सार्वत्रिक सक्तीचे शिक्षण कसे राबवावे?

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in काथ्याकूट
7 Sep 2010 - 3:18 pm
गाभा: 

माझ्या मित्रासबरोबर काल गप्पा चालल्या होत्या. त्याने सांगितलेला हा प्रसंग.. "त्याचा इस्त्रीवाल्याच्या मुलाला शिकायचे नाही असे तो इस्त्रीवाला माझ्या मित्राला दोन वर्षांपूर्वी सांगत होता. तेव्हा मित्राने कारण विचारले असता त्याला शाळेत जे शिकवतात ते आवडत नाही (आणि त्यामुळे नीट येतही नाही). त्याची सगळी आवड गाड्यांचा "मेकॅनिक" किंव तत्सम मशिन्सना उघडण्यात आहे आणि शाळेत ते काही शिकवत नाहीत. इस्त्रीवाला नुकताच गावाहून आला होता. मुलगा गावी असताना नियमित शाळेत जात असे त्यामुळे त्याच्या पायाभुत गोष्टीच कच्च्या होत्या. त्याला इंजिनियर हो म्हणणे धाडसाचे ठरले असते. अश्यावेळी मित्राने त्याच्या मुलाशी बोलून त्यास आय.टी.आय.च्या कोर्सबद्द्ल सांगितले. मात्र त्यात ऍडमिशन मिळण्यासाठी दहावी / बारावी ही किमान परिक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे असेही सांगितले. मात्र ही नवी माहीती मिळाल्यानंतर आवडत्या क्षेत्रात काम करायला मिळेल असा हुरूप येऊन दोन वर्षे चांगला अभ्यास करून तो दहावी झाला व त्याला आता आयटीआयला ऍडमिशन मिळाली आहे"
मित्राला ही कथा ऐकून म्हटले "अरे वा! चांगलं काम केलस की"
तो म्हणाला "अरे त्यासाठी नाही सांगितली हि गोष्ट. सांगायची गोष्ट अशी की आता आपल्याकडे शालेय शिक्षण सक्तीचे होऊ लागले आहे. मी त्या इस्त्रीवाल्याच्या मुलाला मार्गदर्शन करू शकलो पण हे सार्‍यांच्या बाबतीत होईल असे नाही. बहुतांशी मुले कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय एकाच प्रकारचे साचेबद्ध शिक्षण घेणार व कमीतकमी १५ वर्षात पदवीधर म्हणून बाहेर पडणार. पुढे केवळ शाळेत जायचं म्हणून एकाच प्रकारचे शिक्षण घेणारी अख्खी पिढी उभी राहील. एकाच प्रकारे घेतलेले शिक्षण, साधारण एकाच छापाचे विचार व एकाच पद्धतीने ब्रेन कंट्रोल केलेली पिढी तयार होणार आहे हे कितपत बरोबर आहे?"
"अरे पण आपल्यावेळीही असेच तर होते. सगळे जण तोच अभ्यासक्रम शिकायचे. तरीही सगळे एकाच साच्यात विचार थोडेच करतो? आणि तुला काय म्हणायचे आहे? सगळ्यांना शिक्षण देऊ नये? का शिक्षणाची सक्ती करू नये? चांगल्या गोष्टी कोणी आपणहून करत नसतील तर काहिशी सक्ती करावी लागु शकते"
"नाही शिक्षण नको असे नाही पण सरसकट शिक्षणाने काहि तोटे होणार आहेत त्याचाही विचार झाला पाहीजे"
"कोणते तोटे?"
"आता बघ आपण ट्रेकला गेलो होतो तिथे आपल्याला वाट दाखवायला आलेले आजोबा काय सांगत होते? 'चार बुकं शिकल्यापासून पोर गडावर फिरकेनाशी झाली आहेत. खाली उभं राहून शिग्रेटी ओढतील पण कोणाला वाट दाखवायलाही गडावर येणार न्हाईत' किंवा आपला मेकॅनिक पण ओरडत होता हल्ली गॅरेजमधे कामं करायला तरूण पोरं पटकन तयार होत नाहीत. हॉटेलवाल्यांना विचार त्यांना वेटर नेहमी "मागास" म्हणजेच अशिक्षित राज्यांतून का आणावे लागतात? थोडक्यात सगळ्यात मोठा तोटा म्हणजे शारीरिक श्रमांचे मुल्य कमी होऊन ते श्रम करायला लागणार्‍या मनुष्य बळाची कमतरता येत्या वर्षांत वाढणार आहे. शिवाय एका छापाचे शिक्षण घेऊन होणारी सृजनशीलतेची कमतरता हाही लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. याच बरोबर एकाच प्रकारच्या मनुष्यबळाची होणारी वाढ झाल्यावर त्यांचे नोकरीचे प्रश्न सुटले नाहीत तर त्यामुळे वाढता असंतोष व तरुणांचे चुकीच्या मार्गाला लागणं ही बायप्रोडक्ट्स आहेतच"
मी मित्राचं बोलणं ऐकून विचारात पडलो हे खरं..

सार्वत्रिक शिक्षण हवेच हे खरे. पण ते एकाच प्रकारचे हवे का? जर

  • शिक्षणाची 'सक्ती' आहे म्हणजे काय शिकावे याचीही सक्ती करणे कितपत योग्य आहे? (शालेय शिक्षणात)
  • सक्तीच्या शालेय शिक्षणाचे फायदे आपण सारेच जाणतो आणि ते आहेतच. पण या सक्तीच्या सार्वत्रिक शिक्षणाचे काही तोटे आहेत का? असल्यास त्यावर उपाय काय?
  • शिक्षण घेऊनही शारिरीक श्रमाला मोल व श्रमजीवनाला प्रतिष्ठा देणे हे शक्य आहे का? असल्यास कसे?
  • इतक्या सुशिक्षितांना जर फारसे शारिरीक श्रम न करता पैसा हवा असेल तर तशा नोकर्‍या उपलब्ध आहेत का? नसल्यास ह्या सार्वत्रिक शिक्षणामुळे असंतोषाची संभावना कितपत वाढते?
  • थोडक्यात, सार्वत्रिक व सक्तीचे शिक्षण देताना काही खबरदारी, विषेश योजना, पुरवणी नियम असणे गरजेचे आहे असे वाटते का?

टीपः सदर चर्चा ही भारतीय विद्यार्थ्यासंबंधी आहे. मात्र असे प्रयोग जगात होत असल्यास इतर देशांनी सक्तीचे सार्वजनिक शिक्षण राबवताना ह्या गोष्टीची काळजी घेतली आहे का? असल्यास / नसल्यास काय परिणाम झाले हे देखील वाचायला आवडेल

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

7 Sep 2010 - 4:30 pm | अविनाशकुलकर्णी

पारंपारिक शिक्षण व अंगभूत कौशल्य व मेहनत या मुळे आलेले मिळालेले धंदे शिक्षण याचा एक मेकाशी संबंध आहे का? माझ्या ओळखीचा एक मामा मिस्त्री आहे शिक्षण ४ थी नापास..पण तो फाब्य्रीकेशन मधला दादा आहे ..अन त्याचे दोन कारखाने असुन बी.ई झालेली मुले त्याच्या हाताखाली पाणी भरतात..अर्थात हे मान्य कि असे अपवाद असतात..
//

इथे असाही युक्तीवाद असु शकतो की जर त्यांनी फॅब्रिकेशनचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असते तर त्यांच्या अंगभुत कलेबरोबरच शिक्षणाची साथ मिळून अधिक प्रगती झाली असती. मात्र प्रश्न असा आहे की असे शिक्षण असते हेच बर्‍याच जणांना माहित नाही. माहित असल्यास ह्या प्रकारचे शिक्षण देण्यासाठी तितक्या शाळा/कॉलेजे तसेच तितक्या संख्येने शिक्षकही नाहीत. तेव्हा ज्यांना ह्याप्रकारचे श्रमशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी ते कसे घ्यावे?
व असे शिक्षण घेऊनही समाजात प्रतिष्ठा मिळणार नसेल तर हे व्यवसाय करायला कोण आणि का तयार होईल?

थोडक्यात, सध्याचे सक्तीचे शालेय शिक्षण फक्त कारकुन/आयटी हमाल / कॉल सेंटरचे नोकर या प्रकारचे चाकोरीबद्ध मनुष्यबळ घडवेल का?

Dipankar's picture

7 Sep 2010 - 4:08 pm | Dipankar

जन्मल्या जन्मल्या मुलास(मुलींनासुद्धा) कायद्याने दहावी पास करायचे

परिकथेतील राजकुमार's picture

7 Sep 2010 - 4:36 pm | परिकथेतील राजकुमार

ॠषिबॉय मस्त विषय कुटायला घेतला आहेस बॉ !

मला आजही मी जेंव्हा जेंव्हा एखादा संगणक दुरुस्त करायला बसतो तेंव्हा वाटुन जाते की आयुष्यातली काही वर्षे आपण 'महायुद्धांच्या नोंदी, कारणे, सनावळ्या, अमिबा, फॉस्फरस, पाया, समत्रिभुज असे काय काय शिकलो त्याचा आपल्याला तेंव्हा तरी काय उपयोग झाला आणि आत्ता तरी काय होतोय ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Sep 2010 - 5:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

परा, समद्विभुज त्रिकोण आणि त्रिभुज प्रदेश कधी शिकलाच नसतास तर कसं कळलं असतं तुला कशात गती आणि रस आहे ते? मला बारावीत असतानाही धड ठरवता येत नव्हतं फिजीक्स का जीवशास्त्र ते! (शेवटी ते माझ्या कमी मार्कांनीच ठरवलं!) मला विचारशील तर आज दुसर्‍या महायुद्धातल्या सनावळ्या मलाही आठवत नाहीत, पण तरीही कामानिमित्त पहिलं/दुसरं महायुद्ध घडलेल्या भूमीवर जाते तेव्हा बर्‍याच गोष्टी खूप चांगल्या समजतातही!

ऋ, मी इंग्लंडात ऐकलेली पद्धत अशी. एखाद्या मुला-मुलीला गणित, विज्ञान, इ. जमत नसेल तर ते सरळ सोडता येतं. अर्थात काही मुलभूत शिक्षण चुकवता येत नसावं. आणि त्याऐवजी सुतारकाम, माळीकाम, इ. विषयांत रस असेल तर त्या विषयांचा अभ्यास दहावीच्या परिक्षेसाठी करावा लागतो.

ऋ, तुझा गडाखालच्या म्हातार्‍यांकडून आलेला संदेश खरंतर आपल्या सगळ्यांसाठीच आहे. आपल्या शहरातले रस्ते दाखवणं यात आपल्यापैकी बर्‍याच लोकांना कमीपणा वाटत नाही, पण या खेड्यापाड्यांतल्या लोकांना वाटतो. याचं कारण आपण शहरी लोकांचं "अशिक्षित" वागणं का? आमच्या ऑफिसात बरेच लोकं हौशी पक्षीनिरिक्षक आहेत, काही लोकं सर्पमित्र आहेत, काहींना झाडांची खूप माहिती आहे. कामाच्या गप्पांबरोबर याही गप्पा बर्‍याचदा होतात. खेड्यापाड्यातल्या माहितगार लोकांनातर याहीपेक्षा जास्त माहिती असू शकते. पण आपण त्यांच्या माहितीची योग्य कदर करतो का?

परिकथेतील राजकुमार's picture

8 Sep 2010 - 11:56 am | परिकथेतील राजकुमार

परा, समद्विभुज त्रिकोण आणि त्रिभुज प्रदेश कधी शिकलाच नसतास तर कसं कळलं असतं तुला कशात गती आणि रस आहे ते?

प्रामाणीकपणे सांगायचे तर ह्या सगळ्यानी मला भविष्याकडे बघण्यासाठी काही मदत केली असे मला बिलकुल वाटत नाही. उलट भुमिती ह्या विषयाची भितीच जास्त बसवली :( इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षाला आम्हाला मॅकेनिकल पण कंपलसरी होते, त्यावेळी तर येवढे मरणाचे टेंशन यायचे ना.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Sep 2010 - 12:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

परा, भूमितीची किंवा कोणत्याही विषयाची भीती वाटणं हे शिक्षकांचं अपयश म्हणता येऊ शकेल. पण ते समद्विभुज त्रिकोण आणि त्रिभुज प्रदेश शिकलेच नाही तर ते आवडत नाहीत, त्यापेक्षा कंप्यूटरच्या हार्डवेरमधे जास्त रस आहे हे कसं समजणार?

थोडक्यात सगळ्यात मोठा तोटा म्हणजे शारीरिक श्रमांचे मुल्य कमी होऊन ते श्रम करायला लागणार्‍या मनुष्य बळाची कमतरता येत्या वर्षांत वाढणार आहे. शिवाय एका छापाचे शिक्षण घेऊन होणारी सृजनशीलतेची कमतरता हाही लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे.
हा प्रश्न काही नविन नाही. आपल्याकडे शारीरिक श्रमाचे मुल्य नेहमीच कमी होते. तीच गोष्ट छापाच्या शिक्षणाची! नव्या पिढीला कल्पना नसेल पण एक काळ होता जेव्हा नॅशनलाइज्ड बँक, एल. आय. सी. अशा ठिकाणी कारकुन म्हणून नोकरी मिळावी म्हणून शास्त्र शाखेचे द्विपदवीधरही धडपडायचे. ग्रामिण भागात आषाढी/कार्तिकी करत १०वी/१२वी चा शिक्का, नंतर तालुक्याच्या गावाला कॉलेजच्या नावाखाली उनाडक्या, पंचायत समितीत शिपायाची नोकरी मिळावी म्हणून लाच द्यायची तयारी हे प्रकार मी खूप जवळून पाहिलेत. त्याच वेळी ५वी-६वी पासुन गणपतीच्या कारखान्यात कामाला सुरुवात करुन पंचविशीत स्वतःचा मालकीचा कारखाना सुरू करणारी मुले ही पाहिल्येत.

प्राथमिक शिक्षणात वाचन, लेखन, अंकगणितावर भर असावा. घोकंपट्टी नसावी. शास्त्र, भूगोल, इतिहास वगैरे विषय वाचन, लेखन याचाच एक भाग म्हणून यावेत. बरेचदा मुलांना वाचता येत नसते. साहजिकच शिकवलेले कळत नाही. तसेच पुस्तकातले धडे फारसे रंजक वाटत नाहित. तिच गोष्ट लेखनाची. आवडीच्या विषयावर लिहायला-वाचायला मिळाले तर मुले हौसेने शिकतात. नुसते क्रिकेट ही एकच थीम घेऊन लेखन, वाचन, अंकगणित, इतिहास, शास्त्र असे अनेक विषय शिकवता येतिल. हाय काय नी नाय काय.

इथे ९-१२ हायस्कूल असते. यात ३ प्रकारचे हायस्कुल डिप्लोमा आहेत.
१. कोअर फोर्टी- नो कॉलेज, बहुदा मिलिटरी सर्व्हिस
२. टेक्निकल ऑनर्स- २ वर्ष कॉलेज, ४ वर्ष कॉलेज
३ अ‍ॅकॅडमिक ऑनर्स-४ वर्ष कॉलेज, ग्रॅड स्कूल
यातिल टेक्निकल ऑनर्स मधे ब्युटिशियन पासुन नर्सिंग असिस्टंट आणि वेल्डिंग पासुन कार मेकॅनिक पर्यंत बरेच विषय निवडता येतात.

शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा नसणे याचे कारण आपल्या जातीव्यवस्थेत तर नसावे?
मला इथे अमेरिकेत वारंवार जाणवलेली गोष्ट म्हणजे लोकं अभिमानाने सांगतात. डेअरी फार्मिंग करणारी आमची चौथी पिढी. किंवा मासेमारी करणारी तिसरी पिढी. किंवा माझे आजोबा स्टेट मधले १ नंबरचे हॉग फार्मर आहेत. अगदी आमच्या कडे छोटी मोठी दुरुस्तीची कामे करायला येणार्‍या शेनलाही त्याच्या ट्रेडचा प्रचंड अभिमान आहे. आमच्या इथे दर वर्षी गावातील न्युजपेपर तर्फे स्पर्धा असते. बेस्ट फॅमिली डॉक्टर पासुन बेस्ट सर्व्हर पर्यंत आणि बेस्ट हायस्कूल टिचर पासुन बेस्ट बार्बर पर्यंत विविध प्रकारच्या प्रोफेशन साठी नॉमिनेशन मागवतात. लोकं उत्साहाने आपल्या लाडक्या प्लंबरचे, सुताराचे नाव कळ्वतात. तुम्ही काय काम करता या पेक्षा तुम्ही ते काम किती चांगले करता याला महत्व असते.

ऋषिकेश's picture

7 Sep 2010 - 7:09 pm | ऋषिकेश

सविस्तर प्रतिसादासाठी आभार. बर्‍याच गोष्टी नव्या समजल्या

हा प्रश्न काही नविन नाही.

सहमत आहे. प्रश्न जुनाच आहे.. मात्र आता प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण सक्तीचे झाल्यावर त्याची व्याप्ती अधिकच वाढली आहे..

शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा नसणे याचे कारण आपल्या जातीव्यवस्थेत तर नसावे?

असु शकेल. काही ठोस सांगता येणे कठीण आहे. मात्र श्रमास प्रतिष्ठा मिळावण्यासाठी काय करता येईल?

पुढचा प्रतिसाद फक्त तुम्हालाच नाही तर इन जनरल आहे:
सार्वत्रिक सक्तीच्या शिक्षणाने शारीरीक श्रम करणार्‍याची प्रतिष्ठा वाढेल का कमी होईल? यावर एक विचार असाही येतो की सगळेच शिकु लागल्यावर ह्या शारीरिक श्रम करणसर्‍यांची गरज व प्रतिष्ठा दोन्ही वाढेल कारण त्याची कमतरता निर्माण होईल.

>> शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा नसणे याचे कारण आपल्या जातीव्यवस्थेत तर नसावे? >>

छान मुद्दा मांडला आहे स्वाती यांनी.
जातीव्यवस्थेनी/वर्णाश्रमानी अवर कन्ट्री हॅज गॉन ऑर विल गो टू डॉग्स असं वाटतं. मी तुझ्याहून श्रेष्ट कसा दाखवण्याची अहमहमिका ही वृत्ती वाईटच.
अमेरीकेत मी बघते, बरीचशी कामं ही लोकांना आपली आपल्याला यावी लागतात नाहीतर अव्वाच्या सव्वा पैसा ओतावा लागतो. इथे श्रमाला खूप महत्व आणि सन्मान आहे.
कामाच्या दर्जाला खरच महत्व आहे. Your professionalism counts at every step.

इन्द्र्राज पवार's picture

8 Sep 2010 - 12:03 pm | इन्द्र्राज पवार

"जेव्हा नॅशनलाइज्ड बँक, एल. आय. सी. अशा ठिकाणी कारकुन म्हणून नोकरी मिळावी म्हणून शास्त्र शाखेचे द्विपदवीधरही धडपडायचे."

~~ आजही या चित्रात फरक पडलेला नाही, स्वातीताई. तुमचे वाक्य भूतकाळ दर्शविते, त्याचे रूपांतर चालू वर्तमानकाळातही केले पाहिजे.

गेल्याच वर्षी येथील एका मोठ्या वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णंमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमानिमित्ताने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील एका सत्रात एक शिक्षणतज्ज्ञ म्हणाले की, 'या महविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी बॅन्किंग, फायनान्स आदी क्षेत्रात मारलेल्या भरारीची पुस्तिका मला पाहायला मिळाली. मला आनंद वाटला. ही मुले कारणपरत्वे मला कुठे भेटली, ओळख सांगितली की आनंदच होतो, पण ज्यावेळी एखादा दुसरीकडील सायन्सचा पदवीधर भेटतो आणि ''सर, हे पेढे अमुकतमुक बँकेत कॉल आला, परवा जॉइन झालो." असे म्हणतो त्यावेळी त्याला शुभेच्छा तर देतोच पण बाजूला मन आनंदित होण्याच्याऐवजी विषण्ण होते..."

इन्द्रा

इन्द्र्राज पवार's picture

7 Sep 2010 - 9:25 pm | इन्द्र्राज पवार

चर्चेचा हा विषय केवळ आपल्या राज्यापुरता (जरी त्याचे सार संपूर्ण देशाला लागू आहे) घेतला तरीदेखील तामीळनाडू आणि केरळासारख्या राज्यांनी प्राथमिक पातळीपासून जे प्रयोग केले, राबविले त्याच्या अनुषंगाने जरी विचार केला तर ही सार्वत्रिक शिक्षण योजना येणार्‍या पिढीसाठी (प्रॅक्टीकली विचार करता) फार उपयुक्त अशी सिद्ध होईल असे या क्षेत्रातील शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

सर्वप्रथम श्री.ऋषिकेश यांच्या मांडणीतील 'सक्ती' शब्द समोर घेतला तर त्या प्रयोगातून वर्षानुवर्षाच्या अनुभवामुळे पालक-विद्यार्थी यांच्यात त्यामुळे एक प्रकारचा 'अनिच्छे' चा सूर ध्वनीत होतो. त्यामुळे केंद्राने मार्गदर्शन सूचनांमध्ये 'सक्ती वा कंपल्शन' या शब्द प्रयोगाला शक्यतो टाळले आहे (अजिबात काढून टाकलेला नाही, हेही खरेच, पण शक्यतो तो फ्लॅग आला म्हणून दचकून जाण्याचे कारण नाही, याला कारण म्हणजे केन्द्र शासन असे इच्छित आहे की, 'विद्यार्थ्याने शिक्षण घेणे माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी "कंपल्सरीली" मिळविणार' असे म्हणावे ~ इथे 'सक्ती' आहे ती शासनाने विद्यार्थ्याला शिक्षण देण्याची).
[योजनेचा मसुदा तयार झाला त्यावेळी आयोगाने "RIGHT OF CHILDREN TO FREE AND COMPULSORY EDUCATION" अशा शब्दप्रयोग केला होता....आता कायद्यात रूपांतर झाल्यानंतर यावर विस्ताराने चर्चा करता येईल.]

मूळ संकल्पना "सर्व शिक्षा अभियान" या नावाने प्रचलित आहे व जीमध्ये "अ‍ॅक्टीव्हीटी बेस्ड लर्निंग" ला प्राधान्य येणार आहे. त्यातील प्रकार कोणत्या रितीने घेता येतील त्याचा विचार श्री.ऋषिकेश यांच्या मुद्द्यानुसार :

सार्वत्रिक शिक्षण हवेच हे खरे. पण ते एकाच प्रकारचे हवे का?
~~ ते एकाच प्रकारचे असणार नाही. ते कसे असेल हे ठरविण्यासाठी प्रत्येक राज्य १५ सदस्यांचे एक स्वतंत्र मंडळ बनवेल ज्यामध्ये प्रा.शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ, प्रत्यक्ष फिल्ड वर्कचा अनुभव असलेले, आणि ५०% महिला (ज्या शिक्षणक्षेत्रातीलच असतील). ही समिती 'शिक्षण हे एकाच प्रकारचे हवे की त्यात सेगमेन्टवाईज व्हेरिएशन देता येईल, याचा विचार करेल. शिवाय सिलॅबसचा दर तीन वर्षानी आढावा घेतला जाईल. आता इथे मिपावर आपण चर्चा करताना मात्र म्हणू शकतो की, सार्वत्रिक शिक्षण हवेच, पण त्यात वैविधता असावीच असावी.....(प्रत्येक विषयामध्ये कोणत्या प्रकारे आकर्षकपणा आणावा, जेणेकरून विद्यार्थ्यांस शिकण्याची उर्मी कायम वाटत राहील, यावर भर देणे. तामीळनाडू आणि केरळ मध्ये 'ब्लॅकबोर्ड'चा वापर ६५% वर आला आहे, तो २०१२ पर्यंत ३०% वर आणण्याची तेथील शिक्षण मंडळाची मनिषा आहे....'इन्टरअ‍ॅक्शन : अ‍ॅबॅकॅस थ्रू' विलक्षण यशस्वी ठरली असे नोंदविले गेले आहे.)

* शिक्षणाची 'सक्ती' आहे म्हणजे काय शिकावे याचीही सक्ती करणे कितपत योग्य आहे? (शालेय शिक्षणात)

~~ नाही असे होणार नाही. मुळात प्रा.शिक्षण पातळीवर जो अभ्यासक्रम नियत करण्यात येईल त्यात सक्तीला वाव नसून ज्याला आपण आयटी जगतात जी "युझर-फ्रेन्डली" टर्म वापरतो, त्याच धर्तीने 'सक्ती'चे रुपांतर फ्रेन्डली करण्यात येणार आहे. प्राथमिकच्या अभ्यासक्रमात 'वातावरणशास्त्र' देखील घ्यावे असे सुचविण्यात आले आहे, म्हणजे विषयांची व्याप्ती कुठेपर्यंत जाईल, हे तुम्ही जाणालच. (आता असे अभ्यासक्रम "आमच्या टीनाला, आमच्या जीतूला झेपेल का हो?" असा इंदुमती पैंगणकर स्वर कुण्या भगिनीने काढू नये म्हणजे मिळविली.)

* सक्तीच्या शालेय शिक्षणाचे फायदे आपण सारेच जाणतो आणि ते आहेतच. पण या सक्तीच्या सार्वत्रिक शिक्षणाचे काही तोटे आहेत का? असल्यास त्यावर उपाय काय?

~~ मला माफ करा, ऋषिकेश, पण एखाद्या प्रयोगशील आणि प्रयोगक्षम्य योजनेची सुरूवात करतानाच त्यावरील 'तोट्याच्या शिरा' काढणे तसे बरोबर नाही, पण तुम्ही चर्चेसाठी धाग्यात हा मुद्दा मांडलेलाच आहे तर, लेट अस प्रीपेअर अवरसेल्व्ह फॉर द बेस्ट आऊटकम. (या भागात मुलगी उपवर व्हायला आली की मुलीची आई तिला पुरणपोळी करायला शिकविते...का तर आमच्याकडे सुगरण गृहिणीची ती एक अ‍ॅसिड टेस्ट मानली जाते. पण तो प्रयोग करताना ती एकदोनवेळा हात भाजून घेतेच घेते....मात्र तसे झाले तर तो त्या 'शिक्षणाचा तोटा' समजत नाहीत. त्यामुळे तुम्ही म्हणता त्यावर उपाय काही नाहीच, असलाच तर तिला सांगणे "व्यवस्थित शिक'. ~~ असो, हे थोडेसे भरकटले.)

* शिक्षण घेऊनही शारिरीक श्रमाला मोल व श्रमजीवनाला प्रतिष्ठा देणे हे शक्य आहे का? असल्यास कसे?
~ आहेच आहे. किंबहुना अभ्यासक्रमात शारीरिक श्रमाचे महत्व विशद केले जाणारच आहे. श्रमजीवनाला प्रतिष्ठा तर एवढ्यासाठी देण्यात येणार आहे की, पुढे पदवीधर झाल्यावर त्याने/तिने बँका, सरकारी कार्यालये, म्युनिसिपालिटी, झेड.पी. अशा पारंपारिक भींतीना धडका न देता जिथे शारीरिक श्रमाचा वापर करून लघुउद्योजक स्वरूपाची योजना मांडावी, जिला शासनाचे अर्थखाते पायाभूत सुविधा तसेच अर्थसाहाय्य देईल. त्याबाबतही स्वतंत्र अशी श्वेतपत्रिका रितसर प्रसिद्ध करण्यात येईल, शिवाय आयटीआयसारख्या आता अत्यंत उपयुक्त शाबीत झालेल्या निकेतनाला वेळोवेळी भेटी देवून तिथल्या कार्याची (फिल्ड वर्कचा भाग म्हणून) ओळख करून घेणे, हा भागदेखील उपयुक्तच ठरणार आहे.

* इतक्या सुशिक्षितांना जर फारसे शारिरीक श्रम न करता पैसा हवा असेल तर तशा नोकर्‍या उपलब्ध आहेत का?
~~ देशातील अन्य राज्याचा विचार करता असे कुणीही म्हणत नाही...म्हणतात ते फक्त मायमराठीतील पोरे...ज्यांना त्यांचे आईवडील काहीही झाले तरी दोन वेळचे जेवण खायाला घालतातच...आणि ही भटकबहाद्दर उनाडक्या करीत आज एका पुढार्‍याच्या मागे, उद्या दुसर्‍याच, तर परवा तिसर्‍या गुत्त्यावर. याच राज्यातील विशीबाविशीतील सुशिक्षित तरुणांना शारीरिक श्रम न करता पैसा हवा असतो. दमडी लायकीचे हिंदी चित्रपट आणि तितक्याच तद्दन फालतू (पण तुफान चकचकाट असलेल्या) मालिका पाहूनपाहून बथ्थड झाली आहेत हा 'युवा वर्ग'. यांचे स्वप्न काय तर "सोनी, प्लस, झी वर आयडॉल म्हणून चमकणारच !"

शक्य झाल्यास केव्हातरी गुरुदासपूर या पंजाबच्या या एका मोठ्या शहरात आणि रोहटक या हरियाणामधील एका शहरास एकदोन दिवस भेट द्या, अन् मग बघा इथला दिल्लीत, चंदिगड येथील विद्यापीठातून पदवी (पदवी नव्हे पदव्या...) घेतलेला तरुण शेतात, कारखान्यात, वाहतुकीत आदी क्षेत्रात किती शारीरिक श्रम करतो आणि माझ्यासारखा महाराष्ट्रातील मित्र भेटायला आला की आहे त्याच अवतारात त्याला आनंदाने भेटायला धावतो...त्यावेळी त्याच्या मनात चुकूनदेखील येत नाही की आपण द्विपदवीधर आहोत आणि चिखलाने, ऑईलने, मळकट झालेल्या कपड्यांनी परराज्यातून आलेल्या एका मित्राला कसे भेटायचे? ही मानसिक स्थिती आहे या तरुणांच्यात...शारीरिक श्रमाच्या महत्वाबाबत. 'शिक्षण श्रमाला प्रतिष्ठा' देते हे बिंबविण्याचाच प्रयत्न सर्व शिक्षा अभियानात असणार आहे.

.... वर अदिती आणि स्वाती यांनी परदेशात असलेल्या अशा श्रममहतेचे चांगले वर्णन केले आहे. माझ्याकडेही अगदी लिखित स्वरूपातील अमेरिका आणि युरोपमधील काही मित्रांची अशी उदाहरणे आहेत की, जिथे दोघे आहेत...एक मिलियनर बिझिनेसमन आणि एक फुटकळ फळ विक्रेता, पण सायंकाळी तिथल्या "डेक्कन जिमखान्या" वर ग्रुप एकत्र आला तर पहिला दुसरा तसला आहे म्हणून त्याच्याकडे कधीही कमीपणाने पाहात नाही, तर दुसरा पहिला कोट्याधीश आहे म्हणून त्याच्याबरोबर सार्वजनिक ठिकाणी वावरताना दबकून वागत नाही. तिथे ते दोघेही केवळ जॉन आणि माईकच असतात.

मला टायटल आठवत नाही पण 'व्हिक्टर बॅनर्जी' अभिनीत एक इंग्लिश चित्रपट होता. लंडनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या बॅनर्जीला तिथल्या खर्चाच्या मेळीसाठी पार्टटाईम 'बस कंडक्टर' ची नोकरी करावी लागते. तो ती करीत असताना इकडे अभ्यासही चालू असतो. कॉलेजमध्ये मेडिकलचीच एक ब्रिटीश तरुणी त्याच्याबरोबर मैत्री करते आणि ती मैत्री चांगली फुलूही लागते. त्याने तिला अर्थातच आपण बस कंडक्टरची नोकरी करतोय असे सांगितलेले नसते, पण एके दिवशी धो-धो पावसामुळे तिची आणि मैत्रीणीची स्कूटर पाण्यात अडकते म्हणून त्या दोघी लंडन बस ट्रान्स्पोर्टचा आधार घेतात. बसमध्ये बसताना तिचे लक्ष बॅनर्जीकडे जाते आणि तिला त्याला हाक मारताना खूप आनंद होतो. पण ड्रेसवर असल्यामुळे आपल्या नेहमीच्या भारतीय कोत्या मनोवृत्तीमुळे तो आपला चेहरा लपविण्याचा प्रयत्न करतो. ती गोंधळात पडते व त्याला कारण विचारते, तो कसेबसे उत्तर देतो, "अगं मी असा इथे कंडक्टर...तुला काय वाटेल?" यावर ती खळखळून जोराने हसते, म्हणते, 'अरे भल्या गृहस्था, उलटपक्षी तू हे काम करतोस ते कळाल्यामुळे माझा तुझ्याविषयीचा आदर द्विगुणीत झाला आहे....अरे तू काही घरच्या पैशावर फुकट इथे शिक्षण घेत नाहीस, हेच सिद्ध होते ना?...आय अप्रुव्ह. चीअर्स".

ही आहे श्रमाला महत्व देण्याची परदेशी युवावर्गाची व्याख्या.....जी इथे रुजणे फार फार गरजेचे आहे...आणि त्याची सुरुवात या सार्वत्रिक सक्ती शिक्षणाच्या माध्यमातून व्हावी, होईल ही आशा आहे.

इन्द्रा

ऋषिकेश's picture

8 Sep 2010 - 1:35 pm | ऋषिकेश

वा! तुमच्याकडून अपेक्षेप्रमाणे विस्तृत व मुद्देसुद प्रतिसाद आला आहे. आभार.

ते कसे असेल हे ठरविण्यासाठी प्रत्येक राज्य १५ सदस्यांचे एक स्वतंत्र मंडळ बनवेल ज्यामध्ये प्रा.शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ, प्रत्यक्ष फिल्ड वर्कचा अनुभव असलेले, आणि ५०% महिला (ज्या शिक्षणक्षेत्रातीलच असतील). ही समिती 'शिक्षण हे एकाच प्रकारचे हवे की त्यात सेगमेन्टवाईज व्हेरिएशन देता येईल, याचा विचार करेल. शिवाय सिलॅबसचा दर तीन वर्षानी आढावा घेतला जाईल

ही माहिती नवी आहे. कुठून मिळाली? (म्हणजे ह्यामाहितीवर आक्षेप नाही .. त्या ठिकाणाहून अन्य माहिती मिळावी या उद्देशाने विचारतोय).
बाकी पुढे "शिक्षण घेऊनही शारिरीक श्रमाला मोल व श्रमजीवनाला प्रतिष्ठा देणे हे शक्य आहे का? असल्यास कसे"" याचे दिलेले उत्तर हुरूप वाढवणारे आहेच पण असे असले तरी प्रत्यक्षात असे होईल अशी तुर्तास केवळ आशा आहे.

देशातील अन्य राज्याचा विचार करता असे कुणीही म्हणत नाही...म्हणतात ते फक्त मायमराठीतील पोरे...ज्यांना त्यांचे आईवडील काहीही झाले तरी दोन वेळचे जेवण खायाला घालतातच

ह्म्म तुम्ही म्हणता तसे असेल तर श्रमास फक्त महाराष्ट्रातच महत्त्व कमी होतंय का? असल्यास त्याचे कारण काय असेल? इतर राज्यांचा व्यवसायाभिमुख विचार करणं यामागे असेल का? महाराष्ट्र मुख्यत्त्वे नोकरदारांचे राज्य झाले आहे का?

बाकी एकुणातला आशावादी प्रतिसाद हुरूप वाढवत असला तरी आजुबाजुला बघता(कदाचित तुम्ही म्हणता तसे महाराष्ट्रातच बघत असल्याने असेल) चित्र तितके आशादायक दिसत नाही. प्रत्यक्षात दिवसेंदिवस परप्रांतियांच्या प्रश्नापासून ते सामाजिक असंतोषापर्यंत अनेक प्रश्न वाढलेले दिसताहेत हेही तितकेच खरे आहे (आणि याचे कारण शिक्षण आहे असे नाही पण वाढत्या शिक्षणाबरोबरच परतव्याची वाढलेली अपेक्षा आपला वाटा यात उचलते आहेच)

पैसा's picture

7 Sep 2010 - 10:13 pm | पैसा

गोव्यात ही योजना "सर्व शिक्षा अभियान" याच नावाने राबविली जाते. हे खरं आहे की इथेही आज इलेक्ट्रिशियन्स, प्लंबर्स, घरकामाला मुली मिळणे अतिशय कठीण आहे. पण याचं कारण सर्व शिक्षा अभियान नाहीए. याच संदर्भात आजच्या टी.ओ.आय. मध्ये एक लेख आला आहे.

कुशल कामगार, (गवंडी, सुतार सुद्धा त्यातच आले) टर्नर फिटर वेल्डर इ. यांना मध्यपूर्वेत खूप मोठी मागणी आहे. हे सगळं कुशल मनुष्यबळ तिकडे जातं. गोव्यात तर अशी परिस्थिति आहे की प्रत्येक घरातला एक मुलगा, मग तो उच्चशिक्षित असो किंवा आय.टी.आय./ डिप्लोमा घेतेलेला असो, मध्यपूर्वेत असतो. साहजिकच स्थानिक पातळीवर त्यांचा तुटवडा जाणवतोच.

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. मग त्याच्या बौद्धिक कुवतीप्रमाणे, आणि पालकांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे जेवढे शक्य होईल, तेवढे शिक्षण अवश्य घ्यावे. प्रचंड लोकसंख्या हे आपल्या देशाचं दुखणं आहे, तसं ती सगळ्यात मोठी अ‍ॅसेट पण होऊ शकते, जर शैक्षणिक योग्यता, गुणवत्ता असेल तर.

इथेही आज बरीचशी शेते मोकळी पडलेली असतात. कारण घरातला कर्ता मुलगा कुठेतरी परदेशात असतो. लोकांनाही डॉलर्समध्ये येणारं उत्पन्न जास्त बरं वाटतं. याला आळा घालण्यासाठी परदेशात गेलेल्याना इथेच जास्त उत्पन्न देणारे नोकरी धंदे उपलब्ध होणं आवश्यक आहे.

कर्नाटक, केरळ मधून येणार स्वस्त पण कमी गुणवत्तेचं "लेबर " गोव्यातही आहे. पण दुसरा उपाय नसल्यामुळे त्याना कामाला ठेवणेही भाग आहे. आज अशी शक्यता तयार झाली आहे, की आणखी काही (१०/१५) वर्षात, कोकणी आणि मराठी दोन्हीला बाजूला ढकलून कानडीला राजभाषेचा दर्जा द्यावा लागेल. आताच रस्त्यात काही खाणावळींचे बोर्ड कानडीत दिसतात. या विरुद्ध कुरबूर सुरू झाली आहेच. मोठ्या असंतोषाची बीजे या परिस्थितीत दडलेली आहेत.

ही परिस्थिती कशी बदलता येईल, याचा विचार झाला पाहिजे. सक्तीची भाषा असू नये हे खरे, पण काही वेळा अशी भाषा असल्याशिवाय नोकरशाहीला कामाला लावणे कठीण असते. मुलांचं हित कशात आहे ह्या एकाच कळीच्या मुद्द्याचा विचार झाला तर बरंच काही साध्य करता येईल.

मिसळभोक्ता's picture

7 Sep 2010 - 10:16 pm | मिसळभोक्ता

हे खरं आहे की इथेही आज इलेक्ट्रिशियन्स, प्लंबर्स, घरकामाला मुली मिळणे अतिशय कठीण आहे.

ह्म्म्म्म.. कुणाला काय आवडेल, हे ज्याचे त्याचे व्यक्तिगत मत आहे, परंतु, ह्या कामासाठी तुम्हाला मुलीच का हव्या आहेत ?

पैसा's picture

7 Sep 2010 - 10:19 pm | पैसा

कारण मी "कुशल मनुष्यबळाबद्दल" बोलत होते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Sep 2010 - 10:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लै लै भारी!!

मिसळभोक्ता's picture

7 Sep 2010 - 11:14 pm | मिसळभोक्ता

कारण मी "कुशल मनुष्यबळाबद्दल" बोलत होते.

तुम्हाला जबरा उर्फ "वर्किंग लाईक अ‍ॅनिमल्स" उर्फ "पाशवी" म्हणायचे नव्हते ?

मितान's picture

7 Sep 2010 - 11:33 pm | मितान

उत्तम चर्चा !
मला शिक्षणक्षेत्रातच काम करायचं आहे. त्यामुळे इथे मिळणारी माहिती नक्कीच संग्राह्य असेल याची खात्री आहे.
हृषीकेश, चांगल्या विषयाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद.
वाचते आहे. :)

अविनाशकुलकर्णी's picture

7 Sep 2010 - 11:44 pm | अविनाशकुलकर्णी

सुतार्,लोहार..कुंभार व इतर बलुतेदार समाजातल्या मुलामध्ये अंगभूत कौशल्य असते..आम्हि कारखान्यात अश्या मुलांना मशीन वर काम करायला शिकवले व ते आज कुशल कामगार आहेत..काहि नी तर आपली वर्क शोप्स टाकली आहेत....साचेबंद अभ्यास क्रमाबरोबर धंदे शिक्षणा ची जोड दिली पाहिजे..असे वाटते....

इन्द्र्राज पवार's picture

7 Sep 2010 - 11:59 pm | इन्द्र्राज पवार

"आम्हि कारखान्यात अश्या मुलांना मशीन वर काम करायला शिकवले व ते आज कुशल कामगार आहेत..काहि नी तर आपली वर्क शोप्स टाकली आहेत"

~~ श्री. अविनाश कुलकर्णी... याबद्दल तुम्ही नि:संशय अभिनंदनास पात्र आहात. सर्व शिक्षा अभियानाच्या मुलभूत तत्वात "श्रमाचे महत्व" हेच प्रतीत होते आणि केन्द्राची शिक्षण विस्तार विषयावरील विविध सेमिनार्/सिम्पोझियम्/कॉन्फरन्सेस मधून सिलॅबस कमिटीला नेमकी हीच सूचना असते की, विद्यार्थी वर्गाची मानसिक स्थिती श्रमाला प्रतिष्ठान मिळवून देणारी करा आणि तदनुषंगाने त्या अभ्यासक्रमाला रूप देण्याचे काम सुरू आहे.
इन्द्रा

उत्तम मांडणी.

इंद्रराज पवारांचा सहभागही आवडला, या चर्चेतून नक्कीच काहीतरी ठोस माहिती मिळेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

शिक्षणाची 'सक्ती' आहे म्हणजे काय शिकावे याचीही सक्ती करणे कितपत योग्य आहे? (शालेय शिक्षणात)

नाव-पत्त्याप्रमाणे दहावी (माझ्यामते बारावीपर्यंतचे) शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थी पुढे कुठलाही व्यवसाय/नोकरी करणार असला तरीही; विशेषतः सध्या जगात जो माहितीचा विस्फोट झाला आहे त्या पार्श्वभूमीवर. बर्‍याच क्षेत्रात संशोधन इतक्या पुढे गेले आहे की जर मूलभूत गणित, विज्ञान माहिती नसेल तर यातले बरे वाईट ठरवता येणार नाही ( सध्या जे शिक्षण सक्तीचे आहे ते घेउनही त्यातील बरेचसे विसरल्याने, मह्त्त्वाचे न वाटल्याने किंवा बेफिकिरीने जी दुर्दशा झाली आहे ती आपण पाहातोच.)
उलट यात संगणक शि़क्षणाचाही समावेश करावा.

शिक्षण घेऊनही शारिरीक श्रमाला मोल व श्रमजीवनाला प्रतिष्ठा देणे हे शक्य आहे का? असल्यास कसे?
शेअर बाजार आणि तत्सम व्यवहार वगळता तुम्हाला किंवा कोणाला वाटले म्हनून कुठल्याही गोष्टीचे सार्वत्रिक महत्त्व वाढवता/ कमी करता येत नाही. मागणी पुरवठा तत्त्वावर काम चालते. विकसित देशात मनुष्यबळ कमी म्हणून त्याचे महत्त्व जास्त आणि आपल्याकडे नको तेवढे म्हणून त्याची/त्याला किंमत नाही.

इतक्या सुशिक्षितांना जर फारसे शारिरीक श्रम न करता पैसा हवा असेल तर तशा नोकर्‍या उपलब्ध आहेत का? नसल्यास ह्या सार्वत्रिक शिक्षणामुळे असंतोषाची संभावना कितपत वाढते?
शारिरीक म्हणजेच चांगले असे नाही. समाजाला उपयोगी पडणारे कुठलेही काम (शारिरीक/बौद्धिक) आपल्या आवडीनुसार आणि परिस्थितीनुसार करून पोट भरावे. याला जे विरोध करतील ( भ्रष्टाचारी, गुंड, राजकारणी वगैरे) त्या सगळ्यांना ठार करावे.

इन्द्र्राज पवार's picture

8 Sep 2010 - 2:11 pm | इन्द्र्राज पवार

".....त्या सगळ्यांना ठार करावे."

श्री.पेन यांचे विविध विषयावरील प्रतिसाद मी पाहिले आहेत/वाचले आहेत आणि त्यांच्या विचाराची समज किती चांगली आणि विषयात मांडलेल्या समस्येचे सूक्ष्म निरिक्षणही चांगल्या रितीने करतात हे मी अनुभवले आहे....

....पण त्यांच्या वरच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादातील ते शेवटचे वाक्य दाढेखाली खडा आणते.

असो... ते वगळता त्यांचा संपूर्ण विचाराशी सहमत आहेच.

इन्द्रा