मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निधर्मीपणाचे अनपेक्षित फायदे?

चिंतातुर जंतू · · काथ्याकूट
नुकत्याच झालेल्या 'हिंदुत्व आणि भारतीयत्व' या चर्चेच्या ऐन भरात दोन रोचक दुवे मिळाले. त्या धाग्यावर ते हरवून गेले असते असं वाटलं म्हणून हा एक नवीन धागा. निधर्मी असण्याचे काही फायदे-तोटे हे अगदीच उघड असतात. पण सहसा लक्षात न येणारे असे काही परिणाम असतील का? उदा: एकदा एका मित्रानं सांगितलं होतं की निधर्मी माणसांना नैराश्य येण्याचं प्रमाण अधिक असतं (कारण जर देवच मानत नाही, तर मग आधार कुणाचा?) याविषयी माझ्याकडे विदा नाहीत, पण या दुव्यांवरनं कदाचित काही रोचक निष्कर्ष निघू शकतील म्हणून ते देत आहे. पहिल्या दुव्याचा संबंध उपरोल्लेखित चर्चेत अदिती आणि मी यांनी सांगितलेल्या, आम्हाला इंग्लंडमध्ये आलेल्या (अमेरिकेच्या मानानं) सुखद अनुभवाशी जोडला जाऊ शकेल असं वाटलं. भारतीय उपखंडात ज्यांचं मूळ आहे अशा व्यक्तींविषयी सर्वसाधारण ब्रिटिश मनुष्याला बर्‍यापैकी ज्ञान असण्याशी हा सुखद अनुभव निगडित होता. आज ब्रिटनमध्ये धार्मिक असणं हे एक अल्पसंख्य वर्तन आहे असं दिलेल्या दुव्यात म्हटलेलं आहे. त्या देशात ठामपणे धार्मिक असलेले लोक लोकसंख्येच्या सुमारे १/३ आहेत; धर्माविषयी ठामपणे साशंक (deeply sceptical) असलेलेही सुमारे १/३ आहेत; तर उरलेले १/३ हे धर्माविषयी ठाम भूमिका न घेणारे आहेत. आजच्या ब्रिटनमधला मुख्य धार्मिक प्रवाह हा अज्ञेयवादी (Agnostic) आहे, असंही यात म्हटलेलं आहे. यावरून असा प्रश्न मनात आला: धार्मिकतेचं प्रस्थ/स्तोम जिथे कमी आहे अशा देशांत ज्यांचा धर्म आपल्याहून वेगळा आहे अशा 'इतरां'विषयी ('The other' अशा अर्थानं) समंजसपणा, ज्ञान असण्याची शक्यता अधिक असेल का? हाच गुणधर्म पुढे नेऊन 'अस्मितेचा (Identity अशा अर्थानं) दुरभिमान सोडला तर आपल्याहून वेगळी माणसं समजायला सोपं जात असेल' असं म्हणता येईल का? दुसरा दुवा हा थोडा गमतीशीर आहे. एका लोकप्रिय 'डेटिंग' संकेतस्थळानं आपल्यापाशी असलेल्या लाखो लोकांच्या माहितीचं वेगवेगळ्या पध्दतीनं पृथक्करण केलं. त्यात प्रामुख्यानं वांशिक पृथक्करण होतं. म्हणजे गोर्‍या पुरुषांनी आणि काळ्या पुरुषांनी स्वतःविषयी दिलेल्या माहितीत काय साम्य/फरक असतो, वगैरे. हा सर्व विदा मुळातून वाचण्यासारखा आहेच. पण या धाग्याच्या विषयाच्या अनुषंगानं मला रोचक वाटलेला त्यातला भाग हा "लिहावे नेटके" याविषयी आहे. आपापल्या 'डेटिंग प्रोफाईल'मध्ये प्रत्येकानं दिलेली माहिती ही समजायला किती सोपी/कठीण होती आणि त्याचा लेखकाच्या धर्माशी आणि धार्मिकतेशी कसा संबंध लागतो, असा हा भाग आहे. देव न मानणारे लोक सर्वात नेटकं लिहू शकतात असा निष्कर्ष यातून निघाला. हा आलेख पाहा: Image removed. खरी गंमत मात्र पुढेच आहे. विविध धर्माचे लोक आपापल्या धर्माबद्दल किती ठाम/गंभीर आहेत याच्याशीही त्यांचं नेटकं लिखाण जोडलेलं आहे. म्हणजे विशिष्ट धर्मातल्या कडव्या माणसापेक्षा त्या धर्माचं तितक्याश्या गांभीर्यानं वा ठामपणानं पालन न करणारा माणूस अधिक नेटकं लिहू शकतो! हा आलेख पाहा: Image removed. आहे की नाही रोचक? याविषयी आपली मतं जाणून घ्यायला आवडतील.

वाचन 14383 प्रतिक्रिया 0