पावसाची बरेच दिवस वाट पाहिली, शेवटी कंटाळून सकाळी पावसाच्या अनुपस्थितीतच कांद्याची "खेकडा' भजी (खेकड्याच्या पायांसारखी दिसणारी. खेकड्याचे पाय घातलेली नव्हे!) करून खाल्ली. वर बायकोला एकही न ठेवल्यानं, संध्याकाळी तिच्या शिव्याही खाल्ल्या! दुपारी पावसाचा मस्त शिडकावा झाला आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. क्षणार्धात अनेक पावसाळलेल्या सहली डोळ्यांसमोरून तरळून गेल्या.
कॉलेजात होतो, तेव्हा आमचा "नेचर क्लब' नावाचा अभ्यासाच्या नावाखाली भटकंती करण्याचा (उनाडक्या म्हणा हवं तर!) क्लब होता. विशेषतः पावसाळ्यात या भटकंतीला बहर यायचा! एकदा पावसजवळ असंच "एक्सकर्शन'ला गेलो होतो. सकाळी कुठली तरी झाडं-पानं बघायची, त्यांचा अभ्यास वगैरे करायचा आणि दुपारी एकत्र जेवण, गाण्यांच्या भेंड्या, विविध गुणदर्शन वगैरे. संध्याकाळपर्यंत घरी परत, असा कार्यक्रम असायचा. दुपारची जेवणं वगैरे उरकली होती. नरडीही साफ करून घेतली होती. पावसच्या जवळच्या माळरानावर आम्ही होतो आणि तुफान पाऊस आला. कोकणातलाच पाऊस तो! त्यातून मोकळं माळरान आणि जुलैचा महिना! कुणाचीच त्याला अडवायची शामत नव्हती, आणि तोंड द्यायचीही! पावसाच्या तडाख्यात आम्ही मस्तपैकी सापडलो होतो. मोठ्या हरभऱ्याच्या आकाराचे ते टपोरे थेंब टणाटणा तोंडावर-अंगावर आपटत होते. छत्री-बित्रीनं तग धरण्याचा प्रश्नच नव्हता. वाराही सोसाट्याचा होता. कसेबसे त्या तडाख्यातून वाचून रस्त्यापर्यंत आलो. पाऊस थांबायची लक्षणं नव्हती. बऱ्याच वेळानं तो कमी झाला. एसटी गाड्या वेळेवर येण्याची चिन्हं नव्हतीच. आमची परतीची गाडी रत्नागिरीहून सुटलीच नसल्याचं समजलं. मग पर्यायी व्यवस्था बघणं आवश्यक होतं. शेवटी एक टेम्पो ठरवला. वाळूची वाहतूक करणारा टेम्पो होता तो. हौद्यातल्या काही फळ्या निसटल्या होत्या, काही मोडलेल्या होत्या. अख्खा माणूस मधून रस्त्यावर पडेल, अशी परिस्थिती होती. नशीब, वरती हूड (ताडपत्रीचं छप्पर) तरी होतं. सगळी मेंढरं टेम्पोत चढली. टेम्पोवालाही त्या घाटरस्त्यातून पावसाच्या तुफान माऱ्यातही "फॉर्म्युला वन'मध्ये भाग घेतल्यासारखाच टेम्पो चालवत होता. त्यामुळं आम्ही कधी उजव्या बाजूच्या, तर कधी डाव्या बाजूच्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीला जात होतो. टेम्पोच्या हौद्याच्या कठड्यांना धरून जी मुलं उभ
ी होती, त्यांच्या हाताच्या आधारानं मध्यभागी मुलं-मुली उभ्या होत्या. हात जरा जरी सुटला, तरी रस्सीखेचीत दोरी सुटल्यावर जसे सगळे एकमेकांच्या अंगावर कोसळतात, तशी अवस्था होत होती. मध्येच कुणाचा पाय खाली जायचा, कुणी खांबावर आपटायचं! वर पावसाची मजा घ्यायला गाण्यांचा धिंगाणाही होताच.
आणखी एक पावसाळी अनुभव होता ढाक-भैरीचा. आमच्या क्लबबरोबर 31 डिसेंबरच्या रात्री आम्ही कामशेतजवळच्या ढाक-भैरीच्या ट्रेकला गेलो होतो. कामशेतवरून टेम्पोतून जायला आधीच धमाल आली होती. रात्री एका मित्राच्या टेंटमध्ये मस्त गाणी म्हणत बसलो होतो. बाकीचं पब्लिक देवळात जागा शोधून गुडूप झालं होतं. मी आणि आणखी दोन मित्रांची किशोरकुमारची गाणी रंगात आली होती. त्याच वेळी पाऊस आला. तिसरा जो होता, तो पावसासाठी आडोशाचं कारण दाखवून पळाला. मग आम्ही दोघंच राहिलो. बाहेर भरपूर पाऊस, तंबूतही खालून पाणी यायला लागलेलं, अशा स्थितीत आम्ही किशोरकुमारच्या दर्दभऱ्या गाण्यांच्या मैफलीत दंगून गेलो होतो. पहाटे तीन-चारला झोपलो असू. तेही देवळाच्या कातळामुळे थंडगार पडलेल्या गाभाऱ्यात, उंदरांच्या सहवासात!
पहिल्यांदा केलेला तोरणा ट्रेकही पावसाच्या उपस्थितीत असाच धम्माल झाला होता. जाताना धबधब्यात मनसोक्त भिजलो होतो आणि येताना एका बंधाऱ्याच्या अडवलेल्या पाण्यात! ड्यूक्स नोजच्या धबधब्याला तर पर्याय नाही!!
धबधब्याखाली मनसोक्त भिजायचं राहिलं तसं गेल्या वर्षी. ताम्हिणी घाटात एकदाही गेलो नाही. एकदा फक्त पौड रस्त्यालाच "लवासा सिटी'जवळ गेलो होतो. पण कारमधून गेलो होतो. त्यामुळं भिजलो नाही. शिवथरघळीलाही गेलो, तिथेही येताना भिजू म्हटलं आणि राहून गेलं. यंदा बरेच प्लॅन्स आहेत, पण अजून पावसाचा पत्ता नाहीये!
प्रतिक्रिया
20 Jun 2009 - 2:48 am | पक्या
मस्त. पावसाळी आठवणी आवडल्या. अशीच गारांच्या पावसाची मजा ही काही औरच.
दोन्ही फोटू ही सुरेख.
20 Jun 2009 - 3:32 am | सुहास
फोटो मस्तच... पहिला तर १ नंबर..
माझ्या आठवणीतला पाऊस २६ जुलै २००५ चा, मुंबैतला... नशीब माझी नाईट शिफ्ट होती त्या दिवशी त्यामुळे घरी बसून पाहता आला.. बाकीच्यांचे हाल ऐकूनच आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटदा मुंबै सोडावी वाटली.. जर माझ्याकडे करवत असती आणि पाऊस साठवायची सोय असती, तर त्या पावसाचा एक तुकडा कापून साठवून ठेवला असता, इतका तो दाट आणि जोरदार होता.. भजी, cigarette, चहा ची तल्लफ येत होती पण आम्ही रहात होतो त्या हिंदमाता area त पाणी तुंबल्यामुळे आम्हां रूममेट्स ना खाली जाऊन ती चैन करणे परवडत नव्हते...फक्त "maggi" असल्याने आम्ही रूममेट्स ऊपाशी नव्हतो.. दुसर्या दिवशी फक्त दादर टी टी लाच २-३ हजारभर लोक (जास्तच असतील) बघितले.. अडकून पड्लेले... अगदि ठाण्याला जायला कोणत्याही वाहनाला प्रत्येकी हजारभर रूपये द्यायची तयारी होती त्यांची.. पण शीव (sion) च्या पुढे कुणी जातच नव्हते... फोनचे नेटवर्क बंद होते.. flyover बंद पडलेल्या गाड्यांनी सजले होते.. चिंताग्रस्त आणि भुकेले लोक सगळीकडे... या पावसानंतर "गारवा" ची cassette फेकून दिली आणि वर्षभर तरी पावसाची गाणी ऐकणे बंद केले.. आणि मे २००६ ला मुंबै सोडली...!
--सुहास
20 Jun 2009 - 9:23 am | रेवती
पहिला फोटू अप्रतिम!
अनुभव आवडले.
माझे आणि पावसाचे फारसे सख्य नाही.
सुहास यांनी लिहिल्याप्रमाणे मुंबईच्या पावसाच्या २००६ च्या बातम्या वाचून सुन्न झाले होते. माझा भाउ पाण्यात बरेच तास अडकून पडला होता. नंतर कसाबसा चालत तो दुसर्या भावाकडे गेला आणि आमच्या जीवात जीव आला.
रेवती
20 Jun 2009 - 9:28 am | संदीप चित्रे
कुठे काढलाय हा फोटो?
फोटो पाहूनच आधी मन प्रसन्न झालं. त्यानंतर तुझा लेख वाचून अजून आठवणी जाग्या झाल्या.
आम्हाला असा एकदा पाऊस कडकडून भेटला होता लोहगडावर. कॉलेजच्या सहलीसाठी गेलो होतो आणि वर पोचता पोचताच धुमधार पावसाने गाठलं.
खाली उतरताना तर चक्क एक लांबच लांब साखळी करून उतरावं लागलं होतं.
20 Jun 2009 - 9:34 am | अमोल केळकर
मस्त आठवणी
पहिला फोटो , रत्नागिरी- चिपळुण रोडवरचा (सावर्डे जवळचा) आहे का?
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
20 Jun 2009 - 5:06 pm | रत्नागिरीकर
मला वाटतं, हा फोटो कशेडी घाटातला आहे...
20 Jun 2009 - 10:04 am | टारझन
वा !! पहिला फोटू क्लासंच .. अशा रोड्स वरून तुफान स्पीडने बाईक चालवायला काय मजा येते !! वळणांवर लॅप मारताना तर अँड्रेनॅलिन तर एकदम पिक ला पोचतं .. थोडक्यात लेखापेक्षा फोटू आवडला :)
20 Jun 2009 - 12:15 pm | जागु
फोटो मस्तच. पहिल्याने तर गारवा आणला डोळ्यांना.
20 Jun 2009 - 12:48 pm | मराठमोळा
वा!
फोटो पाहुन ऑगस्ट महिन्यातल्या लोणावळ्याची आठवण झाली!!
भुशी डॅम, झेनिथ धबधबा, हिरवळ, आणी पाउस..
डोळ्यांची पारणे फिटावीत असं अप्रतिम निसर्गसौंदर्य..
:)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
20 Jun 2009 - 4:35 pm | चतुरंग
पहिला फोटू कसला क्लास आहे रे. काळजात हललं बघ. (कुठे काढलाय?)
पावसाळी सहली टपटपल्या मनातून. अगदी घट्ट मनात बसलेली म्हणजे शिवथरघळची.
(मुसळधार)चतुरंग
20 Jun 2009 - 4:46 pm | परिकथेतील राजकुमार
वा वा वा ! अभिजितदा फंडु लेखन आणी फंडु फोटु रे.
दिल पावसाळी पावसाळी हो गया.
अवांतर :- खेकडा भजीची पा़कृ फोटुसकट कधी देणार ??
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
20 Jun 2009 - 4:58 pm | आपला अभिजित
सगळेच रस्ते पावसाळ्यात असे धुमशान दिसतात!
पण हा फोटो बहुधा खंडाळा घाटातला आहे. तुमच्या प्रशंसेच्या ओझ्याखाली मी नुसता दबूनच नव्हे, तर गाडला गेलोय, पण तरी सांगितल्याशिवाय राहवत नाही, की हा फोटो ढापलेला आहे. ऑफिस लायब्ररीत सर्च दिल्यावर घावला! मग ढापला नि हाणला इथे!
असो. खालचा फोटो ताम्हिणीतला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात (नव्या `अल्टो`तून) बरीच भटकंती करायची आहे. तेव्हा पावसाचे फोटू काढून तुम्हाला जळवेनच.! असो.
बाकी, पावसाळलेल्या लेखावरच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
टार्या, बाइक जपून चालव हो! आम्हाला अजून बरेच काही वाचायचेय तुझ्याकडून!
चतुरंगराव,
शिवथरघळीचा ट्रेक पावसाळ्यात धम्मालच होतो. विशेषत: घाटाच्या पुढे उतरून शेतातल्या रस्त्यातून जायचं! पण सालं त्या मुख्य धबधब्यात उतरता येत नाही! कसला ध्रोंकार करत वाहतो तो!
पावसाळ्यात कोकण रेल्वेची सफर एकदा तरी करावीच!!
असो.
सगळ्यांना सहलींसाठी पावसाळलेल्या शुभेच्छा!
20 Jun 2009 - 5:03 pm | बाकरवडी
आला ना पाउस, मस्त वाटतयं ........!!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
20 Jun 2009 - 5:31 pm | आपला अभिजित
अत्ता जरासा पिरपिरतोय बाहेर!
हा पुण्याचा पाऊस मला आवडत नाही खरं तर!
पाऊस म्हणजे कसा हवा, मुसळधार!! दोन-दोन दिवस सूर्याचं दर्शन न घडवणारा! दोन फुटावरचंही दिसू न देणारा!! कपडे सुकायची वाट पाहायला लावणारा आणि आंघोळ न करताच घरात बसून राहण्याची संधी देणारा!!!
20 Jun 2009 - 6:16 pm | क्रान्ति
लेख आणि फोटो दोन्ही खास! :)
तुम्ही पाऊसवाले लोक नशीबवान! आम्ही अजूनही काहिलीतच आहोत उन्हाच्या. तपमान "वाढता वाढता वाढे"या एकाच मंत्राचा जप करतंय! नुसते ढग येतात, आणि धग वाढवून निघून जातात. पाऊस कधी यायचा देव जाणे! :S
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
20 Jun 2009 - 6:43 pm | लवंगी
आणी वर्णनहि तितकेच सुरेख.. किती आठवणी जागवल्या.. मला पावसात भिजायला ज्याम आवडत. अगदि अजुनहि पहिल्या पावसात मी न चुकता भिजते. काल इथे रात्रभर पावसाने धुमाकुळ घातलाय. विजा आणी गडगडासकट.. आज सकाळ अशी छान पावसाळी उगवली आहे.. सगळीकडे हिरवगार.. डोळ्यांना सुखावणार.. मुलं ऊठायच्याआधी सकाळी सकाळी ६ वाजता मस्तपैकी १ तास बाहेर भटकून आले. आज संध्याकाळी चहाबरोबर कांदाभजी नक्कि..
20 Jun 2009 - 7:26 pm | स्वाती दिनेश
पहिला फोटो क्लासच!
लेख वाचून पावसात भिजल्यासारखे वाटले.:)
स्वाती
20 Jun 2009 - 7:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिजित, मस्त फोटो आणि मस्त वर्णन.
पावसात भिजायला मजा येतेच !
आमच्याकडेही पावसाचा अजून पत्ता नाही. पण पाऊस आल्यावर आपूनबी लै भिजणार !
-दिलीप बिरुटे
20 Jun 2009 - 8:15 pm | अनिल हटेला
लेख आणी फोटो दोन्ही आवडले...:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
20 Jun 2009 - 9:56 pm | लिखाळ
वा ... फोटो आणि आठवणी एकदम मस्त :)
पावसाच्या खूप आठवणी जाग्या झाल्या. सिंहगडावर अनेक वेळा पावसाळी रात्री केलेली भटकंती आठवली.
मान्सूनच्या जोरकस पावसाची खुमारी टेंपरेट हवामानाच्या प्रदेशातल्या बारमाही पावसाला नाही !
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
21 Jun 2009 - 10:15 am | वेताळ
पण अजुन पावसाचा साला पत्ताच नाही इकडे कोल्हापुरला.बघु कधी येतो ते.अभिजीत साहेब नवीन गाडी घेतली म्हणायची. अभिनंदन ,गाडी घेताना कोणती घ्यावी ह्यावर कौल काढला होता. आता घेतल्यावर पार्टी कुठे द्यायची ह्यावर एकादा कौल काढा.
ह्या पावसाळ्यात होवुन जावुदे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
21 Jun 2009 - 1:00 pm | आदम
1st pic is of kashedi ghat on mumbai-goa highway.
22 Jun 2009 - 10:50 am | विसोबा खेचर
अभिजितराव,
पहिलं चित्र तर अल्टीच! :)
तात्या.