मधाळलेल्या कुण्या मिठीची...
लेखनविषय:
मधाळलेल्या कुण्या मिठीची
चव लाघवी पीठीसाखरी,
झळा भोवती वैशाखी तरी
गोड सावली आम्र पाखरी.
एकच पुरतो कटाक्ष तिरका
नजर अशी की तिख्खी मिर्ची,
पेटवते मग रंध्रांध्रातून
अन्वर ज्वाला आसक्तीची.
दातांचा तो चिमणी चावा
करकरीत जणु कैरी कच्ची,
शिरशिर अंगी हवीहवीशी
कशी लपावी नाजूक नक्षी?
स्पर्श असा की शामक अमला
तनामनाचा दाह उतारी,
कषाय जणू तो प्याल्यामधला
क्षणात देतो कशी उभारी.
खट्ट्या मिठ्ठ्या श्वासांमध्ये
शब्द बिचारे हरवून जाती.
नमकीन काही घडून जाते
अर्थ उगाचच शोधत बसती..
वाचन
6236
प्रतिक्रिया
0