मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सावधान! 'व्हर्चुअल फ्रेंड ' ची 'रियालिटी ' भोवली.

विनायक बेलापुरे · · जनातलं, मनातलं
चाळीशीच्या इसमाकडून २० वर्षीय तरुणीचा विनयभंग इंटरनेटवर चैटिंग करत घट्ट मैत्रीत अडकलेल्या २० वर्षीय तरुणीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. व्हर्चुअल फ्रेंडशी तरुण तरुणींनी किती मैत्री वाढवावी याबाबत सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कोथरूड येथील तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सलील भालचंद्र नानल (वय ४१ वर्षे रा. मुंबई) याला अटक केली आहे. सहा वर्षापूर्वी २००५ मध्ये शाळेत असताना या तरुणीने नानलशी चैटिंग करण्यास सुरुवात केली होती. चैटिंगवर एकमेकाना मोबाईल नंबर्स दिल्यावर त्यांचे बोलणे सुरु झाले. दरम्यान, या तरुणीच्या अनोख्या मैत्रीची माहिती तिच्या आईला समजली. त्यानंतर तिने नानलशी बोलणे बंद केल्यावर त्याने तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. या तरुणीने २००८ मध्ये पुणे पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षात तक्रार नोंदवली होती. त्यावेळी दोघांचे समुपदेशन करण्यात आले होते. नानल याने तिला परत त्रास देणार नाही, असे पोलिसांना सांगितले होते. मात्र, काही दिवसानंतर त्याने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान नानलने फेसबुकावर बोगस आयडी तयार करून तरुणीचा बदनामीकारक मजकूर पोस्त केला होता. त्यानंतर नानल ने तिला १० जानेवारीला संभाजी बागेजवळ भेटण्यास बोलावले होते. त्यावेळी त्याने तिचा विनयभंग केला. सदर बातमी आजच्या (५ एप्रिल २०११) महाराष्ट्र टाईम्स, पुणे आवृत्तीतील मुख्य पानातील २ क्रमांकाच्या पानावर आहे. याची लिंक सापडली नाही म्हणून ज्यांनी वाचली नसेल अश्या सर्वांच्या माहितीसाठी आणि हितासाठी बातमी टंकली आहे.

वाचन 7034 प्रतिक्रिया 0