लाभले दुर्भाग्य आम्हास...

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
30 Mar 2010 - 5:44 pm

"माझ्या आयुष्यातील 68 वर्षांपैकी 41 वर्षे मी महाराष्ट्रात घालविली आहेत. मी स्वतःला महाराष्ट्राचेच एक अंग मानतो आणि त्याबद्दल मला अभिमान आहे.''
...गेली चार दशके केवळ रुपेरी पडदाच नव्हे, तर तमाम भारतीयांचे हृदयही व्यापून उरणारा महानायक अमिताभ बच्चन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून हे गौरवाने सांगत होता....हिंदी भाषेतून!
वेळात वेळ काढून मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहून अमिताभ यांनी मनाचा मोठेपणा दाखविला; पण त्यांचा "महाराष्ट्राभिमान' फुलून आला, तो भाषणाच्या सुरवातीला मराठी उच्चारशैलीतील "नमस्कार', सुरेश भट आणि गडकरी (फक्त "गडकरी'च! "राम गणेश गडकरी' नव्हे!) यांच्या कवितांमधल्या "चारोळ्या' म्हणण्यापुरता.
संमेलनाचा मुख्य मंडप पहिले तीन दिवस फुलला होता, त्यापेक्षा दीडपट ते दुप्पट गर्दी समारोपाला होती; ती अर्थातच अमिताभच्या चाहत्यांची. अमिताभ मराठी कविता वाचणार, कदाचित मराठीतूनही बोलणार, या अपेक्षेने आणि त्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार, या उत्सुकतेने बरेच चित्रपटप्रेमीही सोहळ्याला आले होते. यात अर्थातच त्यांचा दोष नव्हता. "अमिताभी' आवाजातील कविता ऐकण्याचा प्रत्यक्ष योग दुर्मिळच होता. परंतु अमिताभने कविता वाचल्या त्या हरिवंशराय बच्चन यांच्या! मराठी साहित्य संमेलनात, मराठी वातावरणात, मराठी श्रोत्यांसमोर, हिंदी कविता! नाही म्हणायला त्याने सुरेश भट आणि गोविंदाग्रजांच्या कवितांमधील काही ओळींचा उल्लेख केला; पण त्यापेक्षा तो नसता केला तर बरे, असेच म्हणण्याची वेळ त्यांच्या वाचनाच्या शैलीवरून आली.
मुंबईत वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत लावलेल्या हजेरीवरून कॉंग्रेसमध्ये उठलेले वादळ, "मराठी'च्या मुद्द्यावरून "मनसे'ने उठविलेली टीकेची झोड, या सगळ्याचा संदर्भ अमिताभच्या भाषणाला होता. या वादांना आणि टीकेला त्याने "नजरबट्टू' (तीट) असे नाव देऊन सौम्य शब्दांत उत्तरही दिले; पण मुख्य मुद्दा होता मराठीबद्दलच्या अभिमानाचा. कौशल इनामदारच्या मराठी अभिमानगीताचा उल्लेखही अमिताभ यांनी भाषणात केला. मान-सन्मान, बायको, यश, सगळे काही महाराष्ट्रात मिळविल्याचेही सांगितले; पण हिंदीतून.
वास्तविक, महाराष्ट्राच्या ऋणातून उतराईच व्हायचे होते, तर अमिताभसाठी हीच सुवर्णसंधी होती. मराठी कवितांच्या मोडक्‍यातोडक्‍या उच्चारांना तिथे उपस्थित तमाम अमिताभप्रेमी आणि साहित्यप्रेमींनी जेवढा प्रतिसाद दिला, त्यापेक्षा कित्येक पट अधिक प्रतिसाद त्याच्या (मोडक्‍यातोडक्‍या का होईना) मराठीतील भाषणाला दिला असता. अमिताभच्या दर्शनाने मंडपातील रसिक जेवढे भारावले नसतील, त्याहून जास्त व्यासपीठावरील काही मान्यवर भारावले होते. त्यांच्या भाषणातूनही अमिताभप्रेमाचा जागोजागी प्रत्यय येत होता.
कोणत्याही समारंभात, कोणत्याही व्यासपीठावर अमिताभसारखा मध्यममार्गी माणूस शिष्टाचाराला धरून जे बोलेल, ते आणि तेवढेच अमिताभ मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलला. मनसेच्या बोचऱ्या टीकेला, कॉंग्रेसमधील बालिश वादाला टीकाकारांना उत्तरच द्यायचेच होते, तर मराठीतून भाषण करून नव्हे, गेला बाजार "होय, मी मराठी आहे,' असे ठणकावून सांगता आले असते. अमिताभची मराठी अस्मिता "महाराष्ट्राचे अंग' असल्याचे सांगण्यापुरतीच मर्यादित राहिली. संयोजकांनी नाही, पण निदान मराठी रसिकांनी त्याहून जास्तीची अपेक्षा ठेवायला हरकत नाही!

मुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

अनामिका's picture

30 Mar 2010 - 7:37 pm | अनामिका

मराठी ना शिकेल लवकरच्..... निदान सुरुवात तर झाली ना?हे हि नसे थोडके नाही का?
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

प्रकाश घाटपांडे's picture

30 Mar 2010 - 8:06 pm | प्रकाश घाटपांडे

मराठी न आल्याने त्याच्या रोजीरोटीवर काहीही परिणाम होणार नसल्याने मराठि शिकण्याची गरज लागली नाही.
सीएम जाए पर बच्चन न जाए
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

प्रमोद देव's picture

30 Mar 2010 - 8:21 pm | प्रमोद देव

पण मराठी माणूस कधी सुधारणार नाही.
कॉंग्रेसजनांची तोंडे दिल्लीच्या दिशेने वळलेली असतात...असे हिणवणार्‍या इतर मराठी जनांनी स्वत:कडेही जरा पाहावे...तेही उत्तर हिंदुस्थान्यांना जरूरीपेक्षा जास्त महत्व देतात...मराठी ह्या आपल्या मातृभाषेपेक्षा ह्यांचा नैसर्गिक कल हिंदी/इंग्रजीकडेच असतो.
रोजी रोटी साठी आम्ही असे करतो...असे दीनवाणेपणे म्हणतांना ह्यांना आपल्या मातृभाषेत बोलायची लाज वाटते...
इतके सगळे असतांना इतर भाषिक इथे आजन्म राहिले तरी कशाला मराठी शिकतील?
एकूण काय...इथे मराठी माणसालाच मायमराठीबद्दल आत्मीयता वाटत नाही... केवळ फक्त गीतांमधूनच आम्ही म्हणत राहणार..लाभले आम्हास भाग्य ,बोलतो मराठी...
आणि प्रत्यक्षात मात्र....जाऊ द्या. कोळसा उगाळावा तितका काळा आहे...
आपलाच दाम खोटा...तिथे दुसर्‍यांना काय दोष देणार?

प्रशु's picture

30 Mar 2010 - 11:01 pm | प्रशु

तेही उत्तर हिंदुस्थान्यांना जरूरीपेक्षा जास्त महत्व देतात...

महाराष्ट्राचा येवढा दे॑दिप्यमान इतिहास असताना आपले आशुतोष गोवारीकर चार तासाचा कंटाळवाणा 'जोधा अकबर' बनवतात...

प्रमोद्_पुणे's picture

30 Mar 2010 - 9:06 pm | प्रमोद्_पुणे

"सकाळ" साठी लिहिता का?? बच्चन ने मधे त्याच्या ब्लॉग वर लिहिले होते की त्याला फ्रेंच आणि अजून २-४ भाषा शिकायच्या आहेत..त्यात मराठी अर्थातच नव्हती..

विकास's picture

30 Mar 2010 - 9:26 pm | विकास

या संदर्भात मला थोडे वेगळे वाटते. वर प्रकाशरावांनी म्हणल्याप्रमाणे,"त्याच्या रोजीरोटीवर काहीही परिणाम होणार नसल्याने.." त्याला मराठी शिकायची गरज वाटली नसावी. हे काही त्याच्या बचावात नाही तर वास्तव म्हणून लिहीत आहे. त्याचे संबंध कुणाकुणाशी आलेत ते त्याच्याशी मराठीत बोलले होते का? त्यात बाळासाहेब पण येतात.

पण मराठी बोलता येणे हा एक भाग झाला आणि मराठी/महाराष्ट्राबद्दल आदर असणे, त्याहूनही महत्वाचे म्हणजे तुच्छ न लेखणे हे महत्वाचे वाटते. अमिताभ महाराष्ट्राला तुच्छ लेखतो असे वाटते का? मला कुठेतरी तसे (तो तुच्छ लेखत) नाही, असेच वाटते. बाकी उरला मराठीचा मान, तो मागून मिळत नाही, वागून मिळतो. याचा अर्थ न्याय्य हक्कासाठी भांडू नये अथवा टिका करू नये असे नाही, पण जो पर्यंत आपणच मराठी बोलताना कमी पडू अथवा पुढच्या पिढ्यांना शिकवणार नाही तो पर्यंत इतरांना कशाला नावे ठेवायची?

जया भादुरीच्या बाबतीत मात्र मला एकदा राग आला होता. राज्यसभेत ती सारखी "बाँबे" म्हणून बोलत होती. ते बोलण्याला देखील आक्षेप नाही, ती सवय अनेकांना आहे. मात्र मागून शिवसेनेच्या खासदारांनी तीला दुरूस्त करायचा प्रयत्न केला तेंव्हा तीने जे काही तुच्छतायुक्त हास्याने हावभाव केले ते त्या खासदारांपुरते अथवा शिवसेनेपुरते मर्यादीत नव्हते असे वाटले.

मात्र त्यांच्याच सुनेने जेंव्हा येथे डेव्हीड लेटरमनने विचारले की कुठल्या भाषा येतात तेंव्हा त्यात हिंदी, मराठी, तुळू, इंग्रजी असे सांगितल्याचे आठवते.

असो.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अरुंधती's picture

30 Mar 2010 - 10:07 pm | अरुंधती

अमिताभला मराठी चित्रपटाची ऑफर द्या रे कोणीतरी.... मग तो पण पोपटासारखा बोलेल मराठी!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

विकास's picture

30 Mar 2010 - 10:46 pm | विकास

अमिताभला मराठी चित्रपटाची ऑफर द्या रे कोणीतरी.... मग तो पण पोपटासारखा बोलेल मराठी!

किमान आत्ता एबीसीएल पृऑडक्शनच्या "विहीर"च्या निमित्ताने उलट झाले हे काही कमी नाही.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

विकास's picture

31 Mar 2010 - 5:14 pm | विकास

या संदर्भात सकाळ मधील ही बातमी वाचनीय आहे. (अमिताभशी संबंध नाही पण चित्रसृष्टीशी आहे).

मराठी चित्रपटांची हिंदीला धोबीपछाड!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

डावखुरा's picture

31 Mar 2010 - 1:17 am | डावखुरा

लाभले भाग्य आम्हास..

ही रचना पुर्ण कोठे मिळेल? "राजे!"

विकास's picture

31 Mar 2010 - 1:22 am | विकास

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
गीत - सुरेश भट.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

डावखुरा's picture

31 Mar 2010 - 5:47 pm | डावखुरा

शतशः धन्यवाद....
"राजे!"