मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रोहिंटन मिस्त्री वि. आदित्य ठाकरे - महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची पहाट?

चिंतातुर जंतू · · काथ्याकूट
Image removed. एका वीस वर्षांच्या वाघाच्या बच्च्यानं नुकतीच आपली नखं दाखवून आपल्या उज्ज्वल कारकीर्दीची सुरुवात केली आहे. उध्दवजी ठाकरे यांचे सुपुत्र आणि सन्माननीय श्री. बाळासाहेबांचे नातू आदित्यजी ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून एका यःकश्चित कादंबरीची जी रातोरात हकालपट्टी केली आहे ते पाहून मराठी माणसाची मान अभिमानानं पुन्हा एकदा उंचावली गेली आहे. रोहिंटन मिस्त्री नावाच्या एका पारशाच्या 'सच अ लाँग जर्नी' या कादंबरीला २००७ मध्ये जेव्हा मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. (इंग्रजी) अभ्यासक्रमाचा एक वैकल्पिक भाग म्हणून निवडण्यात आलं तेव्हा आमचा वाघाचा बच्चा जरा वयानं लहान होता. यथावकाश मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये बी.ए. (इतिहास) करण्यासाठी त्यानं प्रवेश घेतला त्यानंतर कधीतरी बहुधा या कादंबरीत केल्या गेलेल्या ऐतिहासिक अपराधांची त्याला जाणीव झाली असावी. अगदी अशोकरावजी चव्हाणांनीही त्याची री ओढली आहे. आहात कुठे? कुणीतरी म्हटलंच आहे ना की अंधेर नगरी चौपट राजा, सॉरी देवाच्या दारात उशीर होऊ शकतो पण अंधार नाही! अर्थात प्रथेप्रमाणे मराठीजनांचा द्वेष करणार्‍यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. कुठल्याशा बुकर नावाच्या परदेशी पारितोषिकासाठी या पुस्तकाचं नामांकन झालं होतं म्हणे. करायची आहेत काय ती परदेशी पारितोषिकं? आम्ही नुकतीच किती सुवर्णपदकं लुटलीयेत माहिती आहे नं? पत्रकार-लेखक अरूण टिकेकरांनी म्हणे म्हटलं आहे की अभ्यासक्रमातून पुस्तक काढण्यासाठी एक विशीतला मुलगा मुंबई विद्यापीठाच्या व्हाइस-चॅन्सलरला अशी २४ तासांची नोटीस कशी बजावू शकतो? आता अशा गोष्टी टिकेकरांना या वयातही नसतील जमत कदाचित, पण आमच्या मराठी माणसाच्या हृदयसम्राटांच्या नातवाला यात काय अवघड आहे? विघ्नसंतोषी मराठी माणसाला मुळी कुणाची प्रगती झालेली बघवतच नाही! काही लोकांनी असंही म्हटलं आहे की खरं तर या अभ्यासक्रमाचं हे शेवटचं वर्ष होतं म्हणे. आणि एमेच्या वर्गात गेली २० वर्षं हे पुस्तक शिकवलं जातंय म्हणे. म्हणून काय झालं? शेवटी उदाहरणार्थ हा तत्त्वाचा वगैरे प्रश्न आहे ना? (म्हणजे आमच्या बछड्याचं शक्तीप्रदर्शन हे तत्त्व बरं, नाहीतर म्हणायचात एका टीचभर पुस्तकावरच्या बंदीत काय मेलं तत्त्व न फित्त्व?) त्या पुस्तकात म्हणे पारशांच्या विक्षिप्तपणाचं सुध्दा खूप चित्रण आहे म्हणे. आता पारशांना नसेल काही घेणं आपलं चित्रण कसं आहे याच्याशी. पण त्यांच्यात नसली अस्मिता तरी आमची अस्मिता जिवंत आहे की! काय म्हणता? त्यांच्यात मुलींचं नाव अस्मिता ठेवत नाहीत? अहो असं नाही हो म्हणत मी. म्हणजे तसं ते नाहीच ठेवत, पण मी तसं म्हणत नाही आहे. दुसरी एक अस्मिता नावाची भानगड असते काहीतरी. मला नका विचारू म्हणजे काय ते. तिला काहीतरी दुखापत झाली एवढंच लक्षात ठेवाल तर तेवढं पुरेसं आहे आपल्याला. उगाच भलत्या चौकशा नकोत. अंगाशी येतील बरं! Image removed. आणि त्या मिस्त्रीनं म्हणे असं म्हटलं आहे की या वीस वर्षांच्या मुलाबद्दल कीव, किळस की करुणा बाळगावी ते कळत नाही! त्याला म्हणावं तिथे कॅनडात बसून अशा गमजा करण्याऐवजी आमच्या गल्लीत ये, मग दाखवतो तुला आमचा बडगा! काय म्हणालात, आमचा बडगा फक्त आमच्याच गल्लीत दिसतो? थांबाच जरा, आमचा बछडा अजून थोडा मोठा होऊ दे, मग लावू पुन्हा अटकेपार झेंडा. आहात कुठे? आमच्या आदित्यजींच्या कॉलेजातल्या मुख्याध्यापकांनी पण त्या शिंच्या मिस्त्रीचीच बाजू घेतली म्हणे. 'एकविसाव्या शतकात एका राजकीय पक्षानं आपल्यावरची टीका सहन करण्याची आणि आपल्या वागणुकीतून टीकाकारांना चोख उत्तर देण्याची प्रगल्भता दाखवायला पाहिजे. निव्वळ आपल्यावरच्या टीकेपोटी पुस्तकावर बंदी घालणं हे अयोग्य आहे', असं त्यांनी म्हटलं आहे म्हणे. आता तो मिस्त्री पण त्यांच्याच कॉलेजातला आणि त्यात पुन्हा जागतिक किर्तीचा वगैरे. मग त्यांना ही दादरची मुर्गी दाल बराबर वाटणार नाही तर काय? पण आमची मुर्गी नाही बरं, वाघ आहे वाघ! खाल तेव्हा कळेल आपलं, खाईल तेव्हा कळेल! पण आमच्या वाघाच्या बछड्यानं तरी असल्या ख्रिस्ती कॉलेजात जावंच कशाला? करायची काय ती बी.ए. न फी.ए. ची थेरं? असले इतिहास वगैरे शिकून कोण्णाचं भलं होत नाही! शिवाय घरची एवढी रग्गड जहागीर आहे की. नुसतं बसून खाल्लं तरी काही कमी पडणार नाही. काय म्हणता? घराणेशाही? कोण आहे रे तिकडं? जरा जीभ हासडा बरं यांची. फारच वळवळते आहे! अजूनही काही शंका असतील तर हे घ्या दुवे आणि लावा आपली अस्मिता दावणीला... भारतानं आता पुस्तक जाळण्यापलीकडे गेलं पाहिजे सेनेच्या वारसदारानं अभ्यासक्रमातून पुस्तक मागे घ्यायला लावलं

वाचन 27581 प्रतिक्रिया 0