थंडीतली खाद्ययात्रा.

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
28 Dec 2023 - 9:33 am

थंडी हा माझा आवडता ऋतू आहे,असं मी मागच्या लेखात म्हटलंच आहे. थंडीमध्ये आणखीही एक मज्जा असते. ती म्हणजे थंडीतली खाद्ययात्रा!

थंडीत सर्वात जास्त मजा असते ती हुरडा पार्टीत. मस्त एखाद्या शेतावर जायचं. शेतात मध्यभागी एक बेताच्या आकाराचा खड्डा खणलेला असतो. त्यात शेणाच्या गोवऱ्या, कोळसे,पेटते निखारे धगधगत असतात. कोवळी ज्वारीची कणसं तोडून ठेवलेली असतात. तिथला शेतमजूर एक बारीक पण मजबूत काठी त्या ज्वारीच्या कणसात खुपसतो आणि त्या शेकोटीत घालतो. सर्व बाजूंनी फिरवून फिरवून कणीस भाजतो. कणीस नीट भाजलं गेलं की ते बाहेर काढून हातावर चोळायचं , आणि कोवळे, भाजलेले दाणे खायचे. ते दाणे काय लागतात म्हणून सांगू!अहाहा! पुनश्च अहाहा! त्याला तूप,मीठ लावलं की सोने पे सुहागा! त्याच शेकोटीत कोवळी,ताजी वांगीही भाजतात. मिरच्याही भाजतात. मक्याची कणसंही भाजतात. कणसाच्या दाण्याला तूप मीठ लावून सोबत मिरचीचा तुकडा तोडत खायचं. बरोबर गोड दही असेल तर भाजलेल्या वांग्याबरोबर खायचं. वाह,वा!वाह वा!हाय कंबख्त तूने खाया ही नहीं।

मी अशा चार/पाच हुरडा पार्ट्या एन्जॉय केल्या आहेत. माझ्या आजीच्या शेतावर, समडोळीला, कर्नाटकात भतगुणकीला, खानदेशात धुळ्याजवळ, आणि कोल्हापूरला देखील.

थंडीतली दुसरी पार्टी म्हणजे पोपटीची पार्टी. एका खड्ड्यात मडकं ठेवून, त्यात पोपटीच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, गाजर, कांदे, बटाटे, रताळी, मीठ, तिखट घालायचं. भांबुर्डीचा पाला, इतर पाला, काटक्या, लाकडाच्या लहान ढलप्या घालून मडक्याच्या कडेनं जाळ पेटवायचा. त्या धगीत मडक्यातले सर्व पदार्थ,कंद मस्त भाजून निघतात. त्याला तिखट, मीठ लागतं (यात पाणी अजिबात घालायचं नसतं बरं का!) मग ह्या पोपटीच्या शेंगा सोलून खायच्या. मस्ताड लागतात. भाजलेली गाजरं, रताळी पण झक्कास चव देतात.

थंडीत नवीन पिकं तयार होतात. भरपूर भाज्या मिळतात. त्यामुळेच मिश्र भाज्यांचे प्रकार शिजवले जातात. थंडीतला आणखी एक पदार्थ म्हणजे उंधियु. सुरती पापडी, सुरण, पिकलेली केळी, लहान वांगी,वालाचे ओले दाणे, रताळी, कोनफळ,बटाटे, कोवळ्या मेथीचे तळलेले मुटके घालून केलेली ही मिश्र भाजी अफलातून लागते. हा खास गुजराती पदार्थ. पण आता सर्वत्र मिळतो. गुजरातमध्ये संक्रांतीला पतंग उडवतात. घराच्या गच्चीवर सकाळी जे जातात ते मांज्यामुळे कापलेली, रक्ताळलेली बोटं घेऊन संध्याकाळीच घरात परत येतात. तिथं गच्चीवरच भूक लागली की उंधियु खातात. मेथीचे गोटे,गूळपोळी,बोरं, उकडलेल्या शेंगा हे खास थंडीबेनने दिलेले पदार्थ खात खात पतंग उडवतात.

ह्याच थंडीत खाण्याची रेलचेल असलेला नाताळ येतो आणि जुन्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं आगमन होतं ते खाण्यापिण्याचा मनसोक्त आनंद वाटून टाकणाऱ्या थंडीतच.

थंडीत गुऱ्हाळ पार्टीलाही मजा येते. गुऱ्हाळात प्रचंड, राक्षसी आकाराच्या काहिलीत रस उकळत असतो. त्या पातळ गुळावर तो थंड होत असताना साय येते. ही साय नुसती किंवा शेंगदाण्याबरोबर मस्तच लागते. कसली खमंग लागते ही साय!मिष्ट गोड! लई ग्वाड बगा पाटील!!

ऊसाचा रस,सोलाणा,बोरं हा थंडीतला मेवा. लहान बाळाला त्याच्या पहिल्या संक्रांतीला बोरनहाण घालतात. उसाचे करवे,बोरं, बत्तासे, बिस्कीटं, तिळगुळाच्या वड्या,रेवड्या, गोळ्या,चाॅकलेटस्,मटाराच्या शेंगा,सोलाणा, चुरमुरे, लाह्या हे पदार्थ बाळाच्या डोक्यावर ओतून त्याला नहायला घालतात. हे पदार्थ म्हणजे थंडीतला मेवाच.

गुळाची पोळी संक्रांतीला करतात. ती अतिशय खमंग लागते. पण त्यावर कणीदार तुपाचा गोळा हवाच बरं का! पातळ तूप नाॅट अलाऊड. संक्रांतीला एकमेकांना तिळगूळ देऊन "गोड बोला" अशी प्रेमळ आठवण करून देतात. सर्वात मजा असते भोगीला. भोगीला नवीन ताज्या भाज्यांची पारंपरिक भाजी करतात. या भाजीला लेकुरवाळी भाजी असंही म्हणतात. या भाजीत वांगी, पावट्याचे दाणे, सोललेले ओले हिरवे हरभरे, वालाच्या शेंगा,गाजर, मटार दाणे, ओल्या तुरीचे दाणे, बोरं, ऊसकांड्या, पेरु, शेंगदाणे घालून मिश्र भाजी करतात. या भाजीबरोबर पोळी नाही हं खायची! बाजरीची तीळ लावलेली भाकरी खायची. त्यावर लोण्याचा गोळा. तूप नाॅट अलाऊड!काय मझा येतो राव खाताना! ही थंडी आपली जिव्हा तृप्त करते.

आणि आपले कान तृप्त करतात, थंडीवर आधारित हिंदी सिनेमातली गाणी. माझ्या मागच्या लेखाचं शीर्षक होतं "मुझको ठंड लग रही है". आणखीही गाणी आहेत. "ठंडी हवाऍं"लताचं अजरामर गाणं, "ठंडी ठंडी हवा,पूछे उनका पता"गीता दत्त,"ठंडी हवा ये चाॅंदनी सुहानी"किशोर,"ठंडी हवा काली घटा "गीता दत्त,"ठंडी ठंडी हवा खाने राजा गया गांवमें" लता.अशी बरीच!

"सरकायलो खटिया" सारखी थंडीची गाणीही आहेत. पण त्यांच्या खोलात न जाता इथंच थांबणे इष्ट. समजून घ्या !!

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

कंजूस's picture

28 Dec 2023 - 9:43 am | कंजूस

हुरडा आणि गुऱ्हाळ सोडून बाकीचं खायला मिळालं आहे. कोकणातली पोपटी काही आवडली नाही. वांगी,बटाटे,रताळी या सर्वांना कांदा खोबरं लावतात. वालाच्या शेंगा आवडत नाहीत. तुरीच्या मात्र आवडतात.

Bhakti's picture

28 Dec 2023 - 1:37 pm | Bhakti

मस्तच!
गुऱ्हाळाच्या आठवणी तर खूप सुंदर आहेत.यथेच्छ रस,ताज्या गुळाच्या चिकट्या!
पोपटी कधी नाही खाल्ली.उंधियो कधीतरी चाखला होता.
हूरडा भाजण्याचे तंत्र घरी जमत नाही,तो रानातच जमते
हुरडा प्लेट-रेवडी,गुडीशेव,चटणी, गुळ खोबरे फक्त दही मिसिंग आहे.
Q

मुक्त विहारि's picture

29 Dec 2023 - 7:07 pm | मुक्त विहारि

ह्या भागात, उबाडियो नावाचा प्रकार करतात.. सेम पोपटी..

उबाडीयो, खूप वेळा खाल्ला आहे

माझ्या या आधीच्या "मुझको ठंड लग रही हैं" आणि हा लेख म्हणजे "थंडीतली खाद्ययात्रा" या दोन्ही लेखांवर आपण सर्वांनी वाचने आणि प्रतिसाद दिलेत त्याबद्दल सर्वांचेच मनःपूर्वक आभार मानते. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jan 2024 - 8:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजी अजून लेखन वाचलं नै. सध्या लै धावपळ. निवांत वाचून प्रतिसाद देईन.
ही केवळ पोच.

-दिलीप बिरुटे