`हात मत लगाना'... पुढच्या बाकावरचा तो माणूस अचानक किंचाळल्यासारखा ओरडला.
काहीसं ओशाळत शेजारच्या माणसानं त्याच्याकडे बघितलं.
`अरे भैया, मै तो सिर्फ आपको तिकिट लेनेको बोल रहा हू'... तो समजावणीच्या सुरात म्हणाला, आणि शेजारच्या त्या संतापलेल्या माणसानं आणखीनच रागानं त्याच्याकडे बघितलं.
`मै आगे यहीपें उतर रहा हूं'’... तो गुर्मीत म्हणाला.
`फिर भी टिकट ले लो, और जहां चाहिये घूम लो'... शेजारचा माणूस समजावणीच्या सुरात सांगत होता, पण आता त्याच्या आवाजात काहीशी जरबही आली होती.
हे काय चाललंय याची एव्हाना आसपासच्या लोकांना कल्पना आली होती.
तो माणूस रागानं नुसता धुसफुसत होता.
पण आता आपल्याला तिकीट काढावंच लागणार, हे त्याला उमजून चुकलं होतं...
तो उठला, आणि मागे जाऊन त्यानं कंडक्टरकडून तिकिट घेतलं.
एव्हाना बस सिग्नलपर्यत येऊन थांबली होती.
झटक्यात तो मागच्याच दरवाजातून उतरला, आणि बसच्या बाजूनेच पुढे येत त्याने रस्ता ओलांडला.
जाताना खिडकीशी बसलेल्या आपल्या बसमधल्या शेजार्याकडे एक जळजळीत कटाक्षही त्याने फेकला...
बसमधला तो माणूस स्वत:शीच हसला.
`अभी ये आदमी सबको प्रेम का संदेश देनेके लिये खडा रहेगा'... तो कुत्सित स्वरात काहीसं मोठ्यानं बोलला, आणि मी चमकलो.
सिग्नल मिळाला आणि गाडी चालू झाली.
वळताना सहज बाहेर लक्ष गेलं.
डिव्हायडरवरच सिग्नलच्या खांबाला टेकून उंचावलेल्या हातात फलक घरून तो उभा होता...
त्याच्या चेहेर्यावर एक निरागस, प्रेमळ हसू झळकत होतं.
रस्त्यावरून वाहणार्या गर्दीकडे पाहात असतानाही, तो सगळ्यापसून ‘तटस्थ’ वाटत होता.
... गेले अनेक दिवस तो इथे उभा असतो. भर दुपारच्या तळपत्या उन्हातही, उंचावलेल्या हातातला त्याचा फलक कधी खाली आलेला नसतो.
चेहेर्यावरचे ते हास्यही कायम असते...
त्याच्या या अजब `व्रता'चं मला कुतूहल आणि कौतुकही वाटायचं.
.... आज बसमध्ये शेजार्यानं तिकिट काढायला लावलं, म्हणून संतापलेला तो हाच असेल, असं तेव्हा लक्षातच आलं नव्हतं.
लहानमोठ्या कारणांवरून अनेकदा प्रवाशांमध्ये असे प्रसंग झडतात.
काही जण फुकटेगिरीही करतात.
काही अगदी नियमावर बोट ठेवणारेही असतात.
आपण काटेकोर वागतो, दुसर्यानंही तसं वागलंच पाहिजे, असा अनेकांचा आग्रह असतो.
त्यासाठी प्रसंगी ते हुज्जतही घालतात.
... आपल्या शेजारचा हा प्रवासी तिकिट न घेताच उतरायच्या तयारीत आहे, हे लक्षात आल्यावर या प्रवाशानंही, तेच केलं, आणि त्याला तिकिट घेऊनच उतरायला भाग पाडलं.
... क्षणभराचा हा प्रसंग संपला होता.
तो माणूस तिकिट घेऊन उतरला होता.
आपण एका `फुकट्या'ला रोखलं, याचं समाधान बसमधल्या त्या प्रवाशाच्या चेहेर्यावर उमटलं होतं.
आजूबाजूच्या प्रवाशांमध्यीही, या `विजया'बद्दलचा आदर दिसत होता.
उतरलेला तो माणूसही आपल्या `जागे'वर जाऊन उभा होता.
तेव्हा तो `तोच' आहे, हे माझ्या लक्षात आलं.
त्याच्या चेहेर्यावर नेहेमीसारखंच निरागस हास्य उमटलेलं होतं.
आपण एका `दिव्य' कार्यासाठी वाहून घेतलंय, असे काहीसे भाव त्याच्या डोळ्यात दिसत होते...
पण आज त्याच्या उंचावलेल्या हातातल्या फलकावरची अक्षरे आपल्याला बोचतायत, असं मला उगीचच वाटलं.
रस्त्यावरची अवघी गर्दी तो `संदेश' वाचूनच पुढेपुढे सरकत होती.
... बसमधल्या त्या प्रसंगाचे मात्र, काही मोजकेच साक्षीदार होते.
तरीही, मी नेहेमीच्या सवयीनं तो फलक वाचला.
`अपने धर्म पर चलो... सबसे प्रेम करो'...
-----------------
http://zulelal.blogspot.com
प्रतिक्रिया
7 Jan 2010 - 9:04 am | प्रकाश घाटपांडे
यावरुन एक गावाकडची आठवण आली. लव्हाराच शंकर्या ची एक आयडीया व्हती. यष्टी मदी तिकिट काडुन बसायच पन उगीचच चोरुन चोरुन हिकड तिकडं भेदरल्यावानी पघायच. कंडक्टरला संशय येउन त्यानी तिकिट विचारल कि मंग लगी त्याला तिकिट दाखवत म्हनायच "ह्ये कोन तुह म्हतार हाय का?"
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
8 Jan 2010 - 3:49 am | पक्या
ह्म्म...वेगळाच अनुभव. चांगला मांडलाय.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
8 Jan 2010 - 6:57 am | सहज
>पण आज त्याच्या उंचावलेल्या हातातल्या फलकावरची अक्षरे आपल्याला बोचतायत, असं मला उगीचच वाटलं.
फोकट मे कोई प्रेम नही करता..
सत्यवचन! :-)
8 Jan 2010 - 7:03 am | मराठमोळा
+१ सहमत
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
8 Jan 2010 - 7:37 am | सुबक ठेंगणी
अगदी असंच वाटलं.
कधीकधी आपण लोकांना प्रेमाचे संदेश देऊन उपकारच करत आहोत त्यामुळे बसचे तिकीट न काढणे असे बारीकसारीक लबाड्या आपल्याला माफ झाल्या पाहिजेत असंही गृहीत धरलं जाऊ शकतं.