कोणतीही स्त्री कुठेही जात असली, कुणाला भेटत असली, कुठंही उपस्थित असली तरी तिला एक प्रश्न हमखास विचारला जातो, किमान काही काळापूर्वीपर्यंत विचारला जायचा, तो म्हणजे "तुमचे मिस्टर काय करतात?"
हा प्रश्न विचारला जातो सहज, पण जणू त्या स्त्रीची संपूर्ण "औकात" जोखण्यासाठी विचारल्यासारखा हा प्रश्न असतो. ह्या एका प्रश्नाच्या उत्तरावरुन तिचं संपूर्ण स्टेटस विचारत्याला कळतं.
नवरा डाॅक्टर, इंजिनिअर असेल तर फारच उत्तम. प्रथम श्रेणी, प्रथम पसंती.
"आम्ही तिकडे (यूएस, युरोप आदि) ला असतो. आत्ता इकडे इंडियात आई गेल्या म्हणून आलोय." हे उत्तर म्हणजेही उच्च दर्जा. म्हणजे परदेशातही राहतात शिवाय प्रसंगी परत येऊन क्रियाकर्मही करतात म्हणजे फारच श्रेष्ठ. एरवी परदेशात मुले म्हणजे अगदी "शेवटचे पाणी तोंडात घालायलाही आली नाहीत हो पोरे.." अशी कृतघ्न मानण्याची सरसकट पद्धत दिसते.
"मिस्टर" याऐवजी काळानुसार यजमान, हे, नवरा, हबी वगैरे बदल झाले असतील, पण प्रश्न टिकून आहे.
"मिस्टर" बिझनेसमन म्हणजे सारखा कामात असणार आणि ही रिकामटेकडी बसणार. किंवा आल्यागेल्याची सरबराई करणार.
मिस्टर क्लार्क आहेत, किंवा लायब्ररीयन आहेत वगैरे वगैरे अगदीच बाद. जिचे मिस्टर कापड दुकानदार, किंवा टेलरिंगचं काम करतात, ते भले पैसे बरे मिळवत असतील, तरी बाई बिचारी.. पण ड्रेस डिझायनर किंवा फॅशनमेकर असतील तर एकदम ग्लॅमरस.
जशी बाईची "गुणवत्ता", तसा तिला नवरा मिळणार. म्हणजे खूप मुलींच्या बाबतीत त्यांची गुणवत्ता त्या कोणता नवरा मिळवतात त्यावर ठरणार. त्यांची स्वतःची ओळख काहीच नाही असं चित्र भासायला लागतं. तिची गुणवत्ता, तिचं कौशल्य, टॅलेंट,शिक्षण या सर्वांची किंमत फक्त एक चांगला नवरा मिळवण्यासाठी जणू..!!
माझ्या एका मैत्रीणीचा नवरा तिच्यापेक्षा कमी शिकलेला होता. त्यावरुन त्यांना खूपच टोमणे सहन करावे लागले. तू अमक्याशी लग्न केलं असतंस तर तू आज अमेरिकेत असतीस. असं सुनावलं जायचं. माझ्या ऑफिसमध्ये माझ्या एका कलिगचा नवरा तिच्यापेक्षा वयाने सहा वर्षांनी लहान होता. रुढ अर्थाने जोडपं विजोड समजलं जायचं, पण तरी त्यांचा संसार सुखाचा झाला. माझ्या ओळखीच्या एका मुलीनं नवऱ्याला अटच घातली की लग्नानंतर आपल्याला मूल होता कामा नये. मला मुलं आवडत नाहीत. त्यानं ती अट मान्य केली. त्यांचा संसार सुखाचा झाला. माझी एक नातेवाईक स्त्री नोकरी करुन पैसे मिळवायची आणि तिचा नवरा घर सांभाळायचा. आज काही सेलिब्रिटीज मध्येही अशी उदाहरणे सापडतात. पण हे झाले अपवाद. दोन सुशिक्षित स्त्रिया भेटतील.त्या राजकारणावर, सामाजिक प्रश्नांवर बोलतील, चालू घडामोडींचा आढावा घेतील. पण त्या एकमेकींना एकदा तरी जरुर विचारतील,"तुमचे मिस्टर काय करतात? तुम्हाला मुलं किती? मुलगा आहे का? दोन्ही मुलीच? मुलं काय शिकतात?"
स्त्रीची प्रापंचिक बाजू जाणून घेतल्याशिवाय समाजाला गप्प बसवत नाही. (पुरुषाला मात्र सुदैवाने त्याच्या बायकोबद्दल असे बारीकसारीक तपशील विचारले जात नाहीत. )
त्यातून ती स्त्री परित्यक्ता, घटस्फोटिता, विधवा असेल तर विचारुच नका. ती लगेच"बिचारी"होते.
माझ्या ओळखीचे एक गृहस्थ विधुर होते. ते म्हणाले की "मला ही गेल्यावर सगळेजण एकच विचारतात की, तुमच्या मिसेस गेल्या तर आता तुम्ही तुमच्या जेवणाचं काय करता?"
याउलट एखाद्या विधवेला विचारतात,"तुमचे मिस्टर नाहीत तर तुम्हाला एकटीला घरात झोपताना भीती वाटत नाही?" किंवा जरा बेताची आर्थिक स्थिती असेल तर "आता तुमच्या उत्पन्नासाठी तुम्ही डबे वगैरे बनवून का देत नाही?" म्हणजे आणि पुरुषाचं काम कमावून आणून तिचं रक्षण करणं इतकंच आणि स्त्रीचं काम जेवायला घालणं इतकंच. पूर्वी मोठ्या प्रमाणात हे खरं असेल, पण समाज इतका प्रगत झाला, परिस्थिती बदललीय तरी हे डोक्यात फिट्ट बसलंय.
स्त्री नवऱ्यापेक्षा जास्त पैसे मिळवत असेल,जास्त कर्तबगार असेल,तर "तुमचे मिस्टर काय करतात?", ह्या प्रश्नाचं उत्तर उगीचच वेदनादायक होऊन बसतं.
माझी एक वयानं माझ्यापेक्षा लहान अशी मैत्रीण आहे. तिनं तिच्या नवऱ्याला सोडलंय. घटस्फोट घेतला नाहीय. पण ते एकत्र राहत नाहीत. ती त्याचं नाव लावत नाही. ती कलाकार आहे, कलंदर आहे आहे. कला शिकवते आणि अगदी परदेशात जाहीर कार्यक्रमही करते. तिला कुणी विचारलं की तुझे मिस्टर काय करतात? तर ती काहीही सुचेल ते उत्तर देते. "ते स्मगलर आहेत, ते चोर आहेत, दारु गाळण्याचा धंदा करतात, अवैधरित्या शस्त्रास्त्रांचा व्यापार करतात. वगैरे वगैरे. हे सगळं ती चक्क शांत चेहरा ठेवून बोलते. मला तिच्या ह्या ब्लॅक ह्यूमरची कधी कधी गंमत वाटते. आणि हे उत्तर ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून हसू येते.
प्रतिक्रिया
30 Mar 2021 - 5:12 pm | चित्रगुप्त
आज्जी, तुमचे हे काय करतात?
हे आधी सांगा, त्यावरुन प्रतिसाद काय द्यायचा ते ठरवता येईल.
30 Mar 2021 - 5:16 pm | चौथा कोनाडा
खतरनाक उत्तर !
30 Mar 2021 - 5:45 pm | रंगीला रतन
+१
हे उत्तर लैच आवडलं आणि लेख पण.
30 Mar 2021 - 5:51 pm | अभिजीत अवलिया
+1
30 Mar 2021 - 7:02 pm | Bhakti
भारी उत्तरं!
31 Mar 2021 - 1:37 pm | गोंधळी
+१
30 Mar 2021 - 5:25 pm | गणेशा
माझ्या ओळखीचे एक गृहस्थ विधुर होते. ते म्हणाले की "मला ही गेल्यावर सगळेजण एकच विचारतात की, तुमच्या मिसेस गेल्या तर आता तुम्ही तुमच्या जेवणाचं काय करता?"
हा हा हा ..
30 Mar 2021 - 7:08 pm | नेत्रेश
कींवा एकदा बनवलेले दोन वेळा खातो :) :)
30 Mar 2021 - 5:33 pm | मुक्त विहारि
पुरुषांच्या बाबतीतल्या काही गोष्टी .....
1. शाळेत शिकत असतांना, वडीलांच्या कर्तुत्वा प्रमाणे, शालेय श्रेणी मिळते.
2. नंतर पगाराप्रमाणे, सामाजिक श्रेणी.
आणि
3. मुलांच्या कर्तुत्वा प्रमाणे, सामाजिक श्रेणी.
--------
ही सामाजिक मानसिकता आहे आणि ती तशीच राहणार...
30 Mar 2021 - 6:13 pm | कंजूस
जवळीक आली की तुलना होते, मापं काढली जातात आणि हेतू साध्य झाला नाही की खजुराच्या बी सारखे फेकतात. सोशल डिस्टन्सिंग पाळा हे सर्वच विषाणूंना लागू असते.
30 Mar 2021 - 7:03 pm | मुक्त विहारि
आर्थिक स्तर बघून, संबंध ठेवणार्या मंडळींना, दूरच ठेवणे उत्तम...
सूधा मुर्ती आणि अभिनेत्री, यांच्यात हाच फरक आहे...
30 Mar 2021 - 7:19 pm | श्रीगुरुजी
माईंचे हे काय करतात / करीत होते, हे जाणण्याची उत्सुकता आहे.
30 Mar 2021 - 9:49 pm | विंजिनेर
हा हा.. तो एक कधी न सुटणारा गूढ प्रश्न आहे.. मुदलातल्या माईतरी "अगं" आहेत का "अरे" हेच एक कोडं आहे.
30 Mar 2021 - 9:54 pm | श्रीगुरुजी
हहपुवा
30 Mar 2021 - 11:44 pm | चामुंडराय
>>> मुदलातल्या माईतरी "अगं" आहेत का "अरे" हेच एक कोडं आहे. >>>
अरेच्या, असे आहे होय?
"माईसाहेब कुरसुंदीकर आणि नानासाहेब नेफळे" अशी सौ. आणि श्री. जोडी मी इतके दिवस समजत होतो.
31 Mar 2021 - 3:58 am | सुक्या
खिक्क् !!!
(चामुंडराय .. नमस्कार घ्या :-))
31 Mar 2021 - 8:14 am | श्रीगुरुजी
खूप हसलो
30 Mar 2021 - 7:49 pm | उपयोजक
आवडेश!
30 Mar 2021 - 10:20 pm | सरिता बांदेकर
मस्त लिहीलंय.
मी खूप वेळा एकटीच सिनेमा, नाटकाला जाते. तेव्हा पण मला काही लोक विचारतात, तुमचे मिस्टर.....
मोठा पॅाज् असतो नंतर
मग मी पण अशीच अतरंगी उत्तरं देते
31 Mar 2021 - 12:15 pm | अनिंद्य
लेखन आवडले. साथीदारावरून कोणाचीही किंमत परस्पर ठरवणे चुकीचे आणि क्रूर आहे.
.... "ते स्मगलर आहेत, ते चोर आहेत, दारु गाळण्याचा धंदा करतात, अवैधरित्या शस्त्रास्त्रांचा व्यापार करतात. वगैरे वगैरे. हे सगळं ती चक्क शांत चेहरा ठेवून बोलते...... हे बेस्ट !
आपल्याकडे लोकांना समोरच्याला लेबल चिकटवायची / कम्पार्टमेंटलाईझ करायची फार घाई असते. रंग गोरा असणे, केस कुरळे असणे, कपाळावर बिंदी नसणे -असणे, वेशभूषा, आडनाव ...काहीही कारण पुरेसे असते. I hate it ..... स्त्रियांच्या बाबतीत हे दुप्पट होत असावे.
10 Apr 2021 - 1:15 pm | आजी
चित्रगुप्त- माझे हे कैलासात असतात. तिथून ते माझं रक्षण करतात. (आणि त्रास देणार्यांच्या मानगुटीवर बसतात. हा हा).
चौथा कोनाडा-"ते स्मगलर आहेत."हे उत्तर तुम्ही म्हणता तसे खतरनाक आहे खरं!
रंगीला रतन-उत्तर आणि लेख दोन्ही आवडलं म्हणता! समाधान वाटलं.
अभिजित अवलिया, Bhakti, गोंधळी - आभारी आहे. धन्यवाद.
गणेशा-माझ्याकडूनही"हा हा हा!"
नेत्रेश-नेत्रेश यांनी गणेशला उत्तर दिलंय.
मुक्तविहारी-तुमचा मुद्दाही अगदी बरोबर. अगदी बरोबर बोललात.
कंजूस-तुमचं म्हणणं पटलं.
श्रीगुरुजी-तुमच्या प्रश्नाला सुरुवातीलाच उत्तर दिलंय.
विंजनेर- धन्यवाद आणि शुभेच्छा.
श्रीगुरुजी-धन्यवाद.
चामुंडराय-कशी फजिती झाली!
सुक्या-आभारी आहे.
उपयोजक-तुम्हांला लेख'आवडेश?'माझ्याकडून 'आभारेश'.
सरिता बांदेकर-द्या टाळी!
अनिंद्य-तुमचं म्हणणं पटलं.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
10 Apr 2021 - 2:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजी लेख आवडला, शेवट ख़ासच. लिहिते राहावे.
-दिलीप बिरुटे
10 Apr 2021 - 3:35 pm | मोगरा
छान लिहिले आहे.
शेवट छान
10 Apr 2021 - 3:38 pm | मोगरा
खरे तर कालच वाचलेलं हे लिखान, पण विचार करत होते.
इतका साधा प्रश्न पण त्यामागे काय विचारसरणी असते अशी.
आणि मग प्रतिसाद द्यायचा राहिला नंतर गडबडीत.
म्हणुन आता पोहच पावती दिली
4 May 2021 - 5:10 pm | राघव
हलकं फुलकं, खुसखुशीत अन् तरीही विचार करायला लावणारं लेखन. आवडलं. :-)
7 May 2021 - 5:06 pm | Cuty
आजींचं लिखाण वाचलं की माझा मूडच चेंज होतो !☺