वॉल्डनकाठी विचार विहार (ऐसी अक्षरे मेळवीन-६)
लेखनप्रकार
वॉल्डनकाठी विचार विहार
लेखक – हेन्री डेव्हिड थोरो
अनुवाद –दुर्गा भागवत.
जगण्याची उच्च प्रेरणा म्हणजे प्रेम ,स्वच्छंदी मुक्त जीवन ,निसर्गाची साथ या सर्व गोष्टी ज्याने मिळवल्या तो १८ व्या शतकातला महान तत्त्वज्ञ थोरो.त्याच्या वॉल्डन
तळ्याच्या काठी एका झोपडीत २ वर्षे ,२ महिने ,२ दिवस विजनवासाचे रम्य चित्रण ,डायरी म्हंजे हे पुस्तक आहे.
खर म्हणजे दुर्गाबाईंचे पुस्तक म्हणून वाचायला घेतले आणि आयुष्याच्या साधेपणाचाही उत्सव करणाऱ्या थोरोची ओळख झाली.
पुस्तकात एकूण १८ प्रकारणे आहेत.पहिलेच प्रकरण ‘मितव्यय’म्हणजे ‘कमी खर्च ‘.कमीत कमी खर्च कसा करावा इत्यादी काटकसरीचे उदाहरणे यात आहेत ,तेव्हा मी हे का वाचतेय याचा काय उपयोग ?आताच्या काळात विसंगती आहे का ? असे वाटून गेले.परंतु जस जसे थोरोचे निसर्गाचे ,जीवन जगण्याचे साधे सूत्र वाचत गेले ,हे पुस्तक उलगडत गेले.समाधानाची व्याख्या सापडत गेली .
मी यातील असंख्य वाक्य अधोरेखित केली आहेत.प्रत्येक पानावर दुर्मिळ भावमंत्र आहेत.
“आपण स्वत: स्थिर ,अचल राहावे,कामा करीत राहावे ,लोकमत पूर्वग्रह ,परंपरा ,क्रांती ,दिखाऊपणा यांच्या चिखलातून आणि भावनांच्या मुळाच्या उद्रेकांतून नदीप्रमाणे खालीखाली जाताच राहावे.,म्हणजे मातीचा सुपीक गाळ पृथ्वीभर पसरेल.”-थोरो
तळ्याकाठचे त्याचे जीवन निसर्गाच्या जवळ जाणारे होते.तळ्याला भेटलेले ऋतू,झाडांच्या वाढीचे,बदलांचे मोहक वर्णनयात आहे.प्राणी पक्ष्यांची त्याच्या झोपडीशी कुजबुज,गोठलेल्या तळ्याचे अभ्यासपूर्ण नोंदी कमाल आहेत.निरर्गाशी तो इतका समरसून गेला आहे की एका खारूताईचे वागणे इतके अप्रतिम टिपले आहे जणू ती त्याची दोस्तच दिसताच आहे.
थोरोवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे .भारतीय भगवद्गीता हा त्याचा आवडता ग्रंथ आहे.त्यातील अनेक दाखले समर्पक ठिकाणी त्याने दिले आहेत .
शेवटचे उपसंहार प्रकरण वाचतांना अरेरे संपले पुस्तक ? अशी भावना होते. आणखीन थोरो विचार विहाराची तृषा निर्माण होते.
Majestic Readers पब्लिशिंग हाऊसने ऑक्टोबर २०२१ ला याची देखणी दुसरी आवृत्ती आणली आहे.ज्याची कागदाची गुणवत्ता ,छपाई उत्तम आहे.
निसर्गप्रेमींनी हे पुस्तक एकदा नक्कीच वाचावे.
आणि ही अक्षरे माझ्या घरामागच्या औदुबराच्या झाडाच्या स्मृतीस ,पुस्तक अर्ध्यावर असतांना तांत्रिक जगाच्या नियामापायी ज्याला कोसळावे लागले.त्याचे पान या पुस्तकाच्या अक्षरात मी जपून ठेवले आहे.
-भक्ती
वाचन
3063
प्रतिक्रिया
0