पुणे पोलिस गुन्हेगारांची पाठराखण करत आहेत का?
आजच दैनिक सकाळमध्ये एक अस्वस्थ करणारी बातमी वाचली. ज्या ५० सराईत गुंडांना तडीपार केले गेले व नंतर त्यांची तडीपारी गृहमंत्रालयातून रद्द करण्यात आली त्यांची नावे देण्यासाठी, व त्यांची तडीपारी रद्द करण्यामागे कोणत्या राजकारण्यांची शिफारस होती हे सांगण्यासाठी सकाळचे प्रतिनिधी गेले दोन-तीन दिवस पुणे पोलिसांचा पिच्छा पुरवत आहेत, परंतु पोलिसांकडून उत्तरे देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
याविषयीची बातमी येथे वाचा :
http://www.esakal.com/esakal/20100511/5008723703094993514.htm
गेल्या दोन महिन्यांत ह्या तडीपारी रद्द केल्या गेलेल्या गुंडांकडून अनेक गंभीर गुन्हे केले जात आहेत. बलात्कार, खून, प्राणघातक हल्ले, दिवसाढवळ्या भरवस्तीत पोलिसचौकीजवळ टोळीयुध्द व बेछूट गोळीबार हे त्यांचे वरवर दिसणारे स्वरूप होय. ह्या गुंडांच्या तडीपारी रद्द करण्यामागे राजकीय नेतृत्वाचा हस्तक्षेप आहे हे उघड आहे. पण आता तर पोलिसही त्यांची पाठराखण करत आहेत असे दृश्य दिसत आहे.
माहिती अधिकाराखाली सजग नागरी मंचचे विवेक वेलणकर यांनी पोलिसांच्या वेबसाईटवर तडीपार केलेले गुंड, तडीपारी रद्द केलेले गुंड व रद्द करण्याची कारणे यांची माहिती द्यावी असे सुचवले होते. परंतु अर्धवट माहिती देऊन जणू पोलिसांनी आपली असहायता, दुबळेपणा, गुन्हेगारीची पाठराखण किंवा राजकीय अनुनय करण्याची प्रवृत्तीच दाखवून दिली काय?
त्याचबरोबर आजच्याच इंडियन एक्स्प्रेसच्या पुणे न्यूजलाईनमध्ये बरोबर ह्याउलट बातमी छापली आहे : काही राजकारणी व नागरी संघटना मिळून पुणे पोलिसांची प्रतिमा खराब करण्याच्या प्रयत्नात आहेत असे सिटी बेस्ड पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट [ PCGT] चे म्हणणे आहे.
लिंकः http://www.expressindia.com/latest-news/politicos-orchestrating-propaganda-against-city-cops/617671/
ह्यातील नक्की खरे काय व खोटे काय? की नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी केलेली ही दिशाभूल आहे काय? पोलिसांचे हात बांधले असले तरी इतकी महत्त्वाची माहिती दडवण्यामागे त्यांचा काय उद्देश असेल?
आपल्याला काय वाटते?
वाचन
10028
प्रतिक्रिया
0