सैयॉं निकस गये
नवरा-बायकेतील भांडणे तर आदि काळापासून चालत आलेली आहेत. कधी बायको रुसून बसते तर कधी नवरा घराबाहेर चालता होतो.
बर्याच वेळी हे कपातले वादळ असते. काही वेळाने मिटते; दिलजमाई होते. पण दरवेळी हा तिढा सहजपणे सुटतोच असे नाही. तो नाहीच आला तर मग घरातील नातेवाईक, आजूबाजूच्या आयाबाया जमा होतात आणि.... आणि दोष तिचाच असणार हे गृहीत धरले जाते. तिला जीव तोडून पटवावयाचा प्रयत्न करावा लागतो .... " प्रियकर गेला खरा पण मी काही भांडण काढले नव्हते. काही बोलले नाही, बोलाचाली झाली नाही; मी तर मान खाली करून गुपचुप उभी होते." कोणाचा विश्वास बसत नाही असे पाहिल्यावर ती सखीची साक्ष काढावयाचा प्रयत्न करते ... " माझ्यावर विश्वास नाही तर सखीला विचारा, चादर घेऊन मी पलंगावर पडलेली होते." आता सगळे चर्चा करावयास लागतात, हा गेला तरी कसा असेल ?" मग तिच्याकडे चौकशी. बिचारी म्हणते " या रंगमहालात इतके दरवाजे, खिडक्या; कसे कळणार कसा गेला ?" शेवटी हताश होऊन एवढेच म्हणते " या असल्या ताटातुटीपेक्षा लग्नच झाले नसते, कुमारी राहिले असते, तर बरे झाले असते."
सैयॉं निकस गये मै ना लढी थी !!
ना कछु बोली, ना कछु चाली
सरको झुकायें मै तो चुपके खडी थी !!
मेरा गर ना मानो तो सहेलिसे पुछो
चादर औढे मै तो पलंगा पडी थी !!
रंगमहलके दस दरवाजे
न जाने कौनसी खिडकी खुली थी !!
कहे कमाली, कबीरकी बेटी
ऐसे रिहाईसे तो कुवॉरी भली थी !!
आपल्याकडे कुटुंबातील सगळे सभासद काव्य करतात अशी दोन उदाहरणे. पहिले नामदेव व दुसरे चोखामेळा. उत्तरेत कबीर,कबीराचा मुलगा कमाल व मुलगी कमाली या सर्वांच्या नावावरील काव्य उपलब्ध आहे. वरील शोकगीत कमालीचे. पण ... नुसतेच एक शोकगीत लिहावयास कबीराचा वारसा सांगणे योग्य दिसत नाही. कमाली तर येथे "कबीरकी बेटी " असा स्पष्ट उल्लेख करत आहे. काय असावे ?
हे तर एक रुपक दिसते. जीव (आत्मा) व कुडी. बघा. कुडी किती तळमळीने सांगत आहे; किती हताश झालेली दिसते आहे. जीव आहे, त्याच्या आधिपत्याखाली बिचारे शरीर गुपचुप, मान खाली घालून उभे आहे.तो गेला. आजूबाजूचे म्हणणारच " ऑ, असा कसा मेला ? " साक्ष काढावयाची ती आजुबाजूंच्या लोकांचीच. शेवटी चादर पसरून देह पलंगावर पडला पण त्यालाही जीव कसा गेला, कां गेला, काही काहीच कळणारे नाही.
दस दरवाजे. लगेच लक्षात येणार नाही. शरीराच्या नेत्र, कर्ण, नाक, मुखादी नऊं रंध्रांमुळे शरीराला नेहमी "नवद्वारा" म्हटले जाते. इथे मात्र कमाली "दस दरवाजे" म्हणत आहे. हा दहावा दरवाजा म्हणजे "ब्रह्मरंध्र". अध्यात्मशास्त्रात, विषेशत: योगमार्गात, डॊक्याच्या टाळूच्या जागी एक रंध्र आहे असे समजले जाते. त्याला म्हणतात "ब्रह्मरंध्र". य़ॊग्याचा, संन्याशाचा प्राण या रंध्रातून बाहेर जातो. कित्येक संन्याशांच्या पंथात सन्याशी मेल्यावर त्याच्या डोक्यात खिळा मारून एक भोक पाडले जाते ! तर कमाली म्हणते आहे, " हे असेच होणार होते तर मग मी जन्माला आलेच नसते तर काय बिघडले असते ?
कै. शोभा गुर्टु यांचा आवाज फार कोमल, गोड म्हणता यावयाचा नाही. पण त्याला एक "दर्द " होता. त्यांची मराठी गाणी, "माझिया प्रियाला," "त्यानीच छेडले ग, " आठवा. त्या आवाजाला पर्याय नाही. त्यांनी "सैया निकस गये " मैफलीत म्हणावयास सुरवात केली आणि मग ते भजन त्यांचा ट्रेडमार्कच झाला. भारावून जावे असाच तो अनुभव असे. भजन येथे ऐका
शरद
प्रतिक्रिया
30 Mar 2011 - 8:55 am | चिंतामणी
कै. शोभा गुर्टु यांच्या स्मृती जाग्या केल्या.त्यांच्या आवाजात एक "दर्द " होताच.तसेच त्याला एक वजनसुद्धा होते.
या "दर्द"ची अनुभुती देणारे मराठी गाणे "उधड्या पुन्हा जहाल्या" म्हणजे सर्वात वरची कडी आहे असे म्हणले तरी वावगे ठरू नये.
30 Mar 2011 - 9:49 am | मैत्र
वेगळाच विषय, 'कमाली'ची रचना आणि शोभा गुर्टू हा दर्द घेऊनच आलेला आवाज.
या ठुमरीच्या अंगाने जाणार्या आवाजामुळे 'रंगी सारी गुलाबी चुनरिया रे...' आठवली..
अजून येऊ द्या...
30 Mar 2011 - 1:47 pm | चिंतामणी
पुन्हा एकदा आनंद घ्या.
30 Mar 2011 - 8:56 am | मुलूखावेगळी
छान रसग्रहण. घरी गेल्यवर ऐकते.
सुन्दर भजन पन ह्या ओळी खासच
30 Mar 2011 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर रसग्रहण....!
कै. शोभा गुर्टु यांच्या भजनाच्या दुव्याबद्दल आभारी.
ऐकायला मजा आली.
-दिलीप बिरुटे
30 Mar 2011 - 9:16 am | विनीत संखे
लता बाईंच्या आवाजात ही कविता राज कपूरच्या 'सत्यम शिवम सुंदरम' मध्ये ऐकली होती.... सुंदरच.
हा दुवा पहा... http://www.bharatlover.com/content/view/2631/100/
30 Mar 2011 - 10:01 am | नगरीनिरंजन
>>ऐसे रिहाईसे तो कुवॉरी भली थी !
अगदी खरं! खूप आवडले कवन!
30 Mar 2011 - 10:05 am | llपुण्याचे पेशवेll
वाह वाह... छान छान. रसग्रहण आवडले. फार छान आहे. घरी जाऊन ऐकतो. :)
30 Mar 2011 - 10:16 am | स्पंदना
केव्हढी माहिती!! अन रसग्रहण ही किती नेटक! जणु दुसर गद्य काव्य!
__/\__!!
30 Mar 2011 - 10:18 am | प्यारे१
वाह्ह!!!
अप्रतिम !
30 Mar 2011 - 10:24 am | निनाद
आपल्या साध्या सोप्या भाषेत असलेल्या विवेचनामुळे गाणे जास्त चांगले समजले.
असे अजून हवे. :)
धन्यवाद!
30 Mar 2011 - 11:04 am | पैसा
खूप आवडलं. हेच भजन लताच्या आवाजातही खूप छान वाटतं ऐकायला.
30 Mar 2011 - 11:10 am | विसोबा खेचर
छान लेख..!
शोभाताईंची एक खास आठवण आहे माझ्यापाशी. नक्की लिहीन केव्हातरी..
तात्या.
30 Mar 2011 - 12:26 pm | सुधीर१३७
अप्रतिम ...............सुंदर..... :)
31 Mar 2011 - 7:27 am | शुचि
मस्त
31 Mar 2011 - 9:04 pm | गणेशा
अप्रतिम .. दुसरे शब्दच नाहित
31 Mar 2011 - 10:21 pm | प्रास
शोभा ताईंची सहज गायकी आणि कबीरपुत्री कमालीचे अप्रतिम निर्गुण काव्य......
आनंद घ्या....
8 Apr 2011 - 5:17 pm | चित्रा
रसरहण आवडले. लहानपणी ऐकलेल्या बाकी सर्व गायक/गायिकांमध्ये शोभा गुर्टूंचा आवाज वेगळाच वाटे. गाणेही ऐकते.
गाण्याचे दोन्ही अर्थ वैध असले तरी पहिला अर्थ अधिक योग्य वाटतो, दुसरा अर्थ योग्य वाटला तरीही माझ्या दृष्टीने त्यातील रसास पोषक नाही. मृत्यू हा साधारणतः गंभीर अनुभव असतो. कमाली यांनी कबीराची बेटी म्हणून हा अर्थ मुद्दाम आणला असला तरी तो मृत्यूच्या गांभीर्यास पोषक नाही असे वाटते. अर्थात हे म्हणणे तुमच्या रसग्रहणाबद्दल नाही.
*शिवाय कुंवारी भली, म्हणजे काय? कारण कुंवारी म्हणजे लग्न न झालेली. म्हणजे 'आत्म्याचे कुडीशी मीलन न झालेली' असा काही घ्यायचा का? असे कोण असते? हा अर्थ लागत असला तरी बरोबर वाटत नाही.