नाही

मी श्वास घेत आहे की भास होत आहे ?
काळीज धडकल्याचा आवाज येत नाही

क्या बात है अभ्य॑करशेठ ! मार डाला.

अवा॑तरः भेटीमध्ये तुमच्या गझला ऐकवा अशी विन॑ती केली होती, ती अशी पुर्ण होताना बघून आन॑द वाटला. अपनी तबियत एकदम खूष!!! धन्यवाद शेठ :-)

- (मी सुद्धा आस्वादक) ध मा ल.

आनंदयात्री's picture

4 Apr 2008 - 12:54 pm | आनंदयात्री

म्हणतो, उत्तम गझल, अशा तुमच्या उत्तमोत्तम रचना अजुन येउ द्यात !

शरुबाबा's picture

4 Apr 2008 - 3:07 pm | शरुबाबा

मस्त! गझल अतिशय आवडली.

विसुनाना's picture

4 Apr 2008 - 3:15 pm | विसुनाना

गजल जबराच झाली आहे.

हल्ली मनात कोणी वस्तीस येत नाही
मीही चुकून तेथे कोणास नेत नाही

वा! मतल्यातच बोल्ड झालो.
अजून अशाच याव्यात!

गिरीराज's picture

4 Apr 2008 - 3:38 pm | गिरीराज

तात्या,गझल खूप आवडली!

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 3:44 pm | विसोबा खेचर

तात्या,गझल खूप आवडली!

तो मी नव्हेच! :))

एनीवेज, अभ्यंकर खानदानाचा विजय असो...! :)

तात्या.

गिरीराज's picture

5 Apr 2008 - 11:15 am | गिरीराज

आम्ही त्यांनाही तात्याच म्हणतो बरंका!

अनिरुद्ध अभ्यंकर's picture

4 Apr 2008 - 7:45 pm | अनिरुद्ध अभ्यंकर

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार
अनिरुद्ध.

अजय जोशी's picture

5 Apr 2008 - 9:10 pm | अजय जोशी

रूप दिसायला गजलेचेच वाटते. मला वाटते त्यातील तंत्र तपासून पहावे की काय?
माझी आपली एक बालीश शंका. मतल्यात येत आणि नेत नाही आल्यानंतर पुन्हा ते वापरावे का? जर सातत्याने वापरायचे असेल तर रदीफ म्हणून का नाही?
विषय चांगला.

आपला
अ.अ.जोशी

फटू's picture

6 Apr 2008 - 12:20 am | फटू

एव्हधच म्हणता येईल या रचनेबद्दल... नव्हे रचना म्हणणं सुद्धा चुक ठरेल... ही तर वास्तवाच्या जाणिवेतून आलेली प्रेरणा आहे....

राघव१'s picture

8 Aug 2008 - 5:32 pm | राघव१

काय जबरदस्त लिहिलेत! मान गये!
प्रत्येक शेर खणखणीत!! कोणताही वेगळा काढता येत नाही.
दुवा पाठवला माझ्या सर्व दोस्तांना. म्हटले वाचा लेको. यास म्हणतात काव्य. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त पोचवलेत.
असेच लिहीत रहा. शुभेच्छा. :)