मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी भाषा दिन

कर्नलतपस्वी · · जनातलं, मनातलं
कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा ! – कुसुमाग्रज मिसळपाव परिवारात सामील झाल्यावर सुरुवातीला काही कवीता, मनोगते,मुक्तके राजभाषा हिन्दी मध्ये लिहिल्या, प्रतीसाद संमिश्र आले, गदारोळ माजला, टपल्या, टोमणे,काही शालजोडीतले, काही पुणेरी वर वर स्तुतीपर पण सरळ कसोट्यालाच हात घालणारे. माय मराठीत जन्मलो पण कमी वयातच दूर जावे लागले म्हणून सहवास कमी लाभला. राजभाषेचा सहवास भरपूर. दोघींवर तितकेच प्रेम. आता परत माय मराठीच्या कुशीत आल्या मुळे मराठी भाषेतील अमूल्य रत्ने दृष्टीक्षेपात आली. त्यातीलच एक कुसुमाग्रज', प्रसिद्ध असलेले मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर.आज त्यांची जयंती आणी आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन याचे औचित्य साधून काही आठवणी काही मनोगत. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर हे मराठीतील प्रख्यात कवी, नाटक कार, कादंबरी कार, लघु कथा लेखक आणि मानवतावादी होते. १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या " विशाखा" या कविता संग्रहातील "क्रांतीचा जयजयकार" कवितेने जन आंदोलन तीव्र करण्यात अहम योगदान दिले. "कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल सरणावरती आज अमुची पेटता प्रेते उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार आई, खळखळा तुटणार गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!" पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात काही काळ काम करण्याची संधी मीळाली तेव्हा "वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट ,बेकेट " कुसुमाग्रजांची ही नाटके बघितली,शिवाय शिरवाडकर जवळून बघायला,ऐकावयास मिळाले.तंतरलेल्या आयुष्यातील मंतरलेले दिवस होते. खुप आठवणी पण नंतर कधीतरी. आई कडून मीळालेली मातृभाषा आणी शाळेतल्या बाईंकडून मिळालेल्या इतर भाषांचे दान याने जीवन समृद्ध होते यात तिळमात्र शंका नाही.सर्वानाच मातृभाषेचा अभिमान असणे स्वाभाविक तसाच मला पण आहे.भाषावार प्रातं रचना केल्यामुळे फायदा की नुकसान यात न पडता मी म्हणेन की प्रत्येक मायभाषेचे संवर्धन, संगोपन व्यवस्थित होत आहे आणी त्यातील अमूल्य विचारधन आज आपल्याला उपलब्ध आहे. आज मराठी भाषा दिना निमित्त सर्व मिपाकरांच्या मायबोली वरचे प्रेम, अट्टाहास आणी योगदानाबद्दल हार्दिक अभिनंदन व मराठीच्या एक शिर्ष पाईक कुसुमाग्रज यांना अभिवादन करून लेख संपवतो.

वाचन 4192 प्रतिक्रिया 0