मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पिशितभुजाच्या कान्दिशिक नर्मदांचे विकल मनोरथ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अधिपतींनी नेहमीप्रमाणे दरबाराला सुरवात व्हावी अशी आज्ञा केली. दरबाराला सुरवात झाली. किरकोळ तंटे, भांडणे यांचा यथायोग्य निवाडा करुन अधिपतींनी मौजेचे कार्यक्रम सुरु व्हावे असे सांगितले. दरबारी आपले विविध प्रकारचे कौशल्य दाखवित असतांनाच अधिपतींना लहर आली, आणि त्यांनी आपले नृत्यकौशल्य दाखविले. सभाजन अचंबित होवुन टाळ्या वाजवण्याचे विसरुन आपल्या शेजा-यांची बोटे तोंडात घालु लागले. दोन मिनिटांनी गरके घेवुन झाल्यावर "आताच भोजन झाले नाहीतर, कुणाला हार गेलो नसतो!" असे सांगुन अधिपती धापा टाकत सिंहासनावर जावुन बसले. राजवैद्यांनी जवळ जावुन "हेमगर्भाची मात्रा देवु का?" अशी पृच्छा केली तेव्हा "वेळ आली की जरुर घेवु" असे सांगुन अधिपतींनी त्यांची विनंती अव्हेरली. दरबारच्या रिवाजाप्रमाणे सर्व कार्यक्रम यथास्थित होत असतांना अचानक दरवाजाच्या बाजुने काही गलबला ऐकु आल्यामुळे हे काय विघ्न उपस्थित झाले असा विचार करुन अधिपतींनी जरा रागानेच दरवाजाकडे नजर टाकली. अधिपतींनी नजर टाकली म्हणुन मानक-यांनी पण नजर टाकली. ही मंडळी काय बघत आहेत हे पहाण्यासाठी इतरांनी पण दरवाजाकडे नजरच टाकली. दरवाजातील पहारेकरी दोघा जणांचे बखोटे धरुन आत आणत होते. त्यांना अधिपतीसमोर उभे करुन रक्षकप्रमुखाने सांगितले "अधिपती, हे दोघे नगरामधे तुमच्या विरुद्ध तसेच राज्याच्या विरुद्ध अफवा पसरतांना सापडले. भडकावु भाषणबाजी, गलिच्छ शिवीगाळ यांच्या सहाय्याने नगरजनांना त्रास देतांना हे सापडले. गेल्या कित्येक दिवसांपासुन आम्ही यांच्या मागावर होतो. कधी संतांचा, कधी गारुड्याचा, कधी वारक-याचा, कधी शेतक-याचा अशा बहुरुप्याच्या वेषात फिरणारे हे दोघे आज सापडले आहेत. यांचा बंदोबस्त करावा " अधिपतींनी ही मंडळी कोण आहेत याची पृच्छा केली असता एकाचे नाव चक्रमुख असुन दुस-याचे चक्षुःश्रवस असे असल्याचे दरबारातील मंडळींनी सागितले. मोठ्या आढ्यतेने अधिपतींकडे पहात उभे असलेल्या दोघांना काय आहे असे विचारले असता, आमचे आगमन प्रज्ञावंतांच्या नगरीतुन झाले असुन या नगरीतील मुढांना सुज्ञतेचे धडे देण्यासाठी आलो आहे. त्याचप्रमाणे आम्ही दरबा-यातील मानक-यांपेक्षा जास्त प्रज्ञावंत असल्याने मानक-यांनासुद्धा प्रज्ञावंत बनवणार असल्याचे सांगितले. यावर अधिपतींनी हसुन राजवैद्यांकडे पाहिले. "बोला राजवैद्य ! तुम्हाला आहे इच्छा प्रज्ञावंत म्हणवुन घ्यायची?" अधिपतींनी विचारले. "जरुर ! पण आधी यांच्याच प्रज्ञेची परिक्षा पहावी असे म्हणतो!" राजवैद्य उत्तरले. कोणत्याही परिक्षेला आमची तयारी आहे असे चक्रमुख आणि चक्षुःश्रवसाने सांगताच, दरबारातील कुणाला त्यांची परिक्षा घ्यावयास सांगायचे हा प्रश्न अधिपतींना पडला. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने राजवैद्यांकडे पाहिले. तेव्हा "आपल्या नगरीतील कुणाही सामान्य माणसाला बोलावुन यांची परिक्षा घ्यावी, उगाचच दरबारातील मानक-यांना त्रास कशाला ?" असे बोलुन राजवैद्यांनी एका अनुचराला बोलावुन त्याच्या कानात काही सांगितले. अनुचर ते ऐकुन बाहेर गेला. थोड्या वेळाने अनुचर अर्यमनला घेवुन आत आला. अर्यमन आत येवुन शांतपणे उभा राहिला. त्याच्या बरोबर त्याचा आवडता कपोत खांद्यावर बसुन होता, तर घोरदर्शन गवाक्षात बसुन राहिला. त्याला पहाताच अधिपतींच्या कपाळावर आठ्यांचे साम्राज्य पसरले. "अहो राजवैद्य ! कुणाला बोलावले तुम्ही ? हा मनुष्य माझ्या मानक-यांना वाटेल ते बोलतो! अशा माणसाला तुम्ही दरबारात तरी कसे बोलावले ? याच्यावर विश्वास कसा आणि का ठेवायचा?" यावर अर्यमनने गालातल्या गालात हसुन अधिपतींकडे पाहिले आणि म्हणाला "राजाने स्वतःच्या प्रजाननांवर सुद्धा अवास्तव विश्वास टाकु नये असे चाणक्य म्हणतो. आपले वागणे अगदी योग्य आहे ." यावर राजवैद्यांनी हसुन अधिपतींना शांत रहाण्याची विनंती केली आणि अर्यमनकडे वळुन म्हणाले "अर्यमन! या दोघा अनोकशायिन वेषातील मंडळींना प्रज्ञावान म्हणावे की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी आम्हाला जरा मदत कर" अर्यमनने हसुन "होय जरुर करु" असे उत्तर दिले. अर्यमनने वळुन दोघांकडे पाहिले आणि म्हणाला "आत्तगन्ध व्हायच्याच उद्देशाने आलेल्या प्रज्ञाचक्षुसांनो माझे व दरबारातील मंडळीचे प्रश्न नीट ऐकुन उत्तर द्या." यावर दोघे "हुं... तु काय विचारुन विचारुन विचारणार? विचार !" असे उत्तरले. "तर मग सांगा बरे नीती, अनीती यात काय फरक असतो? धर्माची व्याख्या काय? देव म्हणजे काय?" अर्यमनने विचारले. "...." चक्रमुखाने नजर चुकवली. "...." त्याचेच अनुकरण चक्षुःश्रवसाने केले. "सापेक्षतावादाचा सिद्धांत काय आहे?" अर्यमनने पुढचा प्रश्न विचारला. "...." चक्रमुखाने मान खाली घातली. "...." त्याचे अनुकरण चक्षुःश्रवसाने केले. "भारतीय मानसशास्त्राची माहिती सांगा ?" अर्यमनने विचारले. "...." चक्रमुखाचे खांदे उतरले. "...." चक्षुःश्रवसाचे तसेच झाले. "शुन्याचा शोध का लागला? शहाजोग हा शब्द कुठुन आणि का आला?" अर्यमनने विचारले. "...." चक्रमुखाने खाली बसकण घातली. "...." त्याचे अनुकरण चक्षुःश्रवसाने केले. "एखाद्याने बोललेले, लिहिलेले वाक्य आपल्याला तुकड्यातुकड्याने समजते की पुर्ण वाक्य वाचुन अथवा ऐकुन? आणि समजणे म्हणजे काय? " अर्यमनने विचारले. "...." चक्रमुखाच्या डोळ्यातुन अश्रुंचा पुर सुरु झाला. "...." चक्षुःश्रवसाची स्थिती काही वेगळी नव्हती. "ज्ञान होणे ही अवस्था काय दर्शवते? " अर्यमनने विचारले. "...." चक्रमुख स्फुंदुन स्फुंदुन रडायला लागला. "...." त्याचे अनुकरण चक्षुःश्रवसाने केले. "अमेरिकन डॉलरचे भविष्य काय? " अर्यमनने विचारले. "...." चक्रमुखाने हात जोडुन जमिनीवर लोळण घेतली. "...." त्याचे अनुकरण चक्षुःश्रवसाने केले. "नीट उठुन उभे रहा. आणि अर्यमनच्या प्रश्नांची उत्तरे येत नसतील तर दरबारातील लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्या! " अधिपतींनी फर्मावले. दोघेही उठुन उभे राहिले. अंग थरथर कापत होते. डोळ्यातुन अश्रु वहात होते. तोंड काळेठिक्कर पडले होते. दरबारातील लोकांनी हल्लाबोल करुन प्रश्न विचारायला सुरवात केली. एकेका प्रश्नाला ऐकुनच आपली लायकी या दरबारात उभे रहाण्याची पण नाही याची जाणीव होवुन हळुहळु दरवाज्याच्या दिशेने मागे सरकण्यास दोघांनी सुरवात केली. त्यांचा विचार लक्षात येताच अधिपतींनी सगळ्यांना शांत रहाण्याच्या सुचना करुन, "मग तुम्हाला काय येते ते तर सांगा" असे म्हटल्यावर, गयावया करुन "अधिपती, आमचे चुकले. आम्ही परत असे करणार नाही, आम्हाला सोडा" असे विनवु लागले. यावर दरबा-यांनी यांना अजिबात असे सोडु नका असे अधिपतींना वारंवार सांगितले. दरबारात एकच गलका सुरु झाला. अखेरीस अधिपतींनी "यांच्या तोंडाला काळे फासुन गाढवावर बसवुन धिंड काढा आणि नगराबाहेर हाकलुन द्या " असे फर्मान सोडले. पहारेक-यांनी दोघांचे बखोटे धरुन बाहेर नेले. दरबार बरखास्त झाला. दरबारातील लोक, त्या दोघांची मजा पहाण्यासाठी बाहेर गेले. अधिपती आणि राजवैद्य सौध्यावर जावुन पहात बसले. लोकांचा मार खावुन, चपलांचे प्रसाद खावुन दोघे खुरडत खुरडत नगराच्या सीमेकडे चालले होते तर अर्यमन दुस-या दिशेने मागे वळुन न पहाता चालत होता. त्याचा आवडता कपोत त्याच्या डोक्यावरुन फडफड करत उडत होता तर घोरदर्शन चक्रमुखाच्या आणि चक्षुःश्रवसाच्या मागे मागे उडत चालला होता. खुरडत खुरडत सीमेच्या बाहेर पोचल्यावर दोघेही ओसाड जंगलाकडे निघाले. नगरवासीयांनी ते दोघे सीमेच्या बाहेर गेल्याचे पाहुन प्रचंड जल्लोष केला. तो जल्लोष ऐकुन त्या दोघांची हृदये अगदी विदीर्ण होवुन गेली. कुठुन ह्या भलत्या फंदात पडलो असे वाटुन त्यांची तोंडे अगदी काळीठिक्कर पडली होती. दोघेही ओसाड जंगलात येवुन पोहोचले. घोरदर्शन दोघांच्या मागोमागच होता. त्याला पाहुन भय वाटुन ते भरभर चालण्याचा प्रयत्न करत होते. कधी चालत, कधी खुरडत, आपट्या खात, धडकत कसे बसे काळ्या डोहाच्या कडेला येवुन पोहोचले. काळ्या डोहाच्या एका बाजुने येणा-या अवस्कराच्या प्रवाहात आपले पाय धुवुन दोघे तो प्रवाह येत असलेल्या गुहेत गेले. गुहा कसली ती तर काळ गुंफाच. तिथला काळ जणु जन्मापासुन गोठुन गेलेला. बाहेर चाललेल्या जगातील घडामोडींचे कोणतेही स्पंदन तिथल्या वातावरणात जाणवत नव्हते. शतकांचा दारूण पराभव तिथल्या वातावरणाला अजुन भकास, उदास बनवत होता. जिथे तिथे पडलेले हाडकांचे तुकडे क्वचित अंधारात चमकत होते. मेलेल्या प्राण्यांच्या मुंडक्यांचे भेसुर डोळे येणा-या प्रत्येकावर जसे काही नजर ठेवुन होते. रक्ताच्या ओघळांनी साकारलेली नक्षी अभ्यागतांचे स्वागत करत होती. मृ्त्युच्या दारात जावुन थबकलेल्या प्राण्यांच्या आर्त विव्हळण्याचा आवाज गुहेत प्रतिध्वनी होत भेसुरपणात भर घालत होता. मधुनच येणारा गुरगुरण्याचा आवाज वातावरणात अजुनच गुढपणा वाढवत होता. मधुनच येणारा टपक टपक आवाज कोणत्या दिशेने जायचे हे सुचित करत होता. त्या आवाजाच्या अनुरोधाने दोघेही एकमेकांचा हात धरुन जावु लागले. जाता जाता ते गुहेच्या आतमधे जावुन पोहोचले. आतमधे कुक्कुराच्या मांसाला पेटवुन मशाल बनवुन उजेड पाडला होता. तेथे एका उंचवट्यावर "ते" बसलेले होतं. केसाळ, लिबलिबित, हिरव्यागार डोळ्यांच्या खाचा मिचमिच करत, तीन मस्तकाचं, उग्र दर्प सोडत, एका तोंडानं गुरगुरत तर एका तोंडानं नुकत्याच मारलेल्या कुक्कुराचं आतडं चघळत, लाळ गाळत, एका तोंडानं सुस्कारे सोडत, विचित्र कुठलाही आकार नसलेलं पण त्रिमितीत दिसणारं "ते". विलक्षण दर्प सुटलेल्या त्या जागेत स्वतःभोवती डुलक्या घेत, अस्वस्थ सुस्कारे सोडत बसलेलं "ते". "त्याला" पहाताच दोघांच्या जीवात जीव आला. त्याच्याजवळ जावुन "आमचे रक्षण करा" असे वारंवार विनवु लागले. त्यांच्यापुढे कुक्कुराच्या मांसाचे तुकडे टाकुन "त्याने" बाजुला असलेल्या रक्त,मांसाच्या डबक्यामधे लोळण घेतली. पुर्ण त्यात डुंबुन जावुन बाहेर हळुहळु येवु लागला. आता त्याचे शरीर पिशितभुजाचे होवु लागले होते. पिशितभुजाला पाहुन ते दोघे आनंदित झाले. त्याच्याभोवती फेर धरुन नाचु लागले. पिशितभुजाने विचित्र आवाज काढायला सुरुवात केली. बाजुला पडलेल्या हाडांच्या झांजा बनवुन दोघे वाजवायला लागले. नाचायला लागले. मधुनच दोघे कवटीत साचलेले रक्त पिवु लागले. मांसाचे तुकडे चघळु लागले. पिशितभुजाच्या आवाजात आवाज मिळवुन कर्कश्श सुरात ओरडु लागले. गुहेतला आवाज वाढतच चालला. पिशितभुजाच्या कर्णकर्कश्श आरोळ्या ओसाड जंगलात ऐकु यायला लागल्या. ते ऐकुन घोरदर्शन हळुच परत मागे फिरला. लांबवरुन त्याने उडणा-या कपोताला पाहिले आणि तिकडे निघाला. सौध्यावर उभे असलेल्या राजवैद्यांनी घोरदर्शनाला कपोताच्या दिशेने जातांना पाहिले आणि अधिपतींकडे समाधानाने पाहुन म्हणाले "अधिपती, पिशितभुजाच्या कान्दिशिक नर्मदांचे मनोरथ विकल झाले. आता पुढील व्यतिपातापर्यंत चिंता नसावी. आपण आराम करावा". उडत जाणा-या कपोताकडे विचारहीन टक लावुन पहाणा-या अधिपतींना कोणती संवेदना दर्शवावी हे न सुचल्याने त्यांनी "हम्म" उद्गार काढुन शयनगृहाकडे प्रस्थान केले. राजवैद्यांनी उडणा-या कपोताच्या दिशेने पाहुन कुणी ऐकत नाही याची खात्री करुन "भो भद्रः, नमो नमः" असे म्हणुन संतोषाने आपल्या गृहाकडे प्रस्थान केले. शब्दार्थ : अर्यमन - सूर्य, दृढ मित्र , चक्रमुख - डुक्कर, चक्षुःश्रवस - सर्प, पिशितभुज - लांडगा, कान्दिशिक - घाबरलेला, आत्तगन्ध - अपमानित, नर्मद - खुषमस्क-या घोरदर्शन - घुबड. (संस्कृतच्या शब्दांचे अर्थ असे असावेत असे वाटते) संस्कृत शब्दकोश इथे ...!

वाचन 12345 प्रतिक्रिया 0