एकदाच यावे सखया...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
12 Mar 2012 - 1:15 pm

एकदाच यावे सखया.. (येथे ऐका)

अशोकजी परांजपेंचे सुंदर शब्द असलेलं अशोक पत्की, सुमनताईंचं एक सुरेख गाणं. साधीच परंतु अत्यंत सात्त्विक अन् गोड चाल आणि सुमनताईंचा तितकाच गोड आणि हळवा गळा. 'सखया' हा शब्द खूप म्हणजे खूपच सुरेख!

पुन्हा गूज अंतरीचे हे कथावे व्यथांनी.. - ही ओळ खूप काही सांगणारी.

मध्यंतरीच्या काळात कुठेतरी अंतर पडले आहे, ते दूर व्हावे आणि पुन्हा एकदा तुझे गीत कानी यावे आणि 'भाव दग्ध विटला हा रे, पुन्हा फुलुनि यावा...!'

'पुन्हा फुलुनि यावा...' या ओळीतील पत्कीसाहेबांच्या अत्यंत हळव्या सुरावटीचं सुमनताईंनी अगदी सोनं केलं आहे. ही जागा त्यांच्या गळ्यातून इतकी सात्त्विकपणे उतरली आहे की क्या केहेने..! 'धुंद होऊनी मी जावे..' ही सुरावट देखील तशीच सुरेख...

प्रेमगीतातील ही सात्त्विकशीलता आणि मर्यादशीलता हल्लीच्या काळात क्वचितच पाहायला मिळते. कितीही जरी निरनिराळ्या राजसी-तामसी पाककृती असल्या, आपण त्यांचा वेळोवेळी आस्वाद घेतला तरी अहो शेवटी केळीच्या पानावरील साधा गरमागरम वरणभात, सोबत साजून लोणकढं तूप याला जशी सर नाही ना, तसंच या गाण्याचं आहे. अखेर कुठेतरी तुम्हाला निवारा मिळेल आणि तुमचं मन शांत होईल ते 'एकदाच यावे सखया', 'केतकीच्या बनी', 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या' किंवा विठ्ठला तू वेडा कुंभार..' याचसारख्या गाण्यांमधून..!

पण आमचं हल्ली असं झालंय की आम्हाला 'कोलावरी डी..' सारखी गाणी हेच काय ते उच्च संगीत वाटतं आणि याचं कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात..

मग माझ्यासारखा नॉस्टालजियाने पछाडलेला एखादा खुळा उठतो आणि 'एकदाच यावे सखया..' या सारख्या गोड, अवीट गाण्याबद्दल आपलं मन मोकळं करतो इतकंच..!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

चैतन्य दीक्षित's picture

12 Mar 2012 - 1:22 pm | चैतन्य दीक्षित

खूपच सुरेख गाणं आहे हे.
अशोक परांजपे, अशोक पत्की आणि सुमनताईंना सलाम आहे.

RUPALI POYEKAR's picture

12 Mar 2012 - 1:38 pm | RUPALI POYEKAR

हे गाणं मला ऐकिवात नाही पण त्यांची 'केतकिच्या बनी', 'ए़कतारी सुर जाणी', 'आकाश पांघरूणी',
'जगि ज्यास कोणी नाहि', 'मॄदूल करानी' ही गाणी खुपच आवाडतात

RUPALI POYEKAR's picture

12 Mar 2012 - 1:39 pm | RUPALI POYEKAR

हे गाणं मला ऐकिवात नाही पण त्यांची 'केतकिच्या बनी', 'ए़कतारी सुर जाणी', 'आकाश पांघरूणी',
'जगि ज्यास कोणी नाहि', 'मॄदूल करानी' ही गाणी खुपच आवाडतात

श्रावण मोडक's picture

12 Mar 2012 - 2:09 pm | श्रावण मोडक

वेडं करून टाकणारं गाणं आहे हे... :)

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2012 - 2:58 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम गाणं आहे हे. कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटणारं! शांत निवांत! अनुभूती वेगळीच. हे गाणं परत एकदा ऐकलं त्यासाठी धन्यवाद.

जाई.'s picture

12 Mar 2012 - 8:33 pm | जाई.

+१

कुठे ऐकू ? लिंक आहे का ?
@तात्या , आपला लेख सुरेख पण गाणेच ऐकले नाही म्हणून लेखनसीमा.

मी-सौरभ's picture

12 Mar 2012 - 4:36 pm | मी-सौरभ

लेखात लिंक दिलेली आहे :)

चिंतामणी's picture

12 Mar 2012 - 3:43 pm | चिंतामणी

>>>पण आमचं हल्ली असं झालंय की आम्हाला 'कोलावरी डी..' सारखी गाणी हेच काय ते उच्च संगीत वाटतं आणि याचं कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात..

१०० % सहमत.

>>>मग माझ्यासारखा नॉस्टालजियाने पछाडलेला एखादा खुळा उठतो आणि 'एकदाच यावे सखया..' या सारख्या गोड, अवीट गाण्याबद्दल आपलं मन मोकळं करतो इतकंच..!

येत रहा. आणि लिहीत रहा.

गणपा's picture

12 Mar 2012 - 3:58 pm | गणपा

अवीट गोडवा आहे.
संगीत + बोल + आवाज यांचा त्रिवेणी संमच.

पण आमचं हल्ली असं झालंय की आम्हाला 'कोलावरी डी..' सारखी गाणी हेच काय ते उच्च संगीत वाटतं

किंचितसा असहमत. काळ-वेळ, मुड यांवरही गाण्यांची निवड ठरते. त्यामुळे 'एकदाच यावे सखया' आवडणार्‍या मला 'कोलावरी' सारखी गाणी(?)ही आवडतात.

आबा's picture

12 Mar 2012 - 6:29 pm | आबा

सुरेख !

पैसा's picture

12 Mar 2012 - 6:31 pm | पैसा

मस्त ओळख! सुमनताईंचा आवाज या गाण्याला मस्त फिट्ट बसतो!

रेवती's picture

12 Mar 2012 - 8:02 pm | रेवती

गाणं आवडलं.
आधी कधी ऐकलं नव्हतं.

प्राजु's picture

12 Mar 2012 - 8:09 pm | प्राजु

सुरेख... सुरेख!!
खरच नॉस्टॅल्जिक!

तिमा's picture

12 Mar 2012 - 9:03 pm | तिमा

तात्या, गाणं ऐकलं नव्हतं. दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.
अवांतरः त्याच पानावर कोणीतरी लतादिदींबद्दल गरळ ओकलं आहे. 'डार्क साईड ऑफ लता' म्हणून. त्याला मी योग्य ते उत्तर दिले आहे.

तर्री's picture

12 Mar 2012 - 10:28 pm | तर्री

तात्यांचे रसग्रहणही नेहमी प्रमाणे छान.
ह्या गाण्याची थोरवी गाताना "कोलावरी" चा कात्रज करण्याची काय गरज ? हा आपला माझा ऊठवळ सवाल.
एके काळी शा.संगीत हेच अस्स्ल व ईतर ( नाटय संगीत सुध्दा !) हे कमअस्सल मानल जात होते.
नंतर च्या काळात सुगम संगीतावर घाला घालून शा.संगीत व नाटय संगीत चे पवाडे गायले जात होते.
आता सुगम संगीता कळवळा अन कोलावरीत कोलदांडा ! कश्याला हो हे असे !!

"एकदाच यावे सखया".... हे अप्रतिमच आहे. पण कोणाला कधी कोलावरी आवडेलही..... पॅपॅ पॅपॅ पॅपॅ पॅपॅ

चिंतामणी's picture

12 Mar 2012 - 10:46 pm | चिंतामणी

गणपा
>>>किंचितसा असहमत. काळ-वेळ, मुड यांवरही गाण्यांची निवड ठरते. त्यामुळे 'एकदाच यावे सखया' आवडणार्‍या मला 'कोलावरी' सारखी गाणी(?)ही आवडतात.

तर्री
>>>"एकदाच यावे सखया".... हे अप्रतिमच आहे. पण कोणाला कधी कोलावरी आवडेलही..... पॅपॅ पॅपॅ पॅपॅ पॅपॅ

तात्यांच्या वाक्याचा अर्थ लावताना तुम्हा दोघांचा गैरसमज झाला असावा. कोलवरी पॉप्युलर होण्याचे कारण देताना "कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात.." अशी त्या वाहीन्यांवर टिका केली आहे. त्यांचा रोख आजकाल विविध वाहिन्या अनेक गोष्टी "हॅमरींग" करतात त्या कडे जास्त आहे असे मला वाटते.

पिंगू's picture

12 Mar 2012 - 10:52 pm | पिंगू

तात्या जुन्या आठवणींनी नॉस्टॅल्जिक झालो.

- पिंगू

तर्री's picture

12 Mar 2012 - 10:57 pm | तर्री

<कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात>
हे अगदी विनाविलंब मान्य ! बेछूट पॉईंट !!

पण तरिही ह्या गाण्याच्या रसग्रहणाचे वेळी "कोलावरीचा" ऊल्लेख्च कशाला ? असे माझे मत आहे.
जिलेबीचे कौतुक करताना चकल्या ( तात्यांचे आशिर्वाद ) ना वाकुल्या का दावा ?

तात्या...... फार सुरेख व्यक्त झाला आहात.
खरंच... अशी गाणी ऐकली की आत्मिक समाधान मिळतं !!
त्यातून हे गाणं तर फारच गोड !!

चौकटराजा's picture

13 Mar 2012 - 1:00 pm | चौकटराजा

आदरणीय तात्या,
ही लिंक टाकून फार मागल्या काळात नेलेत हो ! हे गाणे मी बर्‍याच वर्षात ऐकलेले नव्हते. अतः जरा शब्द विसरलो. मी सहसा कलाकारांच्या एकदम प्रेमात पडलेलो आहे. उदा. गोनीदांच्या घरी ओपी नय्यर यांच्या प्रेमात १९६५ साली पडलो. १९६२ साली वाई चित्रा टोकीज मधे सुधीर फडके
१९७५ वाई येथे प्राज्ञ्पाठ शाळा - परवीन सुलताना १९६४ च्या सुमारास खळे काका ( शुक्रताराचे प्रथम प्रक्षेपण मी ऐकले आहे वय १२ ) ई. पण अशोक पत्की या गुणी माणसाच्या प्रेमात पडायला मला का बरे काळ जावा लागला ? कारण अमुक अमुक गाणे हे पत्कींचे आहे असे वाजत गाजत नसे. थोडा प्रसिद्धीचा परिणाम. आपण वाटवे ,कुरवाळीकर, वाळवेकर, जीएन याविषयी एखादा लेख लिहिला तर मज्जा येइल !

अविनाशकुलकर्णी's picture

13 Mar 2012 - 1:20 pm | अविनाशकुलकर्णी

फार सुम्दर व मधुर गाणे............

विसोबा खेचर's picture

14 Mar 2012 - 11:39 am | विसोबा खेचर

प्रतिसाद नोंदवणार्‍या सर्व रसिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, वाचनमात्रांचेही औपचारीक आभार..

तात्या.