मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा

चित्रगुप्त · · जे न देखे रवी...
नमस्कार मंडळी, आम्ही अधून मधून आमच्या जुन्या-पुराण्या नोंदवह्या चाळत असतो, आणि वेळोवेळी त्यातील काही प्रसंग मनुष्ययोनीत प्रसृत करत असतो. वस्त्रहरण प्रसंगी, द्रौपदीने कृष्णाचा केलेला धावा सर्वविदित असला, तरी यापेक्षा पुष्कळ आधी एकदा द्रौपदीला कृष्णाचा धावा करावा लागला होता, ती घटना अशी: प्रसंग: अर्जुनाने एकट्याने पण जिंकला असून द्रौपदीस पाची जणांची पत्नी बनावे लागले.. तपशील: पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, तेव्हा त्यांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली, "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे" हे ऐकून अर्जुनाचा चेहरा गोरामोरा झाला, कुन्तीलाही द्रौपदी कडे बघताच आपली चूक कळून आली, परंतु युधिष्टीराने हट्ट धरला, की मातृवचन ही कृष्णपाषाणावरील अमिट रेषा. तिचे पालन झालेच पाहिजे ... आता काय करावे? सर्व पांडवांची द्रौपदीविषयी लालसा ओळखून, पुढे काही अघटित घडू नये, या विचाराने कुंतीने निर्णय दिला, की द्रौपदीने पाची पांडवांची पत्नी बनून राहावे. परंतु हे साधायचे कसे? शेवटी तिने तोडगा काढला, तो असा: युधिष्ठिरास सोमवार अर्जुनास मंगळवार भीमसेनास बुधवार द्यावा म्हणिजे बरे || नकुल-सहदेव लहान मातेविन पोरके, अजाण त्यांसी द्यावे दोन दोन दिन म्हणिजे बरे || नकुलासी गुरु-शुक्र वार सहदेवास शनी-रविवार ऐशी वाटणी क्रमवार करोन वंश वाढवावा || मग कुंती द्रौपदीस म्हणाली, " हे सुभगे, (शब्दकोश बघणे) त्वां पराकाष्ठेची भाग्यवान आहेस, कारण माझे पाच पराक्रमी पुत्र तुजला एकसमयावच्छेदेकरून पती म्हणून लाभत आहेत. याप्रकारे तुझी आता पाचावर धारण बसली आहे, तस्मात यापुढे तू या पाची जणांकडून धारणा करून घेत त्या गांधारी प्रमाणे शतपुत्र प्रसवावेत, अशी माझी कामना आहे... का रे बाळांनो, पटली ना तुम्हास ही योजना? युधिष्ठिर-भीम आनंदे हसले अर्जुनासही मान्य जाले नकुल-सहदेव कष्टी जाहले कसे कोण जाणे || कुंतीने हे ओळखले, म्हणाली, बाळांनो, तुम्ही कष्टी का? तुम्हास तर दोन दोन दिवस मिळत आहेत? नकुल म्हणाला माते, आम्ही सर्वात लहान, आम्हास दोन दोन दिवस कशाला? आम्हाला दोन दोन तास सुद्धा पुरेत, पण ते भीमाच्या आधीचे... कारण शास्त्रवचन आहेच, "देही ज्याच्या बळकटी, क्रम त्याचा शेवटी " सहदेवही घाइघाईने म्हणाला, होय माते, अगदी खरे, कारण शास्त्रवचन असेही आहे, " सर्वांमध्ये जो सबळ, त्याने सोसावी कळ " कुंतीस हे पटले. शास्त्रवचनच ते, पटणारच. युधिष्ठिराने संमति दिली. भीमास तर आता उरलेले तीनही दिवस आपले, या विचाराने आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. त्याचे सर्वांग स्फुरण पावू लागले... परंतु द्रौपदी? द्रुपदाच्या भव्य महालात लाडात वाढलेली द्रौपदी ध्यानीमनी नसता अचानक या झोपडीत येऊन आधीच बावरली होती, त्यातून कुंतीने केलेली तिची निर्दय वाटणी, सर्व पांडवांच्या नजरेतील तिच्याप्रती अभिलाषा हे सर्व बघून तर तिची बोबडीच वळली... ती अबला धाय मोकलून काकळूतीने श्रीकृष्णाचा खालील प्रमाणे धावा करू लागली: (जाति: धावा-धावा / वृत्त: वसंतलतिका / चाल: झुलवू नको रे बाळा / ठेका: धिंगाणा ) घननीळा लडिवाळा निस्तर घोळ तू सगळा ... विनवितसे ही अबला धाव धाव तू सबला... तू नच येता, निर्मळा होईल माझा, चोळामोळा ... धाव आता रे सबळा दे सद्बुद्धी तू सकळां || झाले, भगवंत तत्क्षणी प्रकट झाले, त्यांनी सर्व काही अंतरज्ञानाने जाणले होतेच, त्यांना द्रौपदीची दया आली, पण प्रसंगाचे गांभीर्य आणि संभावित धोका ओळखून त्यांनी मधला मार्ग काढला: युधिष्ठिरास सोमवार अर्जुनास मंगळवार नकुलासि बुधवार बरा असे || सहदेवास गुरुवार भीमसेनास शुक्रवार मग शनिवार-रविवार पूर्ण सुट्टी || मग पांडवांना ते म्हणाले, खबरदार जर कुणी द्रौपदीला सप्ताहांती छळाल तर... त्या ऐवजी तुम्ही स्वयंपाकपाणी, धुणीभांडी, केरवारे, या सर्वात कुंतीमातेला सर्वतोपरी सहाय्य करायचे... द्रौपदीला संपूर्ण विश्रांती मिळाली पाहिजे... असे म्हणून भगवान अंतर्धान पावले. ... पुढे कलियुगात भारतवर्षाचे पंतप्रधान राजीव गांधी यांना आम्ही दृष्टांत देऊन ही घटना कळवली. भगवंतास जशी द्रौपदीची काकळूत आली, तशीच त्यांना त्यांच्या हाताखालील लाखो कर्म-आचार्यांची येऊन त्यांनी सरकारी फतवा काढून 'पंच-दिन कर्म सप्ताह' हा नियम भारतवर्षात लागू केला. असेच अनेक दृष्टांत आम्ही प्रसिध्द मराठी लेखक आनंद साधले यांना देत आलो, त्यावर त्यांनी 'हा जय नामक इतिहास आहे' या ग्रंथाची रचना केली, जिज्ञासूंनी वाचावा. बरंय, यम यम | (तुम्ही जसे राम राम म्हणता, तसे आम्ही यम यम म्हणतो) चित्रगुप्त.

वाचन 11013 प्रतिक्रिया 0