वाटेने अनवाणी जाता ,केला मी इतरांचा हेवा
मनात म्हटलं " साधी तरि चप्पल मला दे रे देवा"
.... ..
पाय घातला चपलेत आणि वाटलं आता जिंकलं जग
चप्पल मात्र जुनी पुराणी वाटु लागली लगेच मग
म्हटलं "आतi नवीन हवी,सुन्दर आणि सुखदायी
तेवढं जर दिलंस देवा आणखी काही मागणार नाही"
...........
ते ही मिळालं मग वाटलं एक आता पुरत नाही
अजुन एक,अजुन एक हौस काही भागत नाही.
हे हवं ..ते ही हवं.. मिळवुन ना तर खेचुन घ्यावं
जगामधलं सारं सुख माझ्या पायाखाली हवं
उरापोटी धावुन शेवटी, केलंच सारं जमा भोवती
पर्वाच केली नाही जरी, तुटली सारी नाती-गोती
..........
सगळ्या सुखात आहे एकटा, निर्जीव भिंती, निर्जीव वाटा
ढिगभर सुंदर चपलांमधे बुडुन गेलो आहे पुरता
...............
आता मात्र हाव नाही, खरंच सांगतो नको काही
चपला तर खुप आहेत, पाय मात्र उरले नाहित...
प्रतिक्रिया
26 Dec 2009 - 5:51 pm | मदनबाण
मुक्तक फार आवडलं... :)
चपला तर खुप आहेत, पाय मात्र उरले नाहित...
क्या बात है |
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
26 Dec 2009 - 10:42 pm | अनिल हटेला
आवडली मुक्तकविता......:-)
(बूटोबा)
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
26 Dec 2009 - 6:45 pm | प्रमोद देव
खूपच सुंदर कविता!
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
27 Dec 2009 - 12:03 pm | बिपिन कार्यकर्ते
फुलवा, अंतर्मुख करून गेली कविता. हा आपलाच आपल्याशी असणारा झगडा अनादि आहे आणि अनंतही. जोवर माणूस आहे तोवर हे चालूच राहणार. बरं हे कळत नाही असं आहे का? तर तसंही नाही, कळतं सगळं, सगळ्यांना... वळत नाही बहुतेकांना एवढंच.
बिपिन कार्यकर्ते
28 Dec 2009 - 9:17 am | प्रकाश घाटपांडे
अगदी शेम टु शेम म्हंतो!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
27 Dec 2009 - 1:07 pm | दशानन
नेहमी प्रमाणेच नितांत सुंदर व अर्थपुर्ण कविता.
आवडली हे सांगने ना लागे.
किती हव्यास असतो नै,
मला हे हवे मला ते देखील हवे...
मला सुर्य हवा मला चंद्र ही हवा..
पळताना पडते भुई कमी..
सावली देखील सुटते पाठी मागे...
थांबा हा नसतोच, जीव निघतो अर्धावरी...
तरी हव्यास असतो नै..
मला हे हवे मला ते देखील हवे..
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
28 Dec 2009 - 1:43 am | टुकुल
खुपच सुंदर कविता, अंतर्मुख करुन गेली. वर राजे आणी बिकानी त्यात अजुन भर टाकली.
--टुकुल
28 Dec 2009 - 8:59 am | llपुण्याचे पेशवेll
आता मात्र हाव नाही, खरंच सांगतो नको काही
चपला तर खुप आहेत, पाय मात्र उरले नाहित...
हि वाक्यं तर अक्षरशः मनाला भिडली. देवा ! अरे काय रे ही गत केलीस.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
28 Dec 2009 - 10:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
28 Dec 2009 - 11:11 am | sneharani
सूंदर झालीये कविता..!