विचारवंत हवे आहेत...
या देशाला हवे आहेत विचारवंत,
अस्सल विचार करणारे विचारवंत,
मेंदू चालत असूनही वैचारिक षंढत्व बाळगून
लाठ्याकाठ्या, दगडफेकी करणाऱ्या
स्नायूप्रतापींच्या घोळक्यात अचल रहाणारे विचारवंत,
अडाणीपणाला अन आडमुठेपणाला आपल्या बलदंड निर्धारांनी,
तिलांजली देणारे विचारवंत
विचारांची धार असलेल्या कणखर
लेखणीपुढे तलवार वाकवणारे विचारवंत
सडकेपणावर थुंकणारे विचारवंत,
वादळांना फुंकणारे विचारवंत,
शून्यात स्वर्ग पाहू शकणारे विचारवंत,
राष्ट्रासाठी मरण्याऐवजी राष्ट्र जगवणारे, जागवणारे विचारवंत,
कुठे मिळतील असे विचारवंत?,
इतिहासात अंधारच होता
काही तेजःपुंज पुंजक्यांनी थोडासा उजळलेला
पण वर्तमानातल्या उठवळ निऑनी झगमगाटात,
तेजाचे दीपस्तंभ झाकोळून चालले आहेत,
अंतर्मुख अंधारात ते उठून दिसावेत म्हणून रोज एक तास दिवे बंद करावे लागतील, कदाचित...
प्रतिक्रिया
18 Aug 2011 - 11:06 pm | पंगा
शेवटच्या ओळीतली कलाटणी आवडली.
19 Aug 2011 - 8:50 am | सहज
हेच म्हणतो. घासुगुर्जी १ नंबरचे विजारजंत
18 Aug 2011 - 11:37 pm | मुक्तसुनीत
किरवंत हवे आहेत...
या देशाला हवे आहेत किरवंत ,
अस्सल क्रिया करणारे किरवंत ,
याज्ञिकी चालत असूनही पौरोहितीक विकृती बाळगून
ताराबलम् चंद्रबलम् करणाऱ्या
यज्ञप्रतापींच्या घोळक्यात अचल रहाणारे किरवंत ,
तूपाच्या अन बोकडाच्या नैवेद्याला आपल्या तीळ आणि दर्भांनी,
तिलांजली देणारे किरवंत.
भाताचे पिंड असलेल्या लडबडीत
गोळ्यांपुढे कावळा शिवायला लावणारे किरवंत
कर्मविपाकाकाच्या धंद्यावर जगणारे किरवंत ,
बिड्यांना फुंकणारे किरवंत ,
पिंडांत मोक्ष पाहू शकणारे किरवंत ,
अर्थपूर्ण जगण्याऐवजी मरणानंतरची अवडंबरे जागवणारे किरवंत ,
कुठे मिळतील असे किरवंत ?,
इतिहासात अंधारच होता
काही तेजःपुंज पुंजक्यांनी थोडासा उजळलेला
पण नाशिकच्या नि बनारसच्या घाटांवर,
मोक्षाचे दलाल बाजार मांडून उभे आहेत,
दहाव्या तेराव्याला ते सहज मिळावेत म्हणून रोज एक तास मोबाईल फिरवावे लागतील, कदाचित...
19 Aug 2011 - 12:04 am | कवितानागेश
हे राम!
:D
19 Aug 2011 - 12:28 am | शुचि
कविता आवडली. फक्त.
"उठवळ" हा शब्द निऑन लॅम्प ना बरोबर वाटला नाही.
19 Aug 2011 - 12:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
Get this widget | Track details | eSnips Social DNA
हे घ्या रेकॉर्डींगही.
राजेश, कविता आवडली.
19 Aug 2011 - 2:17 am | अभिजीत राजवाडे
.
19 Aug 2011 - 5:09 am | चिंतातुर जंतू
विचार चांगला आहे, पण
यापेक्षा राष्ट्र ही संकल्पना मोडीत काढणारे आणि राष्ट्रभावना ही लहानपणी येऊन जाणार्या गोवर-कांजिण्यांसारखी कशी आहे (लहानपणी एकदा येऊन जावी, मग उर्वरित आयुष्य राष्ट्रज्वररहित शहाणपणानं जगता येतं) हे जगाला सांगणारे विचारवंत आवडतील.
19 Aug 2011 - 8:08 am | पंगा
ही संकल्पना सांगून समजण्यासारखी आहे असे वाटत नाही.
"स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही" म्हणतात.
19 Aug 2011 - 8:55 am | सहज
चिंज गुर्जीशी सहमत. बाकी चिंजगुर्जींना हे गाणे ऐकून काय बरे होत असेल.
19 Aug 2011 - 9:00 am | राजेश घासकडवी
मला इमॅजिन करता येतं.
19 Aug 2011 - 9:18 am | सहज
एखादे फ्रेंच गाणे हवे होते. बादवे तुमच्या जॉन (लेनन)गांधीला टेक्सासच्या माथेफिरु नथुराम (चॅपमनने) गोळी घातली होती म्हणे! चला गांधी-नथुराम आले आहेत तर अवांतराचे मुख्य सनातन मसंचर्चेत रुपांतर होउ दे.
19 Aug 2011 - 9:27 am | पंगा
कंटाळा आला.
19 Aug 2011 - 9:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नेशन-स्टेट ही कल्पना मोडून जाण्याचा रोचक विचार आहे.
"गोवर-कांजिण्यांसारखी" ही उपमा आवडली.
19 Aug 2011 - 10:24 pm | धनंजय
"भारत" हा नेशन-स्टेट मोडण्यापैकी महत्त्वाचा आधुनिक प्रयोग आहे. बर्यापैकी सफलही आहे.
भारत हा नेशन नाहीच (आणि नसावा) असे आंबेडकरांचे मत होते. तर नेमका नेशन कसा ते स्पष्ट नसले, तरी सांस्कृतिकदृष्ट्या नेशन आहेच, असे मत नेहरूंचे होते. सावरकरांचे नेशनबाबत १९२३ काळातले मत सुप्रसिद्ध आहे. पण त्यावेळी स्वतंत्र भारत असा काही नव्हताच. १९४७ नंतर त्यांनी या बाबतीत मत मांडले असेल तर जाणून घ्यायला आवडेल. जिना वगैरे लोकांनी सुद्धा नेशन बाबत मते मांडली होती. परंतु जिना यांची मते १९४७ नंतरच्या भारताला लागू नाहीत, असे वाटते.
या सर्वांनी त्यांच्या-त्यांच्या भूमिकेसाठी विस्तृत युक्तिवादही दिलेले आहेत. या सर्व लोकांनी दिलेल्या युक्तिवादांपैकी मला आंबेडकरांनी केलेला युक्तिवाद सर्वाधिक पटतो. (*आंबेडकरांनी खूप काही वेगवेगळे म्हटले आहे, हे खरे आहे. पण सैद्धांतिक बाबतीत त्यांची मते खूप उलटत-पालटत असे मला जाणवलेले नाही. राजकरणाच्या धोरणा-डावपेचांबाबत त्यांची मते उलटत-पालटत, ते ठीकच आहे.). म्हणून प्रतिसादाच्या सुरुवातीचे विधान मी केलेले आहे.
यू.एस. देखील बहुधा नेशन-स्टेट मोडीत काढणारा प्रयोग आहे - परंतु त्याचा इतिहास त्या मानाने गुंतागुंतीचा आहे. यू.एस. राज्यव्यवस्था जन्माला आली, ती नेशन-स्टेट कल्पना बलवान व्हायच्या आधी.
"देश"ऐवजी ढिसाळपणे यूएस.चा उल्लेख "नेशन"म्हणून केला जातो खरा. यू.एस. म्हणजे एकसंध नेशन नसून फेडरेशन आहे, ही जाणीव अधूनमधून शिक्षणात आणि वर्तमानपत्रांत करून दिली जाते.
19 Aug 2011 - 8:50 am | चतुरंग
घासु आणि मुसु दोघांची विडंबने चान चान असं म्हंटल्या गेले आहे! ;)
रंगा
19 Aug 2011 - 8:59 am | नंदन
दोन्ही विडंबनं आवडली. शेवटच्या ओळीतली कलाटणी झकासच.
19 Aug 2011 - 12:53 pm | श्रावण मोडक
हं...!
19 Aug 2011 - 12:57 pm | परिकथेतील राजकुमार
मिपावर शोधलेत तरी ५/१० सापडतील :)
19 Aug 2011 - 4:06 pm | नगरीनिरंजन
शोधावे लागतील?
19 Aug 2011 - 9:59 pm | राजेश घासकडवी
मला हे बरोबर वाटत नाही. तुम्ही ४/६ तरी शोधून दाखवा पाहू.
19 Aug 2011 - 4:35 pm | धमाल मुलगा
एके काळी असायचे असे विचारवंत..आता दिसतात ते फक्त जंत! निरर्थक वळवळ करणारे आणि स्वप्रतिमेच्या जाहिरातीसाठी उलटसुलट बरळणारे.
म्हणतात ना, शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी. हल्ली प्रदुषण फार वाढलंय ना भाई...
-शॉर्ट सर्किट. :)