नमस्कार! आज आपण बहुगुणी वडे तयार करून पाहाणार आहोत. ही पाककृती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे स्वत:च्या जोखमीवरच या पाककृतीला हात घालावा. ही पाककृती फसल्याने पट्टीच्या खवय्यांनाही बध्दकोष्ट, अजीर्ण, कफ आणि बर्याच वेळा वात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खाणार्यांना उबळ, उलटी, मळमळ, अंगाचा दाह, माथेशूळ उठणे इत्यादी त्रास झाल्यास तात्काळ पाककृती गुंडाळावी आणि काढता पाय घ्यावा - त्यांच्या पचनशक्तीला दोष देऊ नये आणि समजूत काढण्याच्या तर बिलकुल भानगडीत पडू नये. किचनमधून "क्या बात है", "जियो", "येऊ द्या, येऊ द्या, खातोय", "वड्याचा आकार वाढवा", "पंक्तीत जागा राखून ठेवतोय" अशी दाद आली तर वडे जमत आहेत, असे समजावे. "पंक्तीत जागा राखून ठेवतोय" हे मात्र सूचक आहे. ही दाद-कम-ताकीद सहसा पाकशास्त्राच्या जाणकारांकडून, स्वयंघोषित अभ्यासकांकडून येते. अर्थातच तिचा अर्थ, "फार मोठा पाकाचार्य समजतो/तेस काय स्वत:ला, मी पण काही कमी नाही, दाखवतो/तेच कुठे काय कमी पडलं ते", "पाहतो/तेय बरं का तुमचं पाककौशल्य, जाहीर पंचनाम्यास तयार राहा" किंवा "माझी नजर आहे बरं स्वयंपाकाकडे, नीट होऊंदे" असा काहीही होऊ शकतो. काही खवय्यांनी दाद न दिल्यास, नाराज होऊ नये. वडे खाऊन त्यांची रवंथ चालू आहे किंवा सुस्तावून वामकुक्षी घेत आहेत असे खुशाल समजावे. यांची निश्चित संख्या काढायची असल्यास xxxx पात्रे वजा आलेल्या प्रतिक्रिया या सूत्राचा वापर करावा.
साहित्य: १. शब्द - सुमारे हजार ते बाराशे शब्द निवडून घ्यावेत; गरजेनुसार वाढवूही शकता. या पाककृतीत शब्दांचा वापर अळूच्या पानांसारखा होतो. तर असे शब्द आधीच निवडून तयार ठेवावेत.
२. अर्थ - शब्द वापरल्यानंतर पुन्हा अर्थ वापरण्याची गरज नाही असा काही गृहिणी/बल्लवाचार्यांचा समज असतो. तो अर्थातच चुकीचा आहे. अर्थ योग्य प्रमाणात आधीच वाफवून तयार ठेवावा लागतो आणि नंतर तो शब्दांत भरावा लागतो हे चाणाक्ष पाकशास्त्रींच्या लक्षात आले असेलच. अर्थही वाफवून तयार ठेवावा.
३. आशय - या वड्यांची खासीयत म्हणजे यात तेल वापरले जात नाही - तेलाऐवजी आशय वापरला जातो. शब्द आणि अर्थ या दोन्हींमध्ये आशय किती प्रमाणात मुरला आहे यावर वड्यांची चव ठरते. आशयाचा वापर अत्यंत कमी, पक्त चवीपुरता करावा. कारण सगळा माल-मसाला एकत्र वाफवला जातो तेव्हा शब्द आणि अर्थ या दोन वस्तूंचीही एक वेगळा स्वाद तयार होत असतो; प्रचंड प्रमाणात आशय वापरला गेल्यास शब्द आणि अर्थांची चव मार खाते.
कृती: सर्वप्रथम योग्य त्या आकाराची विषयाची कढई घ्यावी आणि ती मनाच्या शेगडीवर मंद आचेवर तापवत ठेवावी. नंतर या कढईत जरूरीपुरता आशय टाकावा आणि मंद आचेवर चांगला तापू द्यावा; मग एक-एक करून शब्दांची पाने घ्यावीत आणि त्यात वाफवलेला अर्थ भरावा आणि वड्यांच्या हव्या त्या आकारात बंद करावा. आशय तापून तयार झाला की त्यात हे वडे सोडावेत आणि वरून घट्ट झाकण लावावे. वडे तयार झाले की त्यांच्या सुगंधाने घर भरून जाते; आणि ते लगेच कळते त्यामुळे हे वडे कितीकाळ कढईत वाफवावेत हे सांगण्याची गरज नाही.
विशेष सूचना:
१. हे वडे इन्स्टंट फूड या प्रकारात मोडत नाहीत. त्यामुळे वडे तयार करताना घाईगडबड करू नये, केल्यास पाककृती बिघडते आणि पहिल्या परिच्छेदात सांगितलेल्या परिणामास सामोरे जावे लागते. खवय्यांकडून हे वडे करण्याचा कितीही आग्रह होत असला तरी भाजी-पोळी किंवा तसलेच रूटीन पदार्थ समोर वाढून त्यांची समजूत काढावी.
२. काही लोक आम्ही कविता, लेख, कथा, कादंबर्या हे अखाद्यपदार्थदेखील याच कृतीचा वापर करून करतो असे म्हणतील - त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. कारण ही एक वेगळी पाककृती आहे.
प्रतिक्रिया
29 Aug 2010 - 11:14 pm | पैसा
तुम्ही चांगले तरबेज स्वयंपाकी दिसताय! पण इतरांसारखा या वड्यांचा फोटो नाही देऊ शकणार!
29 Aug 2010 - 11:25 pm | यशवंतकुलकर्णी
कसंच..कसंच...उगा आपली करून पाहिली पाककृती रविवार होता म्हणून..
30 Aug 2010 - 12:10 am | सुहास..
सर्वप्रथम योग्य त्या आकाराची विषयाची कढई घ्यावी आणि ती मनाच्या शेगडीवर मंद आचेवर तापवत ठेवावी. नंतर या कढईत जरूरीपुरता आशय टाकावा आणि मंद आचेवर चांगला तापू द्यावा; मग एक-एक करून शब्दांची पाने घ्यावीत आणि त्यात वाफवलेला अर्थ भरावा आणि वड्यांच्या हव्या त्या आकारात बंद करावा. आशय तापून तयार झाला की त्यात हे वडे सोडावेत आणि वरून घट्ट झाकण लावावे. वडे तयार झाले की त्यांच्या सुगंधाने घर भरून जाते; आणि ते लगेच कळते त्यामुळे हे वडे कितीकाळ कढईत वाफवावेत हे सांगण्याची गरज नाही. >>>>>
=)) =))
अगागागा !! सही !!
हल्ली मंद आचेवर काय-काय तापत ते सांगता येणार नाही !!
बाकी झकास लेख !!
30 Aug 2010 - 2:35 am | इंटरनेटस्नेही
सुर्पब!
30 Aug 2010 - 5:47 am | रेवती
तुम्ही नक्कीच चांगले बल्लव असणार त्याशिवाय लो कॅलरी वड्यांची पाकृ इतकी चविष्ट बनणार नाही!;)
30 Aug 2010 - 7:27 am | सहज
'स्वाती डांबीश' नामक बल्लवाचार्याचे लोणचे व हे वडे भारीच काँबीनात्सिऑन!
30 Aug 2010 - 2:00 pm | चिंतामणी
फोटो नसूनसुध्दा लै भारी पाकृ आहे.
हा हा हा.
"येऊ द्या, येऊ द्या, खातोय"