गुजरात सहल २०२१_भाग २

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
31 Dec 2021 - 10:13 pm

भाग १ येथे वाचा

विजय विलास पॅलेस पाहून मांडवीतून कच्छच्या रन साठी निघालो. थोडी भूक लागायला सुरुवात झाली होती पण जास्त वेळ वाया घालवायची इच्छा नव्हती. वाटेत दाबेली आणि तसेच काही पदार्थ एका गावातील छोट्याशा स्टॉलहून खरेदी केले. बाकी घरून आणलेलेही काही खाद्य पदार्थ होतेच. गाडीतच जेवण झाले.
भुज पार करून पुढे निघालो. एका ठिकाणी आपण काल्पनिक कर्कवृत्त रेषा ओलांडून पुढे आलो. यानंतरही संपूर्ण सहलीत काही वेळा नकळत कर्कवृत्त ओलांडणार होतो.

कच्छच्या रन प्रवेशासाठीचा ऑनलाईन परवाना काढायचा राहून गेला होता. वाटेत एका चौकीवर शुल्क भरून तो घेतला. (रु.१००/- प्रति व्यक्ती अधिक गाडीचे ५०).

साडे तीनपर्यंत भुजपासून साठ किमीवर असलेल्या होडका या गावात आमचे बुकिंग ज्या रिसॉर्टला होते तेथे पोहचलो. रिसॉर्ट पारंपरिक "भुंगा" प्रकारच्या घरे असलेले होते. या प्रकारची घरे गोलाकार असून वर छप्पर शंकूच्या आकाराचे असते. बांधकामासाठी चिखल,लाकूड, व गवताचा वापर केलेला असतो.
आम्ही दोन दिवसांकरिता सहा भुंगा आरक्षित केलेले होते. भुंगा बाहेरून जितके सुंदर वाटत होते तितकेच आतूनही होते. खिडक्या दारे, छत व त्यांची रंगसंगती खूपच आवडली.

चार वाजले होते. कच्छचे श्वेत रण पाहण्यासाठी निघालो . साधारण अर्ध्या तासात (२५किमी) येथे पोहचलो. रण सुरु झाल्यापासून थोड्या अंतरापर्यंत रस्ता आहे. येथे एक उंच लोखंडी मनोरा बनविला आहे ज्यावरून दूरपर्यंचे रण नजरेस पडते.
पावसाळा संपल्यावर पाणी भरलेला भाग सुकतो व समुद्री क्षारांमुळे उन्हात अतिशय शुभ्र असा चमकतो. मावळत्या सूर्यप्रकाशात येथील बदलत्या रंगछटाही सुंदर वाटत होत्या. चंद्रप्रकाशात विशेषतः पौर्णिमेच्या रात्री याचे सौंदर्य अधिकच खुलते.
दूरपर्यंत पसरलेले शुभ्र रण , येथील सूर्यास्त वगैरे बघण्यात अलौकिक आनंद आहे. उंटावरची फेरी व पगडी/पारंपरिक वेष भाड्याने घेऊन फोटो काढण्यात एक वेगळीच मजा.

पार्किंग

मनोऱ्याहून दिसणारा नजारा

मनोरा

उंट सफारी

सूर्यास्त

अमावसेची रात्र असून सुद्धा विद्युत झोतात झगमगणारे रण

काही नकारात्मक गोष्टी : गुजरात पर्यटन मंडळातर्फे डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या काळात येथे रणोत्सव आयोजित केला जातो. प्रत्यक्षात जागेवर असे काहीच कार्यक्रम होताना दिसले नाहीत. भरपूर पैसे मोजून गुजरात टुरिझमच्या टेन्ट सिटीत राहिलो तरच तिथले भव्य सेट, या काळात तेथे होणारे स्थानिक कलाकारांचे विविध कार्यक्रम वगैरे अनुभवता येतील. रेतीच्या वाळवंटात भुसभुशीत वाळूत चालायला, छोट्या मोठ्या वाळूच्या टेकाडांवरून घरंगळायला खूप मजा येथे. इथे मात्र दूर दूरपर्यंत ओलसर मिठाचा एकसखल थर असलेली जमीन. आराम करण्यासाठी थोडेसे कुठे बसण्याचीही सोय नाही. एकच एक स्थिर देखावा आपण बघणार तरी किती वेळ. ज्या गोष्टीचा इतका उदो उदो होतो आहे ती एकदा अनुभवली. परत परत जाण्याइतके हे ठिकाण मात्र इतके काही खास वाटले नाही.

अंधार पडल्यावर परत निघालो. टेन्ट सिटी ते रण या अंतरात वाटेत दुतर्फा काही खाण्यापिण्याचे तर काही कपड्यांचे, भेटवस्तूंचे स्टॉल लागलेले दिसले. आमचे जेवण रिसोर्टलाच असल्याने आम्ही मात्र थांबलो नाही.
जेवणानंतर आमच्या रिसॉर्टला स्थानिक कलाकारांचा गायनाचा कार्यक्रम झाला. बहुतेक गाणी गुजराती, कच्छी भाषेत होती. कच्छी भाषेतील काही शब्द कळत नव्हते पण कानाला गोड वाटत होते. मध्यभागी पेटवलेली शेकोटी थंडीला पळवून लावत होती. कार्यक्रम संपला आणि सगळे आपापल्या भुंग्यात पळाले.

आज सहलीचा दुसरा दिवस. आज माता ना मढ़ (आशापुरा देवी), नारायण सरोवर , कोटेश्वर मंदिर, लखपत फोर्ट असा जवळपास अडीचशे-तीनशे किमी भटकंतीचा कार्यक्रम होता पण काहींना थोडा थकवा जाणवत होता त्यामुळे लांबचा प्रवास रद्द करून ढोलावीरा जाण्याचा विचार केला. कच्छच्या रण पासून नवीनच झालेल्या शॉर्टकटमुळे हे शक्यही होते पण ड्रायव्हरने नकार दिला. रस्ता कच्चा व काही ठिकाणी अरुंद आहे. मोठ्या गाडीने जाणे कठीणआहे असे त्याचे म्हणणे.. त्यामुळे हाही पर्याय संपला. शेवटी सकाळी जवळचेच एक ठिकाण "कालो डुंगर" व दुपारनंतर भुज जवळील खेडे भुजोडी व तेथील वंदे मातरम स्मारक याला भेट द्यायचे ठरले.

सकाळी नऊला कालो डुंगरसाठी निघालो. आमच्या रिसॉर्ट पासून एक दीड तासाच्या अंतरावरील डोंगर म्हणजे कच्छ मधील सर्वात उंच ठिकाण. आपल्या महाराष्ट्रातील डोंगर पहिले तर याला एखादी टेकडीच म्हणता येईल. समुद्रसपाटीपासूनची याची उंची ४६२ मीटर असून येथून दूरपर्यंतचे कच्छच्या रण नजरेस पडते. येथून फक्त ४०किमी दूर भारत-पाकिस्तान सीमा आहे. डोंगरावर ४०० वर्षांपूर्वीचे दत्त मंदिर आहे. आजूबाजूला श्वेत रंगाचे रण व मधे हा काळपट दिसणारा डोंगर म्हणून याचे नाव काला डुंगर पडले असावे.

वाटेत पक्षी दर्शन

कालो डुंगर

दत्तात्रय मंदीर

दुपारी जेवणाच्या वेळी हॉटेलवर परत आलो. जेवण आटोपून लगेच भूजोडीला जाण्यासाठी निघालो. भुजोडी हातमागावर विणलेल्या कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. लोकरी किंवा सुती शॉल , ब्लॅंकेट, गालिचे येथे रास्त दरात मिळू शकतात. भुजोडीला पोहचता पोहचता पाच वाजले. खरेदीला जायच्या आधी येथे असणाऱ्या वंदे मातरम स्मारकाच्या संग्रहालय व उद्यानाची तिकिटे आधी काढून घ्या असे ड्रायव्हरने सांगतले. घाई करूनसुद्धा संग्रहालयाची तिकिटे मिळाली नाहीत, फक्त उद्यानाची तिकिटे मिळाली यातच संध्याकाळच्या 'लाईट अँड साउंड शो" पाहता येतो. आतमध्येही हस्तकला व कपड्यांची दुकाने आहेत असे कळल्याने बाहेर फिरण्याचा विचार सोडून उद्यानात प्रवेश केला. हे स्मारक ब्रिटिश राजवटीशी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रसंगांची आठवण करून देते. हे भव्य स्मारक १२ एकर जागेत वसलेले आहे.

सेल्फी पॉईंट

सातचा लाईट अँड साउंड शो पाहून रात्री रिसॉर्टला परत आलो. आज रात्रीही येथे स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम होता तो जवळपास संपलाच होता. थोडा वेळ बाहेर शेकोटीजवळ गप्पा मारत बसलो. थंडी वाढायला लागली तसे सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी गेले.

क्रमश:

प्रतिक्रिया

अक्षय देपोलकर's picture

1 Jan 2022 - 9:35 am | अक्षय देपोलकर

सुरेख चाललय प्रवास वर्णन...

नागनिका's picture

1 Jan 2022 - 11:01 am | नागनिका

काला डुंगरवरुन दुर्बिणीद्वारे पाकिस्तानची चेक पोस्त पाहता येते..
वंदे मातरम स्मारकावर संध्याकाळी लेझर शो पण दाखवतात.
कॅलिको म्युझियम ला भेट दिली का?

रंगीला रतन's picture

1 Jan 2022 - 11:09 am | रंगीला रतन

वाचतोय.
पुभाप्र.

गोरगावलेकर's picture

1 Jan 2022 - 11:56 am | गोरगावलेकर

@ अक्षय देपोलकर, रंगीला रतन प्रतिसादाबद्दल आभार
@ नागनिका. वंदे मातरम स्मारक येथील लेसर शो पहिला. छान असतो. वातावरणाची दृश्यता कमी असल्याने चेक पोस्ट नाही पाहू शकलो

चंद्रसूर्यकुमार's picture

1 Jan 2022 - 1:20 pm | चंद्रसूर्यकुमार

दुसरा भागही आवडला.

Bhakti's picture

1 Jan 2022 - 5:17 pm | Bhakti

मस्त!

पराग१२२६३'s picture

2 Jan 2022 - 1:52 pm | पराग१२२६३

गुजरात-सौराष्ट्रात माझं जाणं झालं आहे; पण अजून कच्छला जायचं राहिलं आहे. हे वर्णन वाचून जाऊन यावच आता, असं वाटत आहे.

मुक्त विहारि's picture

2 Jan 2022 - 8:09 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे

कर्नलतपस्वी's picture

2 Jan 2022 - 8:48 pm | कर्नलतपस्वी

छान आणी सखोल वर्णन, फोटोपण खुप छान आहेत पैकी एक दिल्ली मधील ग्यारा मुर्ती ची प्रतिकृती वाटते.

आपली लिहिण्याची शैली फारच छान आहे. त्यामुळे वाचताना मजा येते .

आपण जितकी पर्यटन स्थळे पाहिलेली आहेत त्याबद्दल सविस्तर लिहा

कारण अनेक लोकांना हि स्थळे माहितीच नसतील किंवा सगळ्यांना तिथे प्रत्यक्ष जाणे शक्य होणार नाही (उदा. विदेशातील मराठी बांधव)

अशा सर्वाना आपल्या लेखनाचा लाभ नक्कीच होईल

अनिंद्य's picture

3 Jan 2022 - 11:06 am | अनिंद्य

छान.

भुंगा घरे खास आवडली :-)

कच्छचे रण बघायची इच्छा आहेच. फारच जबरदस्त आहे. पावसाळ्यात सगळे रण पाण्याने भरुन जाते आणि नंतर पूर्ण मोकळे होते हा तर नैसर्गिक चमत्कारच. गुजरात पर्यटनखात्याने पर्यटनस्थळांची व्यवस्था अगदी उत्कृष्ट ठेवली आहे असे दिसते.
फोटो आणि वर्णन आवडलेच.

सिरुसेरि's picture

3 Jan 2022 - 2:33 pm | सिरुसेरि

सुरेख प्रवास वर्णन

गोरगावलेकर's picture

3 Jan 2022 - 3:24 pm | गोरगावलेकर

@कर्नलतपस्वी. ग्यारा मूर्ती पहिली नाही पण तीच असू शकते. बाकीही संसद भवन, लाल किल्ला इ. च्या प्रतिकृती आहेत.
@सुबोध खरे. मिपावरच्या दिग्गज लेखकांकडून कौतुकाची थाप पडावी हे विशेषच. पाहिलेल्या इतर स्थळांबद्दल लिहिण्याचा प्रयत्न निश्चितच राहील.
@अनिंद्य. प्रतिसादाबद्दल धन्यवाद

पण जायची इच्छा होत नाही.

गोरगावलेकर's picture

4 Jan 2022 - 12:06 pm | गोरगावलेकर

@प्रचेतस. कच्छचे रण बघायची इच्छा आहेच. यापेक्षा सहलीतील शेवटच्या दिवसाची ठिकाणे बघण्याची आपली जास्त इच्छा असेल असे वाटते. येतील तीही ठिकाणे लवकरच
@ सिरुसेरि. प्रतिसादाबद्दल धन्यवाद

टर्मीनेटर's picture

4 Jan 2022 - 3:53 pm | टर्मीनेटर

हा भागही आवडला 👍
गुजरात बऱ्यापैकी बघितलाय पण कच्छचे रण बघायचे बाकी राहिलंय!
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

छान प्रवासवर्णन!!पण क्रमशःने जाम वैतागवाडी होते.

nutanm's picture

6 Jan 2022 - 5:27 am | nutanm

photos छान!

कॅलक्यूलेटर's picture

8 Jan 2022 - 3:43 pm | कॅलक्यूलेटर

अतिशय सुरेख प्रवास वर्णन. वाचल्यानंतर लगेच मित्रांना विचारणा सुरु केलीये बघू योग आला तर जानेवारी च्या शेवटच्या आठवड्यात जाऊ. साधारण किती दिवस आणि किती खर्च येईल प्रति कुटुंब ते सांगितलंत तर नियोजन करणं अजून सोयीस्कर होईल

गोरगावलेकर's picture

9 Jan 2022 - 2:24 pm | गोरगावलेकर

@टर्मीनेटर, nutanm प्रतिसादाबद्दल आभार.

काय काय बघायचं त्यावर अवलंबून आहे. कच्छ , सौराष्ट्र साठी किमान दहा दिवस तरी हवेत.
खर्च बराचसा किती जण आहेत त्यावरही अवलंबून आहे. भटकंतीसाठी दोघांसाठीच गाडी करायची असेल तर आज जवळपास ४०००/- खर्च येतो. म्हणजे प्रत्येकी रु.२०००/-.हाच खर्च ग्रुपमध्ये आम्हाला रु.५००/- इतका येतो . (दहा दिवसाचे प्रत्येकी पंधरा हजार वाचतात). शिवाय ड्रायव्हरचे जेवण आपल्या करारात नसले तरी बऱ्याच वेळा आपण खर्च करतोच किंवा रात्रीचा मुक्कामाचा भत्ता साधारण रु.३००/- द्यावा लागतो. आमच्या बहुतेक हॉटेल्समध्ये ड्रायव्हर लोकांसाठी डॉर्मिटरीची सुविधा होती व त्याचा नाश्ता, जेवण सर्व विनामूल्य मिळाले.
प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे ग्रुपमधील बहुतेक सर्व कष्टकरी वर्गातील आहेत. वर्षातील १०-१५ दिवस आरामात घालवणे व नेहमीपेक्षा काही वेगळ्या गोष्टी अनुभवणे हा विचार असतो. खर्चाची उधळपट्टी नसली तरी अत्याधुनिक सुखसोई असलेली हॉटेल्स, खाण्यापिण्याची चंगळ, सामानाची उचलठेव नाही असल्या सर्व गोष्टी ठरविण्याकडे आमचा कल असतो. त्यामुळे हा खर्चही सहलीत सामील होणाऱ्या लोकांच्या विचारसरणीवरच अवलंबून असणार आहे.

चौथा कोनाडा's picture

9 Jan 2022 - 5:13 pm | चौथा कोनाडा

झकासच +१
💖
तुमचे भटकंती धागे भन्नाटच असतात !

@गोरगावलेकर, जर शक्य असेल तर प्रवासासाठी तुम्ही ज्यांच्याकडून गाडी बुक केलीत त्यांचा संपर्क क्रमांक देऊ शकाल काय?

गोरगावलेकर's picture

19 Mar 2022 - 2:25 pm | गोरगावलेकर

व्यनि केला आहे