श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (६)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in लेखमाला
17 Sep 2021 - 10:31 am

.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}

श्रीगणेश लेखमाला २०२१

आधिचा भागः श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (५)

परशुराम पुढे पुढे चालत होते.. ते गेले त्यादिशेने काही वेळ कृष्णा बघत बसली आणि मग तिची नजर सागराकडे वळली. तिच्याही नकळत ती तिथेच आडवी झाली आणि तिला झोप लागली.

समुद्राच्या गाजेने कृष्णाला जाग आली तेव्हा उजाडलं देखील नव्हतं. आकाशात अजूनही तारे लुकलुकत होते. आपण असे वाळूत का झोपलो आहोत; हे काही क्षण तिच्या लक्षात आलं नाही. पण मग एक एक कडी जोडत गेली आणि आदल्या रात्रीच्या प्रसंगांची साखळी तिच्यासमोर उभी राहिली. सगळं आठवून ती पटकन उभी राहिली आणि भराभर पावलं टाकत घराच्या दिशेने निघाली. ती घरी पोहोचली तरीही सिध्दार्थ झोपलेलाच होता. त्याला उठवण्या अगोदर तिने तिचं सगळं उरकून घेतलं आणि ब्रेकफास्टसाठी सांगून मग त्याला हाक मारली.

"वा मॅडम. उशिरा उठायचं आणि निवांत निघायचं ठरलं असूनही लवकर उठून एकदम फ्रेश तयार होऊन मला हाक मारते आहेस?" सिद्धार्थ म्हणाला.

शांतपणे सिध्दार्थकडे बघून कृष्णा म्हणाली; ''खूप काही सांगण्यासारखं आहे. म्हणून तयारच होऊन बसले. तू पटकन तयार होऊन खाली ये. तोवर ब्रेकफास्ट येईलच. टांगा देखील पोहोचेल."

तिचा आवाज थोडा सिरीयस आहे हे सिध्दार्थच्या लक्षात आलं. पण त्यावेळी काही न बोलता तो उठला. कृष्णा खाली आली आणि ब्रेकफास्टची तयारी नीट आहे न बघितलं. सिध्दार्थ आला आणि दोघे ब्रेकफास्ट करायला बसले.

"सिद्धार्थ, काल संध्याकाळी आपल्याला जी व्यक्ती भेटली होती...."

"Don't tell me Krushna.... seriously? तेच परशुराम होते? खरं सांगू... माझ्या मानत देखील त्यावेळी आलं होतं पण मी काही म्हंटलं नाही. पण तुला कसं कळलं? ओह... ती पेटी! श्लोक वाचलास का तू सकाळी? काय लिहिलं आहे?" सिध्दार्थ बोलायचा थांबत नव्हता. कृष्णाने देखील त्याला बोलू दिलं. तो शांत झाला आणि ती म्हणाली; "सिध्दार्थ, परशुराम मला भेटले. त्यांची identity त्यांनी माझ्यासमोर reveal केली."

क्षणभर सिध्दार्थला कळलं नाही की कृष्णा काय म्हणते आहे. पण लक्षात आलं आणि त्याच्या चेहेऱ्यावर आश्चर्य पसरलं. कृष्णाने त्याला शांतपणे आदल्या रात्रीची संपूर्ण घटना सांगितली. सिध्दार्थचा चेहरा अत्यंत समाधानी झाला.

"कृष्णा, खूप मोठी गोष्ट आहे ग ही. एक सांगू का? एक ऋषी कन्या गार्गी हिचं उदाहरण सोडलं तर आपल्याला अशी पुराण कालीन स्त्रियांची नावंच माहीत नाही ज्या पंडिता होत्या. त्याकाळात देखील स्त्रियांना पूर्ण शिक्षणाचा अधिकार होता. होणारे यज्ञ, होम-हवनं, धर्मचर्चा, वाद-विवाद यासोबतच युद्धभूमीवरील सर्व डावपेच त्यांना शिकवले जात असत. पण तरीही याविषयी फार बोललं जात नाही. कितीतरी उदाहरणं आहेत ग अशी. आपण सीतेला त्यागाची मूर्ती म्हणतो. अबला, सहनशीलतेची मूर्ती असंच बरंच काही.... सीता स्वयंवरमध्ये ज्या धनुष्याला रामाने प्रत्यंच्या बांधली आणि त्यावेळी ते धनुष्य मोडून पडलं ते परशुरामांचं होत हे तर आपल्याला माहीत आहे; पण ते राजा जनकाकडे कसं आलं याचा विचार किती लोक करतात? एक अशीही कथा आहे की राजा जनकाला परशुराम भेटण्यास आले होते त्यावेळी त्यांनी त्यांचं धनुष्य राजमहालाच्या बाहेरच ठेवलं होतं. काही वेळाने परशुराम बाहेर आले तर त्या धनुष्याशी सीता खेळत होती. तिने ते धनुष्य लीलया पेललं होतं... ते पाहून परशुरामांनी राजा जनकाला सांगितलं की या धनुष्याला जो प्रत्यंच्या बांधेल तो सीतेसाठी योग्य वर असेल. म्हणूनच तो पण स्वयंवरात ठेवला गेला.

अग, इतकंच का... त्या काळातील स्त्रियांना स्वयंवराचा अधिकार होता. स्वयं-वर. स्वतःचा वर निवडण्याचा अधिकार. आपण अंबा, अंबिका, अंबालिका किंवा अशी काही गिनीचुनी उदाहरणं देतो आणि म्हणतो की स्त्रियांचं अपहरण केलं जायचं. अग, पण आपल्याला माहीत असलेल्या कथांमधील पत्रांव्यतिरिक्त भारतवर्षात इतर कोणीच नव्हतं का? हिडिंबेने भीमाला choose केलं होतं... श्रीकृष्णाला द्रौपदीचं मन वळवायला लागलं होतं की तिने पाचही पांडवांचा पती म्हणून स्वीकार करावा. याचा अर्थ तिला चॉईस होता नकार देण्याचा! या सगळ्या उदाहरणांवरून हेच तर सिद्ध होतं की त्या काळात देखील स्त्रियांना मानाने आणि बरोबरीने वागवलं जात होतं. त्यामुळे मला मुळीच आश्चर्य वाटत नाहीय की परशुरामांनी तुला निवडलं त्यांचं मन मोकळं करायला.

अर्थात आपल्या मनातला मूळ प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे अजून. Why me? Or now we can say; why we?! अर्थात माझा परशुरामांच्या म्हणण्यावर विश्वास आहे; जर आपली निवड झाली आहे; तर त्याचं कारण देखील ठरलंच असेल; आणि योग्य वेळी कळेलच. बरं, चल निघुया न आपण?" असं म्हणून सिध्दार्थ उठला.

कृष्णाला सिध्दार्थच्या समंजसपणाचं कौतुक वाटलं आणि त्याच वेळी तिच्या मनात विचार आला.... सिध्दार्थ समंजस आहे याचं मला कौतुक वाटतंय हीच गोष्ट मुळात किती चुकीची आहे! सिध्दार्थच काय सर्वच पुरुषांनी त्यांची मानसिकता बदलणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि आम्ही स्त्रियांनी अशा एखाद्या सिध्दार्थचं कौतुक देखील करणं बंद करणं आवश्यक आहे. स्त्रीने शालीन असावं.... मग पुरुषाने का नाही? शालीनता म्हणजे लाजरी भाऊली नाही तर वागण्यामध्ये आदब असणं... स्वतःचा मान राखून दुसऱ्याला मानाने वागवण. मग असं तर पुरुषांनी देखील वागलं पाहिजे. पुरुष साहसी... स्त्रीला प्रोटेक्ट करणारे.... का? स्त्रीने स्ट्रॉंग असणं का नाही? स्वतःला सांभाळण्यात तिने समर्थ असावं की. मुळात दोघांनी पूरक असावं.... हे जास्त योग्य. कृष्णा अजूनही विचार करत बसली असती; पण सिध्दार्थने तिला हाक मारली आणि ती पटकन उठून बाहेर पडली.'

"कुठे जातो आहोत आपण?" टांग्यात बसल्यावर सिध्दार्थने विचारलं.

"surprise आहे रे. थोडा धीर धर की." कृष्णा हसत म्हणाली; आणि तितक्यात टांगेवल्याने मागे वळत सिध्दार्थला विचारलं; साहेब, जागृत हनुमान मंदिराकडेच घेऊ न सर्वात अगोदर?''

त्याचा प्रश्न ऐकून कृष्णाने कपाळाला हात मारला आणि सिध्दार्थ खळखळून हसायला लागला....

मंदिरातून दर्शन घेऊन दोघेही बाहेर पडले आणि सिध्दार्थने कृष्णाला विचारलं; "तू मुद्दाम.... ''

''Not exactly.... पण या मंदिराबद्दल ऐकलं आणि मनात आलं काय हरकत आहे इथे यायला? इतकंच! कृष्णा म्हणाली.

त्यानंतर वेगवेगळे समुद्र किनारे आणि असंच कोकणाचं निसर्ग सौंदर्य बघत दोघे फिरले. एका घरगुती खाणावळीमध्ये मस्त मासे आणि सोलकढी असं जेवण देखील घेतलं. दोघे घराकडे परतले. रात्री झोपताना सिध्दार्थ कृष्णाला म्हणाला; "मला वाटतंय आपण परत जावं. हे असं इतकं obvious करून काहीही होणार नाही आहे.''

कृष्णाला ते फारसं पटलं नाही. पण तिने वाद नाही घातला. जबरदस्तीने सिध्दार्थला इथे अडकवण्यात अर्थ नव्हता. मुळात हा प्लॅन बनवताना इथे चिरंजीवी भेटावेत असं तिच्या मानत नव्हतं... किंबहुना that was not her first priority... यानिमित्ताने दोघांनी एकत्र छान वेळ घालवावा; अशी तिची इच्छा होती. पण सध्या सिध्दार्थ अशा मूडमध्ये नाही आहे; हे तिच्या लक्षात आलं.

दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात कृष्णा तशी अबोलच होती. पुणे मुंबई एक्सप्रेस वे ला लागल्यावर सिध्दार्थने सहज कृष्णाला विचारलं; "ए, कालपासून ती पेटी तुझ्याजवळच आहे. एकदा बघ तरी त्यावर काही नवीन...."''

एकदम ताठ बसत कृष्णाने सिध्दार्थकडे बघितलं आणि सिध्दार्थच्या काळजात चर्रर्र झालं.

''मी ती पेटी काल पाहाटे समुद्रावर सोडून आले सिध्दार्थ!" कानात गरम तेल पडावं तसे ते शब्द सिध्दार्थच्या कानात शिरले. एक्सप्रेस वे असल्याने तो गाडी थांबवू शकत नव्हता.... पण आता त्याचं मन सैरभैर झालं होतं. कृष्णाला ते लक्षात आलं होतं. 'सॉरी, चुकले, परत फिरुया का' यापैकी कोणताही शब्द ऐकायच्या मनःस्थितीत सिध्दार्थ नाही हे तिच्या पहिल्याच क्षणी लक्षात आलं होतं.

सिध्दार्थने नकळत गाडीचा वेग वाढवला होता.

"सावकाश सिध्दार्थ. चूक होऊन गेली आहे. आपण शांतपणे त्यावरचा उपाय शोधायला हवा आहे." सिध्दार्थने घाट सुरू झाल्यानंतर देखील जेव्हा स्पीड कमी केला नाही तेव्हा न राहून कृष्णा म्हणाली.

तिच्या त्या शांतपणे बोलण्याने सिध्दार्थ एकदम भडकला; नकळत त्याची नजर तिच्याकडे वळली आणि.....

***

कृष्णाने डोळे उघडले तर तिला वर पांढरशुभ्र छत दिसलं. एका क्षणात पूर्ण भानावर येत ती ताडकन उठून बसली. तिच्या डोक्यातून सण्णकन् कळ गेली आणि डोळ्यासमोर अंधारी आली. ती परत पलंगावर आडवी झाली. तिची आई शेजारीच होती. ती तिच्या जवळ येऊन म्हणाली; ''कृष्णा, बेटा, तुला जाग आली न? कशी आहेस आता?''

''ममा, सिध्दार्थ? कुठंय तो?''
''अजिबात चिंता करू नकोस बेटा. शेजारच्या रूममध्ये आहे तो. अगदी व्यवस्थित आहे. तूच बेशुद्ध होतीस. तो पूर्ण शुद्धीत आहे. In fact accident नंतर गाडीतून उतरून मागून येणाऱ्या गाडीला त्यानेच थांबवलं होतं. पण त्याच्या हाताला फ्रॅक्चर झालंय आणि पाठीला बराच मार लागला आहे. Air bags open झाल्यामुळे दोघेही वाचला आहात.'' आईचं बोलणं ऐकून कृष्णा थोडी शांत झाली.

''मला नक्की काय-काय झालंय? डोक्याला मार आहे. बहुतेक टाके पडले आहेत; हे कळलंय. पण बाकी?'' कृष्णाने विचारलं.

''बाकी काहीही झालेलं नाहीय तुला. थोड्या वेळात दोघांनाही डिस्चार्ज मिळेल. तुझे पपा formalities पूर्ण करण्यासाठीच तर गेलेत.'' कृष्णाची आई तिचा हात हातात घेत म्हणाली.

"म्हणजे मी सिध्दार्थच्या रूममध्ये जाऊ शकते. ok. मॉम प्लीज मला थोडी मदत कर. त्याला प्रत्यक्ष बघितल्या शिवाय माझं मन स्वस्थ नाही होणार." कृष्णा पलंगावरून उठत म्हणाली. आपण काहीही सांगितलं तरी ही ऐकणार नाही; याची कल्पना असल्याने कृष्णाच्या आईने तिचा हात धरला आणि तिला बाजूच्या खोलीच्या दिशेने नेलं. कृष्णा आत गेली आणि तिची आई परत कृष्णाला ठेवलं होतं तिथे आली आणि तिने कृष्णांचं सामान आवरायला सुरवात केली.

''I am really so sorry Siddharth. मला खरंच कळतंय ती पेटी किती महत्वाची होती. ही चूक...'' कृष्णाचं वाक्य मध्येच थांबवत सिध्दार्थ म्हणाला, ''इतका विचार नको करुस कृष्णा; कदाचित आपल्याला येणारा तो जगावेगळा अनुभव आपल्यापुरता इथेच संपत असेल. म्हणून कदाचित तुझ्या हातून ती पेटी तिथेच राहिली असेल. आता परत त्या विषयावर नको बोलूया.'' कृष्णाने सिध्दार्थचा फ्रॅक्चर नसलेला हात हातात घेतला तिचे डोळे भरून आले होते. इतक्यात दोघांचेही आई-वडील खोलीत आले. "कृष्णला discharge मिळाला आहे. पण सिध्दार्थला अजून एक दोन दिवस ओबसर्वशन खाली ठेवण्याचा विचार आहे डॉक्टरचा. इतका मोठा अपघात होऊनही त्याला म्हणावं तसं काहीही झालेलं नाही; हे थोडं unusual वाटतंय त्यांना. So they are keeping him under observation.'' खोलीत येताच सिध्दार्थच्या वडिलांनी माहिती दिली.

''मग मीच थांबते त्याच्या सोबत इथे.'' कृष्णाचा आवाज इतका ठाम होता की तिच्याशी कोणीच वाद घातला नाही.

रात्रीचं जेवण आलं दोघांनी जेवून घेतलं आणि औषध घेऊन सिध्दार्थने डोळे मिटले.

कृष्णा देखील फ्रेश होऊन झोपण्याच्या विचाराने बाथरूममध्ये गेली. तिने हलक्या हाताने तोंड धुवायला सुरवात केली. कोमट पाण्याने ती हळूहळू चेहेरा शेकत होती. तिच्या नकळत वाफ समोरच्या आरशावर जमा होत होती; आणि त्यावर काही शब्द उमटत होते. कृष्णाने मान वर केली आणि तिला समोरच्या आरशावर उमटलेला श्लोक दिसला.

अवशप्त अस्य जायते तद्नंतरम् अनुभूत
तस्मात् अहम् किमर्थम् तादृश मह्यम् मिलति

त्या श्लोकावरून नजर ढळू न देता हाताशी असलेला मोबाईल उचलून तिने झट्कन त्या श्लोकाचा फोटो काढला. जणूकाही तिची नजर ढळली असती तर तो श्लोक गायब झाला असता. फोटो नीट आला आहे याची खात्री झाल्यावर ती झट्कन खोलीत वळली आणि तिने हलक्या आवाजात सिध्दार्थला हाक मारली. त्याला झोप लागली असली तर काय करायचं या विचाराने ती अस्वस्थ झाली होती. पण तिने सिध्दार्थला हाक मारली आणि त्याने डोळे उघडले. कृष्णाने हातातला मोबाईलमधला फोटो त्याच्या समोर धरला. ते काय आहे लक्षात येऊन सिध्दार्थ एकदम उठून बसला आणि कृष्णाला कळायच्या आत पलंगावरुन उतरून बाथरूमच्या दिशेने धावला. सिध्दार्थ पाठोपाठ कृष्णा देखील धावली.

अजूनही समोर श्लोक दिसत होता. सिध्दार्थचे डोळे भरून आले होते आणि तो त्या श्लोकाकडे टक लावून बघत होता. कृष्णा त्याच्या शेजारी उभी राहिली आणि तिने आरशाच्या दिशेने बघितलं. समोरचा श्लोक बघून तिचे डोळे मोठे झाले. त्क्षणी तिने परत एकदा समोरच्या आरशाचा फोटो काढला होता.

सार्वत्रिक सत्य विश्वास अस्तु भक्तिरुपात् निर्मित:!
तत् विश्वास निर्माणार्थम् अस्मात् चिरंजीवी जायते!

सिध्दार्थने तिला परत फोटो काढताना बघितलं आणि विचारलं; ''पहिला नीट नाही का आला?''

''अहं! सिध्दार्थ हा दुसरा आहे.'' कृष्णाने शांतपणे म्हंटलं.

''खरंच?''

''हो!''

''फोटो नीट आलेत?''

''हो!''

''चल न बाहेर. अर्थ समजून घेऊया.'' सिध्दार्थ म्हणाला आणि दोघेही बाहेर आले.

सिध्दार्थ पलंगावर बसला. अचानक केलेल्या हालचालींमुळे फ्रॅक्चर झालेल्या हातातून एकदम कळ आली आणि सिध्दार्थने कळवळून हाताकडे बघितलं.

''कृष्णा..... पटकन.... अजून एक फोटो काढ.''

कृष्णा पुढे झाली आणि तिने फोटो काढला.

सगळ्याच घटना इतक्या वेगाने झाल्या होत्या की दोघेही एकदम स्थितप्रज्ञ होऊन बसले. असेच काही क्षण गेले आणि अगोदर कृष्णा भानावर आली. तिने शेजारीच असलेलं हॉस्पिटलचं नोटिंग पॅड हातात घेतलं आणि सिध्दार्थ समोर ठेवून पेन त्याच्या हातात दिलं. सिध्दार्थने देखील पेन घेतलं आणि तिच्याकडे बघितलं. कृष्णाने पहिला फोटो उघडला आणि श्लोक मोठ्याने वाचला. काही क्षण विचार केला आणि सिध्दार्थकडे बघून म्हणाली "मला जो अर्थ कळतो आहे तो मी सांगते; तू लिही. मग तुझ्या मनातला अर्थ लिहू आणि compare करूया.'' सिध्दार्थने 'बरं' म्हणून मान हलवली आणि डोळे बंद करून कृष्णा अर्थ संगायला लागली.

समजण्यास अवघड परंतु सत्य आले की जो अपराध मागे घेता येत नाही तो समजून होऊ देणे म्हणजे पाप आहे. मी शापित झाल्यानंतर उपरती झाली; असा मी काबरं कोण मला भेटावं.

सार्वभौम सत्य विश्वास आहे जो भक्तितून निर्माण होतो; त्या विश्वासाच्या प्रचारार्थ मी चिरंजीवी आहे.

दोन चिरंजीवांना भेटताच जीवन रहस्य नक्की कळेल.

कृष्णाने डोळे उघडले आणि सिध्दार्थकडे बघितलं. सिध्दार्थ काही वेळ कृष्णाने सांगितलेले अर्थ वाचत होता. तो म्हणाला; ''मला देखील हाच अर्थ लक्षात येतो आहे ग. पण मग पुढे काय?''

बाथरूमच्या दिशेने एक अंधारा कोपरा होता तिथून गंभीर आवाज आला; ''बेटा, जर श्लोक आणि त्यांचे लावलेले योग्य अर्थ समोर आहेत तर त्याअनुषंगाने पुढे होणारी घटना देखील ओघाने आलीच न.''

सिध्दार्थ आणि कृष्णाने एकाचवेळी आवाज येत होता त्या दिशेने बघितलं.

अत्यंत सुदृढ असा एक पुरुष पुढे आला. सर्वसाधारण लोकांपेक्षा खूप जास्त उंची होती त्याची. सावळी कांती अत्यंत तकतकीत होती. दाढी-मिशीने संपूर्ण चेहेरा झाकलेला होता आणि तरीही त्याच्याकडे फार वेळ टक लावणं शक्य नव्हतं. सिध्दार्थ आणि कृष्णा दोघांची नजर खाली झुकली. इतक्यात खोलीबाहेर काहीतरी गडबड झाल्याप्रमाणे आवाज आला आणि अत्यंत स्वाभाविकपणे कृष्णाने उठून दार उघडलं. अनपेक्षितपणे समोर कोणीसं उभं होतं; ते बघून ती दचकली आणि मागच्या दिशेने धडपडली. त्या व्यक्तीच्या मागून नर्सचा आवाज आला; ''मॅडम तुम्ही ठीक आहात न? अहो, हे गृहस्थ आजच इथे ऍडमिट झाले आहेत. अपघात केसच आहे. मोठी जखम आहे कपाळावर. खरं तर त्यांनी आराम केला पाहिजे. पण माझं लक्ष नसताना दोन वेळा खोली बाहेर आले आणि आत्ता तर नजर चुकवून थेट तुमच्या खोलीत...''

नर्सचा आवाज कावरा-बावरा होता. कारण सिध्दार्थ म्हणजे मोठं प्रस्थ आहे याची तिला कल्पना होती. सर्वात मोठी आणि आरामदायक खोली त्याच्या वडिलांनी मुद्दाम मागून घेतली होती. त्यामुळे सिध्दार्थ-कृष्णा डिस्टर्ब झाले असते तर तिची काही खैर नव्हती. कृष्णा काही बोलायच्या आत खोलीमध्ये असलेले गृहस्थ काहीसे मोठ्याने म्हणाले; ''मॅडम, अहो ओळखतो आम्ही त्यांना. येऊ दे त्यांना आत.'' आत देखील कोणी अनोळखी व्यक्ती आहे हे पाहून नर्स अजूनच वैतागली. पण बडी मंडळी म्हणजे रुल्स तोडणारच असा विचार करून खांदे उडवून निघून गेली. कृष्णा दारातून बाजूला झाली आणि..... अश्वत्थामा खोलीच्या आत आले.

''तू ठीक आहेस ना अश्वत्थामा?'' कृष्णाच्या मागून आवाज आला आणि अश्वत्थाम्याने खाली घातलेली मान हलवून होकार दिला आणि तो एका बाजूस जाऊन उभा राहिला. कृष्णाला अचानक एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना सहन करणं अवघड वाटायला लागलं. ती झट्कन जाऊन सिध्दार्थच्या जवळ बसली.

हनुमंत मंद स्मित करून बोलायला लागले; ''मला कळतं आहे की सकाळपासून तुम्ही दोघेही ज्या अनुभवातून जात आहात त्यामुळे तुम्ही भांबावून गेला आहात. अत्यंत स्वाभाविक आहे ते. परंतु सुरू झालेली घटनांची शृंखला अशी मध्येच थांबवणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही इथे तुमच्या समोर उभे आहोत. सिध्दार्थ-कृष्णा येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही वेदव्यास ऋषींना भेटणार आहात. त्याच्या मुखातून बाहेर पडणारी शब्दरूपी मौत्यीके मनाच्या कुपीत जतन करून ठेवा. या भेटींचे प्रयोजन ते तुम्हाला संगतीलच. पण त्याअगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे... बेटा, त्रेता युग.... त्यानंतरचं द्वापार... दोन्ही युगं मी अनुभवली आहेत. त्यानंतर अनेक जिवशक्ती उदयास आल्या आणि ह्रास पावल्या. मात्र तुम्ही आज ज्याला भारत म्हणता अशी ही मानवधर्म सर्वोच्च मानणारी भूमी खूप प्रगत पावली आहे. तुमच्या इतका जास्त उदय झालेली संस्कृती दुसरी कोणतीही नाही. परंतु दुर्दैवाने बाह्य शक्ती मिळवण्याच्या नादात तुम्ही मानव आंतरशक्तीचा ह्रास करता आहात. तरीही मानवीय आयुष्य गणनेनुसार तुमच्या नंतरची तिसरी पिढी निसर्गाच्या होणाऱ्या ह्रासाचा अनुभव प्रत्यक्ष घेईल. मग तरीही आम्ही तुम्हाला का भेटतो आहोत. कारण होणाऱ्या बदलांमुळे तुम्ही सारासार विचारबुद्धी देखील गहाण ठेवायला सुरवात केली आहे. याचा अत्यंत वाईट परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो आहे. मूलतः तुम्ही मानव आयुष्यातील एक अत्यंत महत्वाची भावनिक गरज विसरता आहात. विश्वास!!! तुम्ही जितके शास्त्रीय दृष्टिकोनातून मोठे होत जाल तितके तुम्ही विश्वास या जीवनावश्यक सत्यापासून दूर जाणार आहात. त्यानंतर ह्रासाला सुरवात होईल आणि एकदा उताराला लागलेलं चक्र थांबवता येत नाही. विश्वास जर अढळ ठेवायचा असेल तर मनातील सत्यतेवर पूर्ण विश्वास ठेवा. विश्वास हा केवळ निस्सीम भक्तिमधून येतो; हे त्रिकालाबाधित सत्य देखील विसरू नका. माझ्या येण्याचं प्रथम प्रयोजन अश्वत्थाम्याला तुमच्या पर्यंत पोहोचवणं होतं; आणि आजच्या काळामध्ये ज्याची अवहेलना सतत होते असे भक्तीरूप तन-मनात साठवून आपल्या उद्दिष्टाशी तादात्म्य ठेवा मानवांनो!'' हनुमंत बोलायचे थांबले आणि त्यांच्या आवाजाने भारून गेलेली खोली तशीच उबदार ठेवून ते निघून गेले....

सिध्दार्थ आणि कृष्णाची नजर समोर एका कोपऱ्यात उभ्या अश्वत्थाम्याकडे गेली. काहीसा अंधारा असणारा कोपरा... झुकलेली नजर... काही क्षण तर असेच गेले.

''तुम्ही बसा न."न राहून कृष्णा म्हणाली.

"एक शाप म्हणून चिरंजीवित्व मिळालेला मी... ज्या कारणासाठी श्रीकृष्णाने मला हा शाप दिला ते कारण उराशी घेऊन एक एक दिवस जगतो आहे.''

''महात्मन, जी पुराण कथा आम्हाला माहीत आहे त्याप्रमाणे; आपल्या पिताश्रींचा कपटाने केलेला वध आणि आपला प्रिय मित्र दुर्योधन याचा झालेला मृत्यू यामुळे विवेकबुद्धिपासून दूर जात आपण ब्रम्हास्त्र पांडव पुत्रांवर सोडलंत. त्यांचा संहार आपण केलात म्हणून आपणास चिरंजीवित्वाचा शाप मिळाला. हे खरे आहे का?'' सिध्दार्थने अत्यंत आदरपूर्वक अश्वत्थाम्याला प्रश्न केला.

''हे अर्ध सत्य आहे वत्सा; आणि ते खोट्यापेक्षा देखील जास्त धोकादायक असतं. मी सोडलेलं ब्रम्हास्त्र परत घेण्याचे ज्ञान माझ्याकडे नव्हते. रागाच्या भरात त्याच्या शक्तीचा संपूर्ण विचार मी केला नाही आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्यावेळी उत्तरेच्या गर्भावर तो वार होणार होता त्यावेळी मी तिथून पळ काढला. माझ्या या कृत्यामुळेच मला चिरंजीवित्वाचा शाप मिळाला. मूलतः सद्सद विवेकबुद्धी दूर करून ज्यांचा मृत्यू झाला होता आणि जे स्वतःच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होते; ते केवळ माझे हृदया जवळचे होते म्हणून त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मी जे कृत्य केले ते अत्यंत निंदनीय होते. त्यातूनही पांडव पुत्रांवर ब्रम्हास्त्र सोडताना त्याच्या शक्तीचा अंदाज मला नव्हता... ही दुसरी गोष्ट आणि केलेल्या कृतीचे परिणाम स्वीकारण्याची मनाची तयारी नव्हती त्यामुळे मी पळून गेलो. यासर्वाचा परिपाक मला शाप मिळाला. जी चूक सुधारता येत नाही किंवा माफीच्या लायकीची नसते ती चूक म्हणजे महान पाप आहे. याची उपरती मला शाप मिळाल्यानंतर झाली. आज मी श्रीहनुमंतांसोबत तुम्हाला भेटायला आलो आहे; त्याचं कारण म्हणजे कदाचित तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. मात्र आपली सद्सद्विवेक कायम जागृत ठेवा आणि भक्तीरूप विश्वासाने आयुष्य कर्मीत करा हे सांगायला. मनात इच्छा असूनही मी माझ्या चिरंजीवित्व नाकारू शकत नाही हे दुखरं टोचर सत्य मी आयुष्यभर वागवतो आहे. तुम्ही अशा कोणत्याही पापाचे भागीदार होऊ नका... "

अश्वत्थअमा बोलण्याचा थांबला. सिध्दार्थ आणि कृष्णा त्याचं बोलणं मन लावून ऐकत होते. ते बोलायचे थांबले आणि सिध्दार्थ आणि कृष्णाचे डोळे आपोआपच मिटले गेले.

सकाळी जाग आली तेव्हा कृष्णा सिध्दार्थच्या कुशीत झोपली होती आणि खोलीमध्ये आशावादी स्वच्छ प्रकाश पसरला होता.

क्रमशः

श्रीगणेश लेखमाला २०२१

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

17 Sep 2021 - 2:27 pm | रंगीला रतन

वाचतोय.
पुभाप्र.

कॉमी's picture

17 Sep 2021 - 2:40 pm | कॉमी

हम्म.

इरसाल's picture

17 Sep 2021 - 2:51 pm | इरसाल

मी ही लेखमाला संपल्यावरच प्रतिसाद देणार होतो पण खालील वक्याने रहावले नाही.

हनुमंत बोलायचे थांबले आणि त्यांच्या आवाजाने भारून गेलेली खोली तशीच उबदार ठेवून ते निघून गेले....
हे वाचुन सरर्कन पुर्ण शरीरावर रोमांच उभे राहिले.
खुपच छान आणी भारी लिहीताय तुम्ही.

गॉडजिला's picture

17 Sep 2021 - 3:56 pm | गॉडजिला

खोलीमध्ये आशावादी स्वच्छ प्रकाश पसरला होता.

अत्यंत सुंदर...
पूर्वी सगळं किती मस्त मस्त न्यायी होतं... ते युगच वेगळं होते