गाभा:
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9925083.cms
नाशिकमधे एका सार्वजनिक गणेशोत्सवात डी.जे.चा (म्हणजे काय?) मोठा आवाज कमी करा असे सांगायला गेलेल्या प्राचार्याला बेदम मारहाण केली आणि त्यात त्या बिचार्या माणसाने जीव गमावला.
जिला विद्येची देवता मानतात तिच्या नावाने उत्सव करायचा त्यात असला गोंगाट करायचा आणि तो कमी करायला जाणार्या विद्यार्जनात मदत करणार्या माणसाचा जीव घ्यायचा. इतका भीषण उपरोध कल्पनेतही सुचणार नाही.
खरोखर आता सार्वजनिक गणेशोत्सव बंदच करावा की काय असे वाटू लागले आहे. आज टिळक जिवंत असते तर "हेची काय फळ मम तपाला?" असे नक्की म्हणाले असते.
गणेशोत्सव हा गल्ली गल्लीत साजरा होणारा भ्रष्टाचारोत्सव बनला आहे.
अण्णा, जरा मनावर घ्या.
प्रतिक्रिया
9 Sep 2011 - 11:43 pm | यकु
गल्ली-गल्लीत गणपतीला वेठीस धरून जे काही अख्ख्या महाराष्ट्रभर सुरु आहेत ते गणेशोत्सवाचं अत्यंत विकृत, हिणकस रुप आहे.
तुम्ही लिंक दिलेली बातमी अत्यंत उव्देग उत्पन्न करणारी आहे.
आमच्या गावातील गणेशोत्सव सुध्दा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही.
पूर्वी महिनामहिना आधी गणपती बसायची वाट पाहिली जायची. दहा दिवसांत किमान २-३ तरी नाटकं असायचीच... सकाळी सकाळी गणपतीसमोर गाथ्याचं पारायण केलं जायचं.
नाटकाच्या तालमी महिनाभर आधीच सुरु व्हायच्या... रोजच्या रोज भेटणारी माणसं नाटकात असली जबराट काम करायची की ओळखता सुध्दा यायची नाही.. हा पाटलाची सून झालाय तो महमूद भाईचा चांद्या ( चिकना होता दिसायला ).. ढेरी दिसण्यासाठी कोट-सद्र्याच्या आतुन पोटावर लहानशी उशी बांधलेले शेटजी म्हणजे आबा नाना.. तो करवती मिशावाला डाकू म्हणजे जगन्नाथ महाराजाचा किशोर...
चावडीवर चारपाच ट्रॅक्टरचे फलके काढून उभं करुन त्याचं स्टेज उभं केलं जायचं.. फर्लांगभर अंतरावर गणपतीचा शामियाना..
स्टेज ते गणपतीचा शामीयान्या मधल्या जागेत पब्लिकला बसायला जागा.. स्टेजवर पडदा.. नांदी.. पहिला अंक.. दुसरा अंक.. तिसरा अंक .... अरारारा.... गेले ते दिवस!!!
आता ? आता चोट्ट्यासारखे १०- १० मिनिटांच्या झाक्या करतात..
दिवसभर माझ्या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली वगैरे ओंगळ गाणी गणपतीच्या कानात ओतली जातात... तो पळून कसा जात नाही मध्येच ही खरी कमाल आहे.
9 Sep 2011 - 11:58 pm | शुचि
एका बाजूला उत्सवाला वाईट स्वरूप आलेल्या अशा बातम्या ऐकवत नाहीत तर दुसरीकडे, पाश्चात्य देशात सणांची/उत्सवांची जाणवणारी मारामार दिसते. रस्त्यावर फक्त कार आणि बसेस दिसतात. माणूस पहाण्याकरता तरसल्यासारखे होते. मग घोळक्याने नियमीत काही "फेस्टीव्ह", सार्वजनिक आनंदी समारंभ केलेले दूरच. मग भारताची आठवण येते. या दोहोंचा सुवर्णमध्य असलेले जग नाहीच का कुठे?
सार्वजनिक गणेशोत्सव हवेत. समाजात जिवंतपणा, समारंभ, आनंद हा हवाच. पण वरील उदाहरणातील गुन्हेगारांना अतिशय कडक शासन व्हायला हवे. कायदा कडक हवा.
10 Sep 2011 - 12:09 am | प्रियाली
माणूस कुठेही असला तरी तो समाजप्रिय आणि उत्सवप्रियच असतो.
काहीतरीच काय? फारतर पाश्चात्य देशात रस्त्यावर मंडप घालून गणेशपूजा किंवा सार्वजनिक गणपतीसमोर नाच, स्पीकर्स नसतात असे म्हणा. अन्यथा, गावांगावांत केलेल्या बार्बेक्यू, रिब फेस्टपासून राज्याची वार्षिक जत्रा असो. उत्सव सर्वत्र असतात.
अनेक मराठी मंडळांत गणपती उत्साहाने साजरा करतात. अनेकांच्या घरी गणपती बसवतात.
अमेरिकेत आता उत्सवाचे महिने सुरू होत आहेत. हॅलोवीन, थँक्स गिविंग आणि ख्रिसमस. गच्च भरलेले मॉल, पार्ट्या, कार्यक्रम इथेही सुरु होतातच की.
---
बाकी, सार्वजनिक गणेशोत्सवातील गैरप्रकारांबद्दल न बोललेले बरे :-(. झालेला प्रकार त्याहूनही दुर्दैवी.
10 Sep 2011 - 12:17 am | शुचि
हॅलोवीन हा एकच रस्त्यावर येऊन साजरा केलेला कार्यक्रम. थॅक्स गिव्हींग तर कुटुंबासोबतच करतात आणि ख्रिसमस चर्चमध्ये. यात सामान्य भारतीय नागरीक कुठे सामील होऊ शकतो (ओळखीशिवाय)? हॅलोवीन एक मजा असते एक दिवसाची (किंवा थोडे ३/४ दिवस म्हणा) बाकी दिवस काय तर मॉलमध्ये जायचे आणि चेहेरे पहायचे?
रिब फेस्टपासून राज्याची वार्षिक जत्रा - याबद्दल मी अनभिज्ञ आहे :( मे बी आय अॅम आयसोलेटेड!
10 Sep 2011 - 12:20 am | प्रियाली
तुम्ही तुमच्या घरात थँक्स गिविंग करा. मित्रमंडळींना बोलवा. त्यांच्याकडे जा. ऑफिसात साजरा करतात लोक, पूर्वी आम्ही अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये होतो तेथे साजरा करत. ख्रिसमसचेही असेच.
तसेही, रस्त्यावर येऊन सणच साजरे करायला हवेत असे थोडेच आहे? मॅरेथॉन शर्यती असतात, जत्रा असतात, कार्निवल्स असतात, वर म्हटले तसे फेस्ट्स असतात. आमच्या इथल्या मंदिरात फटाके फोडून दिवाळी साजरी होते, गणेशोत्सव साजरा होतो. मराठी मंडळ पाडवा, दिवाळी, गणेशोत्सव साजरा करते.
10 Sep 2011 - 2:13 am | स्वाती२
+१
आमच्या गावात ३ दिवस चालणारी गावची जत्रा, काउंटी सीट असल्याने काउंटीची जत्रा, हॅलोविन, ख्रिसमस आणि त्या आधी सांताची परेड- सांता त्याच्यासाठी उभारलेल्या कॉटेजमधे मुक्कामाला असतो डाऊनटाऊन मधे, शिवाय स्ट्रॉबेरी फेस्ट पासून फिश फ्राय पर्यंत वेगवेगळे इव्हेंट्स असतात. झालेच तर होमकमिंग आणि त्याची परेड असते. मात्र कुठेही बेशिस्त नसते. कायदे धाब्यावर बसवून इतरांना त्रास देत उत्सव साजरे करणे नसते. रस्ता किंवा चौक ट्राफिकसाठी बंद केला तरी पर्यायी मार्ग आधीच सुचित केलेला असतो.कुठलाही इव्हेंट झाल्यावर संयोजक परिसर लगेच स्वच्छ करतात. जर का नियमांचे पालन केले नाही तर सिटी पुढल्या वर्षी परवानगी नाकारते. मला तरी इथली उत्सव साजरे करायची पद्धत आवडते.
11 Sep 2011 - 2:53 am | पक्या
+१
आमच्या इथे पण भरपूर उत्सव साजरे केले जातात. (म्हणजे अमेरिकेतच म्हणतोय.वेस्ट कोस्टात)
घराजवळच मंदिर असल्याने तिथे चालणारे रामनवमी, जन्माष्टमी, दसरा , दिवाळी हे उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. आल्यागेल्या सर्व भक्तगणांना प्रसाद (ते म्हणजे एक जेवणच असते) असतो. देवळात अभिषेक चालू असतो, भजन , प्रवचनं असतात. मुलांचे नाच गाण्याचे कार्यक्रम असतात. आता गणपती सणानिमित्त एका नजीकच्या सिटीमधे विसर्जनाची मिरवणूक काढणार आहेत आणि त्या सिटीमधील ग्रीन रिव्हर येथे गणपती विसर्जन होणार आहे. महाराष्ट्र मंडळाचे ही भरपूर कार्य़क्रम आहेत. नवरात्रात दाक्षिणात्य लो़कांचे गोलू, मराठी कुटुबांकडे भोंडले, बंगाली लोकांची दूर्गापूजा आणि गुजराथ्यांचे दांडिया, गरबा असे भरपूर कार्यक्रम असतात. दिवाळीत अनेक भारतीय ऑर्गनायझेशन्सचे अनेकविध कार्यक्रम असतात. शिवाय घरोघरी जी जी मित्रमंडळी सण साजरे करतात त्यांच्या घरी पूजा-प्रसादासाठी आमंत्रण असते. या शिवाय २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट चे झेंडावंदन आणी इतर सांस्कृतिक कार्यक्रम ही असतातच. . आमच्याइथे दिवाळीत एक संस्था उत्साहाने रामलीला सादर करते. अनेक हौशी कलाकार त्यात भाग घेतात. मी भारतात असताना प्रत्येक सणात एवढा भाग नक्कीच घेतला नसता. हे झाले भारतीय सणांबद्द्ल.
याशिवाय हॅलोविन , थॅंक्सगिव्हींग ,ख्रिसमस ह्या सणानिमित्त ऑफिसेस, मित्रांकडे पार्ट्या असतात. सिटीचे काही स्पेशल इव्हेंट्स असतात. जसे की पंप्कीन कार्व्हिंग, स्पूकी नाईट, सांटा क्लॉज परेड ई. खिस्मस मध्ये डाऊनटाऊन मधील रस्त्यांवर येशूच्या जन्मावेळीचे देखावे सादर केले जातात. जसे आपल्याकडे गणपतीचे मांडव उभारून केले जाते तसे फक्त प्रमाण तेवढे नाही. इस्टर ला मुलांचे एग हंट आणि इतर कार्निव्हल गेम्स आयोजित केले जातात. सामन डेज , डर्बी डेज , काईट फेस्टिव्हल, स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल, काऊंटी फेअर, बार्बेक्यू असे अनेक डेज आयोजित केले जातात. ४ जुलैचा ही मोठा कार्यक्रम असतो ज्याची सांगता फटाक्यांच्या आतषबाजीने होते.
तरी मी हे थोडक्यात लिहिले. अजून्ही भरपुर काय काय असते पण विस्तार भयास्तव लिहीत नाही.
थोडक्यात काय तर इथे पण तेवढीच उत्सव प्रियता आहे पण फरक हा आहे की त्यात एक शिस्त आहे . उगाच नियम धाब्यावर बसवून उत्सव साजरे केले जात नाही.
11 Sep 2011 - 2:46 pm | धन्या
(निवासी) भारतीयांना म्हणावं शिका काही अमेरिकावासी (अनिवासी) भारतीयांकडून.
11 Sep 2011 - 7:18 am | रेवती
शुचितै,
आमच्या इथे तर मंगळागौरीची पूजा आणि जागरण (रात्री १० वाजेपर्यंत) ;) झाले. देवळांमधे तर सारखे काही ना काही चालू असते. उलट इथे ते सगळे शिस्तीत होते असे दिसते तरी! आज देवळात भारतीय वेळेप्रमाणे गणपती बसवल्याने विसर्जनही भारतीय वेळेप्रमाणे होणार होते. आम्ही गेलो होतो पण त्यांनी वेळ पुढे ढकल्याने परत आलो.
बाकी पुण्यातले गणेशोत्सव हे गुंड लोकांचे अड्डे वाटतात.
10 Sep 2011 - 12:06 am | पाषाणभेद
लो. टिळकजी पुन्हा जन्माला या अन 'सार्वजनीक' गणेशौत्सव बंद करा हो. आता त्याची आवश्यकता नाही.
आता कदाचीत कारवाई झालीच तर दलित सवर्ण हा वाद उकरून काढतील त्या झोपडपट्टीचे लोक. राजकारणीही त्यात उडी घेतील. पोलीस एकादोघांना उचलतील. बास.
एक वाटते, की मोठेमोठे स्पिकर, अॅम्प्ली बनवणार्या कंपन्यांना 'मोठे स्पिकर, अॅम्प्ली' बनवणासाठी सरकारने परवानगी देवू नये. किंवा त्या स्पिकरसोबत डेसीबल दाखवणारे मिटर टाकायला सक्ती करावी. (अर्थात आपल्याकडे प्रत्येक कायदा मोडला जातोच म्हणा.)
10 Sep 2011 - 12:22 am | विकास
विषण्ण करणारी बातमी आहे.
आज टिळक जिवंत असते तर "हेची काय फळ मम तपाला?" असे नक्की म्हणाले असते.
सहमत.
अण्णा, जरा मनावर घ्या.
अण्णा म्हणजे काय "रोग अनेक इलाज एक" सारखे वर्तमानपत्राच्या मागच्या पानावार एक इंच चौरसात येणार्या जाहीरातीतील औषध आहे का? ;) यात मी अण्णांना अथवा मुद्याला कमी लेखत नाही अथवा आपल्याला उद्देशूनही म्हणत नाही. केवळ आपण समाज म्हणून शिवाजी-टिळक-अण्णा असेच कुणाला बघत त्यांनी करण्याची वाट बघत बसलो तर काहीच होऊ शकणार नाही असे वाटते...
10 Sep 2011 - 12:30 am | यकु
अण्णा म्हणजे काय "रोग अनेक इलाज एक" सारखे वर्तमानपत्राच्या मागच्या पानावार एक इंच चौरसात येणार्या जाहीरातीतील औषध आहे का? यात मी अण्णांना अथवा मुद्याला कमी लेखत नाही अथवा आपल्याला उद्देशूनही म्हणत नाही. केवळ आपण समाज म्हणून शिवाजी-टिळक-अण्णा असेच कुणाला बघत त्यांनी करण्याची वाट बघत बसलो तर काहीच होऊ शकणार नाही असे वाटते...
सहमत!!!
काहीही चांगला कार्यक्रम न करता महाप्रसादाच्या नावानं नुसतीच खिचडी आणि रंगीत शिरा देणार्या व दहा दिवस नुसतीच गाणी बडवणार्या गणेशमंडळांना दमडीचीही वर्गणी देऊ नये.
एवढं जरी केलं तरी पुरेसं आहे.
10 Sep 2011 - 12:40 am | अन्या दातार
.......गणेशमंडळांना दमडीचीही वर्गणी देऊ नये.
सध्या वर्गणी घेतली जाते की उकळली जाते?
10 Sep 2011 - 12:46 am | विकास
सध्या वर्गणी घेतली जाते की उकळली जाते?
अगदी बरोबर आहे! एक उपाय (असे अनेक निघू शकतात):
अशा लोकांसाठी / मंडळासाठी चेक फाडावा, कॅश द्यावी, पण ती देत असताना त्यांना त्याच गणपतीचा फोटो देऊन शपथ घालावी आणि वर्गणीचा काही गैरवापर केला तर ती गोळा करणार्या व्यक्तीवर आणि त्याच्या कुटूंबावर कोप होऊ शकेल असे सांगून बघावे. :-) मला खात्री आहे त्याचा अंशतः तरी परीणाम होईल आणि पूर्ण खात्री आहे, या संदर्भात अनिसवाले अंधश्रद्धानिर्मुलन करायला देखील येणार नाहीत. ;)
11 Sep 2011 - 11:40 pm | lakhu risbud
नै तर काय मेलं ! उद्या लोकांच्या घरात पाळणा हलला नै तर म्हणार का अण्णा, जरा मनावर घ्या ......
10 Sep 2011 - 1:28 am | अर्धवटराव
यावर एकच उपाय... "गेले ते दिवस" म्हणण्यापेक्षा "परत आले ते दिवस" म्हणण्याच्या लायकीचा उत्सव साजरा व्हावा; किंबहुना करावा. छोट्या प्रमाणात तो होत असेलही, आता गरज आहे त्याला भव्यरूप देण्याची.
(उत्सवप्रीय) अर्धवटराव
10 Sep 2011 - 2:24 am | स्वाती२
अतिशय खिन्न झाले बातमी वाचुन. :( मात्र एकट्या माणसाने सांगायला जाण्याऐवजी कॉलनीतील ५-६ जण मिळून पोलिस कंप्लेंट केली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती का? असेही मनात आले.
10 Sep 2011 - 6:53 am | सुनील
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9929224.cms
आणि आता ही वेगळीच माहिती पुढे आली आहे.
खरे काय नि खोटे काय?
10 Sep 2011 - 7:15 am | पप्पु अंकल
म टा = मला टाका
दुसरा पेपर वाचा
10 Sep 2011 - 7:15 am | पप्पु अंकल
म टा = मला टाका
दुसरा पेपर वाचा
10 Sep 2011 - 7:24 am | llपुण्याचे पेशवेll
सध्या वाहनांचे बरेच अपघात रस्त्यात होत असतात. बरेच लोक अत्यंत वेगाने, राँग साईडने वाहने चालवतात, त्या अपघातात लोक मरतात, त्यामुळे मी स्वतः बस सोडून इतर कोणतेही वाहन वापरत नसलो तरी सर्व वाहनांना रस्त्यांवरून जायला बंदी करावी. रस्ते फक्त चालण्यासाठीच असतात. डीझेल साहेबांना हे कळले तर ते काय म्हणतील. डिझेल साहेब परत या आणि तुम्ही तयार केलेले डिझेल इंजिन मागे घ्या.
10 Sep 2011 - 1:01 pm | नितिन थत्ते
आज डीझेलसाहेब जिवंत असता तर "हेची काय फळ मम तपाला?" असे नक्की म्हणाला असता.
11 Sep 2011 - 9:38 am | आळश्यांचा राजा
सहमत.
10 Sep 2011 - 11:18 am | तिमा
या देशात कायम भ्रष्ट नेत्यांच्या नांवे ओरड होते. पण हे नेते इथल्याच समाजातून आलेले आहेत हे कसे विसरता ? आपले नेते हा आपल्या समाजाचा आरसाच आहे. दिवसेंदिवस आर्थिक विषमता, दैनंदिन समस्या, अवतीभवती चाललेला चंगळवाद, स्वार्थीपणा , अशा या ना त्या कारणाने भारतीय समाज विकृत होत चालला आहे. शिक्षण, रोजगार हा सहज उपलब्ध नसल्याने टवाळ, टपोरी तरुणांची संख्या वाढत चालली आहे. लहानपणापासून चांगले संस्कार होतात तेंव्हा एक चांगला नागरिक बनतो. अशी किती घरे आता उरली आहेत ? त्यामुळे यापेक्षा आणखी वेगळे काय होणार या देशांत?
सर्वच क्षेत्रांमधला भ्रष्टाचार, अनाचार या देशाला पोखरत आहे.
10 Sep 2011 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार
परवाच एका मिपाकर सदस्येने खरडीत 'ह्या सर्व प्रकाराला लोकजागृती ऐवजी लोकविकृतीचे रुप आले आहे.' असे विधान केले होते जे सतत अनुभवायला मिळत आहे.
बाकी निवासी गणपतीचा धागा हायजॅक करण्याचा प्रयत्न करणार्या अनिवासींचा निषेध करतो आणि मी माझे चार-आठ शब्द संपवतो.
12 Sep 2011 - 12:02 am | चिंतामणी
'ह्या सर्व प्रकाराला लोकजागृती ऐवजी लोकविकृतीचे रुप आले आहे.'
अगदी बरोबर. असेच म्हणतो.
बाकी निवासी गणपतीचा धागा हायजॅक करण्याचा प्रयत्न करणार्या अनिवासींचा निषेध करतो.
:bigsmile:
12 Sep 2011 - 6:33 am | क्रेमर
सार्वजनिक गणेशोत्सव नसावा, असे माझे मत आहे. या मताचा व सदर घटनेचा काहीही संबंध नाही. (प्रत्यक्ष घटनेविषयी शून्य माहिती असलेल्या लोकांशी वाद टाळण्यासाठी सदर प्रतिसाद संपादित केला आहे.)
12 Sep 2011 - 6:06 am | निनाद
अतिशय दुर्दैवी घटना आहे!
मटाची बातमी खोडसाळ असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी माहिती देतांना योग्य माहिती दिली नाही असे म्हंटले गेले आहे. तसेच प्राचार्यपदावरील व्यक्ती असे काही करेल यावर माझा विश्वास बसत नव्हता.
हे खरेच आहे. पण त्यासाठी आपणही जबाबदार आहोत ते तितकेच खरे. दरवेळी गुंड टोळ्यांच्या समोर उभे राहणे शक्य नसले तरी, कायम स्वरूपी प्रबोधन आणि नेमक्यावेळी योग्य लोकांना प्रकल्प सादर करून दिशा दर्शन; यातून मंडळाच्या कार्यात काही बदल घडू शकतो यावर माझा विश्वास आहे.
काय वाईट चालले आहे हे वर आलेच आहे.
मंडळे काय चांगले करू शकतात यावरही चर्चा व्हावी.
12 Sep 2011 - 2:23 pm | ऋषिकेश
एकांगी बातमी, एकांगी - प्रसंगी टोकाचे विचार काहींनी मांडले आहेत ! मात्र चर्चाविषय आवडला
या बातमीमागे मह्णा किंवा चर्चेत व्यक्त झालेल्या उद्वेगामागे म्हणा या संस्थांचे 'सात्विक'पण कमी होत असल्याचा खेद व्यक्त केला आहे. मात्र मुळात गणेशोत्सव हा खुद्द टिळकांनीही 'राजकीय' व काही प्रमाणात 'सामाजिक' कारणासाठी सुरू केला होता, 'धार्मिक' अथवा 'सांस्कृतिक' नव्हे!!! त्यामुळे मंडळे नाटके, किर्तने, स्तोत्रपठण, स्पर्धा-परिक्षा वगैरे उपक्रम करत नाहीत ही ओरड अप्रस्तूत आहे.
या मंडळांचा मुख्य उद्देश 'राजकीय-सामाजिक' होता आणि अजूनही आहे. सध्याच्या सिस्टिममधे ही मंडळे 'राजकीय कार्यकर्ते तयार करण्याचे' महत्त्वाचे कार्य करतात करत आले आहेत. गांधीजी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणत. यामागचे मूळ थेट 'सार्वजनिक उत्सवांना' जाते. लोकशाहीमधे नेतृत्व हे 'लोकांमधून' आलेले नसले तर त्या नेतृत्त्वातील तृटि आपण सध्या पाहतो आहोतच! अश्यावेळी सध्या या मंडळांची गरज तितकीच आहे जितकी यापूर्वी होती. राजकीय पक्ष हे मिडीया, सभा, नेते आणि भाषणे यांच्यापेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे ओळखले जातात. आणि लोकांना विविध कार्यासाठी जमवणे, त्यांना एकत्र आणून त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दिशा देणे - वळविळे, जमावाला प्रभावित करणे, 'त्यांच्यासाठी' 'त्यांना हवे आहे असे' काम करणे वगैरे राजकीय बाळकडू या मंडळांतूनच मिळते!
सध्या दिसणार्या 'कर्कशते'ची किंवा 'भडकपणा'ची कारण माझ्यामते २ आहेत
१. मुक्त अर्थव्यवस्था - भांडवलशाही कडे वाटचाल: भारताने साधारण १९९१-९२ पासून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायला सुरूवात केली आहे. अनॉफीशीयली आपली वाटचाल भांडवलशाही चालू आहे. याचे जसे फायदे आहेत तसेच अर्थात तोटे देखील आहेत. पैशावर अती अवलंबित्त्व हा एक मोठा तोटा म्हणता येईल. सध्या पैशाने बाकी सार्या जाणिवांवर मात केली आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, सास्कृतिक वगैरे सार्या अंगांपेक्षा 'आर्थिक' अंगाला अचानक महत्व -वलय आले आहे. विविध आनंद हे वस्तुवर आधारलेले (मटेरिअलिस्टिक) झाले आहेत.
केवळ एकत्र येण्यात आनंद मानणार्यांसाठी "नुसतं एकत्र येऊन काय 'फायदा'?" असा प्रश्न धक्का देऊ लागला आहे.
हा प्रभाव केवळ मंडळांवर नाही तर राजकी य पक्षांवरही दिसतो आहे. कार्यकर्त्यांमधून आपला विचार लोकांमधे रुजवायला त्यांच्याकडे कार्यकर्तेच उरलेले नाही. आहेत ते पक्षांकडून आर्थिक लाभावर पत्रके वाटणारे, घोषणा देणारे नोकर! अश्यावेळी अधिक शक्तीशाली 'कॅडर बेस्ड' पक्ष पुढे जाईल व त्यासाठी अश्या सार्वजनिक मंडळांना पर्याय नाही
२. लोकांची आवडः मंडळांमधून नवे नेतृत्त्व जन्माला येत असल्याने ते सरळ सरळ लोकानुयय करते. लोकांना सध्या डीजे, डिस्को, बास हवे आहेत तर ते त्याची सोय करून लोकप्रिय होऊ पहाते. पूर्वी लोकांना भाषने, नाटके, किर्तन आवडे तेव्हा ते दाखवले जायचे. लेझीम आवडणारे बहुसंख्य ज्या मंडळाला देणगी देतात त्यांना लेझीम दाखवले जाते, डिस्को आवडणार्यांना डिस्को!
14 Sep 2011 - 1:40 am | संपत
अतिशय सुन्दर मिमान्सा!!