मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रोपगंडा (Propaganda)

टर्मीनेटर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

प्रोपगंडा (Propaganda)



१.

आपल्यावर लहानपणापासून विविध संकल्पना आदळत असतात. आपल्या पालकांकडून, शिक्षकांकडून, समाजातील मोठय़ा लोकांकडून, पुस्तकांतून, चित्रपटांतून, चित्रांतून, संगीतातून, मित्रांच्या गप्पांतून.. आणि आपण घडत असतो. दोन व्यक्तींसमोर सारख्याच प्रतिमा वा सारखेच शब्द ठेवले तरी त्याच्या मनात उमटणारे अर्थ वेगळे असू शकतात. याचे कारण ही घडण्याची प्रक्रिया. ती दोघांबाबत वेगळी असेल, तर एकास डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील टिप्पणी ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरीलच वाटेल, दुसऱ्यास त्यात वेगळाच वास येईल. एकास आकाशीचा चंद्र पाहून प्रेयसीच्या मुखकमलाची याद येईल आणि दुसऱ्यास भाकरीचा चंद्र आठवेल. यास काही लोक शिक्षणसंस्कार म्हणतात. तसेही शिक्षण हा चांगल्या व जुन्या अर्थाने प्रोपगंडाचाच भाग आहे. परंतु प्रश्न असा आहे की प्रोपगंडा चांगला वा वाईट असू शकतो? यास नेहमीच्या साच्यातील एक उत्तर आहे. ते म्हणजे हेतू हे कृतीच्या योग्यायोग्यतेचे परिमाण असते. परंतु प्रोपगंडा या शब्दाबाबत तसे म्हणता येणार नाही. याचे कारण त्याचा अर्थच बदललेला आहे. अनेक शब्द अशा प्रकारे आपल्यासमोर अर्थ-विपर्यास होऊन येत असतात. उदाहरणार्थ अचपळ. म्हणजे चपळ नसलेला. पण ‘अचपळ मन माझे..’ या पंक्तीत तो चपळ या अर्थाने आला आहे. ‘प्रपोगंडा’ या शब्दाचेही तसेच. इंग्रजी स्पेलिंगनुसार त्याचा उच्चार ‘प्रो-प-गं-डा’ असाच हवा. पण बोलीभाषेत तो म्हटला जातो प्रपोगंडा असा. तो उच्चार सुपरिचित. म्हणून नेणिवेच्या पातळीवरील संकल्पनाबोधात अडथळा न आणणारा.




२.

आपण प्रचाराच्या जाळ्यात अडकलेलो आहोत, हे वास्तव अनेकांसाठी सहन करण्यापलीकडचे असते. त्यामुळे ते नाकारण्याकडेच अनेकांचा कल असतो. किंबहुना प्रचार-प्रोपगंडा नामक काही असेल तर तो विरोधकांचा असतो. आपण ज्यावर विश्वास ठेवतो तो प्रचाराचा भाग नसतो, असे अनेकांना वाटत असते आणि त्याहून भयंकर म्हणजे प्रचार नामक काही नसतेच, असे वाटणारीही माणसे असतात. त्यांचे म्हणणे असे असते, की फालतू बुद्धिजीवी, विचारवंत, माध्यमवीर अशा मंडळींनी तयार केलेली ही हवा असून, प्रचार म्हणजे काय हे न समजण्याएवढे लोक काही दूधखुळे नसतात. लोकांना सारे काही नीट माहीत असते. त्यांना तुम्ही मूर्ख समजू नका, हे विधान त्यातलेच. परंतु प्रचाराचा इतिहास पाहिला तर एक बाब नीटच लक्षात येते ती म्हणजे असे म्हणणारे लोक प्रत्येक काळात होते आणि ते व्यवस्थित मूर्ख बनले होते. त्यातही मौज अशी की अडाण्यांपेक्षा उच्चशिक्षितच प्रचारास अधिक प्रमाणात बळी पडताना दिसले. जनसंज्ञापन आणि प्रचार या विषयातील तज्ज्ञ डॉ. ब्रायन अ‍ॅन्सी पॅट्रिक यांच्या मते, याचे कारण शिक्षण. ‘शिक्षणातून अनेकदा प्रचार केला जात असल्याने प्रचाराची शिकार होणाऱ्यांत अशिक्षितांपेक्षा उच्चशिक्षितांचे प्रमाण मोठे असते,’ असे त्यांनी म्हटले आहे.




३.

प्रचाराच्या इतिहासानेही हेच अधोरेखित केले आहे. हा इतिहास साधारणत: तीन टप्प्यांत मांडता येतो. यातील पहिला टप्पा ख्रिश्चन प्रचाराचा. सतराव्या शतकाच्या प्रारंभी पोप ग्रेगरी पंधरावे यांनी ‘प्रोपगंडाकरिताचे काँग्रेगेशन अर्थात धर्मसभा’ स्थापन केली. डॉ. पॅट्रिक यांनी या धर्मसभेचे वर्णन ‘प्रचाराचे पहिले जागतिक अभियान’ असे केले आहे. ही धर्मसभा एवढी प्रबळ होती की तिच्या प्रमुखपदी असलेल्या काíडनलला रेड पोप असे म्हटले जात असे. रेड – लाल हा रक्ताचा, हिंसेचा, युद्धाचा रंग आहे. ख्रिस्ती धर्माचा हा प्रचार विरोधात होता तो प्रामुख्याने ‘काफिरां’च्या, अधार्मिकांच्या आणि सुधारकांच्या. ख्रिस्ती धर्माचा प्रसार पाहता हा प्रचार किती प्रभावी होता हे लक्षात येते. या प्रचाराचे वैशिष्टय़ म्हणजे यातून सर्वानी एकाच तऱ्हेने विचार करावा, विचारांची एकरूपता साधली जावी असा ख्रिस्ती धर्माचा प्रयत्न होता. चर्च सांगेल तेच सत्य हाच ‘सत्याच्या शोधाचा मार्ग’ या प्रचाराने लोकांपुढे ठेवला होता. त्यात रोमन कॅथॉलिक चर्चला यश आले हे दिसतेच आहे. हे प्रचाराचे यश होते. प्रचार इतिहासाचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू होतो तो पहिल्या महायुद्धापासून.




४.

आजवर प्रचार – प्रोपगंडा म्हटले की लगेच मनात विचार येतो तो हिटलरचा. त्याला प्रचारयुद्धातील महारथी मानले जाते. पण त्यानेही त्याच्या ‘माईन काम्फ’ या आत्मचरित्रातून पहिल्या महायुद्धातील ब्रिटिश प्रचाराची स्तुती केली आहे. ‘यासंदर्भातील (म्हणजे प्रचाराच्या) व्यावहारिक धडे घेण्याची भरपूर संधी मला मिळाली, पण दुर्दैव असे की, ते धडे आपणांस चांगल्या पद्धतीने शिकविले ते आपल्या शत्रूंनी,’ हे हिटलरचे उद्गार ब्रिटिशांचा प्रचार किती प्रभावी होता हे सांगतात. तो प्रचार जितका थेट जर्मनीविरुद्ध होता, तितकाच तो अमेरिकेविरोधातही होता. ब्रिटिशांनी प्रचाराच्या जोरावर अमेरिकेला युद्धतटस्थता सोडण्यास भाग पाडले. त्याचबरोबर त्या प्रचाराने ‘पब्लिक है, यह सब जानती है’ हे मिथकही मोडूनतोडून टाकले. अमेरिकी लोकांनी काय जाणावे आणि जाणू नये, हे त्या वेळी ब्रिटिशांची प्रचारयंत्रणा ठरवीत होती. प्रचाराचा छद्मव्यूह कसा रचला जातो हे पाहण्यासाठी ते समजून घेतले पाहिजे..



२०१७ साली लोकसत्ता दैनिकातील प्रचारभान सदरात श्री. रवि आमले ह्यांची 'प्रोपगंडा' वर एक अतिशय अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण अशी लेख मालिका प्रकाशित झाली होती. वरील चार परिच्छेद त्या मालिकेतील पहिला भाग "पब्लिक है, यह सब जानती है..?" मधून घेतले आहेत.

पुढे त्या मालिकेतील लेख व अधिकच्या माहितीसह त्यांचे 'प्रोपगंडा' नावाचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. दैनिकातली लेख मालिका आणि पुस्तक अशा दोन्हींचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करतोय. अर्थात ह्या लेखाचा उद्देश परीक्षण वा समीक्षण नसून स्वैर मांडणीद्वारे पुस्तकाचा परिचय व शिफारस आणि लेख मालिकेतील सर्व भागांच्या लोकसत्ता.कॉम वरील लिंक्स वाचायला सोयीस्कर पडतील अशा प्रकारे सूचिबद्ध करणे एवढाच मर्यादित आहे.


  • आजची फॅशन - मग ती कपड्यांची असो, की विचारांची - येते कोठून?
  • कोणाची निर्मिती असते ती? कोणापासून सुरू होते ती?
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ती फॅशन का अंगीकारतो?
  • आपली मते खरोखरच आपली असतात का?
  • आपण जे वास्तव समजतो ते वास्तवच असते का?
  • सत्य मानत असतो ते सत्यच असते का?
  • की कोणीतरी भरवत असते ते सारे आपल्याला
  • एखाद्या संगणकाच्या प्रोग्रॅमप्रमाणे?

  • तसे नसेल, तर मग माणसांच्या झुंडी कशा निर्माण होतात?
  • या झुंडींना हवे तसे, हव्या त्या मार्गाने कसे वळविले जाते?
  • साधी साधी माणसे अचानक हिंसक का होतात?
  • बासरीवाल्याच्या मागे उंदरांनी जावे तशी एखाद्या नेत्याच्या मागे का जातात?
  • एखाद्या वस्तूचे, विचाराचे, नेत्याचे अवडंबर कसे माजविले जाते?
  • कसे बदल केले जातात समाजाच्या वर्तनात?

  • हे सारे करणारे असते तरी कोण?
  • अदृश्य सरकार. माईंड-बेन्डर्स. प्रोपगंडाकार!

  • ही कहाणी आहे या सगळ्याची.
  • अपमाहितीची, अर्धसत्यांची, बनावट वृत्तांची.
  • आपल्याला वेढून टाकणार्‍या प्रोपगंडाची.
  • त्याच्या तंत्र आणि मंत्रांच्या काळ्याकुट्ट,परंतु तेवढ्याच थरारक इतिहासाची.

▲ 'प्रोपगंडा' पुस्तकाचे मलपृष्ठ.


'प्रोपगंडा' ह्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर उल्लेख केलेल्या प्रश्नांची लेखकाने संदर्भ आणि रोचक उदाहरणांसहित दिलेली उत्तरे वाचताना आपल्याला गुंगून जायला होते. 'प्रोपगंडा' चे प्रकार आणि व्याप्ती समजून घेत असताना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, राजकीय आणि सामाजिक वातावरणाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो, त्यांचे नव्याने अर्थ लागतात.



लेखक रवि आमले
प्रकाशक मनोविकास प्रकाशन
ISBN 978-81-943491-5-0
पुस्तकाची पाने 380
बाईंडिंग पेपरबॅक
किंमत ४००/-

श्री. रवि आमले लिखित 'प्रोपगंडा' हे पुस्तक केवळ वाचनीय नसून संग्रहणीयही आहे.
खाली लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या ४६ लेखांची सूची देत आहे. सगळे लेख माहितीपूर्ण आहेत. आपल्यापैकी अनेकांनी हे लेख आधी वाचले असतील, परंतु ज्यांनी अद्याप वाचले नसतील त्यांना हे सर्व लेख वाचण्याची आग्रही शिफारस करत आहे.

विषेश टिप्पणी : गमतीची गोष्ट अशी आहे कि ही लेखमाला प्रसिद्ध करताना लोकसत्ताने निष्पक्षपणाचा आव आणत काँग्रेसवर थोडीफार टीका करत त्यांच्या संघ, भाजप, मोदीविरोधी अजेंड्याचा प्रचार मोठ्या चलाखीने केल्याचे चाणाक्ष वाचकांच्या नजरेतून सुटणार नाही! अर्थात हा छुपा प्रचार लक्षात येण्यासाठी 'प्रोपगंडा' हि काय चीज आहे हे आपल्याला व्यवस्थित समजावण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.











--X--


वाचन 27580 प्रतिक्रिया 0