मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...!

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
राम राम मंडळी, ही डिसेंबर २००७ मधली हकिकत आहे. बरेच दिवस मिपावर लिहीन लिहीन म्हणत होतो, आज योग आला. "तात्या, कुठे आहेस? काय करतो आहेस?"रात्री एकच्या सुमारास मोर्‍याचा फोन. निनाद मोरे! एका स्वतंत्र लेखाचा आणि व्यक्तिचित्राचा विषय! परंतु त्याबाबत पुन्हा कधितरी... "अरे बाबा, रात्री एक वाजता सभ्य माणसं काय करत असतात? माझ्या माहितीप्रमाणे ती झोपलेली असतात! तेच मीही करत आहे. गाढ झोपलो होतो. बोल, फोन का केला होतास?" "आत्ताच्या आत्ता पैसे घेऊन हायवे - चेकनाक्याजवळच्या बारमध्ये ये. मी जरा आज अंमळ जास्तच घेतली आहे आणि माझं पैशाचं पाकिट कुठे मिळत नाहीये, हरवलं आहे किंवा बहुदा कुणीतरी मारलं आहे. तू बिलाचे पैसे घेऊन ये, तुझे पैसे मी उद्या परत करीन!" मोर्‍या हे अडखळतच बोलत होता. फुल्टूच झाली होती त्याला! मी मनातल्या मनात मोर्‍याला शिव्या देत देत अंथरुणातनं उठलो आणि मैत्रीला जागत मुकाट्याने स्कूटरला किक मारून चेकनाक्याजवळच्या बारमध्ये पोहोचलो. मला आलेला पाहून मोर्‍या आनंदला. "अरे ये तात्या, बस बस. बरं झालं तिच्यायला तू आलास. माझं पैशाचं पाकिटच सालं कुठे मिळत नाहीये! आता आलाच आहेस तर एक पेग मार!" शेवटी हो ना करता करता मोर्‍याला कंपनी म्हणून मीही एक पेग प्यायलो, बिलाचे पैसे चुकते केले आणि आम्ही दोघे बारच्या बाहेर पडलो. फुल्टू झालेला मोर्‍या, "उद्या भेटू रे तात्या!" असं म्हणून मला बायबाय करून रिक्षा पकडून घरी निघून गेला. मी बारच्या बाहेरच एक पानवाला होता, तिथे मस्तपैकी एक १२० पान जमवलं आणि घरी परततायला म्हणून स्कूटरला किक मारू लागलो. स्कूटर सुरू करून तेथून निघणार तेवढ्यात मागनं माझ्या खांद्यावर एक मजबूत हात पडला. मागे वळून बघतो तर एक वर्दीतला पोलिस उभा होता! "चला साहेब, जरा आमच्या चौकीपाशी चला. तुम्हाला आमचे साहेब बोलावताहेत!" "का? कशाला? मी काय केलं? अहो हे पाहा, लायसन आहे माझ्याकडे." "ते सगळं ठीक आहे हो, पण तुम्ही चला. साहेबांनी बोलावलंय!" "चला! कुठायत तुमचे साहेब?" 'साला, कर नाही त्याला डर कशाला?' अस म्हणून मीही मोठ्या मस्तीत तेथून जवळच असलेल्या चौकीपाशी पोहोचलो. तिथे एक घार्‍या डोळ्याचा, करड्या नजरेचा वाहतुक शाखेचा इनिसपेक्टर साहेब उभा होता. वर्दीवरल्या पाटीवरून त्याचं नांव शिंदे आहे हे मला कळलं "नमस्कार शिंदेसाहेब! बोला, काय काम होतं?" मी. "नांव काय तुमचं?" "अभ्यंकर." "कुठे बसला होता?" "हे काय, इथेच! तो समोरचा बार दिसतो आहे ना, तिथे बसलो होतो." हे ऐकून शिंदेसाहेबांनी थोडाश्या मिश्किलपणानेच मला पुढचा प्रश्न विचारला, "काय मग? ब्रॅन्ड कुठला ब्रॅन्ड? किती पेग झाले?" :) "हां हां, ब्रॅन्ड ना? रॉयल चायलेन्ज! फार नाही, एकच पेग प्यायलो. मित्राला कंपनी म्हणून!" मीही हसत हसत उत्तर दिलं. मला अजून प्रसंगाचं गांभीर्य कळलेलं नव्हतं, पुढे काय वाढून ठेवलं आहे, याची कल्पना नव्हती! "अरे वा! रॉयल चायलेन्ज का? बरं बरं! लावा, गाडी साईडला लावा जरा, आणि समोरच्या चौकीत जाऊन त्या बाकड्यावर बसा!" ?? "अहो पण मी काय केलं आहे? मला कशाला अडवताय?" "दारू पिऊन वाहन चालवणं हा गुन्हा आहे अभ्यंकरसाहेब! तुम्हाला माहीत नाय का?" आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. च्यामारी भलत्याच भानगडीत सापडलो होतो! बरं शिंदेसाहेबांचा चेहेराच इतका करडाकठोर होता की जास्त वाद घालण्यात काही अर्थ नव्हता! साला कुठल्याही क्षणी फाडकन कानफटात बसायची! ;) "जाऊ द्या शिंदेसाहेब! चुकलं खरं. एक वेळ माफ करा अन् सोडून द्या. पुन्हा असं करणार नाही!" मी आवाजात शक्य तितकी नम्रता आणत म्हटलं. "अगदी बरोबर! तुम्ही पुन्हा असं करू नये म्हणूनच तर तुम्हाला पकडलं आहे!" इनिसपेक्टर साहेब पुन्हा एकदा खुनशीपणे हसत हसत म्हणाले! रात्री दीडचा सुमार. स्थळ -ठाण्याचा हायवे चेकनाका. शिंदेसाहेब आणि दोनचार पोलिस शिपाई गराडा करून माझ्याभोवती उभे होते. दोन-तीनदा विनंत्या करूनही इनिसपेक्टर ऐकेना. मला वाटलं बहुतेक माझी स्कूटर, लायसन वगैरे आता जप्त होणार! शिवाय दंडही भरावा लागणार! त्याशिवाय दुसरा पर्यायच दिसत नव्हता! "ठीक आहे साहेब. मला माझा गुन्हा मान्य आहे. किती दंड भरायचा ते सांगा. तो मी भरतो आणि मला जाऊ द्या!" "तुम्हाला आता कसं जाऊ देणार? या क्षणी तुम्ही आमच्या अटकेत आहात!" अटक?? च्यामारी, ही अटकेची नवीन भानगड काय आहे ते मला कळेना. आता मात्र मला अंमळ चिंताच वाटू लागली. "अहो साहेब, पण अटक कशाबद्दल? मी दंडाची रक्कम भरतो ना!" "त्याचं काय आहे अभ्यंकर साहेब, तुमच्यावर आम्ही कलम १८५ लागू केलं आहे. तेव्हा नुसता दंड भरून चालणार नाही. आता जरा वेळाने आपण आमच्या गाडीतनं सिव्हिल हॉस्पिटलला जायचं आहे. तिथे तुमच्या रक्ताची चाचणी करावी लागेल! मग त्यावर तुमची जबानी घेऊन आपण आमच्या वाहतुक कार्यालयात जायचं, तिथे अनामत म्हणून दोन हजार रुपये दंडाची रक्कम भरायची आणि मगच घरी जायचं! उद्या सकाळी तुम्ही पुन्हा आमच्या ओफीसमध्ये यायचं, तिथून आम्ही तुम्हाला कोर्टात घेऊन जाऊ. तिथे जजसाहेबांसमोर गुन्हा कबूल करायचा आणि दंड भरायचा! बस! एवढंच आपल्याला करायचं आहे. आहे की नाही सोप्पं? तुम्ही कशाला घाबरताय, आत्ता तुम्ही अटकेत आहात म्हणजे फक्त आमच्या ताब्यात आहात. आम्ही काय तुम्हाला गजाआड बंद वगैरे करणार नाही! तेव्हा जा जाऊन तूर्तास त्या बाकड्यावर चुपचाप बसा!" च्यामारी! हा शिंदेसाहेब मला भलत्याच लफड्यात अडकवू पाहात होता! आयला! घरी चांगला सुखाने झोपलो होतो ते मोर्‍यामुळे नसत्या भानगडीत अडकलो होतो! आणि मोर्‍या रांडेचा पिऊन टाईट होऊन रिक्षा करून सुखाने घरी जाऊन केव्हाच झोपला होता! :) मी चुपचाप माझी स्कूटर रस्त्याच्या एका कडेला उभी केली आणि पोलिसांच्या वाहतुक शाखेच्या चौकीत जाऊन त्या बाकड्यावर बसलो. तिथे अजून चारसहा मंडळी बसली होती. चौकीबाहेर पोलिसांचं पकडसत्र सुरूच होतं. काही वेळाने अजून दोनचार रथीमहारथी चौकीत दाखल केले गेले! आता तिथे आम्ही एकूण दहाबारा आरोपी मंडळी जमा झालो होतो. परंतु एकंदरीत वातावरण फारसं गंभीर नव्हतं. शिंदेसाहेब आणि त्यांचे सहकारी तसे आमच्याशी बरे वागत होते. शिव्याओव्या किंवा हात चालवत नव्हते! "क्यू साब, कुछ तोडपानी नही हो सकता क्या? दोपाचसौ रुपिया लेके छोड दो साब!" आमच्यातला एक जण साहेबांना म्हणाला. कुणीतरी पंजाबी असावा. एकदम हायफाय, चांगल्या कपड्यातला होता. चांगल्या हुद्द्यावरचा किंवा वरपर्यंत पोहोच वगैरे असलेला वाटत होता! "नही, पैसा नही चाहिये मुझे! पैसा रखो अपनेही पास!" शिंदेसाहेब एकदम गुरकावले त्याच्यावर! "क्या साब? चलो, कोई बात नही! हज्जार रुपया लो और छोड दो! मुझे घर जाना है! नही तो मुझे अभी आपके बडे साबसे बात करनी पडेगी!" आता मात्र त्या शिंदेसाहेबांमधला पोलिस जागा झाला आणि दुसर्‍याच क्षणी तो त्या पंजाब्याला स्वच्छ मराठीतून बोलता झाला, "ए आता गप बसतो, का कानाखाली दोनचार आवाज काढू? बड्या साहेबाशी बोलायच्या धमक्या कुणाला देतोस रे मादरचोद? भडव्या, एक तर दारू पिऊन गाडी चालवतोस आणि वर पुन्हा पैशाची मस्ती करतोस? कर, तुला ज्याला कुणाला फोन करायचाय तो कर. पण मी कुणाशीही बोलणार नाही!" आता मात्र इतका वेळ तसं बरं असलेलं वातावरण जरा तापू लागलं! आम्ही बाकीची आरोपी मंडळी यावरून काय तो धडा घेऊन चुपचाप उभे होतो! तेवढ्यात आमच्यातला अजून एक इसम पुढे झाला. त्याने खिशातनं एक ओळखपत्र काढलं आणि तो शिंदेसाहेबांना म्हणाला, "हे बघा साहेब, मी पत्रकार आहे. मला सोडा!" हे ऐकल्यावर शिंदेसाहेब आणखीनच भडकले! "पत्रकार आहेस ना? मग दारू पिऊन गाडी चालवत नाहीत हे तुला माहीत नाही काय? कुठे बसला होतास भडव्या? किती पेग झोकलेस मादरचोद? तोंडाला साला जाम वास मारतो आहे तुझ्या! साल्या १८५ सोबतच मुंबई पोलिस कायद्याची अजून दोन-चार कलमं लावून तुला आज लॉकप मध्येच टाकतो! काय लिहायचं ते लिही तुझ्या पेपरात! पोलिसांची बदनामी करणार्‍या बातम्या नेहमी देता ना पेपरात? मग 'दारू पिऊन गाडी चालवली म्हणून पोलिसांनी एका पत्रकाराला पकडले!'ही बातमीही तुझ्या नावासकट दे की तुझ्या पेपरात! मला ओळखपत्र दाखवतोय भडवा! च्यामारी, शिंदेसाहेब भलतेच कडक होते. कुणाकडूनही एक पैसा घ्यायला तयार नव्हते की कुणा बड्या आसामीच्या फोनच्या दडपणाखालीही येत नव्हते! जरा वेळाने ती पोलिसांची निळ्या रंगाची मोठी जाळीची बसगाडी आली, त्यात आम्हा सर्व मंडळींना बसवले आणि रात्री दोनच्या सुमारास आमची यात्रा ठाण्याच्या शासकीय रुग्णलयाकडे निघाली! मंडळी, सुदैवाने आपला स्वभाव हा एकूणच फार चिंता करत बसण्याचा नाही. 'साला, जो होगा वो देखा जाएगा!' ही आपली खुशालचेंडू वृत्ती! आयुष्यात प्रथमच पोलिसांच्या त्या मोठ्या निळ्या जाळीदार गाडीमध्ये आरोपीच्या जागेवर बसलो होतो! आता एकंदरीतच हे प्रकरण मला थोडंसं थ्रिलींग वाटू लागलं होतं!;) आत्तापर्यंत ही गाडी नेहमी लांबूनच किंवा शिणेमातच पाहिली होती. का कुणास ठाऊक, परंतु आता मनातली भिती जरा चेपली होती आणि एकंदरीतच तो प्रसंग मी थोडा एन्जॉय करू लागलो होतो! त्या बसगाडीतले ते दोघंतिघं पोलिस, बाकीचे अंमळ बावरलेले, 'च्यामारी, घरी आता बायकापोरांना काय सांगायचं?' या विचारात गढलेले आरोपी पाहायला मला आता हळूहळू गंमत वाटू लागली होती! त्यातच मीही एक आरोपी होतो! तात्या अभ्यंकर! आरोपी - भारतीय दंड विधान, कलम १८५! है स्साला, क्या बात है! :) गाडीत योगायोगाने शिंदेसाहेब माझ्या बाजुलाच बसले होते. मी कसनुसा चेहरा करून त्यांच्याकडे बघितले तशी ते पुन्हा एकदा मिश्किल हसले! "अहो, कधी कुठे घेतली तर स्वत: वाहन चालवायचं नाही. रिक्षा किंवा टॅक्सी करायची! यापुढे लक्षात ठेवा. काय?!" "हो साहेब, यापुढे लक्षात ठेवीन!" (पण आत्ता सोडता का?) कंसातला प्रश्न अर्थातच मनातल्या मनात होता! ;) थोड्याच वेळात आमची गाडी शासकीय रुग्णालयात पोहोचली! पुढची रामकहानी, सॉरी तात्याकहानी पुढच्या अंतीम भागात. अंतीम भाग येत्या ४८ तासात! आपला, तात्या अभ्यंकर, आरोपी - भारतीय दंड विधान, कलम १८५!

वाचन 25852 प्रतिक्रिया 0