पर्यटकांचे आकर्षण - आयफेल टॉवर

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
2 Jan 2022 - 12:16 pm

आयफेल टॉवर – फ्रांसचे बोधचिन्ह. संपूर्ण फ्रांसमध्ये व्हर्सायपासून मार्सेलिसपर्यंत कितीही भव्यदिव्य राजवाडे आणि अन्य ऐतिहासिक वास्तू उभ्या असल्या तरी फ्रांस हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर जी प्रतिमा उमटते ती असते केवळ आयफेल टॉवरचीच. पॅरिसमधून वाहणाऱ्या सेईन नदीच्या किनाऱ्यावर हा टॉवर उभा आहे. त्याच्या उभारणीला सुरुवात झाली, त्या घटनेला यावर्षीच्या सुरुवातीलाच 135 वर्षे पूर्ण होत आहेत.

फ्रेंच राज्यक्रांतीला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पॅरिसमध्ये 1889 मध्ये मोठ्या आंतरराष्ट्रीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने एका आकर्षक रचनेची उभारणी करण्याचे ठरले होते. त्यानुसार गुस्ताव आयफेल याने आयफेल टॉवर उभारला होता. त्याआधी 1888 मध्ये स्पेनमधील बार्सिलोना येथे हा टॉवर उभारण्याची योजना होती.

स्पेनमध्ये अपयश आल्यानंतर आयफेलने तोच प्रस्ताव फ्रेंच सरकारसमोर मांडून त्याला मंजुरीही मिळवली. या टॉवरची उभारणी 15 मार्च 1889 ला पूर्ण झाल्यानंतर 6 मे 1889 पासून आयफेल टॉवर सर्वांसाठी खुला करण्यात आला. सुरुवातीला आयफेल याला हा टॉवर 20 वर्षांपर्यंतच उभा ठेवण्याची परवानगी मिळाली होती. म्हणजे 1909 मध्ये हा टॉवर पाडला जाणे अपेक्षित होते. त्यानंतरही या टॉवरचा काही भाग पाडण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली होती. पण पुढे तो विचार मागे पडला. त्याचवेळी नभोवाणी प्रसारणासाठी या टॉवरचा उपयोग करण्याला सुरुवात झाली. टॉवरवर 1899 मध्ये सुरू करण्यात आलेले एक नभोवाणी प्रसारण केंद्र आजही कार्यरत आहे.

चार पायांवर उभा असलेला आयफेल टॉवर शिखराकडे निमुळता होत जातो. तीन भागांमध्ये विभागलेल्या या टॉवरमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पायऱ्या तसेच लिफ्टने जाता येते. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी 328 पायऱ्या चढाव्या लागतात. त्यानंतर 340 पायऱ्यांनंतर येतो दुसरा मजला आणि त्यापुढे 18 पायऱ्यांनंतर येते लिफ्ट. फक्त या लिफ्टच्या मदतीनेच तिसऱ्या मजल्यावर जाता येते. आयफेल टॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यांवर रेस्टॉरंट्स आहेत. गुस्ताव आयफेल याने त्या काळातील फ्रांसमधील नामांकित 72 शास्त्रज्ञ, अभियंते आणि अन्य महत्वाच्या व्यक्तींची नावे या टॉवरवर कोरलेली आहेत.

आयफेल टॉवरच्या उभारणीसाठी 7300 टन पोलाद वापरण्यात आलेले आहे. हा संपूर्ण टॉवर उभारण्यासाठी वापरण्यात आलेल्या अन्य साहित्याचाही त्यात समावेश केल्यास त्यांच्यासह टॉवरचे वजन तब्बल 10,000 टन भरते. पोलादाचा प्रसरण-आकुंचन हा मूलभूत गुणधर्म लक्षात घेऊन या टॉवरच्या काही टप्प्यांच्यादरम्यन थोडे अंतर ठेवण्यात आलेले आहे. हवामानाचा पोलादावर परिणाम सतत होत असतो. त्यामुळे टॉवरला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण आयफेल टॉवरला दर 7 वर्षांनी गंजरोधक रंग दिला जातो. यासाठी सुमारे 60 टन रंग लागतो. टॉवरचा रंग पायथ्याकडील भागात सर्वात गडद तपकिरी असून तो शिखराकडे फिकट होत जातो. आयफेल टॉवर उभारला जात असलेल्या परिसरात वाहणाऱ्या वाऱ्यांचा विचार करून त्याचे आरेखन करण्यात आलेले आहे. 324 मीटर उंचीचे बांधकाम केले जात असताना हा विचार करणे आवश्यकच होते.

31 डिसेंबर 1999 रोजी नव्या सहस्त्रकाच्या स्वागताच्या निमित्ताने आयफेल टॉवरवरून आतषबाजी करण्यात आली होती. त्यावेळी सुरू झालेली ही प्रथा आजपर्यंत कायम आहे. 2000 मध्ये आयफेल टॉवरमध्ये 4 सर्च लाईट्स बसवण्यात आले. युरोपीय संघाचा फ्रांस हा संस्थापक सदस्य आहे. युरोपीय संघाच्या ध्वजातील बारा चांदण्या आणि निळा रंग यांची प्रतिमा आयफेल टॉवरवर 31 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री उमटवण्यात आली होती. दर तासाला चमचमणारे लाखो विद्युत दिवेही या टॉवरवर बसवण्यात आलेले आहेत. आज सर्वात जास्त परदेशी पर्यटक भेट देणाऱ्या देशांमध्ये फ्रांस जगात अव्वलस्थानी आहे आणि त्या पर्यटकांसाठी आयफेल टॉवर हे प्रमुख आकर्षण आहे.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/01/blog-post_2.html

कलाइतिहासमुक्तकप्रवासदेशांतरलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

सुरसंगम's picture

2 Jan 2022 - 1:08 pm | सुरसंगम

आकर्षण आहे हो पण जास्त चोरांचा सळसुळाट पण आहे असं वाचलंय आणि काही लोकांना वाटत असतं की बाहेरच्या देशात सर्व चांगलंच असतं.
आपल्यापेक्षा प्रमाण कमी पण सगळीकडे सगळं अस्तित्वात असतंच.

सौन्दर्य's picture

7 Jan 2022 - 12:03 am | सौन्दर्य

मी २०१९ मध्ये युरोपची टूर केली त्यात आयफेल टॉवर देखील पाहिला, पण तुम्ही म्हणता तसे चोर काही दिसले नाहीत. म्हणजे नसतीलच असे नाही पण सुळसुळाट दिसला अथवा जाणवला नाही. तेथे कोणताही विक्रेता त्याची वस्तू विकण्यासाठी आपल्या मागे लागत नाही किंवा त्रासही देत नाही. ते त्यांच्या वस्तू जमिनीवर कापड अंथरून त्यावर ठेवतात व आपण किंमत विचारली तरच येऊन सांगतात. गंमत म्हणजे तेथे आफ्रिकन वंशाचे विक्रेते जास्त आहेत व ते बऱ्यापैकी चांगले हिंदी बोलतात.

Trump's picture

7 Jan 2022 - 11:55 am | Trump

माझा मित्र हेच सांगत होता. मी त्याला सांगितले की गरीबासारखे दिस, म्हणजे कोणी त्रास देणार नाही.

कंजूस's picture

2 Jan 2022 - 4:57 pm | कंजूस

फोटोबिटो टाका. आणि तिकडचा रेल्वे प्रवास हवाच.

चौथा कोनाडा's picture

7 Jan 2022 - 11:43 am | चौथा कोनाडा

हे गेले नसावेत.
विकीवरची माहिती दिलेली वाटतेय .

सरिता बांदेकर's picture

2 Jan 2022 - 9:59 pm | सरिता बांदेकर

खरंच आयफेल टॅावर खूपच छान आहे.त्याचे तुम्ही दिलेले डिटेल्स आधी माहित होते पण तिकडे गेल्यावर सगळं विसरले.
लकीली दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी आयफेल टॅावर कसा दिसतो ते बघायचा योग आला.
सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि सनसेट नंतर.
त्या परिसरात रात्री १० वा. पर्यंत होतो.
एकदम मॅजिकल वाटत होतं.सायकल रिक्शावाल्यांशी गप्पा.
तुमच्या लेखाच्या निमित्ताने परत एकदा आठवणी जाग्या झाल्या.
त्यासाठी तुमचे धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

7 Jan 2022 - 11:44 am | चौथा कोनाडा

एकदम मॅजिकल वाटत होतं.सायकल रिक्शावाल्यांशी गप्पा.

धागा काढला नाही का ? नसेल तर काढा की !

हा आयफल टावर कोण्या एका महाठकाने विकला होता असा एक किस्सा पूर्वी वाचल्याचे स्मरतेय, आता तपशील विसरलो.
कोणास आठवत असेल तर टाका ह्या निमित्ताने, म्हणतो मी.

अनेकदा हा टॉवर बघितला आहे. वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या कोनांतून. टॉप फ्लोअरला अस्सल उंची शाम्पेन मिळण्याची सोय एका खिडकीत केली आहे. त्या उंचीवर कडाक्याच्या थंडीत ती सिप करत शहराचा नजारा पाहणे हा अनुभव अगदी खास. तिथे टॉवरच्या थंड लोखंडी जाळीला सरकारी नियमांची पर्वा न करता अनेक प्रेमिकांनी अडकवलेली कुलुपे ही आपल्याकडच्या वडाच्या झाडाला बांधलेले दोरे, लटकावलेले पितळी घोडे, धातूच्या घंटा यांची आठवण करुन देतात. नवस हा मनुष्यस्वभावातला रोचक भाग आहे.