मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वामी समर्थ आणि दत्तभक्ती

शुचि · · जनातलं, मनातलं
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्ट ही माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. संपादकांना योग्य वाटल्यास हा धागा ठेवावा अथवा उडवावा. श्री दत्त व प्रभू रामचंद्र हे दोन्ही भगवान विष्णूंचे अवतार होते. एक कृत युगातले तर दुसरे त्रेता युगातले. प्रभू रामचंद्र हे स्वामी समर्थांचे उपास्य दैवत. पुढील कथेतून स्वामी समर्थांची दत्तभक्ती दिसून येते. एका प्रसंगी आंबेजोगाईच्या परिसरात काही ब्राह्मण दत्तदर्शनाच्या इच्छेने तप करत होते. समर्थांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे साह्य मागितले. समर्थांनी त्यांना "भाव दृढ करा" असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले. एक प्रहर रात्र उलटल्यावर दत्तप्रभू गारुड्याच्या रूपात पत्नी, पाच मुले, हल्यावर लादलेली गोणी,हातात पाच कोंबडे व बोकड अशा परिवारासह तेथे येऊन थांबले.त्या वेळी बरोबरच्या स्त्रीला "भूक लागली" असे म्हणून स्वयंपाक करायला सांगीतले.तिने एक चूल मांडून तीवर एक हंडी चढविली व कोंबडे , बोकड त्यात कापून घातले तरी हंडी भरत नाही असे पाहून क्रमाक्रमाने तो हल्या व पोरेही कापून त्यात घातली.तरी हंडी भरेना तेव्हा ते पलिकडे बसलेले परदेशी (तपाला बसलेले ब्रह्मण) आहेत असे त्याचे बोलणे ऐकून ब्राह्मण पळून गेले.समर्थ मात्र शांतपणे बसून राहीले, कारण हे कोण आहेत हे त्यांनी ओळखले होते.तेव्हा ते सर्व दृष्य नाहीसे होऊन तिथे श्री दत्तस्वरूप प्रकट झाले. त्यावेळी समर्थांनी त्या ब्राह्मणांनाही दर्शन द्यावे अशी प्रर्थना केली.पण ते सकाम भक्त आहेत त्यांची आत्मसाक्षात्काराची योग्यता नाही असे दत्तप्रभूंनी सांगीतले.पुढे श्रीसमर्थांच्या वाक्यास्तव त्या ब्राह्मणांचे स्वप्नात समाधान केले असे वर्णन आहे. श्री समर्थ रामदास स्वामींची पुढील आरतीही त्यांच्या दत्तभक्तीची साक्ष देते - विधीहरीहर सुंदर दिगंबर झाले| अनसूयेचे सत्त्व पहावया आले| तेथे तीन बाल करूनि ठेवले| दत्त दत्त ऐसे नाम पावले||१|| जय देव जय देव जय दत्तत्रेया| आरती ओवाळू तुज दत्तत्रेया||धृ|| तीनही देवांच्या युवती पतीमागे आल्या| त्यांना म्हणे वळखूनी न्या आपल्याला| कोमल शब्दे करूनी करुणा भाकिल्या| त्यासी समजाविल्या स्वस्थानी गेल्या||२|| काशी स्नान करवीर क्षेत्री भोजन| मातापुरि शयन होते प्रतिदिन| तैसे हे अघटित सिद्ध महीमान| दास म्हणे हे तो नव्हे सामान्य||३||

वाचन 26683 प्रतिक्रिया 0