मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पत्रास कारण की

युयुत्सु · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मा० राष्ट्रपती मा० पंतप्रधान मा० सरन्यायाधीश, भारत सरकार स० न० वि० वि० या देशाचा नियमित कर भरणारा आणि कायद्याला भिणारा एक नागरिक म्हणून मला देशातील अधिकाधिक गढूळ वातावरणाची चिंता वाटते. आजचे गढूळ वातावरण भविष्याचा पाया असल्याने ते जास्त धोकादायक आहे. मुख्य म्ह० संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते. माझ्या अल्पमती धारणेनुसार अस्मिता माणसाला एक प्रकारे मानसिक ताकद देते. त्या ताकदीतून आत्मविश्वासाची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. तसेच प्रगतीच्या प्रयत्नांना दिशा पण मिळू शकते. पण टाचणी लागलेल्या फुग्याप्रमाणे किंवा काचेच्या वस्तू प्रमाणे अस्मिता फुटणार असेल तर ती अस्मिता किती खरी मानायची? अस्मितेची ऊर्जा दहशत निर्माण करण्यासाठी वापरायची की आपल्या प्रगतीसाठी याचे भान मोठ्या संविधानिक पदावरील पदांवरील व्यक्तीना नाही यासारखी शोचनीय गोष्ट दुसरी नाही. मी माझ्या वैयक्तिक उत्सूकतेपोटी कुत्र्यांच्या मानवीकरणाचा अभ्यास करतो. त्यातून माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट अशी की माणसे सहसा कुत्र्याच्या प्रत्येक ’योग्य’ वर्तनाला शाबासकी देतात, येताजाता त्याचे लाड करतात, पण माणसांच्या बाबतीत मात्र विरूद्ध वर्तन करतात. म्ह० माणसाच्या प्रत्येक ’योग्य’ वर्तनाला शाबासकी कधीही मिळत नाही. पण एखाद्या क्षुल्लक चुकीबद्दल उध्वस्त करणारी शिक्षा मिळू शकते. जी व्यक्ती १०० पैकी एकदा दोनदा चुकते त्याला लगेच शिक्षा आहे, पण जी १०० पैकी ९० वेळा जी चुकते ’तो/ती तशीच आहे’ म्हणुन दुर्लक्ष केले जाते. हा विरोधाभास कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरत नाही. संविधानिक आणि इतर मोठ्यापदांवरील व्यक्तींकडून वापरल्या जाणार्‍या हिंसक भाषेला आळा घालायची गरज निर्माण झाली आहे. कारण समाज घडनविण्यात त्यांची भूमिका अतिशय निर्णायक असते. एक सामान्य (आणि ज्येष्ठ) नागरिक म्हणून मी आपल्याला फक्त विनंती करू शकतो. प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी केवळ आपणच समर्थ आहात! माझ्या लहानपणी वृत्तपत्रांमध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये आलेली पत्रे न्यायालये स्वत:हून अर्ज म्हणून दाखल करून घेत असत. तसं काही माझ्या या जाहिर पत्रामुळे घडलं तर मीच नाही तर असंख्य सामान्य भारतीय आपल्याला दुवा देतील, याची मला खात्री आहे. -एक नागरिक

वाचन 7648 प्रतिक्रिया 0