मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

३३ कोटी

विजुभाऊ · · काथ्याकूट
परवाच बोलताना कोणीतरी म्हणाले की ३३ कोटी देव आहेत. सहज विचार केला तर ज्या वेळेस देव ही संकल्पना आस्तित्वात आली तेंव्हा ज्ञात जगाची लोकसंख्या सुद्धा ३३ कोटी नसेल. मग हे ३३ कोटी देव आले कोठून? जिथे १०० कौरवांची नावेच कोणाच्या लक्षात नाहीत तिथे ३३ कोटी कसे लक्षात रहाणार. गणपतिची फ्यामिली ( वडील शंकर ,आईपार्वती , भाऊ कार्तिकेय , पत्न्या रिद्धी आणि सिद्धी ) विष्णूची फ्यामिली ( पत्नी लक्ष्मी आणि दशावतारातील इतर पत्न्या) ब्रह्मदेवाची फ्यामिली. विरोबा वेतोबा भैरोबा म्हसोबा म्हाळसाई सटवाई हे स्थानीक उपदेव असे ज्ञात सगळे मिळूनसुद्धा ३३ कोटी होत नाहीत. अज्ञातांची शिरगणती करण्याची पद्धत प्रचलीत नसावी. तरीसुद्धा ३३ कोटीबद्दलचे कुतुहल जात नव्हते. मी लहानपणी एका पुराणीक बुवाना हा प्रश्न विचारला होता. त्यानी जमीन पशुपक्षी असे मिळून ३३ कोटी होतात असे तात्पुरते उत्तर दिले होते. मुद्देसूद उत्तरादाखल पाठीत एक धपाट्या सोबत आगाव कार्टे ही पदवी घरपोच प्रदान करण्यात आली आणि माझे आजीसोबत पुराणाला जाणे बंद करण्यात आले होते. काही अनुत्तरीत बालसुलभ प्रश्न या फोल्डरमध्ये हा प्रश्न गुंडाळून टाकला. सहज कुठेतरी वाचनात आले की ३३ कोटी मधल्या "कोटी "चा अर्थ प्रकार्/प्रत असा होतो. म्हणजे एखाद्याला आपण म्हनतो ना की तुझे विचार उच्च कोटीचे आहेत तसेच. तसे; देव हे एकूण ३३ प्रकारचे/प्रतीचे आहेत. असा अर्थ ध्वनीत होतो. हे प्रकार कोणी सांगु शकेल का ? ३३ प्रकारचे देव देवता कोणत्या? अजून एक शंका? दिव्या दिव्या दीपत्कार. कानी कुंडल मोतीहार..... या प्रार्थनेतील "कानी कुंडल मोतीहार" हे शब्द नक्की कोणासाठी लिहिले आहेत?

वाचन 14852 प्रतिक्रिया 0