मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शाही अंडा बिर्याणी

केशवसुमार · · पाककृती
काल ३१ डिसेंबराला 'निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी' भेटायला आला होता, तेव्हा पुन्हा एकदा राकलेट आणि चॉकलेट मूस चा बेत आणि भरपूर गजाल्या झाल्या..
DSC01595 DSC01599
नवीन वर्षाची सुरुवात वजन करून करावी अशी अभिनव कल्पना आमच्या डोक्यात आली. मुक्काम पोस्ट फ्रँकफर्टला हालवल्यानंतर पहिले ३-४ आठवडे, ब्राझील मध्ये बसून स्वातीताईंच्या पाककृतींची बनवलेल्या यादीची यथेच्छ वसुली आणि आमच्या ब्राझील मध्ये केलेल्या पाककृतीची स्वाती व दिनेश यांना प्रात्यक्षिके करून दाखवण्यात गेले होते.. ह्याचा व्हायचा तो परिणाम झालाच होता.. ६ किलो वजन ३० दिवसात कमावले आहे अशी आनंदाची बातमी वजन काट्याने दिली... सकाळी निनादला टाटा बाय केल्यानंतर पुन्हा आमची आणि दिनेशची चर्चा वजनावर घसरली.. ह्या वजनाचे काही तरी केलेच पाहिजे असा एकमताने निर्णय झाला आणि ७ जानेवारीला दिनेश पॅरिसहून परत आला की डायेट आणि व्यायामशाळा सुरू करायचा संकल्प कॉफी पीतपीत सोडण्यात आला. थोड्या वेळ व्यनि, चेपू चाळाचाळी झाली आणि नव्या वर्षातली पोटातल्या कावळ्यांची पहिली कावकाव सुरू झाली.. काय करावे चा काथ्याकूट सुरू केला. नवीन वर्षाचा संकल्प सुरू करायला अजून ७ दिवस आहेत काही तरी फर्मास करूया असे दिनेशचे अनुमोदन मिळाले आणि अंडा बिर्याणी बनवायचा प्रस्ताव दोनमुखानी मंजूर झाला. चला तर मंडळी शाही अंडा बिर्याणी बनवायला. घ्या साहित्य लिहून ... साहित्य: सर्व साहित्य ४ माणसांना पुरेल ह्या हिशोबाने दिले आहे.. ८ अंडी ३ वाट्या तांदूळ ३-४ मध्यम कांदे १ मध्यम टोमॅटो २ मध्यम बटाटे ६-७ लसुणाच्या पाकळ्या २ पेरं आलं १ टेबल चमचा कांदालसूण मसाला ३ टेबल चमचा तयार बिर्याणी मसाला २ इंच दालचिनी १-२ दगड फुल ४-५ तमालपत्र ७-८ लवंगा १०-१५ मीरे १ मसाला वेलदोडा ५-६ वेलदोडे १ वाटी दही १/४ वाटी दूध ४-५ काड्या केशर १५-२० काजू हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार मीठ, कडीपत्ता, कोथिंबीर, पुदिना आवडीनुसार जिरे, हळद, तेल(ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स. ) रायत्याचे साहित्य २ कांदे १ टोमॅटो १-२ टेबल चमचा चाट मसाला मीठ, कोथिंबीर आवडीनुसार पोटातल्या कावळ्यांची कावाकावी मुळे सर्व पदार्थांचे फोटो काढायला वेळ नव्हता. कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन, ४५ मिनिटे भिजवत ठेवा. केशर चुरडून दुधात भिजवत ठेवा. १ १/२ कांदा बारीक उभा कापा, बाकीचे कांदे, टोमॅटो कोथिंबीर, पुदिना आणि मिरच्या बारीक कापून घ्या. बटाट्याचे जाड काप करा. (एका बटाट्याचे फक्त ८ काप) आलं लसूण मिक्सर मधून वाटून घ्या. एका भांड्यात तेल गरम करत ठेवा. तेल तापले की त्यात उभा चिरलेला कांदा आणि बटाट्याचे काप तळून बाजूला ठेवा. अंडी कडकडीत उकडून घ्या. उकडलेली अंडी अर्धी कापून थोड्याश्या तेलात शॅलोफ्राय करून बाजूला ठेवा. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवायला ठेवा, त्यात जिरे आणि सर्व खडा मसाला घाला. थोड्या वेळाने त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं लसूण वाटण आणि मिरच्या घाला. कांदा गुलाबी होई पर्यंत परता. मग त्यात काजू, थोडी कोथिंबीर, कडीपत्ता आणि पुदिना घाला. आणि सर्व मिश्रण २ मिनिटे ढवळा. आता त्यात कांदा लसूण मसाला, तयार बिर्याणी मसाला घाला. सर्व मिश्रण एकजीव करून त्यात एक वाटी दही घालून परता.दोन मिनिटे शिजू द्या. आता ह्या मसाल्यात भिजवलेले तांदूळ घालून २ मिनिटे परता. नंतर ४ वाट्या पाणी घालून पातेल्यावर घट्ट झाकण ठेवून तांदूळ ७-८ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. तांदूळ थोडे शिजले की त्यात तळलेले बटाटे घालून पुन्हा घट्ट झाकण ठेवून ७-८ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. तांदूळ पूर्णं शिजल्यावर, वरचा थोडा थर बाजूला करून त्यात शॅलो फ्राय केलेले अंड्याचे काप घाला, दुधात भिजवलेले केशर मिसळा, वर तांदुळाचा बाजूला केलेला थर पुन्हा लावा. वरून तळलेला कांदा आणि कोथिंबीर पेरा आणि झाकण घट्ट बंद करून अतिशय मंद आचेवर अंदाजे १० मिनिटे वाफाळू द्या. झाली शाही अंडा बिर्याणी तयार...
DSC01603 रायत्याची कृती= कांदा, टोमॅटो उभे चिरून घ्या. त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, दही आणि चाट मसाला टाका. चवी नुसार मीठ मिसळा. झाले रायते तयार.
DSC01606
आता पुढे काय हे सांगायला हवे का? एन्जॉय.. चला आता दुपारी कॉफी बरोबर टूटीफ्रूटी केक करायचा आहे..त्याच्या तयारीला लागतो..;) (७ जानेवारीला आजून बराच वेळ आहे)

वाचन 22448 प्रतिक्रिया 0