मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बायका आणि अंनिस!!!

पिवळा डांबिस · · काथ्याकूट
आज भल्या पहाटे कोकिलकूजनाने झोपेतून जागा झालो. हो, आमच्याकडे बारा महिने उन्हाळा असल्यामुळे श्रावण महिन्यातही कोकिल कूजतात (आणि आमची साखरझोप कुजवतात!!!). तर काय सांगत होतो? हो, जागा झालो, प्रातर्विधी, स्नान वगैरे आटपून आणि शुचिर्भूत होऊन आपल्या मिपामंदिरात डोकावलो. मंदिर पहाटे सुनसान होतं.... लांबूनच गाभार्‍यात डोकावून पहिलं तर श्री नंदनगिरी होडावडेकर स्वामीमहाराज हलक्या आवाजात तत्वज्ञानावर प्रवचन देत होते.... त्यांच्यासमोर चार हलकी मंडळी (वजनाने हो!!) बसून हलक्या आवाजात चर्चा करीत होती....... आता आम्ही पडलो फाटकी मुंडासंवाली सामान्य माणसं! आपल्याला गाभार्‍यापर्यंत कोण जाऊ देणार? आपली हद्द नगारखान्यापर्यंतच!! तेंव्हा तिथेच बसून नंदनस्वामींचे अमॄताचे बोल ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो..... पण आयच्यान सांगतो, एक शब्द कळेल तर शपथ!!! अल्बिनो काय, मेलॅनिन काय, वेरेश्चगिन काय!!!! आम्ही मॅट्रिकला इंग्रजी नापास असल्याने नंतर त्यांच्या मराठी शब्दांवर लक्ष द्यायचा प्रयत्न करून पाहिला!! पण तिथे ही तीच गत!!! उत्क्रांती, नेणिवेची पातळी, नैसर्गिक उर्मी, छ्या, छ्या, छ्या!!!! हे म्हाराज तर अगदीच उच्चपातळीवरून (मराठीतः हाय फंडा!) बोलून र्‍हायले होते. आमच्या डोचक्याचा अगदी पार कोदा व्हायची पाळी आली!!!! तेव्हढ्यात.... आमच्या कानी 'बायका', 'भांडण', 'शिव्या', हे शब्द कानी पडले... आणि आमची "नैसर्गिक उर्मी" तिथेच असल्याने आम्ही कान टवकारले.... वर्तमानपत्रातल्या कुठल्यातरी बातमीसंबंधी महाराज अगम्य शब्दांत बोलत होते..... इथे आम्ही महाराजांचा नाद सोडून वर्तमानपत्रांकडे वळलो. आमचा नेहमीचा "ठाणेवैभव" सोडून काही हुच्च पेपर चाळल्यावर आमच्या प्रकार ध्यानात आला. सारांश असा..... महाराष्ट्रातील सुखेड आणि बोरी या दोन शेजारी गावांतल्या बायका म्हणे दर नागपंचमीला या दोन गावांच्या मध्ये असलेल्या पाणवठ्यावर एकत्र जमून एकमेकींना भांडून जाहीर शिव्या घालतात..... अख्खी दोन्ही गावंच काय पण शेजारपाजारच्या गावांतून लोकं तिथे मुद्दाम हा समारंभ बघायला जमतात... ही प्रथा म्हणे गेली अनेक वर्षे चालू आहे.... आणि आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) त्याला विरोध करून ती प्रथा बंद पाडणार आहे...... तिच्यायला, ह्या अंनिसच्या!!!!!!! भांडल्या सुखेड-बोरीच्या बायका तर अंनिसचं काय गेलं? आता चार मराठी बायका एकत्र जमल्या तर भांडणार नाही तर काय करणार? एकत्र जमून एकमेकीची "निर्हेतूकपणे" स्तुती करण्यार्‍या बायका आमच्या तरी पाहण्यात कधी आलेल्या नाहीत!! आता शहरी बायका गोड शब्दांत एकमेकींना टोमणे मारतात, तर खेड्यातल्या बायका डायरेक शिव्या देतात, पण भावना तीच!!! आणि खुद्द त्या भांडणार्‍या आणि शिव्या देणार्‍या बायकांची या प्रथेविरूद्ध काही तक्रार दिसत नाही. त्याशिवाय उगाच का त्या दर वर्षी नटून्-सजून हा सोहळा साजरा करतात? आम्हाला तर ह्या सोहळ्याला स्वतः हजर रहावंसं वाटायला लागलंय..... कल्पना करा.... दोन गावांतल्या पाच-पन्नास बायका नटून्-सजून एकत्र जमल्यात आणि एकमेकींना शिव्या देत भांडतायत.... शिव्या देण्याच्या आवेशाने त्यांची तोंडं तांबडीबुंद झालीयेत, श्वास फुललाय..... चेहर्‍यावर केसांच्या बटा हिंदकाळतायत, पदर घसरतायत, कंबरा झुलतायत.... किती मनोहर दृश्य!!!! त्यात हे सगळं पाणवठ्यावर.... म्हणजे एखाद-दोन ललना घसरून पडून ओल्याचिंब होण्याची शक्यताही नाकारता येत नाही....... अरे काय त्या अंनिसचं डोकं फिरलंय काय? असला सोहळा बंद करायचे डोहाळे लागलेत त्यांना!!!! मी तर म्हणतो समजा गेलेच तिथे त्या अंनिसचे कार्यकर्ते.... आणि हा सगळा सोहळा पाहून, तोही नागपंचमीला, जर समजा सगळे नाग फडा उभारून र्‍हायले तर? तर हे कार्यकर्ते सोहळा थांबवतील की नागांना आवरायचं कार्य करतील? मिपावरील स्त्री सभासदांच्या सदर्भातला मजकूर संपादित. - संपादक. (निवेदनः वरील लिखाण विनोदाने लिहिले आहे हे ज्याला समजले नाही तो खरा मिपाकरच नाही! त्यामुळे नेहमीचं ते ह. घ्या वगैरे लिहिणार नाही ज्जाऽऽऽ!!!)

वाचन 13057 प्रतिक्रिया 0