मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अस्वल

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
का रागावलात हो बाबा माझ्यावर. मला न सांगताच निघुन घेलात. तीन दिवसांसाठी आजीकडे गेले, परत आले तेंव्हा दिसलाच नाहीत. फोन पण करत नाहीत तुम्ही. आधी कसे कॉलेजमधे पोचताच फोन करायचात. तुमचा फोन आल्याशिवाय मी शाळेत जायची नाही. 'ठकु' म्हणायचात तुम्ही मला. मला ते खुप आवडायचे. बाबा, मी सध्या कुणाशी जास्त बोलत नाही. आईशी सुद्धा नाही. आधी किती बड्बड करायची मी. ती पण किती बदलली आहे. तुम्ही असताना कुठे लिपस्टीक लावायची. आता भडक रंगाच्या लावते. आधी नेहेमी साडी घालायची. आत्ता कसले कसले गाउन घालते. सिनेमातल्या हिरॉइन सारखे मला नाही आवडत. शाळेतल्या 'मिस' म्हणतात ठकु तुझे लक्ष कुठे असते? काय करु हो बाबा, सारखे अस्वल डोळ्यासमोर येते. मला नाही वाटत तुम्ही निगुन गेल्याचे मम्मीला फारसे वाईट वाटले हो , बाबा आजकाल तीला आई म्हटलेले आवडत नाही. सगळच काही बदलले आहे हो बाबा, तुम्ही गेल्यावर आधी तुम्ही दोघे मला जवळ घेउन झोपायचा. एक हात तुमच्यावर एक आईवर. आता मात्र वेगळ्या खोलीत. हो, आता घर पण बदलले आहे आईने. १४ व्या माळ्यावर आहे हे घर. मला भिती वाटते हो. सारखे पडेन की काय ची. आधीचे बैठे घर किती छान होते. रात्री एकटे झोपताना तुमची खुपच आठवण येते हो बाबा. मग हळुच दप्तरातला तुमचा फोटो काढते. रात्री पहिल्या सारखी झोपत नाही मी. खुप वेळा दचकुन उठते. परत अस्वल डोळ्या समोर नाचायला लागते. शाळेत झोप येते. मिस एकदा रागावल्या. मग त्यांना अस्वलाबद्दल सांगितले. लगेच जवळ घेतले त्यांनी मला. कुरवाळले. डोक्यावरुन कितीतरी वेळ हात फिरवत होत्या. डोळ्यात पाणी होते. आधी आई घ्यायची ना तसे. आता माझा १ ला नंबर येत नाही. लक्षच लागत नाही अभ्यासात कानात अस्वलाचे हसणे घुमत असते सारखे. 'आताशा कुठे जगायला सुरु केले आहे' म्हणजे काय हो बाबा? आजीला म्हणत होती आई फोनवर तुम्ही किती शांत होतात. इंग्लीश चे प्रोफेसर असुन सुद्धा माझ्याशी मराठीत बोलायचात. म्हणायचात, 'शाळेतले पुरे' मातृभाषेशी नाते तोडायचे नाही. मग तुम्ही आपल्या ठकुशी का नाते तोडलेत हो. तुम्ही घरी आल्यावर हातपाय धुउन देवाची आराधना करायचात. ह्या घरात देव्हारा नाही आहे हो बाबा. त्या मुळे शाळेत जाताना देवाला पाया पडायचा प्रश्नच राहीला नाही. दर शनिवारी पार्टी असते ह्या घरात माझी रवानगी खोलीत. बाहेरुन बंद एकदा चुकुनु उघडा राहीला दरवाजा. मी बाहेर आले. सगळे जण खिदळत होते. घाणेरडा सिनेमा बघत होते. ड्रीक घेत होते. चहाटळ पणा करत होते. मी बाहेर आले म्हणुन अस्वलाला राग आला. खसकन हाताला धरुन परत खोलीत बंद केले. अजुनही हात दुखतो हो बाबा. बहुतेक माझी हकालपट्टी आजी कडे होणार असे दिसते. बरे, होईल. निदान अस्वलापासुन माझी सुटका होईल. मला सहनच होत नाही त्याचा वास रोज नवीन सेंट लावतो तो. पुरुष कधी एवढी पावडर लावतात का? किती सिग्रेटी ओढतो. मला श्वासच लागतो. आ़जी कडे गेल्यावर तुम्ही मला भेटायला याल का हो बाबा?

वाचन 3769 प्रतिक्रिया 0