मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे

वामन देशमुख · · पाककृती
तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे
नमस्कार मिपाखरांनो! महाराष्ट्रात आंब्याचे लोणचे घालायचे दिवस येऊ घातलेत. त्यानिमित्ताने तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे ही पाककृती सादर करत आहे. आवड असल्यास नक्की करून पहा. साहित्य:
  • कैऱ्या - चार किलो
  • लसूण - अर्धा किलो
  • आलं - अर्धा किलो
  • तिखट - एक किलो
  • मीठ - एक किलो
  • मोहरी पूड - ५० ग्राम
  • जिरे पूड - ५० ग्राम
  • मेथी पूड - ५० ग्राम
  • शेंगदाण्याचे तेल - तीन किलो
कृती: आंब्याच्या फोडी दोन-तीनदा भरपूर पाणी घालून स्वच्छ धुऊन घ्या. कपड्यावर टाकून कोरड्या करून एका स्टीलच्या मोठ्या भांड्यात घाला. आलं-लसणाची पेस्ट करून त्यावर घाला. नीट हलवून चांगले एकत्र करा. त्यावर मीठ, तिखट, मोहरी पूड, जिरे पूड, मेथी पूड घाला. पुन्हा चांगले एकत्र करून घ्या. झाकून ठेवा. शेंगदाण्याचे तेल चांगले गरम करून थंड करून घ्या. थंड तेल वरील मिश्रणात घालून नीट हलवून एकत्र करून घ्या. काचेच्या / चिनीमातीच्या हवाबंद बरण्यांत घालून झाकण लावून ठेवा. तीन-चार दिवसानंतर, पुढचे वर्षभर खाण्यासाठी लोणचे तयार होईल. बोनस रेसीपी: चार-आठ दिवसांनी या लोणच्यातील एक किलो वेगळे घेऊन त्यात अंदाजे १०० ग्राम गूळ घाला. अप्रतिम चवीचे गोड लोणचे तयार होईल. टीपा:
  • कच्चे आंबे (कैऱ्या) ह्या निबर, गडद हिरव्या सालीच्या, आतून पांढऱ्या, आंबट अश्या बघून घ्याव्यात. मऊ, पिवळट, गोडसर अश्या घेऊ नयेत.
  • लसूण हा चांगल्या घट्ट गड्ड्यांचा, तीक्ष्ण चव व वासाचा असा घ्यावा.
  • आलं हे चांगल्या प्रतीचे, मोठमोठ्या खांडांचे, तीक्ष्ण चव व वासाचे घ्यावे.
  • तिखट हे लाल रंगाचे, तिखट चवीचे घ्यावे.
  • बरण्यांत घातल्यावर नेहमीच लोणच्यावर तेलाचा वर थर असावा. फोडी उघड्या पडू नयेत, नाहीतर लोणचे खराब होऊ शकते.
  • वरील साहित्याचे मोजमाप हे, तयार लोणचे चार जणांच्या कुटुंबाला पैपाहुणे, शेजारी-पाजारी यांसहित वर्षभर पुरेल अश्या हिशेबाने दिले आहे. आपापल्या गरजेप्रमाणे त्यात कमी अधिक बदल करावा.
  • फोटोंतील दिसणारे साहित्य प्रमाणात दिलेल्या असेलच असे नाही.
  • सदर पाककृती माझ्या अर्धांगिनीने सिद्ध केली आहे. मिपाखरांच्या कौतुकावर तिचा अधिकार आहे.
बाजारातील कैऱ्या बाजारातील कैऱ्या बाजारातून फोडून घेतलेल्या फोडी बाजारातून फोडून घेतलेल्या फोडी तिखट मीठ मसाला तिखट मीठ मसाला  आलं लसूण पेस्ट घातली आलं लसूण पेस्ट घातली फोडींवर मसाला घातला फोडींवर मसाला घातला एकत्र केल्यानंतर एकत्र केल्यानंतर फोटोसाठी फोटोसाठी तापवून थंड केलेले तेल तापवून थंड केलेले तेल सर्व एकत्र केलेले सर्व एकत्र केलेले एवढे तेल पुरेसे नाही, अजून घालावे लागेल एवढे तेल पुरेसे नाही, अजून घालावे लागेल हा एक फोटो वरील क्रमात द्यायचा राहिला होता! ;-) हा एक फोटो वरील क्रमात द्यायचा राहिला होता! ;-) जाता जाता:
  • महाराष्ट्रात, "पहिला पाऊस पडून गेल्यावर आंब्याचे लोणचे घालावे म्हणजे टिकते. उन्हाळ्यात घातले तर उष्णतेने खराब होऊ शकते" असे म्हणतात.
  • आंध्र-तेलंगाणात, "आंब्याचे लोणचे उन्हाळ्यातच घालावे म्हणजे टिकते. एकदा पावसाळा सुरु झाला की मग दमटपणाने खराब होऊ शकते" असे म्हणतात.
आमच्या घरी दोन्ही ठिकाणांची लोणची टिकतात! धन्यवाद. _/\_

वाचन 11544 प्रतिक्रिया 0