संदीप उवाचः
तर सुजाण मिपाकरहो, धाग्याचं नाव वाचून एका अचानक घडलेल्या मिपाकट्ट्याचा वृत्तांत वाचायला मिळणार हे तुम्ही ओळखलच असेल. पण हा अचानक ठरलेला कट्टा सुमारे दोन दिवाळी अंक पाहिलेला आहे. म्हणजे सर्वांची तारीख आणि ठिकाण हे काही केल्या ठरत नव्हते. ते एकदाचे ठरले आणि कट्टा यशस्वीरित्या अगदी मजेत पार पडला. कट्ट्याला प्रचेतस (पूर्वाश्रमीचे वल्ली), प्रशांत (सरपंच), टर्मिनेटर, ज्ञानोबाचे पैजार (पैजारबुवा), तुषार काळभोर (पूर्वाश्रमीचे पैलवान) आणि मी व माझी कन्या मानसी इत्यादी हजर होतो. कट्टा मॅप्रो गार्डन, लोणावळा व भाजे लेणी अशा ठिकाणी घडला. याहून आधिक माहितीपर न लिहिता वृत्तांताला सुरूवात करतो.
सकाळी सव्वासातला घर सोडले. बरोबर आठ वाजता ठरलेल्या ठिकाणी पोचण्याचा विचार आमच्या कन्या रत्नाने रस्त्यात तीन वेळा वॅक वॅक वॅक साठी गाडी थांबवायला सांगून हाणून पाडला. शेवटी पावणे नवाच्या ठोक्याला पोचलो तर पाच शिलेदार घोळका करून थांबलेले. वल्ली आणि प्रशांत यांना आधी भेटलो असल्याने अडचण आली नाही. पैलवान आणि टर्मिनेटर यांनाही आधी पाहिलेले फोटोमध्ये. पैजारबुवांना मी प्रथमच पाहत होतो, तेही साक्षात! आधी तर दंडवतच घालणार होतो पण तेवढ्यात तिथे झाडू मारायचा बाकी आहे असे समजल्यावर तो विचार पुढे ढकलला तो कायमचाच. पैजारबुवाको मात्र मैने जैसा सोचा था वैसाही पाया. फक्त त्यांचे पुढचे दात अजून पडलेले नाहीत आणि अगदीच
"जख्ख" वगैरे म्हणण्याइतके ते म्हातारेही झालेले नाहीत. असा थोडासाच माझा अंदाज चुकल्यामुळे मला बरे वाटले.
मॅप्रो गार्डन, लोणावळा, हे ठिकाण सुचवल्याने सर्वचजण तुकांच्या निवडीचं कौतुक न करतील तर ते मिपाकर कसले? पंधराएक मिनीटे (की जास्त?) त्यांच्या कौतुकाचा कार्यक्रम पार पडला. टर्मिनेटर तर इतके खूष झालेले की त्यांनी तुकांच्या सत्कारासाठी कालच हार आणून ठेवलेला म्हणे, पण त्यातली फुले आज सकाळी सुकल्याने त्यांनी तो हार वाटेतच टाकला. खरेखोटे तो हारच जाणे. असो, नंतर मग जशा टुरिस्टांच्या एकेक गाड्या येऊन पार्क होऊन ते आत जाऊ लागल्या तसे सर्वानुमते आपणही आत जावे असे ठरले.
माझी मुलगी मात्र मॅप्रो गार्डन पाहून खूपच खूष झालेली! आपल्या वॅक वॅक वॅक चे कष्ट कसे वर्थ होते ह्यावर तिला स्वतःचेच कौतुक वाटत होते.

साधारणपणे सकाळी नाष्ट्याला, पोहे, उपमा, इडली, मेदूवडा सांबर, लोणीस्पंज डोसा(बेन्नेचा) झालंच तर मिसळपाव, साबुदाणा खिचडी नाहीतर ऑफिसच्या दुपारच्या डब्यासाठी असलेली भाजी आणि चपाती, चहा-चपाती, चहा बिस्कीट, चहा-खारी, चहा-टोस्ट, चहा-क्रीमरोल किंवा नुसताच चहा यातलं काहीतरी खाण्याची/पिण्याची पद्धत असते. पण आज सासंचा स्पेशल कट्टा असल्याने आज आम्ही पिझ्झा खाल्ला. तोही चुलीवरचा! चूल पाश्चिमात्य होती खरी. नंतर तोंडी लावायला म्हणून सॅन्डवीच.

नंतर चहा किंवा कॉफी बाहेर घ्यावी असे ठरले तसेच भाजे लेणीलाही भेट द्यावी असा एक प्रस्ताव आला आणि लगेचच पासही झाला. एव्हाना बरीच पुण्या-मुंबईची गर्दी तिथे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असलेली दिसली. त्यांच्यातून वाट काढीत बाहेर निघताना मॅप्रोच्या उत्पादनांची गुणवत्ता तपासणी करावी म्हणून मी, वल्ली आणि तुका आत शिरलो. आणि टेस्टर काऊंटर वर जाऊन मोहितो वगैरे ट्राय केले. गुणवत्ता आवडल्याने सरपंच आणि बुवांनी थोडी खरेदी केली.

पुढे जाताना बुवांचा एक खांदा थोडासा झुकलेला दिसला. पार्कींगजवळ आल्यावर दोन गाड्या भाजे लेण्यांकडे निघाल्या.
भाजे इथे पोचल्यावर प्रथेप्रमाणे मैं इधर, तुम किधर असे झाले. दोन मिनीटांनी पुन्हा भेटाभेटी झाली. वर चढायला सुरूवात केली तसा माझ्यातला ट्रेकर जागा झाला आणि असा तरातरा वर गेलो की बाकीच्यांना यायला तब्बल पाऊणतास लागला. तेवढ्या वेळात मी तिथल्या सुरक्षारक्षकांबरोबर, हल्लीचे पर्यटक आणि आधीचे पर्यटक यावर विस्तृत चर्चा केली. त्यांना कोपऱ्या कोपऱ्यात नीट लक्ष ठेवणे कसे गरजेचे आहे यावर मार्गदर्शनही केले. तेवढ्यात बाकीचे हाश्शहुश्श करीत वर आले. बहुतेक सगळ्यांची वयं झालीत. सरपंच तर रोज इतकी सायकल चालवून फोटो वगैरे सोशल मिडियावर टाकताना दिसतात परंतु इथे ते चक्क वल्लींच्या आधाराने वर चढत येताना दिसले. तुका उलटे होऊन चालत होते. म्हणजे वर पाय असे नव्हे तर पाठमोरे होऊन. काय तर म्हणे, उतरल्या सारखे वाटते. काय एकेक तऱ्हा! हौस तर मोठी लेण्या चढायची! असो, सर्वजण वर आल्यानंतर वल्लींनी एक सीक्रेट लेणी जी कुलुपबंद होती तिची चावी मिळवली व ती पाहण्यासाठी आम्ही निघालो.

बाकी इथे लेण्यांविषयी जास्त काही लिहित नाही. वल्लींचे त्याविषयीचे पूर्वीचे धागे वाचून काढावेत. माझा हा वल्लींसोबत पहिलाच लेण्यानुभव असल्याने त्यांच्या तोंडून शिलाहार, सातवाहन, मौर्य, यादव वगैरे एखाद्या लहान मुलाला आईसक्रीम, चॉकलेट, कॅन्डी असे ऐकताना कशी गंमत वाटत असेल अगदी तस्संच झालेलं.

वेळ कमीच पडला असे नंतर राहून राहून वाटत होते. मग तिथे माफक फोटोसेशन करून आम्ही खाली निघालो व वाटेत पायऱ्यांवर अगदीच काही नाही तर लिंबू सरबत तरी! असे म्हणून ते गपगुमान प्राशन केले. पुढे टर्मिनेटर यांना परत घरी जाण्यासाठी कुठे सोडावे यासाठी मळवली रेल्वे स्टेशनच्या जरासे पुढे एक चर्चासत्र घडले. आम्हां पाचही जणांची प्रायव्हेट विमाने नेमकी आजच इतर मित्रांनी नेल्यामुळे टर्मीनेटर यांना बसने जाणे क्रमप्राप्त होते त्यानुसार बुवांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली व पारही पाडली. कार्ला फाट्यावर काही काळ ट्रॅफिक जाम करवून आमच्या दोन गाड्या दोन दिशेला वळाल्या. पुढे मी तुकांना निगडी बस स्थानकावर सोडले ते पुढल्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनानंतर भेटण्याचे प्रॉमिस घेऊनच.
इतिवार्ता:
(चांदणे संदिप)
तुका उवाचः
तर...
यह बहुत दिन पहले की बात है...

( फोटो काढताना फोटोग्राफर शिंकला बहुतेक!!)
मिपाचा दिवाळी अंक सालाबादप्रमाणे प्रकाशित झाला. ६ नोव्हेंबरला प्रशांत यांनी पुणे आणि मुंबईतील दिवाळी अंक समितीतील सदस्यांचा कट्टा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. नीलकांत आणि प्रशांत, घाटाखालून टर्मिनेटर आणि नुलकरकाका, घाटावरचे पैजारबुवा, संदीप चांदणे, प्रचेतस आणि मी असे कट्टेकरी होतो.
पण, पुणे कट्टा असल्याने प्रथेप्रमाणे या शनिवारी हा नाही, त्या रविवारी तो नाही असे करत वर्ष संपत आलं. डिसेंबरमध्ये पहिल्या विकांतला मी नव्हतो, तर उत्तरार्धात पैजारबुवा नव्हते. नवं वर्ष सुरू झालं. विषयाने परत उचल खाल्ली. तर टर्मिनेटर नव्हते. मग प्रशांत यांनी सांगितलं की ते फेब्रुवारीमध्ये मोठ्ठ्या सायकलदौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे या रविवारी काही करून कट्टा करायचाच, हे ठरलं.
परवा रात्री लोणावळा येथे मॅप्रो गार्डन हे ठिकाण ठरले. वेळ ठरली रविवारी सकाळी आठ वाजता.
काल संध्याकाळी नूलकर काकांनी कार्यव्यस्तते मुळे यायला जमणार नसल्याचे कळवले. त्यामुळे घाटाखालून टर्मिनेटर एकटेच येणार होते. बुवांनी प्रशांत, प्रचेतस आणि मला घेऊन जाण्याची व्यवस्था केली (प्रशांत आणि बुवांनी सायकलवर लोणावळा गाठायची तयारी केली होती, पण मला डब्बल सीट न्यावे लागेल म्हणून तो बेत बारगळला). तर संदीपरावांनी ते थेट पोचतील असे कळवले.
आणि नौबत झडली, दुदुंभी निनादल्या.. आणि आज सकाळी तो दिवस उजाडला!
.
.
.
ऍक्चुअली, दिवसाची सुरुवात उजाडायाच्या आधीच झाली. मी पाचच्या गजरला उठून स्नुझ करतच होतो, की बुवांचा सुप्रभात मेसेज आला. मग स्नुझ न करता उठलो, आवरून ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी, म्हणजे साडेसहाला, पोचलो. दोनच मिनिटात बुवा आले. गाडीत बसल्यावर जरा उबदार वाटले. पुढच्या वीस मिनिटात भूमकर चौकात प्रशांत आणि प्रचेतस यांना उचलले आणि पुढे प्रस्थान ठेवले. बुवांनी सात वाजून अठ्ठावन मिनिटे वाजत असताना लोणावळ्यात मॅप्रो गार्डन गाठले. पण अजून तर त्यांचे गेटसुद्धा उघडले नव्हते. मग प्रशांत यांनी जवळच्याच मन:शक्ती केंद्रात अल्पोपहारासाठी जायचे सुचवले. अल्पोपहार होईपर्यंत टर्मिनेटर मॅप्रोमध्ये पोचले सुद्धा. मग आम्ही पुन्हा तिकडे कूच केले. टर्मिनेटर यांची गळाभेट घेईपर्यंत संदीपराव फोटोग्राफरला घेऊन पोचले. मग तिथेच पार्किंगमध्ये अर्धा एक तास मस्त कोवळ्या उन्हात गप्पा मारत बसलो.

प्रचेतस, टर्मिनेटर, पैजारबुवा, प्रशांत, संदीप, तुषार
मग तिथे आलेले पहिले कुटुंब परतीलादेखील लागल्याचे कुणीतरी लक्षात आणून दिले, आणि आम्ही मोर्चा आत वळवला.

...
फोटोग्राफरच्या कौशल्याची झलक :-

...
निवांत गप्पा सुरू झाल्या. तोपर्यंत औपचारिकपणा गळून पडला होता. खाद्यपदार्थ आले होते.

गप्पा जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हेलकावे घेत होत्या. रंग चढत होता.

तीन तास मॅप्रो मध्येच कसे गेले ते कळलेच नाही.
मग तिथेच असलेल्या त्यांच्या दुकानात खरेदीला गेलो. सरबत, कॉकटेल्स अन मॉकटेल बनवण्यासाठी उपयुक्त सरबते, आणि इतर साहित्य होते.
तिथून आल्यावर कार्ले लेणी पाहायचा विचार झाला पण आज रविवार असल्याने तिथे प्रचंड गर्दी असेल, असे सांगून प्रचेतस यांनी भाजे लेण्यांचा पर्याय सुचवला. मोर्चा तिकडे वळवला.
...
प्रचेतस यांच्या सहवासात लेणी पाहणे, हा अनुभवण्याचा क्षण असतो, याची प्रचिती आली. या वल्ली माणसाकडे असलेले माहिती आणि ज्ञानाचे भांडार, आणि त्याला लाभलेली शोधक दृष्टी हे त्यांच्या लेखांतून दिसतंच. पण प्रत्यक्षात ते जेव्हा सांगतात, त्यावेळी एकच ठिकाणी असलेल्या दोन वृक्षातील एक सामान्य वृक्ष आणि एक कल्पवृक्ष का, हे कळते आणि आपण त्यांच्या सान्निध्यात काही वेळ व्यतीत केल्याचे समाधान मिळते. उदा. खालील चित्रात 'पोडि' हा शब्द तत्कालीन प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत आहे, ज्याचा आताच्या मराठीत उच्चार 'पोई' असा होतो, म्हणजे हा लेख 'ही पाण पोई 'क्ष्क्ष्क्ष' याने दिलेल्या दानातून बांधलेली आहे' असा काहीसा आहे.

भाजे लेणी या विषयावर स्वतः प्रचेतस यांनी अतिशय माहितीपूर्ण
लेख लिहिलेला आहेच. त्यातील फोटोही अतिशय देखणे आहेत.
भाजे येथील मुख्य चैत्यगृहात प्रचेतस आणि इतर मिपाकर :

आमच्या सोबत सावलीसारखी वावरणारी आणि जिच्यामुळे सेल्फी न घेता सर्वांचे एकत्र फोटो आले ती बाल छायाचित्रकार - संदीपरावांचे 'टिपूर चांदणे' :) -

इतिवार्ता:
...