मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जागतिकीकरणाची कहाणी भाग १: जागतिकीकरण म्हणजे काय?

क्लिंटन · · काथ्याकूट
नमस्कार मंडळी, अहमदाबादमधील भारतीय प्रबंधन संस्थान (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) या संस्थेच्या निवडप्रक्रियेतील पहिला टप्पा हा कॉमन ऍडमिशन टेस्ट आणि दुसरा टप्पा निबंधलेखन आणि वैयक्तिक मुलाखत असा असतो.मला निबंधाचा विषय ’Globalization has failed to live up to its potential' असा होता. मी दिल्लीतील भारतीय विदेश व्यापार संस्था (Indian Institute of Foreign Trade) या संस्थेच्या मुलाखतीलाही गेलो होतो. त्या मुलाखतीमध्ये जागतिकीकरण,परदेश व्यापार यावर प्रश्न विचारतात.तेव्हा या विषयाची तयारी मी आधीच केली होती. IIFT ने क्लिंटनला पळवून लावले पण त्या मुलाखतीसाठी केलेली तयारी अहमदाबादच्या संस्थेच्या मुलाखतीसाठी उपयोगी पडली.मिपावर एक चांगली चर्चा घडवून आणायला हा विषय योग्य आहे असे मला वाटले म्हणून हा लेखप्रपंच. या लेखमालेत माझ्या निबंधातील मुद्दे तर आहेतच आणि इतरही काही मुद्द्यांचा समावेश करत आहे. सुरवात करू जागतिकीकरण म्हणजे नक्की काय आणि त्याचे उद्दिष्ट काय यापासून.यासाठी मागे जायला हवे मानवजातीच्या विकासाच्या एका जुन्या टप्प्यात--जेव्हा राष्ट्र ही संकल्पना उदयास यायची होती. माणूस अजूनही गुहेतच राहत होता.मूलभूत गरजांपैकी अन्न ही गरज माणूस शिकार करून भागवत होता.वस्त्र म्हणून फारतर जनावरांची कातडी वापरत होता.आणि निवारा म्हणून गुहा होत्याच.अशा अत्यंत कमी गरजा असलेल्या काळात प्रत्येक माणूस आपापली शिकार करून राहू शकत होता.त्यासाठी इतरांवर अवलंबून राहायची गरज नव्हती.नंतरच्या काळात मानवी संस्कृतीचा विकास झाला आणि माणूस छोट्या समूहाने पाण्याच्या स्त्रोताजवळ वस्ती करून राहू लागला.माणसाच्या गरजाही आता वाढल्या.अन्न म्हणून केवळ शिकारीवर अवलंबून न राहता धान्य पिकवले जाऊ लागले.वस्त्राचीही माणसाला गरज भासू लागली.निवारा म्हणून छोटी घरे गरजेची झाली.एकदा घरे झाल्यावर आत लोखंडी,लाकडी,तांबे-पितळेच्या वस्तू गरजेच्या झाल्या.शेतीसाठी नांगर,वाहतुकीसाठी बैलगाड्या आणि रथ गरजेचे झाले. हौस म्हणून सोन्या-चांदीचे दागिनेदेखील गरजेचे झाले. समाजाचे हिंस्त्र श्वापदे आणि शत्रू यापासून संरक्षण करायला सैन्याचीही समाजाला गरज लागू लागली. यात इतरही अनेक गोष्टींचा समावेश करता येईल पण सांगायचा मुद्दा म्हणजे मानवी संस्कृतीचा जसाजसा विकास झाला तशा समाजाच्या गरजाही मोठ्या प्रमाणावर वाढल्या.आता या सगळ्या गरजा प्रत्येक माणूस आपल्या पातळीवर पूर्ण पडायला अपूरा पडू लागला.यातूनच वस्तूविनिमय पध्दती वापरात आली.या पध्दतीचे मूलभूत तत्व असे की प्रत्येकाला गरजा अनंत असतात आणि या सगळ्या गरजा पूर्ण करायला प्रत्येकाकडे वेळ आणि कौशल्य नसते. शेती चांगली करू शकणारा माणूस सोन्याचे दागिने चांगले घडवू शकेलच असे नाही.तसेच सोन्याचे दागिने चांगले घडवणारा मनुष्य चांगली शेती करू शकेल असे नाही.तेव्हा ज्याला शेती चांगली येते त्यानेच सोन्याचे दागिने घडवले तर त्याचा दर्जा चांगला असेल असे नाही.तेव्हा प्रत्येकाने आपल्याला जी गोष्ट चांगली येते ती करावी आणि इतरांबरोबर देवाणघेवाण करावी.म्हणजे सगळ्यांनाच चांगल्या दर्जाच्या वस्तू/सेवा वापरता येतील.नाहीतर शेती चांगली येते अशा माणसास निकृष्ट दर्जाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याचे दागिने चांगले येतात अशा माणसास कमी दर्जाचे धान्य वापरावे लागेल. म्हणजे मी इतरांच्या गरजा पूर्ण केल्या की इतर लोकही आपल्या गरजा पूर्ण करतील अशी ही व्यवस्था होती.इतरांशी देवाणघेवाण करण्यात कसलाही कमीपणा नाही हे यावरून लक्षात येते. आता हीच संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेली की तेच जागतिक व्यापाराचे मूलभूत तत्व बनते.भारतासारख्या देशातील लोकांना संगणक प्रोग्रॅमिंगमध्ये गती असेल पण इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या देशात किफायतशीर पध्दतीने उत्पादित केल्या जाऊ शकत नसतील तर ’आम्ही तुम्हाला सॉफ्टवेअर देतो. त्यातून मिळालेल्या पैशातून आम्ही इतरांकडून हार्डवेअर विकत घेतो’ अशा स्वरूपाचा व्यवहार करण्यात येतो.यातूनच दोन्ही देशांमधील लोकांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे दोन्ही चांगल्या प्रतीचे वापरायला मिळते.यात दोन्ही देशांचा फायदाच आहे.अर्थात एका देशात कोट्यावधी लोक राहतात त्यामुळे वैयक्तिक पातळीवर जसे व्यवसायांचे पूर्णपणे 'specialization' झाले तसे देशपातळीवर होऊ शकत नाही.पण त्यातूनही अर्थकेंद्रित (Capital Intensive) आणि मनुष्यबळ केंद्रित (Labor Intensive) अशा स्वरूपाचे वर्गीकरण उद्योगांत होऊ शकते.आणि मनुष्यबळ जिथे स्वस्तात उपलब्ध आहे असे देश (उदा.चीन) दैनंदिन वापरात असलेल्या अनेक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्यात करतात.अशा वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग ’मनुष्यबळ केंद्रित’ असतात. मुख्य मुद्दा म्हणजे अशा प्रकारच्या व्यापारातून दोन्ही देशांचा (गावातील दोन माणसांप्रमाणेच) फायदा होऊ शकतो.आणि वस्तूंची आयात करण्यात कसलाही कमीपणा नाही.उलट आपण कोणत्या वस्तू/सेवा अधिक चांगल्या आणि स्वस्त उत्पादित करू शकतो त्यावर लक्ष केंद्रित करून आपली निर्यात कशी वाढेल हे बघितले पाहिजे.यात सगळ्यांचाच फायदा आहे. जसे गावपातळीवरील व्यवहारात प्रत्येक माणूस इतर कोणाही व्यक्तीकडून आपल्याला गरजेची असलेली वस्तू/सेवांची कोणत्याही आडकाठीशिवाय देवाणघेवाण करू शकत असे त्याच पध्दतीने एका देशात निर्माण होत असलेल्या वस्तू/सेवा आणि मनुष्यबळ यांची देवाणघेवाण कोणत्याही आडकाठीशिवाय जगभरात कुठेही होऊ शकणे यालाच खरे जागतिकीकरण म्हणता येईल. आता जागतिकीकरण या अर्थाने झालेले नाही हे तर उघडच आहे.आता त्यामागची कारणे नंतरच्या लेखांमध्ये. लगेच पुढचा लेख जागतिकीकरणाच्या फायद्या-तोट्यावर.

वाचन 32275 प्रतिक्रिया 0