मनातलं..खूप खूप आतलं…….!!
इतक्या वर्षानंतर सुद्धा तश्शीच आहे नव्हाळी
तशीच कोवळी
काही फांद्या झाल्या असतील थोड्याशा जुन्या…
पण आतला ओलावा मात्र अगदी तस्साच !
एक छोटंसं मोग-याचं फुल सतत आसपास असावं…
तसा तुझा सहवास
हवाहवासा, ताजा, गंधाळलेला
इतकी सवय झालीये ना त्याची !!
कधी हेच मोग-याचं फुल अबोली बनतं ना…
तेव्हा मात्र मन कावरंबावरं व्हायला लागतं
अबोलीच्या मनातलं काढून घेणं फार फार कठीण !
पण एकदा का ही अबोली बहरुन गुलाबाची टप्पोरी कळी झाली ना……
की सगळं जगच गुलाबी होऊन जातं माझं !
…..
…
आता हा गुलाब… आणखीनच डौलदार झालाय
डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा आलाय
केसातली ती चंदेरी वळणं…
कानावरचे थोडेसे रुपेरी केस…
जास्तच रुबाबदार दिसतो आहेस !
गालांवरच्या त्या दोन खोल खळ्यांमधे तर मी कोसळतेच आहे कित्येक वर्षापासून !
तुझ्या डोळ्यातली मिश्किली…. माझा श्वास आहे
माझं जगणं, मरणं त्यावर अवलंबून आहे
कायमच एक सखा होऊन राहिलास
माझं बालपण टिकवलंस
वेडेपण गोंजारलंस…
तारुण्य जपलंस….!!
अतिशय समृद्ध आणि तृप्त आयुष्य दिलंस मला
तुझ्या परिघातच आहे माझं जग सारं
ते असंच राहू दे.
तुझी सखी
प्रतिक्रिया
22 Apr 2009 - 6:51 pm | प्राजु
जयू ताई, अवि भावजींनी आज काय दिलंय तुला गिफ्ट म्हणून? ;) (ह. घे.)
पण मुक्तक छान झालं आहे. तुझ्या मनाचा गाभार असाच गुलाबांनी बहरत रहावा हीच त्या जगंनियंत्याला प्रार्थना. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Apr 2009 - 7:02 pm | क्रान्ति
खूप खूप सुरेख भावना जयवीताई!
=D>
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
22 Apr 2009 - 7:08 pm | चकली
कविता आवडली...खूप
चकली
http://chakali.blogspot.com
22 Apr 2009 - 7:48 pm | चतुरंग
चतुरंग
22 Apr 2009 - 8:06 pm | संदीप चित्रे
जोरदार साजरा झालेला दिसतोय ;)
मुक्तक आवडलं; विशेषतः
>> कायमच एक सखा होऊन राहिलास
माझं बालपण टिकवलंस
वेडेपण गोंजारलंस…
तारुण्य जपलंस….!! >>
22 Apr 2009 - 9:16 pm | शितल
जयवी ताई,
खूप खूप सुंदर..
खूप आतुन लिहिलेले आमच्या मनात ही खूप आत शिरले. :)
29 Nov 2012 - 10:49 am | ज्ञानराम
अप्रतीम
29 Nov 2012 - 11:11 am | जयवी
अरे....... इतक्या वर्षांनी हा धागा कसा काय वर आला :)
मनापासून धन्यवाद :)
29 Nov 2012 - 5:22 pm | प्यारे१
तुम्ही आता तरी प्रतिसादांना प्रतिसाद द्याल ह्या भावनेनं कुणीतरी वर काढला असावा. ;)
- वाळवंटातील उंटसुमार. :)
29 Nov 2012 - 7:43 pm | जयवी
:) ह्म्म ते ही खरंच :)