मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

२१५

सारिका होगाडे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

२१५

(कृपया मानसिक त्रास होणाऱ्या लोकांनी हा लेख वाचू नये.) आंतरजालावर जी माहिती दिसते ती सगळी खरीच असते असे नाही आणि सर्व सत्य घटनांची माहिती आंतरजालापर्यंत पोहोचतेच असेही नाही. त्यापैकीच हे एक हत्याकांड आहे जे दशकानुदशके लपवून ठेवण्यात आले, घडत गेले, आणि कोणालाही त्याचा पत्ता नाही. स्थानिक लोकांनाही कळायला खूप वेळ लागला पण जेव्हा कळले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मात्र आज उघडपणे ही बातमी जगासमोर आली आहे आणि आंतरजालावर उपलब्ध आहे. कॅनडावरचा हा डाग मात्र कधीही धुवून निघणार नाही, असे दिसते. आज कॅनडामध्ये २१५ हा काळा आकडा आहे असे म्हणू शकतो. जून महिन्याच्या सुरुवातीला २१५ लहान मुलांचे शव एका शाळेच्या अंगणात सापडले. ही शाळा म्हणजे "रेसिडेन्शिअल स्कुल". ब्रिटिशांनी (यावर्षी मला समजले कि ते खरे ब्रिटिश नाहीच मुळी, ते तर जर्मन होते जे ब्रिटिशांचे नाव लावून गेली २-३ शतके राज्य करत आहेत.) जसे भारतात 'फोडा आणि राज्य करा' ही पद्धत वापरली, आपल्या संस्कृतीतील सर्व पुस्तके जाळली, गुरुकुल पद्धत बंद केली वगैरे सर्व आपल्याला माहीत आहे. जसे आफ्रिकेमध्ये सुदृढ तरुण आफ्रिकनला त्याच्या मुलासमोर मारले जात असे, जेणेकरून त्याच्या मुलाला पटते की आपल्या वडिलांपेक्षासुद्धा ही माणसे मजबूत आहेत आणि तो मुलगा पुढे जाऊन कधीही ब्रिटिशांबरोबर मारामारीचे विचार करत नाही. तसे कॅनडामध्ये त्यांनी काय पद्धत वापरली? बरीच शतके जे लोक आधीपासूनच इथे राहत होते त्यांना 'नेटिव्ह कॅनडिअन्स / इंडिजिनिअस / अबोरिजिनल' असे म्हणतात. त्यांची भाषा, राहण्याची पद्धत, अन्न, कपडे, सगळे काही वेगळे होते, सुंदर होते. एवढ्या थंडीमध्ये कसे राहायचे, निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाबरोबर कसे राहायचे, त्यांना खूप चांगले माहित होते आणि अजून बरच काही. साधारण १८५० च्या दरम्यान कॅनडा सरकार (= पोप + राणीचे राज्य) यांनी रेसिडेन्शिअल स्कुल बांधले आणि नेटिव्ह लोकांना मुलांना पाठवण्यास सांगितले. १८९४ पासून मात्र या लोकांना या शाळेत जाण्याची सक्ती केली गेली. ही शाळा ५ ते १८ वर्षांच्या मुलामुलींना सक्तीची होती. उन्हाळ्यात (जुलै- ऑगस्ट) २ महिने मुले सुट्टीत घरी जाऊ शकत होती. सप्टेंबरमध्ये मुलांना परत शाळेत येणे सक्तीचे होते. सक्ती म्हणजे काय केले जात होते? कॅनेडियन पोलीस घरी यायचे घ्यायला आई-वडिलांनी मुलांना नाही पाठवले, नाही जाऊ दिले तर त्यांच्या डोक्याला बंदूक लावून मुलांना घेऊन जायचे. मारामारीत पालक वारले आणि नंतर मुलेही शाळेत जाऊ लागली, अजून कोणाचा जीव जाऊ नये म्हणून. पालक मुलांना लपवून ठेवायचे पण हे नाझी सारखेच, त्यांना बरोब्बर मुलांचा वास यायचाच आणि यादीमध्ये असलेली सर्व मुले जोपर्यंत शाळेत पोहोचत नाहीत तोपर्यंत ते थांबत नव्हते. काय व्हायचे शाळेत? असे काय शिकत होती ही मुले? सर्वात आधी त्यांचे केस कापणे, अगदी बारीक असा कट करणे. शाळेने दिलेला गणवेषच घालणे. मुलांना घरची कोणतीही आठवण जवळ ठेवू दिली जात नव्हती. सर्व काही जाळून टाकले जात होते. कोणाशीही बोलताना इंग्रजीमध्ये बोलणे सक्तीचे होते. मुलांच्या मायबोलीत बोलणे, विचार करणे सुद्धा वर्ज्य होते. या शाळांचा एकाच उद्देश होता, नवीन पिढीला इंग्रजाळवणे. त्यांची मूळ संस्कृत नष्ट करणे. जेवताना पण सर्व हालच होते. रोज तेच तेच कोणालाही न आवडणारे जेवण दिले जात होते. मुलांनी ननचे ऐकले नाही तर कडक शिक्षा दिली जायची. उपाशी ठेवणे, मुलांना त्यांच्या शक्तीबाहेरची कामे सांगणे. शाळेच्या बाहेरही जाता येत नसे. या शाळा शहरांपासून खूप लांब बांधल्या होत्या त्यामुळे जवळ कोणीच भटकत नव्हते. चुकून कोणी आलंच तर शाळेच्या आत जाऊ शकत नाही कारण २४ तास सैनिक पहारा देत असत. तरीही बऱ्याच मुलांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, काही बंदुकीच्या गोळीने गेली तर काहींना पकडण्यात यश आले, अशा मुलांचे तर खूपच हाल केले जायचे. चाबकाचे फटकारे पासून ते बलात्कार आणि खून असे सगळे तिथे घडत होते. उपासमारीने मुले मारत होती. ऐकत नाही, पळून जातात किंवा अजून काही कारण असो, त्यांचा खूनही केला जात होता. शाळेत दिवसभर एकच शिकवले जायचे, देव एकच आहे आणि तो म्हणजे जीजस. त्याचीच प्रार्थना करायची आणि इंग्रजीमध्येच बोलायचे. या सगळ्या जाचातून जर मुले वाचलीच, आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी जाऊ शकली तर त्यांची काय अवस्था असणार आहे? चिडचिड, राग यातच २ महिने जायचे. आईवडील प्रयत्न करायचे त्यांना परत ठीक करण्यासाठी पण सगळे व्यर्थ. काही मुले आत्महत्या करायची. दरवर्षी १० महिने हे सर्व सोसणे आणि वयाच्या १७-१८ वर्षापर्यंत हे सोसणे, याचा त्यांच्या मनावर खूप परिणाम होत होता आणि दारू पिणे, ड्रुग्स घेणे याचा सहारा ती घेऊ लागली. १२वी नंतर आता पुढे काय याचा विचारही ते करू शकत नव्हते. संपूर्ण पिढी वाया जाऊ लागली. साधारण १९५० मध्ये लोकांमध्ये जागरूकता सुरु झाली. कारण या लोकांचा त्रास सुरु झाला, चोऱ्या, मारामारी, ड्रुग्स घेऊन पडून राहणे, भीक मागणे, ही लोकं असे का करतात याचा शोध घेण्यात आला आणि जागरूकता सुरु झाली. १९९६ मध्ये शेवटची रेसिडेन्शिअल स्कुल बंद करण्यात आली. (फक्त २५ वर्षांपूर्वी, बघा फार लांब नाही.) आज काय परिस्थिती आहे? यांच्या पुढच्या पिढीला पब्लिक किंवा प्रायव्हेट शाळांमध्ये इतर मुलांसारखेच छान वागवले जाते. पण आपली भाषा, आपली संस्कृती, याची त्यांना काहीच माहिती नाही आणि ती परत शिकण्यासाठी काहीही स्रोत उपलब्ध नाही. त्यांची संस्कृती संपूर्णपणे लोप पावलेली आहे. एका अर्थाने कॅनेडियन सरकारला (= पोप + राणी) जे हवं होत ते झालं आहे. एक उदाहरण: माझ्या सहकार्याच्या वडिलांना ज्या पोपने त्रास दिला होता इतकी वर्षे, तो त्यांच्याच घराजवळ राहतो आणि वडिलांनी त्याला बघितल्यावर त्याचा खूप कसा करावा हा एकच विचार त्यांच्या मनात होता. २-३ पिढ्यांचे जीवन त्यांनी बरबाद केले आहे. आता नवीन पिढी यातून बाहेर पडून जगण्याचा प्रयत्न करत आहे. कॅनेडियन सरकार आणि लोक ही बातमी वाचल्यानंतर काय पावले उचलत आहेत, याबद्दल पुढील लेखात सांगू शकते. हा लेख वाचल्यानंतर अनेक प्रश्न पडले असतील, ते तुम्ही खाली लिहा, मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. आज कॅनेडियन संस्कृती कशी आहे याबद्दल सांगायलाही आवडेल. २१५ नंतर अजून एका शाळेत शव सापडत आहेत. एकूण १५० रेसिडेन्शील स्कुल आहेत. जाता जाता अजून थोडं: शाळेत गणवेश घालणे ही संस्कृती आपल्याकडे इंग्रजांमुळे आली, तर इथे फक्त रेसिडेन्शिअल स्कुल आणि अनाथ मुलांची शाळा, याठिकाणीच गणवेश सक्तीचा आहे. खाजगी शाळांमध्ये गणवेश नाहीये. तुम्हाला जे कपडे आवडतात ते घालून तुम्ही शाळेत या, जी केशरचना आवडते ती करून तुम्ही शाळेत या. थोडक्यात तुम्ही तुमच्यावर जसे प्रेम करता तीच छबी घेऊन शाळेत या, हा उद्देश. भारतात आपण मुलांना शाळेत गणवेश घालून पाठवतो यामागे कुठेतरी त्यांना हा संदेश देतो की तुम्ही जसे आहात तसे शाळेत जाण्यास पात्र नाही, तुम्हाला बदलावे लागेल आणि तिथेच त्याच्या बालमनात सर्जनशीलता मरायला सुरुवात होते, खुंटत जाते. अधिक माहिती: https://en.wikipedia.org/wiki/Canadian_Indian_residential_school_system https://www.cbc.ca/news/canada/british-columbia/tk-eml%C3%BAps-te-secw%C3%A9pemc-215-children-former-kamloops-indian-residential-school-1.6043778 https://www.cbc.ca/news/canada/saskatchewan/cowessess-marieval-indian-residential-school-news-1.6078375 धन्यवाद.

वाचन 13255 प्रतिक्रिया 0