ड्यूक्‍स नोजचा धडा

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
2 Aug 2009 - 1:32 am

dukes2
खंडाळ्याच्या रेल्वे स्टेशनपासून सुरू होणारी वाट
---
dukes3
वाटेतला छोटा, पण निसरडा ओहोळ
---
dukes5
...आणि सर्वात मोठं आकर्षण असलेला धबधबा!
---
dukes6
धबधब्यासोबत दस्तुरखुद्द लेखक!
---
dukes7
धुमाकूळ!
---
dukes10
डोंगराची निसरडी वाट
---
dukes9
धबधब्याची रुंदी मोजताना...
---
dukes11
दगडातून पार होणार का??
---
dukes12
धुक्यात बुडालेला डचेस नोज.
---
dukes13
जपून टाक पाऊल जरा!!
---
dukes14
बाय बाय ड्यूक्स नोज! परतीच्या वाटेवर...
----
ड्यूक्‍स नोजला पहिल्यांदा गेलो, तेव्हा म्हणजे साधारण 1999 सालापासून मी कोणत्याही वर्षी हा ट्रेक चुकविलेला आठवत नाही. एखाद्‌ वर्षाचा अपवाद असावा. अलीकडच्या काळात त्यात तोरणा आणि ढाक-भैरीचीही भर पडली होती. पण त्यात अनेकदा खंड पडला. ड्यूक्‍स नोजचा नेम मात्र कायम होता. यंदाही जूनमध्ये कोरड्या वातावरणात तोरणा कटाक्षानं टाळला. त्याची पुरेपूर भरपाई ड्यूक्‍स नोजला झाली.
नेहमीप्रमाणं "सिंहगड एक्‍स्प्रेस'नं खंडाळा गाठून तिथे पोटपूजा करून चालायला सुरवात केली. पहिल्या धबधब्यापाशीच पावसाच्या जोराचा अंदाज आला होता. हा ट्रेक म्हणजे जंगलातून जाणारी, दोन-तीन रॉक-पॅचची थोडीशी अवघड, पण भन्नाट वाट! वाटेत एक-दोन छोटे धबधबे आणि ओहोळ व नंतर डोंगरावरून फेसाळत येणारा मोठा धबधबा. यंदा धबधब्यापर्यंत पोचेपर्यंत त्याविषयीचं आकर्षण वाढलं होतं. धबधबा मस्त फेसाळत वाहत होता. यंदा तर त्याचा जोर एवढा होता, की थोडासा आधार घेऊनच पार करावा लागणार होता. आम्ही अर्थातच धबधब्यात मस्त तासभर डुंबलो. मनसोक्त भिजून-भिजवून झालं. निसर्गाची करामत म्हणजे, यंदा धबधब्याच्या वरच्या भागातला डोह दरड कोसळून नाहीसा झाला होता. तिथल्या धबधब्याचा प्रवाहदेखील बदललला होता. खालच्या धबधब्याचाच जोर एवढा होता, की त्याखाली उभंही राहवत नव्हतं. मग तिथेच धमाल केली.
धुक्‍यानं दरीचा बराचसा भाग व्यापला होता. पावसाचं कृपाछत्र असल्यावर ड्यूक्‍स नोजच्या ट्रेकची मजा वाढते. यंदा तर पावसानं नुसता धुमाकूळच घातला होता. धबधब्यात भिजल्यानंतर बदलायला मी कधी कपडे घेत नाही, पण यंदा घेतले होते. पण बदलावेसे वाटले नाहीत. ओले कपडे अंगावर वाळवण्याच्या आनंदाने ट्रेकचा उत्साह आणखी वाढतो. हाच निर्णय नंतर नडला!
वाटेत एका ठिकाणी मस्त लोटांगण घातलं. हाता-पायाला थोडं झाजरलं, कपडे चिखलात लोळले. पठारावरही भरपूर धुकं होतं. ड्यूक्‍स नोजवर पोचायला साडेबारा वाजले. तिथेही पावसानं झोडपून काढलं. धुक्‍यामुळं दरी दिसण्याचा प्रश्‍नच नव्हता. धबधब्यानंतर कॅमेराही बाहेर काढण्याची सोय नव्हती. साधारणपणे दोन वाजेपर्यंत खाली उतरलो. आता उतारावरची बरीचशी माती धूप होऊन वाहून गेल्यामुळे आणि खाली सुरू असलेल्या नव्या रस्त्याच्या कामामुळे उतारावरून घसरत येण्याचा आनंद कायमचा गेला!
जीन्स घातली होती, ती ओली (पावसामुळे!) राहिल्यानं पायाला घासून पाय आतल्या बाजूने मस्त सोलपटून निघाले! दोन दिवस विदूषकासारखं चालावं लागत होतं! भरपूर दिवसांनी केलेल्या ट्रेकमुळे पाय (आणि मन!) भरूनही आलं होतं. ("कुणी सांगितलं होतं नको तिथे शेण खायला!' अशी सुवचनं सहधर्मचारिणीनं ऐकवली, ती गोष्ट वेगळीच!)
असो. पुढच्या ट्रेकला जाण्याआधी 85 किलोच्या या देहाला आता थोड्या व्यायामाची सवय लावली पाहिजे, असा निश्‍चय केलाय. बघूया, कितपत अमलात येतोय ते!!
-------

मुक्तकप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

विकास's picture

2 Aug 2009 - 2:53 am | विकास

फोटो आणि वर्णन एकदम मस्त आहे! कधी काळच्या विशेष करून नेरळ- जुम्मापट्टी-माथेरान भागात आणि चिंचोटीच्या धबधब्यातील असेच क्षण आठवले....

पुढच्या ट्रेकला जाण्याआधी 85 किलोच्या या देहाला आता थोड्या व्यायामाची सवय लावली पाहिजे, असा निश्‍चय केलाय.

मनःपुर्वक शुभेच्छा! ;)

बहुगुणी's picture

2 Aug 2009 - 4:13 am | बहुगुणी

धुकं तर फारच मस्त दिसतंय, नक्कीच मजा आली असणार.
पुढच्या ट्रेकसाठी शुभेच्छा.

(तुम्ही 'डचेस नोज' म्हणून जो दाखवलाय तो खरं तर 'ड्यूक्स नोज' आहे ना? माझ्या आठवणीप्रमाणे 'डचेस नोज' [या कोनातून] डावीकडे आहे, आणि थोडा आधिक अणकुचीदार पण relatively लहान सुळका आहे.)

विमुक्त's picture

3 Aug 2009 - 2:18 pm | विमुक्त

फोटोतला ड्यूक्स नोज आहे... बहुगुणी म्हणतात त्याप्रमाणं डचेस नोज डावीकडे आहे...

पाषाणभेद's picture

3 Aug 2009 - 2:11 am | पाषाणभेद

मस्त मजा केलेली दिसतेय. फोटो छानच.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Aug 2009 - 9:08 am | llपुण्याचे पेशवेll

फोटो छानच.
>>हाता-पायाला थोडं झाजरलं
हे वाचून रत्नागिरीकडच्या भाषेची आठवण आली.

>> ट्रेकला जाण्याआधी 85 किलोच्या या देहाला आता थोड्या व्यायामाची सवय लावली पाहिजे
हे बाकी उत्तम.. अधून मधून व्यायाम करणे चांगले असते...

(८८किलोवाला)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विसोबा खेचर's picture

3 Aug 2009 - 9:40 am | विसोबा खेचर

हेवा...हेवा...हेवा...!

फक्त हेवा वाटला....! :)

तात्या.