मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

म्हसवे - सर्वात मोठा वटवृक्ष

दशानन · · कलादालन
शनिवारी घरी निघावे म्हणून निघालो होतो. पाचवडच्या थोडे आधी एका हॉटेल मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो. पुणे ते घर २६२ किमी चा प्रवास. त्यामुळे खूप वेळ हातात आहे असे वाटत होते. फोन चाळताना पुनेरींचा नंबर दिसला. एक कॉल केला व त्यांना येथे आसपास पाहण्यासारखं काही आहे का ते विचारलं. तर त्यांनी मला म्हसवे गावाचं नाव सांगितले पाचवडहून उजव्या हाताला वळलो. चांगले दहा एक किलोमीटर पुढे गेलो तरी काही वडाच्या जंगलाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या. शेवटी एकाला थांबवला आणि त्याविषयी विचारले. तर तो म्हणाला उलट आला आहात. सरळ परत पाचवडला जा, तेथून डाव्या बाजूने सरळ जाऊन पहिला उजवा कट मारा. तेथून दोन-तीन किलोमीटर नंतर म्हसवेचा कट. नेहमी प्रमाणेच कपाळ व हाताची गाठभेट घातली व बाइक सरळ परत वळवली. विराटगडाच्या पायथ्याशी हे म्हसवे गाव आहे. हा भाग जावळी तालुक्यामध्ये किंवा सातारा जिल्हात आहे. म्हसवे गावाच्या बाहेर एका जागेला कंपाउड घातलेले दिसते व तेथे एक भला मोठा सरकारी बोर्ड आहे. त्यावर ह्या वटवृक्षाची माहिती लिहिलेली आहे. सरकारी कृपेमुळे तो बोर्ड तर एकदम सुव्यवस्थित (? ) आहे. फक्त अक्षरे उडाली आहेत, रंग उडालेला आहे. त्यामुळे काय लिहिले आहे ते वाचण्यासाठी कूटलिपी तज्ज्ञ अशा कोणी मिपाकराची मदत घेता येईल असा विचार करून सर्वात आधी त्या बोर्डाचाच फोटो काढून घेतला. एका गावक-याकडून कळलेली माहिती अशी: म्हसवे गावात असलेला हा वटवृक्ष पुरातन काळापासून आहे. ह्याने जवळजवळ ६ एकर जागा व्यापली आहे. एकाच वटवृक्षाच्या पारंब्यांतून हे भले मोठे वटवृक्षांचे जंगल उभे राहिले आहे. मूळ वृक्ष काही वर्षापूर्वी पडला पण त्याच्या पारंब्यांतून जे वृक्ष तयार झाले त्यांनी आपला डोलारा सांभाळून ठेवला आहे. सन १८८०-८५ च्या आसपास ली वॉर्नर नावाच्या एका ब्रिटिश अधिका-याने ह्याचा सर्वात आधी उल्लेख केला. आता सरकारने हे स्थळ संरक्षित म्हणून घोषित केले असल्या कारणाने त्या जागेत प्रवेश निषिद्ध आहे. कोणी येत जात नसल्यामुळे प्रचंड झाडी वाढली आहे. त्यामुळे आत घुसण्याचा प्रयत्न केला नाही. तो गावकरीदेखील आत जायला फारसा इच्छुक वाटत नव्हता. कारण पकडले गेल्यास मजबूत दंड होतो असे त्यानेच सांगितले. बाहेरून चक्कर मारल्यावर लक्षात आले की सरकारने खरोखरच प्रामाणिकपणे हा वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्यासाठी आत विहीर खोदली आहे. आता वडालादेखील बाहेरून पाणी लागते हे माझ्यासाठी जरा नवीन होतं. अहो जो वृक्ष शेकडो वर्षापासून दिमाखात उभा आहे त्याच्यासाठी पाणी? हे म्हणजे सूर्याला आपली टॉर्च देऊन "अंधारात जपून जा रे" असं म्हणण्यासारखंच आहे. असो. हा असा सरकारी खेळ. पण तो आपला विषय नाही. जास्त माहिती घेतल्यावर असे कळले की क्षेत्रफळाच्या बाबतीत हा आशिया खंडातील दुस-या नंबरचा वटवृक्ष आहे. गुगलबाबा म्हणतो की ह्यापेक्षा थोडा मोठा वृक्ष बंगालमध्ये (कलकत्त्याला) आहे. आणि ह्यापेक्षा लहान (तीन एकर पसरलेला) वृक्ष हा म्हसवे गावातच विराटगडाच्या पायथ्याजवळ आहे . त्या सरकारीबोर्डनुसार हाच भारतातील सर्वात मोठा वटवृक्ष आहे. आता खरंच कुठला मोठा हे ते दोन वृक्षच जाणोत. असो. वादात न पडता मी पाहिलेल्या वृक्षाचे फोटो खाली देत आहे. *************************************************** आगामी आकर्षण : - अजिंक्यतारा व सज्जनगड वृतांत.
लेखनविषय:

वाचन 15078 प्रतिक्रिया 0