एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग २
लेखनप्रकार
>(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)
आधीचा भाग येथे वाचा
http://misalpav.com/node/8127
पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस. घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण पम्याचे मात्र अभ्यासापेक्षा राडे करण्यातच जादा लक्ष. असा पम्या पत्रकार व्हायच्या कुठ्ल्यातरी कोर्सला अॅडमिशन घेतो आणि कुठ्ल्याशा पेपरमधे सुट्टीत ईंटर्नशिप करतो. तिथे त्याला पत्रकारितेतले जे नमुने भेटतात, त्यांच्या वागण्याने प्रभावित होऊन पम्या पत्रकारितेतच करीअर करायचे ठरवतो. त्याची डायरी त्याच्या एका टर्रेबाज मित्राच्या हाती लागते आणि...... आता पुढे वाचा........
२८ मे
च्यायला काहीतरी लोचा आहे. आज गल्लीतल्या मित्रांबरोबर कोपर्यावरच्या हॉटेलबाहेर टाईमपास करत बसलो होतो तर आपला मोबाईल वाजला. नंबर अनोळखी होता. घेतलाच नसता पण मग विचार केला की त्या १५२ नंबरच्या बसमधे एका आयट्मच्या पर्समधे आपला नंबर लिहून कागद टाकला होता त्या पोरीचा असेल आणि घेतला तर त्या पेपरच्या टकल्या चीफ रिपोर्टर बोलत होता. साला लय आखडू आहे. उद्या सकाळी १० वाजता ऑफिसमधे भेटायला बोलावलेय पण काम काय आहे याचा पत्ता लागू दिला नाही. त्या नडदा मॅडमने नाटकातल्या नटाचे उगाच सॉलिड माप काढून परिक्षणाला "एका तोतर्याची गोष्ट" नाव दिलं अन त्यांची आणि माझी एकत्र बायलाईन दिली त्याने डिफेमेशनची केस केली नसली म्हणजे मिळवली. नस्त झेंगट सालं!
२९ मे
अपनी तो चल पडी!!!!! चीफ रिपोर्टर बाराथे साहेबांनी एकदम गुगलीच टाकली. फोन आल्यावर तशी फाट्ली होती आपली, हो खोटं कशाला बोलायच. पण ऑफिसात गेलो तर साहेबांनी मुंड्क्यावरच टाकले. ऑफिसात गेलो तर बरीच पोरं-पोरी आधीच आली होती. पण त्या यशदा मॅडमनी ओळख ठेवली होती - छान हसल्या, कसा आहे काय करतो चौकशी केली. ईतर रिपोर्टर यायचे होते पण बाराथे साहेब बसले होते जागेवर, संपादक आगलावे पण होते त्यांच्या केबिनमधे. बाराथे साहेबांच्या समोर उभा राहिलो तर त्यांनी सरळ संपादकांच्या समोरच नेले. संपादक पण छान हसले, चहा मागवला आणि टाकला ना राव फुल्लटॉस. मला सरळ विचारले इथे नोकरी करणार का म्हणून. आपली तर बोलतीच बंद! मी गप्प बसलो तर तेच पुढे म्हणाले, "सध्या ट्रेनी रिपोर्टर म्हणून घेवू. महिना चार हजारावर. एक वर्ष ट्रेनिंग, नंतर सहा महिने प्रोबेशन आणि काम बरे वाटले तर नंतर कन्फरमेशन." काय बोलावे तेच सुचेना. बाराथे साहेबच पुढे म्हणाले, "तुमच्याबद्दल सगळ्या रिपोर्टर्सनी शिफारस केली म्हणून तुम्हाला प्राधान्याने विचारले. बघा! विचार करून नंतर सांगा वाट्ल्यास." विचार केला उशीर केला तर आहे ती संधी हातून जायची. लगेच हो म्हणलो आणि १५ मिनिटांत बाराथे साहेबांनी अॅपॉईन्ट्मेंट लेटर ठेवले. नंतर रिपोर्टिंग सेक्शन मधे नेऊन सगळ्यांना सांगितले पण! सगळ्यांनी अभिनंदन केले आणि वर कोपर्यावरच्या अण्णाकडे नेऊन चहा पण पाजला. च्यायला! आज आपण रिपोर्टर झालो. उद्या ड्यूटी सुरू. वाट्तय, मनिषा कोईराला सारखं नाचत गावं, "आज मै ऊप्पर." काय कंडा दिसलीय त्या गाण्यात ती. बाकी आनंदी माणूस छानच दिसतो म्हणा! घरी जाऊन आईला पत्र दाखवलं तर तिच्या अंगात एकदम निरुपा रॉय संचारली. शिरा काय केला, गुणी बाळ म्हणून कौतुक काय केलं! कायम खेकसणारा बाप पण खूष.... त्याच्या स्कूटरची चावी दिली अन म्हणाला, "तुलाच घे. माझे काय? मी बसनं जाईन ऑफिसला. निमी पण छान हसली अन शेकहॅन्ड करून काँग्रॅट म्हणाली. आता टर्रेबाजी बंद! उद्यापासून सिन्सिअरली काम करायचे!
वाचन
4164
प्रतिक्रिया
0