मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इन्शुरन्स कंपन्यांची फसवेगिरी

सस्नेह · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पॉलिसी च्या नावाखाली इन्शुरन्स कंपन्या सामान्य माणसाची कशी मनमानी लूट करत आहेत, याचा नुकताच अनुभव आला. २००९ मध्ये मी पीएनबी मेटलाईफ कंपनीकडून एक युनिट लिंक्ड लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली. वर्षाला एक लाख हप्ता आणि पुढची ५६ वर्षे १५ लाखाचे जीवनविमा कव्हर. पहिले ३ हप्ते कंपल्सरी नंतर ऑप्शनल. मी पॉलिसी घेतली आणि दोनच वर्षांनी सदर पॉलिसी नवीन ग्राहकांसाठी बंद करण्यात आली. पॉलिसी च्या नियमाप्रमाणे मी ५ वर्षांनंतर म्हणजे २०१५ मध्ये ₹ ७५०००/- पार्शल विथड्रॉवल घेतले. त्यावेळी पॉलिसी फंड व्हॅल्यू ₹ ३२५०००/- शिल्लक असल्याचे मला सांगण्यात आले. यानंतर २०२० मध्ये मला कंपनीचे वेगवेगळे प्रतिनिधी ३ वेळा भेटावयास आले व सदर पॉलिसी फारशी फायदेशीर नसून ती मी बंद करावी व कंपनीच्याच इतर काही पॉलिसीज भरपूर नफा देणारया आहेत त्यात गुंतवणूक करावी अशी गळ घातली. तथापि मला त्यात तथ्य न वाटल्याने मी ते नाकारले. यानंतर गेल्या वर्षी २०२१ मध्ये मी पुन्हा ₹ १५००००/- पार्शल विथड्रॉवल घेतले तेव्हा फंड व्हॅल्यू शिल्लक ₹ २०००००/- असल्याचे मला सांगण्यात आले. यानंतर नोव्हेंबर महिन्यात मी पुन्हा पार्शल विथड्रॉवल करण्यासाठी गेले असता मला सांगण्यात आले की फंड व्हॅल्यू शिल्लक ₹ १६८०००/- आहे. मी विचारले की गेल्या वर्षी ₹ २०००००/- शिल्लक होते व यावर्षी मार्केट इंडेक्स सुमारे १०००० नी वधारला असताना फंड व्हॅल्यू कमी कशी झाली ? त्यावर हे कंपनीचे गुंतवणूक धोरण आहे त्यावर आम्ही सांगू शकत नाही असे सांगण्यात आले. मग मी गेल्या ४ वर्षांचे फंड स्टेटमेंट मागून घेतले तर फंड व्हॅल्यू दर वर्षी २० टक्क्यांनी कमी होत आहे असे दिसून आले. शेअर मार्केट निर्देशांक चार वर्षात वाढत असून ही ही तूट का याचे उत्तर कंपनीकडून मिळाले नाही. यात मेख अशी की फंड व्हॅल्यू एक प्रिमियम रकमेपेक्षा कमी झाली की पॉलिसी आपोआप लॅप्स/ रद्द होते व ती तूट वजा जाता राहिलेली रक्कम विमाधारकाला परत दिली जाते. आता असेच सुरू राहिले तर दोनेक वर्षांनीं माझी फंड व्हॅल्यू नक्कीच एक लाखाहून कमी होणार आणि पॉलिसी आपोआप रद्द होणार हे मला स्पष्ट दिसून आल्यामुळे मग मी सरळ पॉलिसी सरेंडर केली आणि तूट वगळता इतर रक्कम परत मिळण्यास अर्ज केला. एकूणच असे निरीक्षण झाले की सदर विमा योजना ग्राहकांना फायदेशीर असली तरी कंपनीसाठी फायद्याची नव्हती. म्हणूनच ती त्वरित बंद केली गेली. अशा प्रकारे २००९ ते ११ साली गुंतवलेल्या ३ लाख रुपयांचे मला २०२२ अखेर ₹ ४ लाख मिळाले. बाकीचे अक्कल खाती !

वाचन 7340 प्रतिक्रिया 0