श्रीगणेश लेखमाला २०२३ - माझा खत प्रकल्प

निमी's picture
निमी in लेखमाला
21 Sep 2023 - 2:24 pm

माझा खत प्रकल्प

घरातील ओल्या कचऱ्याचं सुंदर गांडूळ खत होतं, हे मला माहीत असूनही त्याचा योग येत नव्हता. खत करण्यासंबंधी एक-दोन छोट्या पुस्तिका वाचनात आल्या होत्या. गांडूळ हा प्राणी तसा अगदी निरुपद्रवी, पण अतिउपयोगी. आवाज नाही, रडारड केकाटणं नाही, खाण्यापिण्याची तक्रार नाही, बाळंतपणसुद्धा अगदी बिनबोभाट. नर-मादी असा भेदभाव नाही. प्रजननाचा ठरावीक काळ नाही.. मादीला भुलवणं, इतर नरांशी स्पर्धा करत हिंसा करणं नाही. तसा अगदी सोपा, सुटसुटीत जीव. तरीही 'गांडूळ' म्हटलं की काहीतरी वळवळल्यासारखं वाटायचं आणि ते खत करणं लांबणीवर पडायचं. गांडूळ हा शब्द का कुणास ठाऊक फारसा देखणा नाही, आणि उच्चारतानाही भारदस्त वाटत नाही. उगीचच काहीतरी घाण वाटतं. तरीही एकदा हा प्रयोग करायचा असं ठरवलं. माझ्या मैत्रिणीने - अलकाने त्यासाठीचं सगळं प्रशिक्षण घेतलेलं आहे. तिने मला मोफत प्रशिक्षण, एक-दोन शेणी आणि काही गांडुळंसुद्धा मोफत देण्याचं आनंदाने मान्य केलं.

"हे पाहा, आधी एका बादलीत किंवा डब्यात रोजचा कचरा गोळा करायला लाग. कचरा जमून चांगला कुजला पाहिजे" असा सल्ला दिला. झालं.. कचऱ्यासाठी मी खास मोठा डबा केला. घरातील सर्वांना सांगितलं, "सर्व ओला व सुका जैविक कचरा, जो कुजू शकतो, तो ह्या डब्यातच टाका." भाजीच्या पेंड्या निवडतानाच्या काड्या, मटार-पावट्याच्या शेंगांची फोलपटं, कांदा-लसणाच्या सालीसह कागद, चहाचा चोथा, नारळाच्या शेंड्या, फळांच्या साली डब्यात जमू लागल्या. पाहता पाहता डबाभर केरकचरा सहज जमा झाला. ठरल्या दिवशी सकाळी अलका आली. कुजलेला कचरा पाहून खूश झाली. खतासाठीच्या बादलीला भोकं पाडून त्यात विटांचे तुकडे, नारळाच्या शेंड्या कशा भरायच्या ते सांगून दुपारी स्वतः गांडुळांसह येण्याचं आश्वासन देऊन गेली. मुलीच्या मदतीने मी विटांचे तुकडे करून, शेंड्या घालून बादली भरून तयार करून ठेवली.

आमची जेवणं करून अलकाची वाट पाहत होते. अलका ठरल्यावेळी आलीच. माझा कुजलेला कचरा पुरेसा जमा झाला असल्याने बादलीत तो घालून वर शेण्या, पाणी आणि तिच्या घरी सुखासमाधानाने नांदणाऱ्या गांडुळांना प्रवास घडवून माझ्या घरी सोडलं. "यांना मुंग्या लागू देऊ नकोस" असं बजावून सांगून ती गेली. दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या मी खताच्या बादलीकडे गेले. काळ्या मुंग्यांची भली मोठी रांग लागली होती. अरे देवा...! पहिलीच गांडुळं हुतात्मा झाली की काय असं वाटलं.. पण नाही! पाणी आणि लक्ष्मण रेघेने मुंग्यांनी काढता पाय घेतला.

कचरा वर-खाली करून हवा खेळती कशी करायची, ते आठ दिवसांनी अलकानेच दाखवलं. गांडुळं मजेत असल्याने अलकाही हसली आणि परत गेली. चार दिवसांनी आपणही पाहावं कचरा वर-खाली करून, असं वाटल्याने मी कचऱ्यात हात घातला. गांडुळं गायब! चार दिवसांपूर्वी तर भरपूर होती. 'कुठे गेली सगळी? आता अलकाला काय सांगायचं? साधी गांडुळं पाळायला जमत नाहीत आपल्याला.. छे..छे. काय हे.. दोन मुलींना काय सांभाळणार आपण!' असे विचार मनात आले. आणि इतक्यात.. काय आश्चर्य! आणखी खोल हात घातल्यावर 'गांडूळ संमेलन' असल्यासारखी अनेक गांडुळं एकत्र होती. इतकंच काय.. अनेक जीव तर प्रजोत्पादनाच्या कामात अगदी मग्न असताना मी हे पाप केलं होतं. त्याच क्षणी मला महाभारतातल्या पंडू राजाची आठवण झाली. अनवधानाने त्यानेही कुण्या ऋषीला हरणाच्या रूपात त्या अवस्थेत मारलं असल्याने शाप दिला होता. माद्री आणि पंडूराजाचा झालेला शेवटही आठवला. 'उगीचच या खत प्रकल्पात हात घातला' असं वाटायला लागलं. रात्री तर नवऱ्याकडे पाहतानाही उगीचच धडधडायला लागले. मी दुसऱ्या खोलीत झोपून गेले.

सकाळी उठल्याबरोबर आणखी थोडा कुजलेला कचरा अर्थात गांडुळांचा खाऊ आणि पाणी घेऊन गेले. बादलीला नमस्कार करत सगळ्या गांडुळांची माफी मागितली. झाला प्रकार अनवधानाने घडला असल्याचंही सांगितलं. आमिष, प्रसाद म्हणून कचरा, पाणी घातलं. काहीही ढवळाढवळ न करता त्यांना सुखाने प्रजा वाढवण्याचं आवाहन केलं. मी पूर्वसूचना देऊनच त्यांच्या एकांतात.. तेही केवळ त्यांच्या हितासाठी लक्ष घालेन असं वचनही दिलं. गांडुळं माझ्यावर प्रसन्न झाली. भरभरून वाढणाऱ्या प्रजेने, त्यांच्या मुला-नातवंडांनी बादलीतील कचऱ्याचं खतरूपी सोनं केलं होतं. त्यांच्या पुढच्या पिढीसाठी आणि त्या सर्वांच्याच यशस्वी वाटचालीसाठी कचऱ्याची दुसरी बादलीही तयार आहे आणि मी, माझा खत प्रकल्प, माझ्या नवऱ्यासह आनंदात.. समाधानात नांदत आहे.

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

ते एका ज्येष्ठ मिपाकर सदस्यांचे क्षेत्र आहे. (मी कोणाचे नाव घेत नाही). आपण त्यात कशाला पडा?

तर काय सांगत होतो.. हे वयोवृद्ध ज्येष्ठ सदस्य हौसेने आणि तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने चार पाच तास नदीवर जाऊन गळ टाकून बसतात. मग परत येताना मासळी बाजारात फेरी मारून तिथून पिशवी भरून घरी येतात असे ऐकले.

तुम्ही खोडसाळ मिपाकर असल्याने ह्या धाग्यावर फारच अवांतर करता राव. त्यांच्या त्या विवक्षित धाग्यावरच प्रतिसाद द्या ना.

पण कोणाचेच नाव घेतले नसताना तुम्ही कोणा विशिष्ट ज्येष्ठ व्यक्तीकडे असा थेट अंगुलीनिर्देश करणे खटकले असे प्रांजळपणे(१) सांगू इच्छितो.

बाकी खोडसाळ सदस्य वगैरे हा खोडसाळ अपप्रचार आहे असे नम्रपणे(२) नमूद करतो.

तळटीप १ आणि २. - हे दोन्ही गुण आपल्यात आहेत हे काहीसा आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगणे आवश्यक होते. धन्यवाद. एका चांगल्या धाग्याचे काश्मीर करू नये अशी विनंती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Sep 2023 - 11:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गांडुळाचं दुसरं काही तरी नाव पाहिजे होतं. उच्चारायला सोपं आणि शब्दातून काही तरी सौंदर्य बोध व्हायला पाहिजे असं. सुरवंट (टू )वगैरेही चाललं असतं. गांडुळापासून निर्मित कच-याचे खत होणे ही अतिशय नैसर्गिक आणि सुंदर प्रोसेस वाटते.

आम्ही लहानपणी त्याला शिदोड म्हणत असू पण ते शिदोड फारच अशक्त वाटायचे. घरातील-शेजारी फार हूंदडणा-या लेकरांना काय शिदोडा सारखं वागतोय असे म्हणायचे. वयपरत्वे शिदोडाचं गांडुळ झालं. आणि गांडुळापासून नैसर्गिक खत तयार कसे होते आणि शेतीसाठी ते किती महत्वाचं आहे हे समजून गांडूळाचं महत्व समजलं. आणि त्यांचं महत्व समजलं. माशाच्या गळाचं टोक क्रूरपणे टोचतांना वाईट वाटतं, पण माशाच्या आमिषा पोटी आणि 'जीवो जीवस्य जीवनम्' सनातनी सूत्रानुसार हे असं चालायचंच म्हणून समजूत घालतो.

-दिलीप बिरुटे

चामुंडराय's picture

28 Sep 2023 - 3:54 am | चामुंडराय

गांडुळाचं दुसरं काही तरी नाव पाहिजे होतं. >>>>>

ज्यांना त्या शब्दाची अ‍ॅलर्जी आहे ती मंडळी "मांडूळ" म्हणताना ऐकले आहे.

काही ठिकाणी तसे असेल. पण मांडूळ हे नाव एका सापासाठी अधिक प्रचलित आहे असे वाटते. सँड बोआ उर्फ दुतोंड्या या बिनविषारी सापाचे मराठीतले आणखी एक नाव. याची प्रचंड तस्करी चालते खूप किंमत मिळत असल्याने.

शंका काढून टाकायला खात्रीच करून घ्या. तुमच्या बेसमेंट मध्ये कचरा कुजतो म्हणून वास येतो.. पण गांडुळे रुजली नसल्याने खत होत नाही. गांडूळांना जपावे लागते..मांजर, घुशी लागून देऊन चालत नाही.. त्यामुळे जमिनीवर त्यांना चांगले वाढवता येत नाही.. म्हणून माझ्याकडे तरी वेलकम इन घर अँड बाल्कनी.

रोगापेक्षा इलाज जालीम होतोय हा..

आग्या१९९०'s picture

28 Sep 2023 - 12:10 am | आग्या१९९०

छान प्रकल्प!
गांडूळ खत तयार होत असताना अजिबात दुर्गंधी पसरत नाही, उलट गांडूळ खताला हवाहवासा सुगंध असतो. प्रकाश आणि उष्णता जास्त असल्यास गांडूळ कचऱ्यात खाली जाऊन बसतात त्यामुळे खत लवकर तयार होत नाही.

छान खुसखुशीत लेख. मी गेले तीन वर्षे गांडूळखत करते. मी गांडूळ्खताचा बेड व गांडुळे मागवली होती. मोठी लांबट जाड्या प्लास्टीकची बॅग असते. त्यात पाला-शेणखत असे थर देऊन गांडूळे सोडते. दर ३-४ महिन्याने गांडूळखत मिळते.

मी तर बायोकल्चर वापरुन किचन वेस्टचे खत बनवतो आणि त्या प्रोसेसमध्ये गांडूळनिर्मिती होते. त्यामुळे माझे तरी काम बरेच सोपे झाले आहे. कारण गांडूळ कल्चर ४०० रुपये किलो मिळते आणि बायोकल्चर हे त्यामानाने स्वस्त पडते.