मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आंतरजालीय अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेले संस्थळ : मिपा

परिकथेतील राजकुमार · · काथ्याकूट
अवांतर लिखाण बॉंबस्फोटातील आरोपी मिर्झा टारायत बेग व मौला अवलिया यांना मिपा स्वगृहात वाचण्यासाठी लेखन, पाककृती विभाग द्यावे, असा आदेश विशेष न्यायाधीश पशा टुकारे यांनी दिला. १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका अवांतर प्रतिसाद स्फोटाने १७ लेखांचा जीव घेतला आणि टुकार लेखनाने ५०-६० प्रतिसादक जखमी केले. हे अघोरी कृत्य करण्यास जबाबदार असलेल्या मिर्झा टारायत बेग व मौला अवलिया यांना(७ महिन्यांनी) अखेर मिपाच्या दहशतवादविरोधी पथकाने काटाकिर्र येथून अटक केली. पुढे मिपाबाहेर प्रतिबंधीत कोठडीत असताना ह्या अतिरेक्यांनी हळूहळू आपल्या मागण्या सांगायला सुरुवात केल्या. अगोदर वर्तमानपत्र, नंतर कपडे, आता तर त्यांना वाचायला खरडवही हवी आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व मंजूर झाले. आज मिपावर काथ्याकुटापासून पाककृतीपर्यंत जाण्यास जितका जीव धोक्यात घालावा लागतो त्याच्या कितीतरी कमी जीव धोक्यात घालून, यांनी अवांतर आणि टुकार हल्ला करून आता पुन्हा मिपावर ऐश-आरामात जीवन जगत आहेत. मला एक समजत नाही, मिपा हे एक पवित्र संस्थळ आहे. १७ लेखांचे जीव घेतलेल्या नराधमांना मिपासरकार असे कसे काय पुन्हा प्रवेश देउ शकते ? मिपा वाचून त्या 'बेग' आणि 'मौला' मध्ये असा काय बदल घडणार आहे ? ते काय सगळ्या अवांतर कारवाया सोडून समयोचीत प्रतिसाद मार्गाला लागणार, कि अजून काही त्या लेखातून भलते-सलते अर्थ काढून पुन्हा काही अघटीत करायचा विचार करणार ? एखाद्या आंतरजालीय अतिरेक्याचे स्वातंत्र्य जपायचा हा अट्टाहास कशासाठी चाललेला आहे ? याने अतिरेक्यांना उत्तेजनच मिळणार नाहीतर अजून काय. अतिरेकी हेच समजतील 'भाई, आज चलो एक अवांतर डालेंगे, मरे तो मिसळप्रेमी, बचे तो मिपा कि जिंदगी' हळूहळू असे अतिरेकी वाढत गेले कि हे संस्थळ म्हणजे 'टुकारांना पोसण्याचेच एक संस्थळ' बनून राहील असे वाटते. हे मिपा संस्थळ सामान्यांना वाचण्यासाठी आहे कि आंतरजालीय अतिरेक्यांना पोसण्यासाठी ? अनेकांनी ह्या आंतरजालीय अतिरेक्यांच्या खोडसाळ आणि वैयक्तिक प्रतिसादाला दिलेली परखड उत्तरे संपादित झाली. मात्र त्यांनी केलेले एकांगी आरोप आणि अवांतर संपादित झाले नाही याचे आश्चर्य वाटते. मिपावर टुकार लेखन आल्याने काय तोटा होतो हे स्पष्ट करण्यास सांगितले तर या महाशयांनी स्वतःकडे मुद्दे नसल्याने 'अभ्यास वाढवा' असा चोमडेपणाचा सल्ला दिला. सदर आंतरजालीय अतिरेक्यांची सही आणि एकंदरीत सगळेच चाळे इथे का खपवून घेतले जातात ह्याचा खुलासा मिपासरकार करेल काय? काही सूचना :-
  • सदर लेखन हे मौजमजा, विनोद ह्यासाठी केलेले एक विडंबन आहे. तेंव्हा उगाच 'मिपाचे नाव कशाला घातले ?' वगैरे भिकार शंका उपस्थीत करु नयेत.
  • लेखाशी संबंधीत व्यक्तींशी चर्चा करुनच त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या नावांचा लेखात समावेश केलेला आहे तेंव्हा उगाच आंतरजालीय पोलिस बनुन 'वैयक्तीक आरोपांचा धागा' वगैरे मुक्ताफळे उधळु नयेत.
  • मिपावर सर्वच सदस्य आमचे मित्र आहेत. त्यामुळे 'विशिष्ठ लोकांनी विशिष्ठ लोकांसाठी काढलेला हा धागा आहे' असा ज्यांचा समज होईल त्यांनी तातडीने चपला अडकवुन धाग्यावरुन निघुन गेल्यास अतिउत्तम.
  • 'आधी भन्नाट पुर्ण करा' वगैरे आपुलकींच्या सल्ल्यांसाठी कृपया व्यनी अथवा खरडीचा वापर करावा.

  • वाचन 16169 प्रतिक्रिया 0