डॉन लोकांना मुंबईचे प्रेम अफाट. कींबहुना डॉन फक्त मुंबईवरच राज करतात, ऐकलात का कधी चैन्नैचा डॉनाण्णा कींवा कोलकात्याच्या डोनबाबू? भाई किंवा डॉन शोभतो मुंबईतच. मग अशा ह्या मुंबैतल्या बॉलीवुडाला मुंबैच्या गँगस्टरांचे प्रेम जरा जास्तच. कसा का असेना, काही का करेना आणि कसा का मरेना, पिक्चरमध्ये त्याला हिरो बनवणे म्हणजे गल्ल्याची फुल्ल वसूली. स्टार्टींगला गरीबीत झालेला अन्याय, तेंव्हाही साथ देणारे यार दोस्त, अन्याय करणार्याचे हात पाय तोडून किंवा जीवे मारुन केलेला प्रतिकार, ह्या प्रतिकाराच्या गेटपासवर अंडरवर्ल्डात झालेली एन्ट्री, दुशमनोका दुशमन दोस्त ह्या न्यायाने वाढलेले नेटवर्क, कमाई, व्यसने, जीव लावणारी आयटम अथवा हिरवीन कींवा टू इन वन, "फॅमिलीको बीचमे नई लानेका, जबान, उसूल, फर्ज, वादा अशा जिर्यामोहर्या सोबत थोडी सर्व धर्म सम्भावाची फोडणी, त्यात शिंदे पाटील कुलकर्णी अशा तत्सम मराठी आडनावाचे भ्र्ष्ट पोलीस आणि राजकारणी मंडळी, त्यांच्या आपासातल्या टिपा किंवा एखाद्या दगाबाजीने चार पाच डॉयलॉग हाणत द एन्ड ची पाटी ओढायची. ह्याच रेसिपीवर मस्तान झाला, वरदा झाला, डॅडी झाला, माया झाला, मन्या झाला, कासकराचा पोरगा तर वेगवेगळ्या रुपात, वेगवेगळ्या कारवायात दाखवून झाला. आता आला अमर नाईक.
मुंबई सागा ह्या सव्वादोन तासाच्या छळवादात ८० ते ९० च्या दशकातली मुंबईतला गँगस्टर अमर नाईकाची कथा ह्याच मसाल्यात घोळलेली आहे. बॉलीवुडकरांचे आर्ट डायरेक्टर आणि इतर वेषभुषा वगैरे बघणारे पब्लिक पिरियड पिक्चर करताना टाईमलाईन ह्या गोष्टींना फारसे महत्त्व देत नाहीत हे आधीही सिध्द झालेले पुन्हा सिध्द झाले आहे. रस्त्यावर चार पाच अॅम्बेसेडर आणि सायकली दिसल्या आणि फ्रेम जर सेपीया केली की काळ ४० वर्षे मागे जातो इतकेच त्यांना माहीत. भले मग त्यातली अॅम्बेसेडर इसुझु हे १९९२ ला आलेले मॉडेल १९८० चे म्हणून खपून जाते.
बरं वाहनांचं सोडलं तरी जुन्या इमारती मुंबईत काही तशाच अवतारात शिल्लक राहिल्यात म्हणून खालच्या मजल्यावरचे डिजिटल बोर्ड दिसावेत तेही ८० च्या दशकात? कपडे आणि हेअरस्टाईलचे तसेच. भाषा आणि शिव्याही आधुनिक असताना नुसते मोठे कल्ले ठेवले की ८० साल दिसावे म्हणजे फारच. परवाच आलेला बिग बुल काय किंवा इथे काय. डिटेलिंग आणि अभ्यास फक्त हिरोच्या स्टाइलमध्ये.
अर्थात चित्रपट संजय गुप्ता सारख्या दिग्दर्शकाचा म्हणजे काय बोलायचे. ज्याची जंदगी संजूबाबा, सुनीलआण्णा, जॉनभाई सारख्या अभिनयमाठांना नुसते स्लोमोशनमध्ये चालवून आणि फायटिंगच्या नावाखाली पालापाचोळा उडवण्यात गेली तेथे काळ, कथा आणि कॅरेक्टरचा अभ्यास म्हणजे ह्यॅ ह्यॅ ह्यॅ. आठवा तो अंगावर काटे आणणारा कांटे. पात्रांच्या केवळ इंट्रोवर घातलेला एक तास आणि उरलेल्या दीड तासात त्याच पात्रांनी केलेली हॉलीवुडी प्लॉटची केलेली बॉलीवुडी माती. आठवा तो संजूबाबाची स्टायलिश व्यसने ग्लोरीफाय करण्यासाठीच काढलेला मुसाफिर आणि जिंदा. ह्या मुंबई सागातही पात्रे तशीच येतात, स्टाइल मारतात आणि स्टाइलीत मारतात मरतात. सत्य कहाणीवर आधारीत म्हणले तरी गुप्तासायबांना मूळ कथेशी देणेघेणे नसते.
कथा मुंबईची म्हणल्यावर बॉलीवुडकरांनी मराठीची एक केलेली तर ओघाने आलेच. पकिया, गोटीया, मानिया हे तर आम्ही फार आधीच स्वीकारले आहे. मांजरेकर अन अमोल गुप्तेसारखी काही मंडळी बोलतात मराठी पण बाकीच्यांचे काय? सुरुवातच अमर नाईकाचे नाव चक्क अमर्त्य राव. अहो इथे काय भाईगिरीतले नोबेल मिळवायचेय काय? का कोथरुडात भाईगीरी करायचीय? नाव काय तर अमर्त्य म्हणे. मांजरेकर एकटे त्याला अमर म्हणतात. बाकीचे अमरत्या. सुरुवातीला वाटते तसे हे राव पण आडनाव नाही बरं का. आडनाव नाईक. ते ही त्याचा भाऊ अर्जुन नाईक म्हणून आपणाला कळते. तर अशा ह्या कथेत जॉन आण्णा असतात अमर्त्या नाईक, ते मन्या सुर्वेचा सिक्वल आणि वेलकम बॅकमधला अज्जूभाई चा प्रिक्वल, टोटली सत्यमेव जयतेचा इक्वल असा अमर्त्या नाईक साकारतात. बापाचा जड आणि घोगर्या आवाजाचा रेकॉर्ड मोडणारा प्रतिक बब्बर अर्जुन नाईकाच्या भुमिकेत. बाळासाहेबाची टोटल कॉपी भाऊं ह्या नावाने खपवणारे महेश मांजरेकर, चाळीस पन्नास करोडांमुळे आणि सेक्रेड गेमामुळे माहीत झालेले गायतोंडे नाव धारण केलंय अमोल गुप्त्यांनी. सगळ्यात टॉप म्हणजे इम्रान हाश्मीसाहेब आहेत सावरकर. दचकू नका मंडळी. विनायक सावरकर नाही तर विजय सावरकर. हे विजय साळसकरांशी साधर्म्य असलेले एकमेव आडनाव दिग्दर्शकाला सापडल्याबद्दल त्याला मार्सेलिसला पाठवावे की अंदमानात हाच प्रश्न प्रत्येक मराठी माणूस विचारेल.
बाकी ओळखीच्या मंडळीत गुलशन ग्रोव्हर नारी खान, रोहीत राय, आकाश खुराना, समीर सोनी आणि एका फ्रेमपुरता सुनीएल शेट्टी. चार पाच फ्रेमापुरती आपली काव्या...सॉरी काजल अगरवाल. ती हि सिंघमच्या चौथ्या पाचव्या सिक्वेलात काम करावे इतक्या सहजतेने कुंकू टिकली काही न लावता मिसेस नाईक बनते. एक दोन फ्रेमपुरती अंजना सुखानी मिलमालकाच्या सुनेच्या भुमिकेत. खेतान मिलचे नाव तेच ठेवले आहे आणि त्या मिलच्या जागेच्या पैशाबाबतीत सगळा गोंधळ आहे हे आपण समजोन घ्यायचे. ह्या गोंधळाला दिलेले संगीताचे बाप अमर मोहिले आणि योयो हनीसिंग म्हणल्यावर म्युट करुन पाहायचे का ते तुम्ही ठरवा.
सुरुवातीला भाजी विक्रेत्याकडून पक्षी नाईक कुंटुंबाकडून हप्ता घेताना तक्रार, गुंडांना हाणणारे जॉन नाईक, मग जेल, तेथे गायतोंडे, व्हाया गुल्लु शेट्टी टू भाऊ. धाकट्या भावाला लंडनला पाठवणे, तो परत येणे, त्यामध्येच येणारे पोलीस इन्पेक्टर सावरकर. बरेच इकडे तिकडे करुन भावाची परत लंडन्ला रवानगी करताना सावरकरांनी केलेला अमर नाईकांचा एन्कांटर इतकीच कथा असताना काही प्रसंग मात्र डोळ्यात पाणी आणण्याइतपत हसवतात. उदाहरणार्थ पिक्चरातल्या सेनाप्रमुखाच्या म्हणजे भाऊंच्या युवाशाखेत युवा सावरकर चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्ण गणवेशात ध्वजप्रणाम करताना(फोटोत) दिसतो. आता ह्या प्रसंगात काही क्रिप्टिक कॉन्ट्रोव्हर्शिअल असल्यास चित्रपटावर बंदी आली असती पण बंदी घालायची मागणी केली ती अमर नाईकाच्या वहीनीने हे जास्त क्रिप्टीक. ती मान्य झाली असती तर जास्त कॉन्ट्रोव्हर्सी झाली असती आणि कोरोनाच्या सागात डुबलेला हा सागा कदाचित तरुनही गेला असता.
असा छळवाद सोसायची हौसच असेल, सगळ्याच्या घरी नेट आहेच आता बहुधा आणि वर्क फ्रॉम होम आहेच तर प्राईमवर आहे. थेटरात काही जायची सोय नाही तेंव्हा ह्या सीझनचा एखादा आयपीएल एपिसोड बळी देऊन बघण्यास हरकत नाही.
प्रतिक्रिया
28 Apr 2021 - 2:14 pm | योगी९००
हा हा... मस्त चिरेफाड केली आहे. वास्तविकता दाखवायच्या नादात दर दहा वाक्यांनंतर दोन-चार शिव्या, फकाफक ओढलेल्या बिड्या, आधी देशी व नंतर विदेशी पिणारा हिरो, धंदा करणार्या बायका आणि तिकडे हिरोने केलेला हिरोगिरी हे पण असल्या चित्रपटात असते.
28 Apr 2021 - 2:40 pm | भीमराव
खबरदार अण्णाला माठ म्हणाल तर, दोन-चार वेळा ये धरती मेरी मॉं है फेकून मारेल आण्णा.
28 Apr 2021 - 3:29 pm | राजेंद्र मेहेंदळे
का कुणास ठौक, फार एण्ड ह्यांच्या चित्रपट समीक्षेची आठवण आली. गिरणगावातील गुंडगिरीवर ईतके उत्तमोत्तम चित्रपट आधीच पाहिले असल्याने हा नक्कीच पाहणार नाही. वेळ वाचवल्याबद्दल आभार.
28 Apr 2021 - 4:01 pm | गॉडजिला
एकदम सॉल्लिड.
28 Apr 2021 - 6:13 pm | रंगीला रतन
भारी!
बघणार हा सागा. आपल्याला आवडतात असले बिनडोक पिक्चर बघायला :)
28 Apr 2021 - 6:41 pm | मदनबाण
सुनीलआण्णां चे नाव वाचताच त्यांचा दिव्या भारती सोबतचा बलवान हा चित्रपट आठवुन ड्वाळे पाणावले बघा ! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Naa Romba Busy... :- Vasuvum Saravananum Onna Padichavanga
28 Apr 2021 - 8:12 pm | अभिजीत अवलिया
छान परीक्षण.
28 Apr 2021 - 9:07 pm | अनिंद्य
मातृभगिनी एकत्रीकरण :))))
शीर्षकापासूनच सिक्सर, खूप दिवसांनी खूप हसलो. आवडलय !
लिहीत राहा सुरिया.
28 Apr 2021 - 9:30 pm | तुषार काळभोर
हा पिक्चर माहिती आहे?
नव्वदीच्या दशकात असले लई पिक्चर असायचे. बालनाट्यातील मेकअप दर्जेदार वाटावा , असे हनुवटीला केस चिकटवून दाढी वाढविलेले ' अभिनेते' असायचे.
मुंबई सागाचं पोष्टर तसं वाटतं.
28 Apr 2021 - 9:26 pm | लई भारी
चिरफाड आवडली :-)
बरीच वाक्य quote करण्यासारखी आहेत त्यामुळे सगळा लेख केला आहे असे समजावे.
वेळ वाचवल्याबद्दल धन्यवाद :-)
28 Apr 2021 - 10:44 pm | सुरिया
वाचक आणि प्रतिसाद दात्यांचे खूप खूप आभार.
29 Apr 2021 - 12:39 pm | आंद्रे वडापाव
भंगार चित्रपट ...
परंतु
हा लेख उत्कृष्ट ...
29 Apr 2021 - 12:59 pm | मुक्त विहारि
डाॅन म्हणजे फक्त चंद्रा बारोटचा...
29 Apr 2021 - 5:36 pm | चौकस२१२
हॉलीवुडी प्लॉटची केलेली बॉलीवुडी माती.
लै भारी मग तर आता तर ती खाल्लीच पाहजे ( माती हो)
30 Apr 2021 - 3:19 pm | Bhakti
चांगल लिहलय.
असले बंडल सिनेमा बनवतातच का?
संगीताचे बाप अमर मोहिले आणि योयो हनीसिंग म्हणल्यावर म्युट करुन पाहायचे का ते तुम्ही ठरवा.
ना ना अशा साउंड आणि बिनडोक लिरीकमुळे चार squats जास्त होतात..
मचेगा मचेगा.. शोर :)
1 May 2021 - 2:48 pm | चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... !
लै भारी पोस्टमॉर्टेम !
😂
6 May 2021 - 11:06 pm | फारएन्ड
धमाल लिहीले आहे. लेखाच्या नावावरून पटकन लक्षात येत नाही :)
या असल्या चित्रपटांचा पॅटर्न, संजय गुप्ता व स्लो मोशन वगैरे कोट्स जबरी आहेत, आणि चपखलही.
6 May 2021 - 11:29 pm | आंद्रे वडापाव
,आम्हाला वाटलं तुम्हीच डुआयडी घेवुन लिहलंय...
7 May 2021 - 12:33 am | सुरिया
अरे वाह, फारेंड साहेबांकडून कौतुक म्हणजे आकाशालाच हात टेकले आमचे.
धन्यवाद फार एंड सर.
सर्व साक्षेपी वाचकांचे आणि मिपकरांचे आभार.
धन्यवाद
7 May 2021 - 9:39 am | सुबोध खरे
सिनेमाचा आणि वास्तवाचा एकमेकांशी दुरान्वयेही संबंध नाही.
शोले मध्ये वीरू ज्या अजस्त्र पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्यतेची धमकी देतो त्या टाकीत वीजच नसलेल्या रामगड गावात पाणी कसे चढवता येईल इतका बाळबोध प्रश्न सुद्धा दिग्दर्शकाला सुचला नाही.
मग बाकी सगळं बॉली वूड हा तद्दन बाजारच आहे.
सिनेमात दर वर्षी एखादाच चांगला सिनेमा येतो बाकी सब घोडे बारा टक्के.
बाकी आपण परीक्षण छान लिहिलं आहे
8 May 2021 - 4:52 pm | बबन ताम्बे
भारी परीक्षण लिहिलेय . तद्दन डोकं बाजूला ठेवून पाहण्याच्या लायकीचा दिसतोय . पकीया, मनिया, गोटीया .... हा हा हा !
9 May 2021 - 6:27 pm | मराठी कथालेखक
चित्रपट बेकारच आहे.. पण शिवसेना गप्प कशी हे आश्चर्य आहे ? की एकाही शिवसैनिकाने अजून पाहिला नाही ?
9 May 2021 - 6:33 pm | मराठी कथालेखक
मला वाटते खरे नाव खटाव मिल होते... त्याच्या मालकाची हत्या झाली होती. पण ती अमर नाईक टोळीने केली होती की गवळी टोळीने ? मला आता नेमके आठवत नाही.. नेटवर त्याकरिता आता अधिक वेळ घालवण्याची इच्छाही नाही :)
10 May 2021 - 9:35 am | आंद्रे वडापाव
अमर नाईक टोळीने हत्या केली, गवळी टोळी ला आर्थिक हादरा देण्यासाठी...
10 May 2021 - 3:59 pm | सौंदाळा
गवळीने मिल विकायला युनियनची परवानगी मिळवण्यासाठी स्व्तःचा नातेवाईक (भाचा?) सचिन अहिर खटाव मिलच्या युनियन्मधे घुसवला होता.
हा अहिर २००९-२०१४ दरम्यान शिवसेनेचा आमदार होता. अश्विनची बायको नीता शिवसेनेतर्फे नगरसेवक म्हणुन निवडुन आली होती
संदर्भ - भायखळा ते बँकोक
10 May 2021 - 3:31 pm | सुरिया
हो, खटाव मिल्सच. १९९४ ला सुनीत खटाव ची हत्या झाली गँग्स्टरांकडून. ती जागा १४५ करोडला विकली गेली असे म्हणतात. मुंबईतली लोकेशन आणि जागेची व्याप्ती पाहता ही रक्कम खोटी असावी.
10 May 2021 - 3:20 pm | स्वराजित
छान लिहलय