 |
|
गुणीदास पं जगन्नाथबुवा पुरोहित. हिंदुस्थानी गायकीतलं, आग्रा गायकीतलं, बंदिशीच्या दुनीयेतलं, तबलावादनातलं एक मोठं नांव. पं जितेंद्र अभिषेकी, पं यशवंतबुवा जोशी, मणिक वर्मा, पं रामभाऊ मराठे, पं भाई गायतोंडे यांसारख्या दिग्गजांना घडवणारे जगन्नाथबुवा!
कठोर परिश्रम करून गाण्यावर हुकुमत मिळवलेले जगन्नाथबुवा!
'हम्म! जितेंद्र अभिषेकी गाणं शिकायला सकाळी सात वाजता यायचे आहेत ना?' मग स्वत: पावणेसात वाजताच तानपुरा गवसणीतून काढून, सतरंजी वगैरे घालून तयार राहणारे करड्या शिस्तीचे गुरू जगन्नाथबुवा!
"छे! हा शिरा काही खरा नाही! थांब मी शिकवतो तुला.." असं म्हणून अत्यंत हौशीने परंतु तेवढ्याच निगुतीने उत्तम गोडाचा शिरा कसा बनवावा, याचं माणिक वर्मांना प्रात्यक्षिक करून दाखवणारे बल्लवाचार्य जगन्नाथबुवा!
स्वत:चं मोठेपण विसरून, गुरूपण विसरून भीनसेन अण्णांच्या एखाद्या तोडीला साश्रू नयनाने दाद देणारे गुणग्राही जगन्नाथबुवा! "बुवा, माझं गाणं आपल्याला आवडलं, यातच सगळं भरून पावलं!" असं भीनसेनअण्णांनी म्हटल्यावर कुठलाही अभिमान न बाळगता उलटपक्षी किंचित अवघडून जाणारे जगन्नाथबुवा!
दिवाळीचेच दिवस होते. बुवांची प्रकृति जरा नरम होती. बुवा डोंबिवलीला आपली मानसकन्या लीला करंबेळकर यांच्या घरी मुक्कामाला होते. धनतेरसची संध्याकाळ. बुवा तसे करड्या शिस्तीचे पण प्रत्येक गोष्टीची हौस मात्र दांडगी. बुवा एकदम मुलीला आणि जावयाला म्हणाले, "हे काय, दिवाळी आहे ना? जा मस्तपैकी फटाके वगैरे आणा. वाजवूया तरी!"
"नको हो बुवा. आपली तब्येत बरी नाही ना.."
"छे छे! काही होत नाही मला. तुम्ही दोघं आत्ताच्या आत्ता बाजारात जा. मिठाई आणा, फटाके आणा. अगदी दणक्यात दिवाळी साजरी करूया!" बुवा हसून म्हणाले.
एवढं म्हणातात न म्हणतात तोच बुवांनी अखेरचा श्वास घेतला. एक मोठा गुरू, एक मोठा बंदिशकार क्षणात नाहीसा झाला होता. ऐन दिवाळीत अंधारून आलं होतं!
आज मिपा परिवातर्फे बुवांना ही लहानशी आदरांजली..!
माणिक वर्मा. सात्विक आवाजाच्या, निकोप आवाजाच्या अतिशय गुणी गायिका. बुवांच्याच शिष्या. राग जोगकंस. बुवांचीच निर्मिती. बंदिशही बुवांचीच. शब्द आहेत,
"पीर पराई जाने नही बालमवा..
प्राणपिया तुम ऐसे निठूर भयो
दासगुणी आस गवाई.."
(येथे ऐका)
माणिकताईंचं सुंदर गाणं, सोबत व्ही जी जोगांची व्हायलीनवरील एखाद्या सावलीसारखी पाठराखण करणारी सुंदर साथसंगत!
काही अक्षरं रेषेवरची असतात, काही सूर शब्दातीत असतात, तर काही माणसं गगनाइतकी उत्तुंग असतात. आमचे जगन्नाथबुवा त्यातलेच!
-- तात्या अभ्यंकर.