मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काSSSSSSयपो छे....

विजुभाऊ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
एखाद्या देशाची संस्कृती त्या देशाच्या सणांवरुन दिसते असे कोणीसे म्हंटले आहे. महाराष्ट्राची संस्कृती गणेशोत्सव दिवाळी पाडवा या सणांवरून दिसते. कोकणातला गणेशोत्सव हा अगदी आगळाच. कोकणी माणसाचा देवबाप्पाला पाहुणा म्हणून वाजतगाजत आणण्याचा उत्साह त्याच्या मनात वर्षभर गाजत असतो. गुजरातच्या पतंगोत्सवाबद्दल मी बरीच वर्षे ऐकून होतो . या वर्षी तो योग आला. संक्रान्तीच्या दिवशी गुजरातची पतंगनगरी अहमदाबाद ( गुजरातीत अमदावाद) मध्ये होतो. संक्रान्तीचा मह्त्व म्हणजे दक्षीणायन संपून उत्तरायण सुरु होते. इकडे त्याला उतराण म्हणतात. संक्रान्तीची तयारी जवळजवळ महीनाभर अगोदरपासूनच सुरू होते. पतंग मांजा चकरी पतंग उडवण्यासाठी अत्यावश्यक असे चष्मे टोप्या असे बरेच काही घेवुन दुकाने सजली जातात Image removed. इथला माणेक चौकातील पतंग बाजार अक्षरशः रात्रभर चालू असतो. पतंग खरेदीला येणारांची झुंबड उडालेली असते Image removed. संध्याकाळी सुरु झालेला बाजार सकाळी पाच सहा च्या सुमारास थंडावतो. इथे पतंगाचे शेकडो प्रकार बघायला मिळतात. Image removed. नुसते चौकोनीच नव्हे तर गोल ,पक्ष्याच्या आकाराचे, कागदाचे , सिल्क चे, प्लॅस्टीकचे असे अनेक प्रकारचे पतंग पहायला मिळतात. Image removed. लोक थंडीची तमा न बाळगता पतंग खरेदी करेत असतात. Image removed. इथले लोक देवाला देखील पतंग चकरी मांजा वहातात. ( बाळकृष्ण लहान बाळ आहे .त्याला खेळायला पतंग देतात) खास देवासाठी म्हणून पतंग मांजे चकरी बनवल्या जातात Image removed. हे एवढ्यावरच भागत नाही . मांजा बनवायचे कारखाने रस्तोरस्ती दिसू लागतात. पतंगाचे प्रेम इतक्यावर थांबत नाही. खास उतरणच्या दिवसासाठी म्हणून हलवायांची दुकाने तयारीला लागतात. त्यावेळेस दुकानाची /पदार्थांची जहीरात करणारे बोर्ड सुद्धा पतंगाच्या आकाराचे असतात Image removed. इथे उतराणच्या दिवशी घरात एकच चर्चा असते पतंगाची. अर्थात चर्चा करायला कोणी घरात नसतेच मुळी. सगळेजण ग्राउन्ड वर गच्चीत ,छपरावर रस्त्यावर जागा मिळेल तेथुन मनसोक्त पतंग उडवत असतात. दुकानात पतंग घ्यायला गेले तर एक दोन पतंग घेणारे गिर्‍हाईक नसतेच. इथे पतंगाचे मोजमाप करायला "कोडी" हे युनीट वापरले जाते . वीस पतंगाची एक कोडी. लोक अक्षरशः दोनशे तीनशे पतंग घेतात. Image removed. घराच्या छपरावर सर्व कुटुंबीय जमतात . काका मामा आत्या शेजारी पाजारी , नातेवाईक , मुलाबाळांचे मित्र, पै पाहुणे वगैरे सर्व एकत्र दिवसभर आणि रात्रभर घराच्या गच्चीतच असतात. कोणी येताना पाच एकशे पतंग आणतो. कोणी तीस चाळीस फिरक्या ( चक्र्या ) आणतो , कोणी खावामाटे मिश्टान्न आणतो , उतराणच्या निमित्ताने घरोघरी तरतर्‍हेचे लाडू केले जातात. यात चुरमुर्‍याचे लाडू , बेसनाचे लाडू, मेथीचे लाडून , शेंगदाण्याचे लाडू , लाह्याचे , पोह्याचे , शेवेचे , चुरमा लाडू , सुटीयानो लाडवो , तिळाचे , हरबर्‍याच्या डाळीचे ,खजुराचे लाडू असे अनेक प्रकार असतात . खाण्यासाठी उंधीयो , लिलवानी कचोरी हे नेहमीचे यशस्वी असतातच. उतराणच्या निमित्ताने पतंग उडवण्याचा आनंद लहान मुले मुलीच काय पण वयाची साठी कधीच मागे ठेवलेली आज्जी आजोबा सुद्धा पतंग उडवत असतात. Image removed. घराच्या गच्ची वर एक मस्त गेट टुगेदर असते. आकाशात पतंगांची अक्षरशः ठिपक्याची रांगोळी असते. क्षितीजावर कुठेही पाहिले तर पतंगच पतंग दिसत असतात. प्रत्येक घराच्या गच्चीचा एक किल्ला झालेला असतो. एखाद्या गच्ची वरून " काssssssयपो छे " अशा आरोळ्या ऐकु आल्या की समजावे पतंग कटली म्हणून. म्हातारी आजोब आज्जी सुद्धा मुलांच्या उत्साहाने काटाकाटी खेळत असतात. Image removed. रस्तोरस्ती पानझडीत पानांचा सडा पडवा तसा रस्त्यावर पतंगांचा सडा पडलेला असतो. तुटलेला पतंग /मांजा लुटायला वेळच कोणाकडे असतो? रस्त्यावर कर्फ्यू असावा तसा शुकशुकाट असतो दिवस मावळायल येतो तसा काटाकाटीचा मुड बदलतो. मावळत्या दिनकरासोबतच क्षितीजावरील पतंग घरट्यात परतु लागतात. पण दिवस मावळला म्हणून लोकांचा उत्साह मावळत नाही. एखादा भला मोठ्ठा पतंग भक्कम दोरा लावून उडवला जातो. पतंगसाहेब थोडे वर जाऊन स्थिरस्थावर झाले की त्या दोर्‍याला कागदाचे कंदील बांधले जातात. त्यात लहान लहान मेणबत्त्या लावून धाग्याबरोबर वर कंदील जातात. आकाशात ठीकठीकाणहून दिव्यांच्या माळा आकाशात झगमगत असतात. कोणे एउत्साही वीर हॉट एअर बलून बनवतात त्यात दिवे ठेवून ते आकाशात उडवले जातात. पतंग उडवून झाल्यावर जमलेली मंडळींचा उत्साह अजुन ओसरलेला नसतो. गच्चीवरच " गरबा " करायची हुक्की येते. रात्री तीन चार वाजता श्रमपरीहार करून मंडळी घरे निघतात. दुसर्‍या दिवशी सुर्य मध्यावर येपर्यन्त गाव निजलेले असते. पण निजण्यापूर्वी मात्र बच्चे कंपनी , तरूण तरुणीनी ,आई वडीलानी आणि आज्जी आजोबानी सुद्धा आपल्या आठवणीत एका आनन्दी दिवसाची नोंद केलेली असते. ( टीपः या लेखातील सर्व छायाचित्रे ही मी स्वतः काढलेली असुन फ्लीकरमार्फत ती येथे मांडलेली आहेत)

वाचन 19282 प्रतिक्रिया 0